Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

संघर्ष… एक यशस्वी वाटचाल | लेखक वैभव चौगुले,सांगली

सुधा मूर्ती, नारायण मूर्ती, Sudha Murti, Narayan Murti,

"इतकं सोपं नसतं जीवन जगणं! सुख वाटेला येईल हे विसरून जायचं आणि कष्टासोबत दु:खाशी दोस्ती करायची !" हो करावीच लागते यात तिळमात्र शंका नाही. खूप चेहरे वाचले, खूप दु:खाची पडताळणी केली. दु:खाच्या डोहाला फक्त सुखाची किनार असते…दु:खाची लाट फक्त किनारी स्पर्श करून पुन्हा परतते.

        खूप जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. कर्ता म्हणून वावरत असताना चेहर्‍यावर हसू बळचं आणावं लागतं जबरदस्तीने खोट्या वाक्यावरही हसावं लागतं! कोणीही कुणाच्या मनासारखं वागत नाही. आणि कोणीही असं वागण्यास बांधीलही नाही. किती धावपळ करत असतो मनुष्य! शांत मनानी विचार केला तर मिळतं काय यातून? कोणता आनंद आपण मिळवण्यासाठी इतकी पळापळ करत असतो हेच मला कळत नाही.

        भीती, कोण काय बोलेल का, असं केलं तर तसं होईल, मी करतोय ते जगाला आवडेल काय? जग यावर काय म्हणेल? किती डोक्याचा भुगा करून घेऊन विचारांचं वादळ सतत डोक्यात भिरभिरत ठेवायचं हेच कळत नाही. सत्य स्वीकारायची ताकत ठेवायचीच आणि मी ती ठेवतोच! काही इलाज नाही. औषधांनी शरीर जपता येईल, पण मन जपता येणार नाही. मन जपायला काय हवं असतं, हे मी सांगण्याची गरज मला भासत नाही!

        हळवं राहून उपयोग नाही, किती लोक किती प्रकारचे भेटतात. स्वार्थ डोक्यात ठेवून वावरत असतात. मला काय तुम्हालाही याचा अनुभव आलाच असेल, हे शंभर टक्के सत्य आहे. प्रामाणिक राहतं कोण? जरा विचार करून बघा आपल्याशी जोडलेली नाती किती प्रामाणिकपणानी ते नाती जपतात, नाही ना जपत? हेच सांगतोय मी, प्रत्येक माणूस प्रत्येक माणसांच्या मनासारखा वागूच शकत नाही.

        स्वभावाला औषध नसतं हे शेवटी खरं, तारेवर चालण्याची जशी कसरत असते आणि ही कसरत आपण करत तारेवर चालतोही, पण तोल जात असताना सावरतो कोण? कोणी नाही, त्यावेळी जवळ कोण असतं का? छे!, आणि जवळ जर कोणी असेलच, त्यांनी तोल सावरलाच तर मी ते भाग्य समजेन! अपवाद असू शकतो जसे वाळवंटात पाणी सापडल्यासारखं, असेलही कदाचित आणि असे घडावे ही चांगलीच गोष्ट आहे.

        सरळ चालणार्‍या दिशाही भरकटतात येथे माणसांच काय घेऊन बसलात? मी करतोय ते योग्य आहे हाच आत्मविश्वास सर्वसाधारण आहे. हे उघडच कितीतरी वेळा सिद्ध झालं आहे. थोडीच नाती असावीत मग ती रक्तातली असो व जोडलेली, मानलेली पण शेवटापर्यंत टिकणारी, जपणारी राहावीत, असे प्रत्येकालाच वाटतं, पण घडतं का असं सांगा बरं? एखादं उदाहरण लगेच सांगाल? नाही सांगता येणार. मला माहीत आहे कारण मी मा‍झ्या अनुभवावरून सांगतोय आणि हे तुम्हालाही मान्य करावेच लागेल, मी म्हंटलं आहे सत्य स्वीकारण्याची ताकत ठेवा ठेवावीच लागेल, सवय लावून घ्या… जगावे कसे हा पुन्हा प्रश्नच? पण हा प्रश्न न बाळगता, यावर विचार न करता, जगणे शक्य आहे ते कसं… मी एक गोष्ट सांगू इच्छितो… ती अशी…

        सन १९६० च्या दशकामध्ये एक युवती अभियांत्रिकी कॉलेजला प्रवेश घेते. त्या अगोदर कोणत्याही युवतीने तिथे प्रवेश घेतला नव्हता. साधारण सन १९६० हे दशक म्हणजे महिलांचे रहाणीमान एकदम साधं होतं लांब वेणी, केस बांधलेली अशा बंधनात राहणाऱ्या मुली एकीकडे व ही मुलगी जिचा बॉबकट असायचा, अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी एकशेसाठ मुलांच्यामध्ये एकटी शिकणारी मुलगी होती. ही शिकत असताना तिला खूप त्रास सहन करावा लागला. तरीही तिचा प्रत्येक परीक्षेत रिझल्ट अव्वल असायचा, अशा संघर्षात तिने अभियांत्रिकी पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर तिने टेल्को कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला पण कंपनीने सांगितले येथे फक्त मुलांना परवानगी आहे. मुलींना आम्ही या कंपनीमध्ये घेत नाही असा कंपनीचा नियम आहे.

        या विषयावर ती मुलगी गप्प राहिली नाही. तिने 'जे आर डी टाटा जे टेल्को' कंपनीचे मालक यांना तिने, पत्र लिहले व पत्रात असे नमूद केले होते की, आपण नेहमी भविष्याचा विचार करता मग स्त्री आणि पुरूषामध्ये हे अंतर व भेदभाव का करता? आपल्या कंपनीमध्ये मुलांनीच नोकरी करायची का? मुलींनी का नाही? असा सरळ सरळ प्रश्न होता. यावर तिला मुलाखतीसाठी कंपनीमध्ये बोलावण्यात आले आणि तिच्या बुद्धिमत्ता चाचणीवर तिला कंपनीमध्ये नोकरी मिळाली.

        किती हा आत्मविश्वास! तिच्यामध्ये व संघर्ष करण्याची ताकत यावरून दिसून येते. काही दिवसांनी तिचे लग्न झाले. तिचे पतीही नोकरीच करत होते. थोडा कालावधी उलटल्यानंतर तिच्या पतीने, तिला सांगितले की मला नोकरी करायची नाही. माझा बिझनेस करायचा प्लॅन आहे. माझ्याकडे बिझनेसचा प्लॅन तयार आहे. पण योग्य तितकी लागणारी रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. यावर तिने बचत केलेल्या रक्कमेमधून दहाहजार रूपये पतीला बिझनेससाठी देण्याचे ठरवले व असं सांगितलं की तुम्हाला तीन वर्षाचा कालावधी आहे. जर तुम्ही तीन वर्षात बिझनेसमध्ये यशस्वी झाला नाही तर तुम्हाला पुन्हा नोकरी करावी लागेल. मी घरातले सर्व व्यवहार बघेन मी घराची जबाबदारी पार पाडेन असं तिने पतीला सांगितले. यावर तिच्या पतीने होकार देत राहत्या घरालाच ऑफिस बनवले आणि सोबत असलेल्या सहकार्याबरोबर बिझनेसला सुरूवात केली…

        घरची जबाबदारी पेलवत असताना पैसे अपुरे पडू नयेत म्हणून त्यांनी 'Walchand group of industry ' सोबत 'senior system analyst' चं काम सुरू केले. अशी जबाबदारी पार पाडत संघर्ष करत त्यांची वाटचाल चालू होती. त्यांच्या पतीचा बिझनेस यशस्वी झाला. त्यांचं स्वप्न पूर्ण झाले. ते यशस्वी उद्योजक झाले. आणि ही कंपनी म्हणजे आपल्याला माहिती असलेली आय टी क्षेत्रात नावाजलेली “INFOSYS” आणि ही युवती म्हणजे “सुधा मूर्ती ” व ते यशस्वी उद्योजक म्हणजे “नारायण मूर्ती” हे आहेत.

        सुधाजी एवढं करून थांबल्या नाहीत. त्यांनी जे आर डी टाटांची भेट घेऊन आपण नारायण मूर्ती सोबत बिझनेसमध्ये काम करणार आहे असं सांगितले. त्यावर जे आर डी टाटांनी त्यांना एक सल्ला दिला की, तुमच्या गरजा भागवून तुमची काही शिल्लक रक्कम राहत असेल तर ती सामाजिक कार्यामध्ये खर्च करा. कारण या लोकांच्यामुळेच आपण यशस्वी झालो आहोत किंवा होत असतो. हा सल्ला त्यांचा विचार सुधाजींच्या मनात घर करून राहिला. त्या प्रेरित होऊन गेल्या. त्यानंतर सन १९९७ साली सुधाजी Infosys foundation trustee मधील एक होत्या, ज्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला पैकी एक झाल्या होत्या.

        आजही साध्या पद्धतीने त्या जीवन जगत आहेत. सामाजिक कार्य म्हणून सुधाजींनी लोकांसाठी हॉस्पीटल, कॉलेज, शाळा, अनाथ आश्रम, शौचालये, ३५०० पेक्षा जास्त वाचनालये उभी केली आहेत. सुधाजींनी Women Empowerment Public hygiene Art & Culture Education व Health Care यासाठी अनमोल योगदान दिलेले आहे. तसेच सुधा मूर्ती या Best Selling Writer ही आहेत. लहान मुलांची पुस्तके, शॉर्ट स्टोरी, टेक्नीकल बुक्स, २४ नॉव्हेल्स यांचा यामध्ये समावेश आहे.

        अशा संघर्षमय यशस्वी व्यक्तिमत्वाला माझा सलाम आहे. संघर्ष करून सुधाजींनी त्यांचे जीवन यशस्वी करून दाखवले आहे. मग आता मला सांगा संघर्षाशिवाय जीवन आहे का? बिलकूल नाही. कष्टाला पर्याय नाही आणि संघर्ष हा करावाच लागतो. गर्दीतून बाजूला व्हायचं असेल आणि आपल्या मनासारखे जगायचं असेल तर वेगळी वाट स्वत:ला स्वत:साठी तयार करावी लागेल व यशस्वी व्हावे लागेल… चला तर मग नवी दिशा, नवी वाट, नवे ध्येय निवडू आणि आपले जीवन यशस्वी करू…

- वैभव चौगुले, सांगली 
  ९९ २३ १० २६ ६४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या