Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सोनचाफा | रहस्यमय कथा | सौ.हेमा येणेगूरे, पुणे

#भयकथा, #भुतांच्या कथा, #रहस्यमय कथा, #लावसट कथा, #Bhutachi Katha,

सोनचाफा

    रजतने डोळे मिटले, गाढ झोप लागली आणि ते भयानक स्वप्न पडले. तो दचकून उठला, त्याला त्या सोनचाफ्याचा वास येऊ लागला. तो उठून गॅलरीतून खाली पाहू लागला. पाचव्या मजल्यावर फुलांचा वास कसा येऊ शकतो हे कळेना. त्यातच त्याला आठवले, सोनचाफा काय, साधा चाफासुध्दा आपल्या सोसायटीच्या आवारात नाही की गार्डन मध्ये नाही. मग हा वास कुठून येतोय ? थोड्या वेळाने तो वास कमी झाला. तो परत झोपी गेला. त्याला ते परत भयानक स्वप्न पडू लागले. त्या स्वप्नाचा आणि आताच्या जीवनाचा काही संबंध होता का ? काही कळेना. स्वप्नात त्याला दिसले. तो एका जंगलात दरीच्या काठावरून चालतोय. सर्वत्र काळोख, नीरव शांतता इतकी की समोरून वा मागून कोणी आले तर त्याच्या पावलांच्या आवाजाने भीती वाटावी. त्याच्या श्वासांच्यामधे बाहेर होणार्‍या प्रक्रियांचासुध्दा आवाज येत होता. इतक्या भयान शांततेत काहीतरी भयान असल्याची त्याला जाणीव होत होती. चालून चालून त्याला धाप लागली होती. थंडी वाजू लागली होती. तो मटकन खाली बसला. शेकोटी पेटवली आणि एक आकृती त्याच्याकडे सरकताना दिसू लागली. तो घाबरून पाहू लागला. ती आकृती जवळ आली आणि गायब झाली. परत सोनचाफ्याचा वास येऊ लागला. तो घाबरून पळू लागला. परत धाप लागून थांबला तसा कुत्रे, मांजर यांचा समोरासमोर झालेला कल्लोळ, पक्षांचा अचानक अंधारात झालेला किलबिलाट आणि वटवाघळांचा कर्कश आवाज येऊ लागला. कानठळ्या बसतील असा जीवघेणा आवाज ऐकू येऊ लागला. तो त्याला ऐकायला असह्य होऊ लागले. तो परत पळू लागला. आता आपला ऊर फुटतोकी काय असे वाटू लागले. तेवढ्यात‌ मागून‌ आवाज आला, थांब रजत कुठे चालला. रजत घाबरून पळायला लागला आणि तो दरीत कोसळला. कोसळताना तो जोरात ओरडला. तेवढ्यात त्याचा हात कोणीतरी पकडला. त्याचे डोळे उघडले गेले. तर शेजारी झोपलेली माधवी उठून बसली होती. ती घाबरून त्याला उठवत होती. तिने त्याचा हात पकडला होता. तो थोडावेळ गांगरला. तो उठून बसला. त्याला वाटले हे स्वप्न होते पण त्याच वेळेला सोनचाफ्याचा वास दरवळू लागला. त्याला काहीच कळेना. कोण असेल ती आकृती मा‍झ्याच का स्वप्नात येते कळत नाही.

        पहाटेचे चार वाजले होते, त्याने माधवीला झोपायला सांगितले, आपण एक भयानक स्वप्न पाहिले होते असे सांगितले. तो गॅलरीत आला तेथे परत त्याला सोनचाफ्याचा वास येऊ लागला. त्याला आता झोपच येत नव्हती. त्याने ठरवले की उजाडले की तो संपूर्ण भाग धुंडाळून काढेल आणि त्या सोनचाफ्याचे झाड शोधेन. तो साडेपाच वाजेपर्यंत गॅलरीत आराम खुर्चीत बसून राहिला. माधवी अजूनही झोपली होती. तो उठला हळूच रुमबाहेर आला. मुलांच्या खोलीत डोकावून पाहिले. ते मस्त झोपले होते. आज रविवार असल्याने उठायची गडबड नव्हती. तो बाहेर सगळा परिसर पिंजून काढला पण त्याला सोनचाफा कुठेही आढळला नाही. तो थकून मंदिराच्या आवारात येऊन बसला. तेथील पुजार्‍याने काय झालं विचारले, त्याने रात्री घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले, हा काही वेगळाच प्रकार दिसत आहे. तुम्ही कोणाला धोका काही दिला नाही ना, किंवा तुम्ही काही घडताना पाहिले नाही ना, कारण तो आत्मा तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा बदला घेतोय. पण रजतला या अशा गोष्टींवर विश्वास नसल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पुजार्‍याने काहीतरी मंत्र पुटपुटत एक दोरा हातात बांधला आणि म्हणाला हा कधी सोडू नका. तो काही बोलला नाही आणि घरी निघून गेला. रजत घरी आला तर माधवी उठलेली होती. काय रे रजत आज एवढ्या लवकर उठला. रविवार‌ होता ना, झोपायचं थोडा वेळ, रात्री ‌कसला गोंधळ झाला. पूर्ण झोप पण झाली नसेल तुझी. रजत फक्त हसला. त्याच्या डोक्यात गुरूजींचे वाक्य फिरत होते. तो खुर्चीवरून उठून अंघोळ करायला निघाला आणि त्याचे आपल्या अंगाकडे व पायाकडे लक्ष गेलं. खूप ठिकाणी खरचटलं होतं. पायाच्या अंगठ्यातून रक्त येत होते. हे कधी झालं. बाहेर जाताना मी तर कुठे पडलोही नाही. मग कधी लागलं. तेवढ्यात तेथे माधवी आली, त्याला लागलेलं पाहून ओरडली. हे काय झालंय रजत कुठे पडलास की काय? तिच्या आवाजाने आताच झोपीतून उठलेली मुलं पळत‌ त्यांच्या रुममध्ये आली. बाबा, काय झालं हे, कुठे पडलात? पण तो काही बोलला नाही. फक्त आठवू लागला. म्हणजे मी जे स्वप्नात पडलो तेव्हा लागलं की काय. पण कसं, काही कळेना. तो शांत बसून राहिला. मुलं उठून बाहेर गेली. माधवी मलम लावू लागली. त्याने माधवीला रात्रीचे स्वप्न सांगितले. ती हसून म्हणाली, उगी बस तू आताच‌ कुठेतरी पडून आलास आणि मी‌ टेन्शन घेऊ नये म्हणून हे सांगतोस. तो परत परत तेच सांगू लागला. ती उठून ‌बाहेर‌ गेली. तो झोपला, डोळे बंद व्हायला लागले पण तो घाबरला. परत स्वप्न पडले तर...

        रविवार असल्याने माधवी किचनमध्ये आरामात आवरत होती. मुलंही आपापल्या कामाला लागली होती. नाष्टा बनवून रजतला उठवायला गेली तर तो‌ झोपलेला दिसला. तिने त्याला उठवलं नाही. पण त्याला झोपेत स्वप्न दिसलं नाही. खरंतर गुरूजींनी बांधलेल्या दोऱ्याचा प्रभाव होता. तो‌ उठल्यावर‌ त्याला वाटलं, दिवस‌ असल्याने दिसलं नाही. दुपारी जेवताना त्याने सर्वांसमोर हा विषय काढला. मुलं तर पप्पा हे स्वप्न होते. खरं नाही, असं म्हणून हसू लागले. माधवीलाही हसू येत होते. पण तो रात्री विचित्र वागलेलं पाहून ती शांत राहिली. रात्री झोपताना रजतला हातातला दोरा दिसला. दुपारी स्वप्न पडले नाही, आताही पडणार नाही असे वाटल्याने त्याने तो दोरा सोडला आणि बाजूच्या टेबलवर मोबाईल शेजारी ठेवला. रात्री परत त्याला स्वप्न पडले पण यावेळेस त्याला कोणीतरी आपल्या अंगावर, तोंडावर हात फिरवत आहे ,असे वाटू लागले. त्याने झोपेतच ते हात झिडकारले. दोन‌ चार मिनिटे गेली आणि त्याला आपला गळा कोणीतरी आवळत आहे असे वाटू लागले. त्याने लाईटचे बटन दाबले पण लाईट चालू होईना. त्याचा जीव गुदमरू लागला. तो मोबाईल घेण्यासाठी टेबलवर हात ठेवला पण तो हात त्या दोऱ्यावर‌ पडला. त्याबरोबर असे जाणवले की ते आवळणारे हात एकदम ढिले झाले. लाईट लागली गेली. तंग झालेलं वातावरण मोकळं झालं. तो धडपडून उठला. खोलीत‌ आता फक्त सोनचाफ्याचा वास होता. या गडबडीने माधवी उठली रजतने झालेला प्रकार तिला सांगितला. तिने तो दोरा पटकन त्याच्या हातात ‌बांधला. आता माधवीलाही सोनचाफ्याचा वास येऊ लागला.

        आज रजत निश्चिंत होता. आज त्याला स्वप्न पडणार नाही. म्हणून तो जरा खुशीतच माधवीशी मस्ती करत, गुदगुल्या करत झोपी गेला. माधवीपण त्याला गुदगुल्या ‌करत असल्याने ते दोघे जाम हसले होते. पण‌ यामुळेच ती आकृती रजतवर चिडली होती. गुरुजींनी दोरा बांधलेला असूनही रजतला परत स्वप्न पडू लागले. यावेळेस ती चिडलेली आकृती थोडीशी स्त्रीचा आकार घेत रजतचा पाठलाग करू लागली. रजत कुठे जातोय‌ कळत नव्हते. पण एक घनदाट जंगल दिसत होते. तेवढ्यात‌ रजत कशाला तरी अडकून पडला. ती आकृती पटकन रजत जवळ आली आणि त्याला फरफटत घेऊन जाऊ लागली. रजतला एका पडक्या वाड्याजवळ नेऊन सोडले. रजत घाबरून वा त्या फरफटीने‌ बेशुद्ध पडला. जाग आली तेव्हा तो एका वाड्यात होता. तो कसाबसा उठला आणि वाड्याबाहेर जाऊ लागला. तेवढ्यात‌ आवाज आला, कुठे चाललास रजत ? थांब तेथेच! रजतला कदाचित भयानक परिस्थितीची जाणीव झाली. तो पळू लागला. त्याच्या डोक्यावर काही आकृत्या फिरू लागल्या. वातावरण अचानक अतिशय थंड होऊ लागले. त्याला हुडहुडी भरू लागली. तो हु हु असा आवाज करू लागला. पायाजवळून साप फिरू लागले. पक्षांचा भेसूर आरडाओरडा सुरू झाला. कान फाटतील असे वाटू लागले. वाडा अतिशय भयानक वाटत होता. त्याला भीतीने धडकीच भरली. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कोणीतरी बोललं, तो मागे वळून पाहू लागला तर कोणी नव्हतं. पण पाच मिनिटांनी ती आकृती त्याच्या एकदम समोर आली आणि त्याला एका कक्षेत घेऊन जाऊ लागली. तो घाबरून ओरडू लागला. तेवढ्यात‌ माधवीने रजतला जोरात चिमटा काढला. तो खडबडून जागा झाला. माधवीच्या चिमट्यामुळे तो वाचला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. माधवीला वाटले त्याला ताप आला आहे. अंग गरम लागत आहे. ती त्याला उठवून बसवायला गेली. त्याला गोळी द्यायची होती. पाठीवर‌ हात‌ ठेवताच तो सू सू असा आवाज करू लागला. माधवी शर्ट वर‌करून पाहिला तर‌ पाठ‌ सोलवलेली होती. रजतने आपले स्वप्न सांगितले. आता माधवीला खात्री पटली की‌ रजत खरं सांगतोय आणि काही तरी भयानक आहे हे. काहीतरी केलं पाहिजे.

        सकाळी उठल्यावर माधवीने मुलांना सर्व सांगितले. मुलांनी सुरवातीला या घटनेवर विश्वास नाही ठेवला. पण माधवीने मुलांना जेव्हा रजतची पाठ दाखवली आणि रजत संध्याकाळी घरी आल्यावर ठीक होते पण रात्री हे घडले. मुलं पण आता घाबरून गेली. सुरवातीपासून काय घडलं ते सांगायला सांगितले. रजतने सांगितले मागच्या आठवड्यात काकांनी गावची जागा व शेती विकण्यासाठी काढली तेव्हा मी गावाकडे गेलो होतो. तीन चार दिवस तेथे राहून आलो. तेथे असताना मा‍झ्या चुलत भाऊ राजेश याने गावातील पडक्या वाड्यात घेऊन गेला होता. तेथे मला काहीतरी वेगळं आणि विचित्र वाटलं. घरी आल्यावर मला कसंतरी वाटू लागले आहे. मी रात्रभर बैचेन होतो. झोपलोच नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी मी इकडे निघून आलो. तेंव्हापासून मला हे स्वप्न पडायला लागले. दरी किनार्‍यावर चालणे, गळा दाबणे, वाड्यात फरफटत नेणे हे सगळं मुलांना सांगितले. मुलांनी आणि माधवीनं ठरवलं की रजतला मंदिरातील‌ गुरुजीकडे घेऊन जायचं. त्यांना सांगायचं की त्यांचा दोरा बांधलेला असला तरी स्वप्न पडतच आहे आणि त्रासही होतोय. सगळे पटकन आवरून मंदिरात गेले पण गुरुजी नव्हते. ते गावी गेले होते अचानक आणि महिना भरानीच येणार होते. सगळे हबकले, काय करावे कळेना. ते तेथेच बसून राहिले. तेथील दुसर्‍या भटजीने त्यांना त्यांची समस्या विचारली. ऐकल्यावर एका मांत्रिकाचा नंबर दिला. ते मांत्रिकाकडे निघाले. मांत्रिकाच्या घरात व अंगणात बरीच लोकं बसली होती. त्यातील काही विचित्र आवाज काढत होती. वागत‌ होती. काही खूपच गंभीर बसली होती. माधवीला थोडंसं घाबरल्यासारखं झालं. रजत आपण येथे येऊन ठीक केलं ना रे. तो काही बोलला नाही. ते आत दालनात जाऊ लागले. समोर‌ एका आसनावर मांत्रिक होता. डोळे बंद करून कसली तरी पुजा करत होता. मुलं व माधवी आतमधे गेले आणि जसं रजत आत पाऊल टाकणार, थांब तेथेच, आत पाऊलही टाकायचं नाही. रजत कावरा बावरा होऊन पाहू लागला. हो तुलाच म्हणतोय. तेथेच थांब, खबरदार आत आलीस तर लायकी नाही तुझी. रजत आणि सगळे आवाक होऊन पाहू लागले. तो एक पुरुष मग मांत्रिक कोणाला थांब म्हणत होता.

        रजत न कळून आत येऊ लागला. पण तेवढ्यात मांत्रिकाने हातातील दांडुक त्याच्याकडे भिरकावले. तेही डोळे बंद असताना, सगळे घाबरून उठून थांबले तर माधवी व मुलं जागेवर थिजली. मांत्रिक सगळ्यांना म्हणाला, तुम्हाला उठायला सांगीतले नव्हते बसा खाली. जो डोळे बंद असून सगळे जाणतो म्हणजे हा खरंच सिद्ध पुरूष असेल याची माधवी व रजतला कल्पना आली. जवळ जवळ अर्धा तास ती पूजा चालत होती. रजत दारातच थांबला होता. पूजा संपल्यावर रजतला आत बोलावलं गेलं. त्याच‌ं सर्व ऐकून घेण्यात आले. तेंव्हा मांत्रिकाने सांगितले की तो जेव्हा येथे येत होता तेंव्हा एक अमानवीय अदृष्य शक्ती तुझ्यासोबत येत होती. मी ती थांबवली पण ती आता येथे नाही. मांत्रिकाने त्याच्याकडून पत्ता घेतला. पाच सहा दिवस सुट्टी काढायला सांगितली. रात्री तो त्याच्या घरी येणार होता. तोपर्यंत त्याने कितीही झोप आली तरी झोपायचं नाही हे सांगितले. सगळ्यांनी परवानगी घेऊन तेथून बाहेर पडले. दुपार झाली होती, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. सगळ्यांना भुका लागल्या होत्या. सगळ्यांनी बाहेरच जेवण करून परत मंदिरात आले. तेथे बसून झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा करू लागले. विचाराने थकल्याने आणि पोटभर जेवल्याने रजतला झोप येऊ लागली. सगळे त्याला जागी ठेवत होते पण डुलकी लागलीच. पण तो मंदिरात असल्याने त्याला काही होत नव्हते पण मंदिराभोवती वादळ गोल गोल फिरू लागले. अचानक अंधार झाला. सोसाट्याचा वारा सुटला. रजतला अजूनच आतल्या गाभार्‍यात नेलं. हे पाच दहा मिनिटे चाललं मग शांत झालं. माधवी हे काहीतरी भयानक आहे, नुसतं स्वप्नापर्यंत मर्यादित नाही हे ओळखलं. संध्याकाळी घरी गेले. जेवणकरून मांत्रिकाची वाट पाहू लागले.

        रात्रीचे दहा वाजले होते, सगळे थकल्याने झोपेला आले होते, पण मांत्रिक अजून आला नव्हता. रजतने मुलामुलीला झोपायला सांगितले पण ते घाबरून झोपत नव्हते. शेवटी साडे दहाला मांत्रिक घरी आला. त्याचे दोन साथीदार पण बरोबर होते. माधवी व मुलांना दुसर्‍या खोलीत झोपायला सांगून तो रजतच्या पलंगाजवळ खाली जमिनीवर पूजा मांडू लागला. खिडकीला काही दोरे त्यांनी बांधले. दोन शिष्यांना बाहेर हॉलमध्ये काहीतरी पठण करायला सांगितले. रजतला झोपायला सांगून तो अंधारात मेणबत्तीच्या उजेडात पूजा करू लागला. रजतला त्या प्रकाराने आणि भीतीने झोप येईना. पण त्याशिवाय मांत्रिकास काही करता येईना. शेवटी बाराच्या सुमारास रजतला झोप लागली. त्याला स्वप्न पडू लागले. ती शक्ती आता स्त्रीचे रुप धारण करून रजतवर चिडत होती. तू हे चांगले केलं नाहीसं म्हणत होती. ती आता हळूहळू त्याच्याजवळ येऊ लागली. मांत्रिकाला तिची चाहूल लागली. त्याने जोरजोरात मंत्र पठण सुरू केले. पण ती अमानवीय शक्ती जास्तच चिडली. तिने मांत्रिकास वर उचलून छताला धडकावलं व खाली पाडलं. मांत्रिकाने एक जोराची किंचाळी फोडली. रजत झोपेतून खडबडून जागा झाला. मुलं व माधवी, ते दोन शिष्य आत पळत आले. त्यांनी लाईट लावली तर त्यांनी पाहिलं की पूजा विखुरली गेलेली आहे आणि मांत्रिक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. रजतने व सर्वांनी मांत्रिकास पटकन दवाखान्यात नेले. या गोंधळात अर्धी सोसायटी जमा झाली होती. सगळीकडे उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. कोणी म्हणत होते की रजत काही तरी जादूटोणा करण्यासाठी याला घेऊन आला होता आणि घबाड मिळाल्यावर त्या मांत्रिकास मारलं. तर कोणी म्हणत‌ होतं की माधवीला त्याने छेडलं म्हणून मारलं. सोसायटी सेक्रेटरीने पोलीसांना कळवले होते. पोलीस दवाखान्यात हजर झाले व घाबरलेल्या रजतला व माधवीला घेऊन स्टेशनला निघाले. मुलांना घरी जायला सांगितले पण मुलं घाबरून घरी न जाता दवाखान्यातच थांबली.

        रजत आणी माधवीला पोलीस स्टेशनला नेण्यात आले तर मुलं घाबरून दवाखान्यातच थांबली. पोलीस स्टेशनला गेल्यावर इन्स्पेक्टर विजय देसाई त्या दोघांना खूप खोदून खोदून विचारू लागले की नेमकं काय घडलं होतं. रजत आणि माधवीने जे सांगितले, त्यावर देसाईंचा विश्वास बसेना. ते हसू लागले, म्हणाले आजच्या काळात भूतबीत काही नसतं. तुम्ही मला वेड्यात काढत आहात का? खरं खरं सांगा हा काय प्रकार आहे ? कशासाठी असली पूजा करत होतात ? पण दोघांचे उत्तर तेचं. रात्रीचे दोन वाजलेले शेवटी देसाई कंटाळले. हवालदारांना यांना पोलीस कोठडीत ठेवा सकाळी पाहू म्हणाले. दोघांनी खूप विनवण्या केल्या. आम्ही काही नाही केलं म्हणाले. पण उपयोग झाला नाही. बाहेरचे पोलीस सोडले तर सगळे डुलकी घेऊ लागले. आज वातावरण खूप गरम होतं. उकडायला लागलं होतं. पण तशातही रजतला झोप लागली. परत त्याला स्वप्न पडू लागले. पोलीस स्टेशन मधील वातावरण एकदम थंड झाले. सगळ्यांना थंडी वाजू लागली. देसाईही खाडकन जागे झाले. त्यांनाही कळेना अचानक थंडी का वाढली. ते उठून पोलीस स्टेशन बाहेर आले. बाहेर तर उकाडा मग आत एवढी थंडी का? ऐसी तर नाही वाढला म्हणून पाहू लागले तर ऐसी बंद होता. कोठडीत तर साधा फॅनही नव्हता पण तेथेही थंडी वाजत होती. तेवढ्यात सोनचाफ्याचा वास येऊ लागला. आता हा सुगंध कोठून यायला म्हणून पाहू लागले. वरचेवर तो वास वाढू लागला. अति-सुगंधामुळे उलटी सारखे होऊ लागले माधवी यामुळे जागीच होती, तिच्या ते लक्षात आले. तिने रजतला उठवायचा प्रयत्न करू लागली. दूर असल्याने आवाज त्याला जाईना. तेवढ्यात वारं सुटलं, पोलीस स्टेशनामधील पेपर सगळीकडे उडू लागले. देसाई व बाकीचे पोलीस, हवालदार अचंबित होऊन पाहू लागले. काही कैदी पण घाबरले. काही अघटित घडेल हे माधवीला जाणवलं ती जोरात रजत अशी ओरडली तसा तो खडबडून जागा झाला आणि उठून बाहेर पाहू लागला. तसे थंड वातावरण परत बदलले आणि उकाडा सुरू झाला. सोनचाफ्याचा वास पण कमी झाला. माधवी देसाईंना म्हणाली, बघा साहेब मी जे म्हणत होते ते खरं होतं. यांना स्वप्नात एक भूत‌ येऊन त्रास देत आहे. त्यासाठीच मांत्रिकास आणले होते पण त्या भुताने त्यालाही जखमी केले. आता तर सोडा साहेब. मुलांना व मांत्रिकास बघितले पाहिजे. देसांईना हे खरे वाटले त्यांनी त्या दोघांना सोडून दिले. ते तेथून परत दवाखान्यात गेले. पहाटेचे चार वाजले होते. रजत आणि माधवीची झोप न झाल्याने त्यांचे डोके दुखत होते. चहा घेऊन ते मांत्रिकास शुद्ध येण्याची वाट पाहू लागले.

        दुसर्‍या दिवशी दुपारी मांत्रिकास शुद्ध आली. मुलं व माधवी घरी गेले. माधवी डबा घेऊन परत दवाखान्यात आली. मांत्रिक रजतला सांगत होता की जी शक्ती स्वप्नात येते आहे. ती प्रचंड शक्तीवाली आहे. कदाचित ती तुझ्या मागे-मागे इथपर्यंत आली आहे. पण काही मर्यादामुळे ती तुझ्यापर्यंत पोहचू शकत नाही. म्हणून ती स्वप्नात येत आहे. एकतर तिला तुझ्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे आहे किंवा तुझा बदला घ्यायचा आहे. ही शक्ती स्त्री असून ती कदाचित सोनचाफा केसात माळायची. मला ती कोन आहे आणि तू कोणत्या गावाला गेला होता तेथे जाऊन याच मूळ शोधावं लागेल. पूर्ण तयारीने अजून काही पूजा करून तिच्यापेक्षा माझं सामर्थ्य वाढवावं लागेलं. हे माधवीनं सर्व ऐकलं. ती दरवाजा उघडून आत येत असताना अचानक वाऱ्याची झुळूक आली. माधवीच्या अंगावर शहारा आला. ती आत आली आणि डबा ठेवू लागली. तिची नजर खाली होती. रजत हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. बरं झाले लवकर खायला आणलेस. जाम भूक लागली होती. आधी गुरुजींना दे मग आपण खाऊ. पण माधवी काही बोलली नाही. ती हळूहळू मांत्रिकाकडे जाऊ लागली. तेवढ्यात सोनचाफ्याचा सुगंध येऊ लागला. मांत्रिक सावध झाला. रजतही पळत बाहेर आला. माधवी मांत्रिकाजवळ थांबलेली होती. डोळे रक्तासारखे लाल झाले होते. तिचे दोन्ही हात झटकन पुढे आले आणि मांत्रिकाचा गळा आवळू लागले. मांत्रिक जोरात ओरडला. त्याच्या आवाजाने एक नर्स व कंपाऊंडर पळत आत आले. माधवीने मांत्रिकाचा गळा आवळलेला पाहून रजत व कंपाऊंडर एकत्रच तिचा हात सोडवायला गेले पण‌ करंट लागल्यासारखे दोघेही उडून बाजूला पडले. माधवी रागात बोलू लागली. मला मारणार आहेस का? बघतेच‌ कसा मारतोस. रजत माझा आहे. त्याला मी घेऊन जाणारचं. एकदा पळून आलाय पण आता सोडणार नाही. त्याला घेऊनच जाणार. माझं प्रेम आहे त्याच्यावर. पण तेवढ्यात मांत्रिकाने कुठला तरी मंत्र म्हंटला आणि माधवी मागे जमिनीवर पडली. कोपर्‍याला लागलं. आपणास काय झालं आणि आपण असे का पडलो. तिला काही कळेना. ती रजतला विचारू लागली. रजतने तिला उठवले. नर्स तर हा गोंधळ पाहून केव्हांच‌ बेशुद्ध पडली होती. रजतने तिला सर्व कथन केले. मांत्रिकास पुढे कसे करायचे हे रजतला विचारायचे होते पण त्याला झोपेचे इंजेक्शन दिल्याने तो झोपला होता.

        रजतला पुढे काय होणार हे कळत नव्हते. घाबरून झोप येत नव्हती. पण सलग चार दिवस न झोपल्याने त्याची तब्येत बिघडली. मुलं तर घाबरून घरी न जाता आत्याकडे निघून गेली होती. माधवी रजत जवळ थांबली. रजतलाही त्याच दवाखान्यात दाखल केले गेले. रजतला झोप यावी म्हणून त्यालाही झोपेचे इंजेक्शन दिले. पण तेच धोकादायक ठरणार होते का? त्या अमानवीय शक्तीला रजतला घेऊन जाणे सोपे जाणार होते का? सगळीकडे शांतता पसरली. सगळ्यांची निजानीज झाली. काही नर्स सोडले तर सगळेजण डुलक्या घेत होते. ती अमानवीय शक्ती दवाखान्यात दाखल झाली. ती हळूहळू रजतच्या खोलीकडे जाऊ लागली. माधवीलाही दोन तीन दिवस झोप नव्हती. ती पण गाढ झोपली होती. आता दवाखान्यात सोनचाफ्याचा वास दरवळू लागला. एका नर्सला त्याची जाणीव ही झाली. पण तिला सर्व कथा माहिती असल्याने ती डोळे मिटून पडून राहिली. ती शक्ती रजतजवळ आली. ती रजतचा गळा आवळणार इतक्यात तिला कशाचा तरी स्पर्श झाला आणि ती झटक्यात मागे सरकली. माधवी रजतच्या अंगावरच हात टाकून झोपी गेली होती. तिचे मंगळसूत्र व बालाजीचा फोटो असलेले लॉकेट रजतच्या छातीवर पडले होते. तेच त्या शक्तीला रजतजवळ जाऊ देत नव्हते. दुसर्‍या दिवशी रजत व मांत्रिक यांना डिस्चार्ज देण्यात आला. मांत्रिकाने आधी रजतच्या गावी जायचं ठरवलं. ते त्या दिवशी सगळे गावी निघाले. त्या शक्तीलाही तेच हवे होते. ती तर‌ आधीच‌ गावी जाऊन रजतच्या येण्याची वाट पाहू लागली. वाड्यात‌ आनंदाने घिरट्या घालू लागली. वाड्यात सगळीकडे सोनचाफ्याची फुले पडली होती. वाड्याला अक्षरश: सोनचाफ्याने सजवले गेले होते. गावातल्या लोकांना कळेना. या पडक्या वाड्याला कोणी सजवले असेल आणि का? कारण वाड्याचा एकही वंशज जिवंत नव्हता. सर्व संपत्ती सरकारी जमा झाली होती. पण वाडा आणि त्यातील धन दौलत सखीबाईच्या नावावर होती. ती तर केव्हाच वाड्यातून गायब झाली होती.

        हा वाडा कोणाचा, या वाड्याचा आणि सखीबाईचा रजतशी काही संबंध होता का? हे तर पुढे वेळ आल्यावर कळणारच होते. सहा तासांचा प्रवास करून गाडी गावाजवळ आली. अचानक गावातील वातावरण बदलून गेले. वादळ व वारं सुटलं. एक विचित्र वातावरण तयार झाले. लोकांना कळेना, असे अचानक का घडतंय. पण डोंगरावरील गुरव खाली गावाकडे पाहत म्हणाले. काहीतरी अनिष्ट घडणार आहे गावात. त्याला गावात येऊ नको म्हणावं. ते जोरात पुटपुटले. तसा हाताखालचा गण्या म्हणाला कोणाला येऊ नको म्हणताय जी. काय होणार आहे कोणाला. पण गुरव काही न बोलता जगदंब ! जगदंब !! म्हणत आत गेले आणि देवी समोर बसून काही तरी मंत्र म्हणू लागले. गण्या काही न कळाल्याने झाडू मारू लागला. "आई, येणार्‍या पोराला भयानक संकटाची जाणीव नाही. त्याचा मृत्यू त्याला येथे घेऊन आलाय. माते थांबव ग त्याला. काही तरी कर !" खाली गावात चर्चा उलट पुलट होतं होती. गाडी गावच्या वेशीवर आली. धुळीने गावात जायचा रस्ता दिसेना. तेवढ्यात गाडी पुढं एक लाल साडीचा पदर ओढलेला स्त्रीचं मुंडक येऊन पडलं. सगळे जोरात चिरकले. मांत्रिकही थोडासा हादरला. सगळ्यांना आत बसवून खाली उतरला. हातात पाण्याचा लोटा घेऊन मंत्र पुटपुटू लागला पण खाली काही दिसले नाही. पण त्याला येणार्‍या अशुभ संकटाची चाहूल लागली. तो गाडीत बसला आणि रजतला गाडी पुढे न्यायला लावली. हळूहळू गाडी रजतच्या घराजवळ आली. लोक या वादळाला चक्रावून पहात होते. कारण या वादळात वाडा मात्र शांत होता. मांत्रिकाने दुरूनच वाडा पाहिला. त्याला वाड्यातच मूळ कारण आहे हे शोधले. घरी गेल्यावर हातपाय धुवून चहा घेतला आणि रजतला विचारले की तुझा या वाड्याशी काही संबंध आहे का? रजत आणि घरातील काका काकू, आत्या व आजोबा सगळेच दचकले. रजतने आपल्या पडणार्‍या स्वप्नाचा किस्सा सगळ्यांना सांगितला. आजोबा ऐवढच म्हणाले. " म्हणून म्हणत होतो तुला की तू गावाकडे येऊ नको. मागच्या वेळेस ऐकलं नाहीस आलास. वरून वाड्यातही जावून आलास. ज्याची भीती वाटत होती तेच घडतंय बघ ". मांत्रिक न समजून म्हणाला, मला रजत तू तुझा आणि वाड्याचा संबंध सांग तरच पुढचा आपण मार्ग काढू शकतो.

        गावात रजतचे घर वाड्याच्या अगदी समोर होतं. पण अर्धा किलोमीटर. वाड्याच्या आसपास बाग होती. जी आज ओसाड पडली होती. वाड्याच्या बांधकामावरून ती एखाद्या श्रीमंत सुभेदाराची हवेली जशी वाटत होते. शंभुदेवराजे पिसे हे मोठे सुभेदार पेशव्यांच्या काळात त्यांच्या घराण्यातील वंशजाला सुभेदार हे पद मिळाले. हे पद‌ मग पिढ्यांन‌पिढ्यां चालत आले. शंभुदेवराजे यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या कौशल्यादेवी तर दुसर्‍या सुशीलादेवी. कौशल्यादेवींना बरीच वर्षे मुलबाळ झाले नाही म्हणून शंभुदेवराजेंचा दुसरा विवाह सुशीलादेवीशी करण्यात आला. सुशीलादेवी अत्यंत सुंदर व हुशार. शंभुदेवराजेंचा व्यवहार त्या हळूहळू आपल्याकडे घेऊ लागल्या. त्यातच त्यांना पहिला मुलगा अंशुदेव यांचा जन्म झाला. मगतर त्यांच खूपच कौतुक होऊ लागले. कौशल्यादेवी साधवी व शांत स्वभावाच्या. त्या कधी भेदभाव न करता अंशुदेवास आपल्या मुलासारखे सांभाळू लागल्या. दोन वर्षे गेली आणि सुशीलादेवीला परत दिवस गेले‌. पुढे शंकरदेवाचा जन्म झाला. कारभार आणि शंकरदेवाच्या सांभाळण्यात सुशीलादेवी व्यस्त झाल्या. अंशुदेवाची पूर्णपणे जबाबदारी कौशल्यादेवीवर‌ आली. त्याच मायेमुळे कौशल्यादेवींना दिवस गेले. एक कन्यारत्नाचा जन्म झाला. तेंव्हा तिचे हे दोन्ही भाऊ‌ चौदा आणि सोळा वर्षांचे होते. पण संपत्तीत वाटेकरी आली म्हणून सुशीलादेवी मुलांच्या मनात तिच्या बदल विष पेरू लागल्या. ते दोघे भाऊ आपली बहीण सखीबाईचा द्वेष करू लागले. एकटेपणाची बोच आणि राजे साहेबांचं ‘मुलगा मुलगा’ करणं तिला त्रासदायक ठरू लागले. त्यातच तिची आई कौशल्यादेवींचा पायऱ्यांवरून पडून मृत्यू झाला. एकटी पडलेली सखीबाई भरकटली. लहानपणापासून खेळायला येणारा सोबती रजतवर ती कधी प्रेम करू लागली तिलाच कळलं नाही. रजतचही वय अठरा कोवळं वय. तो तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. होऊ नये ते घडले. सतरा वर्षाची सखीबाईला दिवस गेले. तिने हे रजतला सांगितले, तो घाबरला. तो गरीब घरचा ती श्रीमंत घरची शंभुदेवांना कळले तर काय होईल याची भीती वाटू लागली. पण सखीबाई ऐकेना. मग त्यांनी डोंगरावरील मंदिरात जाऊन लग्न केले. याची कुणकुण शंभुदेवांना लागली आणि ते हृदय विकाराच्या झटक्याने निधन होऊन गेले. दोघे भाऊ चिडले आणि त्यारात्री रजत तिला मागच्या दाराने भेटायला आल्यावर त्याला जाम‌ बदडले आणि नदीत‌ फेकून दिले. सगळ्यांना वाटलं, रजत गेला पण‌ काकांनी त्याला वाचवलं आणि कायमचं त्याला मुंबईला घेऊन आले. पण‌ सखीबाई संगे मागे वाड्यात काय घडलं.

        सखी बाईच्या सावत्र भावांना जेव्हा कळालं की सखीबाईनी आपल्या जातीबाहेर एका गरीब व आपल्याच घरच्या नोकराच्या मुलाशी लग्न केले आहे. ते चिडलेले होते, त्या दिवशी रजत जेव्हा सखीबाईला भेटायला आला तेव्हा ते जास्तच चिडले. त्यांनी रजतला जाम बदडून नदीत फेकले. रजतच्या घरी त्याच्या मृत्यूची बातमी पोहचली. रडारड सुरू झाली. मुंबईच्या काकांनी त्याला वाचवलं व मुंबईला घेऊन गेले. स्वत:च्या घरीपण सांगितले नाही. तो जिवंत असल्याचे. सखीबाईपर्यंत ही बातमी गेली तेंव्हा ती बेशुद्ध होऊन पडली. वैदीनीच्या तपासात ती गरोदर असल्याचे कळाले. भाऊ तर अजून जास्तच चिडले. तिला गच्चीवरून धक्का देऊन खाली पाडलं. मुल‌ मेलं पण ती वाचली. आईने आपल्या इजत्तीला डाग नको व संपत्तीत वाटेकरी नको म्हणून तिला त्या अवस्थेत तळघरात कोंडले. आधीच मुल गेलेलं आणि त्यात जेवण न दिल्याने तिची तब्येत हळूहळू ढासळू लागली. पण तिच्या दाईने तिला चोरून जेवण देऊन तिचा जीव वाचवला. पंधरा दिवसांनी एका रात्री ती मेली का जिवंत आहे हे पाहण्यासाठी तिचे ते दोन भाऊ व सावत्र आई सुशीलादेवी तळघरात गेल्या. पण सखीबाईला जिवंत पाहून ते हादरले. इतके दिवस उपाशी ठेवूनही आजारी व्यवस्थेत ती चांगली दिसली. सखीबाई सगळ्यांना पाहून चिडली. ती म्हणाली, मी सगळ्यांना सांगणार की माझे रजतशी लग्न झाले होते. त्याचं मुल मा‍झ्या पोटात वाढत होतं. तुम्ही मा‍झ्या मुलाला आणि नवऱ्याला मारलंत. आता तुमचा मा‍झ्या इस्टेटीवर डोळा आहे. ती त्यांना बाहेर जावा म्हणून जोर जोरात ओरडू लागली. पण या प्रकाराने मोठा भाऊ भयंकर चिडला आणि पळत तिच्याकडे गेला आणि कमरेची तलवार काढून तिच्या मानेवर हाणली. सखीबाईच मुंडकं उडालं आणि भिंतीवर जाऊन आदळलं. शरीर जमिनीवर पडून तडफडू लागलं. झाल्या प्रकाराने सुशीलादेवींना चक्करच आली. सुशीलादेवीनां उचलून वर आणलं. तळघराचं तोंड कायमचं बंद करून टाकण्यात आले. सुशीलादेवींना सखीबाईचा मृत्यू हवा होता पण अशा पद्धतीने नको होता. दुसऱ्या दिवशी सगळीकडे रजत आणि सखीबाई पळून गेले अशी बोंबाबोंब तिच्या भावांनी केली. रजतच्या घरचे नाही तो मेला म्हणू लागले. या धक्क्याने आई गेली. वडील एकाकी शांत राहू लागले. सखीबाईचा आत्मा रजतकडे जाण्यासाठी तडफडू लागला. तेरा दिवस होऊन गेले पण भावांनी आत्मा शांतीसाठी कुठलीही पूजा केली नाही. सखीबाईचा आत्मा दु:खी कष्टी झाला. महिनाभर त्याच दु:खात राहिला पण एके दिवशी तिचा आत्मा पेटून उठला. भावांचा व त्यांच्या वंशाचा निर्वंश करायचा. त्या रात्री वाड्यात विचित्र व भयानक ओरडण्याचे आवाज येऊ लागले. भावांच्या खोलीत साडीने तोंड झाकलेले मुंडकं पडले. सगळीकडे रक्त रक्त झाले. सगळ्यांची बोबडी वळली. रात्रभर‌ सगळे जागून राहिले. दुसर्‍या दिवशी ‌डोंगरावरील मंदिरातील गुरूजींना बोलावण्यात आले. ते म्हणाले, कोणाचा तरी आत्मा आहे जो बदला घेण्यासाठी आला आहे. लवकर वाडा सोडून जा. नाहीतर निर्वंश होईल. पण भावांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लवकरच एक वादळ वाड्यात येणार होतं आणि याची भणक भावांना नव्हती. भावाचं घर निर्वंश करण्यासाठी सखीबाईचा आत्मा तडफडत होता. होळीच्या रात्री सगळे नोकर लोक आपल्या घरी निघून गेले होते. फक्त दोन नोकर व एक बाई जे सुशीलादेवीचे खूप वफादार होते व विश्वासू होते. दिवसभर मस्ती करून रात्री वाड्यात होळी पेटवण्यात आली. होळीचे दर्शन घेऊन सगळे जेवण्यासाठी गेले. इकडे सखीबाई होळीजवळ येऊन आत घरात पाहत होती. पाहता पाहता होळी धडधडली. असं का होतंय म्हणून सगळे धावत बाहेर आले तर वाड्याने पेट घेतला होता. सगळे मुख्य दरवाज्याकडे जाऊ लागले. पण पुढे जाता येईना, अंशुदेवांची दोन मुलंही सोबत होती. तर शंकरदेवाची बायको गरोदर होती. पण सखी बाईच्या डोळ्यात बदल्याचे अंगार‌ फुलत होते. तिला काही दिसत नव्हतं. माझ्या मुलाला, नवऱ्याला व मला तडफडून मारलतं. तुम्हाला सोडणार नाही. बघता बघता वाडा संपूर्णपणे पेटला. सगळा गाव जमा झाले. पण वाड्याचा एकही दरवाजा उघडत नव्हता. सकाळपर्यंत वाडा धुसमत होता. सकाळी लोकांनी आत जाऊन पाहिले तर दहा जणांचे सांगाडे जळक्या अवस्थेत दिसले. सगळे लोक हळहळले. त्याच वेळेला सखीबाई तळघरात हसत होती. पुढे हळूहळू लोकांनी वाड्याकडे यायचं बंद केले. रात्री अपरात्री लोकांना वाड्यात एक बाई फिरताना दिसते असे म्हणायचे. ही तिच सखीबाई होती. जीला सोनचाफा खूप आवडायचा. रजत तिला आणून द्यायचा. मागच्या महिन्यात रजत जेव्हा तब्बल तेत्तीस वर्षांनी गावी गेला आणि ‌चुलत भावाबरोबर ‌वाडा बघण्यासाठी गेला. तेंव्हा सखीबाईला रजत दिसला. तिचा रजत जो जिवंत होता. आपण मेलो का जिवंत आहोत किंवा आपल्या सोबत इथे काय काय घडलं हे त्याने जाणूनही घेतलं नाही. आपला जीव वाचवून तो पळून गेला याचा तिला राग आला. तसेच तैतीस वर्षांनी आपले प्रेम दिसल्यावर तिला पहिले दिवस आठवले. आपले प्रेम मिळवण्यासाठी ती रजतच्या मागे निघाली पण तिच्या सीमा वाड्यातच सीमित असल्याने तिने मग आपल्या शक्तीने रजतला स्वप्नात जाऊन तिच्याकडे आणण्याचा प्रयत्न करू लागली.

        आज रजत गावात आला होता. तिला खूप आनंद झाला होता. त्याला फक्त वाड्यात आणायचे होते. मग ती आपली सगळी शक्ती एकवटून रजतला आपलेसे करून घेणार होती. सगळे जेवण करून डोंगरावरील मंदिरात गेले. तेथील गुरूजींनी म्हटले, रजत तू गावात येऊन चूक केलीस तू यायला नको होतास. पण मांत्रिक तिला वश‌ करून त्याची सुटका करणार आहेत हे त्यांनी सांगितले. मांत्रिक गुरूजींनाच पाहत होता त्यांचा चेहरा पाहून तोही काळजीत पडला. तसंही तो गावात आल्यापासून कसल्यातरी अभद्र गोष्ट होणार याची जाणीव होत होती. दुपारी रजत व माधवी वाड्याकडे पूजेसाठी जाऊ लागले. मुलं पण आम्ही येणार म्हणू लागली पण मांत्रिक नको म्हणाला. मांत्रिक व त्याचे शिष्य आणि मंदिरातील गुरूजी वाड्याकडे गेले. वाड्यात या लोकांना पाहून सखीबाई चिडली. वाड्यात सगळ्यांना असं वाटू लागले की ते जिथे जिथे जात आहेत तेथे तेथे कोणीतरी पाठीमागे येत आहे. मांत्रिकाला सखी बाईच्या अस्तित्वाचे ठिकाण शोधायचे होते. खूप फिरल्यावर तळघराकडे तिची जाणीव झाली. पण तळघराला भले मोठे कुलूप होते. महत प्रयत्न करून तळघराचा दरवाजा उघडला गेला. सखीबाईच्या हाडाचा सांगाडा शोधून पूजा करू लागले. पण एकदम कोंदट वातावरण तयार होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गुरूजी आणि मांत्रिकास पाठीला चटके बसू लागले. गुरूजींना कशाचीतरी जाणीव झाली. त्यांनी माधवीला लगेच वाड्याबाहेर जायला सांगितले. माधवी नको म्हणत होती पण ते तिला जायला सांगत होते. ती वाड्याबाहेर जाऊन दूरवर थांबून वाड्याकडे पाहू लागली. आत मांत्रिकाने पूजा जोरात सुरू ठेवली पण तेव्हाच कोणीतरी त्याला हवेत उचललं आणि बाहेर फेकून दिले. पण गुरूजींना काही कळत नव्हतं. पण तेथे खूप धूर दिसू लागला गुरूजींना भोवळ येऊ लागली. ते तेथून गायब झाले पण कोठे ते त्यांनाही कळाले नाही. तळघराचा दरवाजा बंद झाला. रजत हादरून गेला. तो दरवाज्याच्या दिशेने पळाला पण‌ मागून त्याला कोणीतरी ओढू लागलं. तो ऐकेना, मांत्रिकास पडल्यावर उठायला वेळ लागला. शिष्य तर घाबरून वाड्याच्या मागच्या दाराने पळून गेले होते. मांत्रिक दरवाज्याकडे गेला पण दरवाजा उघडला गेला नाही. इकडे रजत आत इकडून तिकडून भिंतीवर आदळत होता. तो खूप जखमी झाला होता. तेवढ्यात तो अणकुचीदार वस्तूवर पडला आणि त्याचे मुंडके धडापासून बाजूला झाले. एक जोराची किंकाळी वाड्यात घुमली. ते ऐकून तर मांत्रिकही वाड्याबाहेर पळून आला. सखीबाई रजतच्या आत्म्याजवळ प्रेमाने बसली. तिला तिचे आज प्रेम मिळाले होते. तर‌ बाहेर माधवी चक्कर येऊन कोसळली होती. त्या आवाजाने गाव गोळा झाले होते. सगळं गाव‌ हळहळत होतं आणि म्हणत होतं की रजतने गावात यायलाच नको होतं. मुलं आणि माधवीला तर भानच नव्हते. रजतच्या घरात एकच कल्लोळ माजला होता. गुरूजी जेव्हा भानावर आले तर ते वाड्याच्या पाठीमागच्या झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. वाड्याकडे आले तर रजत बाबत कळाले. ते डोक्याला हात लावून बसले होते. वाड्यात आणि वाड्याबाहेर सोनचाफ्याचा वास दरवळत होता…

- सौ.हेमा येणेगूरे, पुणे
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या