Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

रणछोडदास | मराठी लेख | वासुदेव पाटील

रणछोडदास वासुदेव पाटील यांचा मराठी वैचारिक लेख

रणछोडदास...

    माणसाचं जीवन हे एक संगर आहे. दैनंदिन जीवनात माणसास सतत काहीना काहीतरी संघर्ष हा करावाच लागतो. त्यात प्रत्येक संघर्षात माणसाला यश येईलच असे नाही व ते अपेक्षित असलं तरी शक्य नाही. संघर्ष म्हटला की हार जीत लागू असते. पण कोणताही प्रतिकार न करता वा अर्ध्यातच आयुधे टाकून पळ काढणे हे कितपत योग्य? लढता लढता हारणं हे मान्य पण प्रतिकार न करता पळ काढणे हे स्विकाहार्य नसतं.

    पुराण, इतिहास पाहिला तर असे अनेक प्रसंग आढळतात की देवादिक, राजे महाराजे यांनी ही रणांगणातून पळ काढलाय! पण का? ते समजून घेतलं पाहिजे. श्रीकृष्णास तर गुजरातेत ‘रणछोडदास’ म्हटलं जातं. पण कृष्णाचं रणांगणातून पळणं हा मुत्सद्दीपणा होता! जरासंध हा बऱ्याचदा मथुरेवर हल्ला चढवी. श्रीकृष्णास आपलं मरण कळत होतं पण मथुरेतील प्रजाजनाच्या रक्षणासाठी त्यांनी द्वारकेस पलायण (?) की स्थलांतर केलं. मथुरेतील सर्वसामान्य लोकांना या युद्धात नाहक त्रास नको म्हणून श्रीकृष्ण भगवानांनी आपली राजधानीच द्वारकेस नेली व यथावकाश भिमाकडून जरासंधाचा वध केला. म्हणून गुजरातेत श्रीकृष्णास रणछोडदास (रण सोडून पळालेला) म्हटलं जातं.

    कालयवन या राक्षसापासून बचाव करण्यासाठी व त्याचं पारिपत्य करण्यासाठी श्रीकृष्ण रणातून पळ काढत झुलवत मुचुकुंद राजा झोपलेल्या गुहेकडे त्यास नेऊ लागले. या मुचुकुंद राजाने देवांना असुराशी झालेल्या लढाईत मदत केली होती. युद्धानंतर मुचुकुंद स्वजनाकडे पृथ्वीलोकावर परतू पाहत होता. पण कितीतरी काळ लोटल्याने ते शक्य नसल्याचे इद्रदेवानं सांगताच मुचुकुंदाने आराम करावयाचं सांगताच इंद्राने त्यास शयनासाठी जागा दाखवली. “जो कोणी तुला उठवायचा प्रयत्न करेल त्यावर तुझी नजर पडताच जळून खाक होईल” असं त्यास वरदान ही दिलं. कालयवनचा कोणाकडून पराभव शक्य नव्हता. म्हणून श्रीकृष्णानं कालयवनपासून पळ काढत त्यास पळता पळता मुचुकुंद झोपलेल्या गुहेत आणलं. गुहेत शिरताच श्रीकृष्ण बाजूला झाले. कालयवनास समोर झोपलेला मुचुकुंद हा मायावी श्रीकृष्ण वाटला व त्यानं मुचुकुंदास डिवचलं. मुचुकुंद आपणास कोणी उठवलं म्हणून पाहण्यासाठी त्याची नजर कालयवनावर पडली व कालयवन जळून खाक झाला. अशा रितीनं श्रीकृष्णानं पळ काढला असला तरी त्यात मुत्सद्दीपणा होता.

    इतिहासात ही डोकावून पाहिलं तर आपणास असे मुत्सदीपणाचे अनेक प्रसंग दिसतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा गनिमी कावा हे युद्धतंत्र हे ही याचाच भाग! शिवाजी महाराजांची आगऱ्याहून सुटका, पन्हाळगडाहून विशालगडाकडं जाणं या घटना व अशा बऱ्याच लढायात मावळ्यांनी एकदम सुलतानढवा करत शत्रुची दाणादाण उडवत रणातून पळ काढत सह्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात पसार होत. एखाद्या लढाईतून ते पळ काढत पण का? तर पुन्हा जोमानं, त्वेषानं शत्रूवर तुटून पडण्यासाठी! ती माघार ही तात्कालीन असे की पुन्हा हल्ला चढवण्यासाठी! सिंह, वाघ चार पावले माघार घेतात पण ती सावजावर झडप घालण्यासाठी! शिवाजी महाराज व मावळे शत्रूस आपल्या सिकंज्यात घेण्यासाठीच रणातून अशी माघार घेत!

    काही प्रसंगात मावळ्यांनी ‘मेलो तरी बेहत्तर पण माघार नाही!’ अशी भूमिका घेतलेलीही आपणास दिसते. महाराजांचे सेनापती कुडतोजी गुजर (प्रतापराव) यांचं वीरमरण, हौतात्म्य असंच! कुडतोजी गुजरांनी हाती आलेल्या बहलोल खानास उदारता दाखवत सोडून दिलं. महाराज खवळले. कुणास सोडावं व कुणास उडवावं याचं महाराजांचं आपला एक आडाखा असायचा. कुडतोजी यात चुकले यानं खफा होत राज्यांनी “खानास मातीत मिळवल्याशिवाय मला तोंड दाखवू नका” असा फतवाच काढला. आपले स्वराज्याचे धनी आपल्यावर नाराज झाले याची सल कुडतोजी गुजरांना स्वस्थ बसू देईना. सुटलेला बहलोल खान धुमाकूळ घालू लागला. त्यातच रायगडावर राज्याभिषेक सोहळा होणार म्हणून आपण बहलोलखानास मातीत मिळवल्याशिवाय महाराजांना तोंड कसं दाखवायचं? कुडतोजी गुजरांनी बेत आखला. आता माघार नाहीच! विठ्ठल अत्रे, विठोजी शिंदे, विसाजी बल्लाड, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर, दिपाजी राऊतराव व स्वत: कुडतोजी सरसेनापती हे महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील नेसरी खिंडीत बहलोलखानावर तुटून पडले. केवळ सात वीर शेकडो सैन्यावर तुटून पडले. “वेडात मराठे वीर दौडले सात!” निभाव लागणे शक्यच नव्हते पण मराठी तलवारीचं पाणी दाखवत हे वीर स्वराज्यासाठी, आपल्या महाराजांसाठी बहलोलखानास मातीत मिळवण्यासाठी हौतात्म्य पत्करत इतिहासात अजरामर झाले! पण माघार घेतील ते मराठे कसले! मरणाला मिठी मारतील पण माघार नव्हेच! रणांगणातून पळ काढणे तर दूरच! गनिमी काव्यानं पळ काढली असेल पण ती सिंहाप्रमाणे झडप घालण्यासाठीची चार माघारीची पावलं!

    असाच एक प्रसंग पेशवाईतलाही सांगता येईल! समोर मरण दिसत असतानाही पळ काढत बचाव करता येणं शक्य असूनही वीरगती पत्करली पण रणछोडपणा नाहीच! ग्वालियरचे शिंदे घराण्यातील राणोजी, जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी, महादजी शिंदे यांनी एक काळ गाजवत उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण केला. दत्ताजी व पुतण्या जनकोजी शिंदेंना नजिबखानासाठी दिल्लीकडं पाठवलं. दत्ताजी शिंदे यांनी मर्दुमकी गाजवत नजीबखानास पिछेहाट करायला लावत पिटाळलं. पण नजिबखान रोहिल्यानं अब्दाली, सुजा, मोहम्मद बंगश यांच्याशी संधान साधत साऱ्या यवनाना एकत्र केलं. एक वेळ मागून गिलचे व पुढून रोहिले अशी बिकट परिस्थिती निर्माण होत शिंदे कात्रीत अडकले. तरी माघार घेत राजस्थान मार्गे शिंदेंना बचाव करता आला असता. पण मानी, पराक्रमी दत्ताजीस तो विचार ही शिवला नाही. पळ काढणं तर दूरच पण माघार ही नाही. त्यांनी जनकोजी व कबिला दिल्लीस पाठवला व चढाईची आखणी केली. नंतर १० जानेवारी १७६० ला यमुना तिरी बुराडी घाटात दत्ताजी शिंदे रोहिले व गिलच्यावर तुटून पडले. हातात तळपती तलवार, पाठीवर ढाल व डोक्यावर शिरस्त्राण घेत आपल्या लालमणी घोड्यावर मांड ठोकणाऱ्या आपल्या सरदारास पाहताच मराठे सैन्यात चैतन्य पसरलं व यवनांना मराठी तलवारीची ताकद, मराठी रक्त काय असतं हे दिसू लागलं. नुसती कापाकापी! त्यात जरीपटक्याजवळ येणाऱ्या गिलच्यांशी लढताना जनकोजी शिंदेस गोळी लागल्याची बातमी दत्ताजीस कळाली. दत्ताजी बेफान झाले येणाऱ्या अफगाण्याची मुंडकी उडवत ते लढू लागले व नजीबखानाजवळ जाऊ लागले. पण मराठे तलवारीनं तर अब्दालीकडे जंबुरका व बंदुकी! त्यातच एका जंबुरक्याचा गोळा दत्ताजीच्या बरगड्याचा वेध घेत लालमणीच्या पाठीत घुसला. दत्ताजी खाली कोसळले. ही संधी साधत कुतुबशहा व नजीबखान दोन्ही दत्ताजीवर चालून आले. नजीबखान, कुतुबशहानं घायाळ दत्ताजीचं शीर हातात धरत, “क्यो पाटील और लढोंगे?” विचारलं. घायाळ घजन्फरानं- दत्ताजीनं घायाळ स्थितीत आपली सारी शक्ती एकटवत हाती तलवार घेत वाघासारखी डरकाळी फोडली. “क्यो नही? बचेंगे तो और भी लढेंगे!” या डरकाळीनं मराठी वीरानं इतिहास अजरामर केला! कुतुबशहा नं दत्ताजीचं शीर धडावेगळं केलं. नजिबखान रोहिल्यानं एकाकडून भाला घेत ते भाल्याच्या टोकावर ठेवत तो नाचू लागला. पण या मराठी घजन्फराचा वीर हौतात्म्य पाहण्यासाठी जणू यमुनेचा प्रवाह ही क्षणभर थांबला. या वीरांनं पळण्यापेक्षा आपल्या पराक्रमाने बुराडी घाटास आपलं रुधीरानं स्नान घालत वीरगती मिळवली व मराठ्यांचा इतिहास अजरामर केला. एकूणच प्रत्येक संघर्षात एकतर लढावं भले वीरमरण आलं तरी स्वर्गप्राप्ती! नाही लढणं शक्य तर माघार घ्यावी पण ती सिंहासारखी सावजावर झडप घालणारी माघार असावी! ते ही शक्य नसेल तर श्रीकृष्णासारखं रणछोडदास व्हावं पण मुत्सद्दीपणानं पुन्हा चालून जाण्यासाठी वा पारिपत्य करता यावं म्हणून.

    आज सर्वसामान्य माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष, त्याचं स्वरूप बदलतंय. आज युद्ध लढाई, मोहीम हे नसलं तरी दैनंदिन जीवनात संघर्ष अटळ आहेच! भले वेगळ्या स्वरुपात असेल! या संघर्षात माणसाला लढत यश मिळवणं शक्य होतच असं नाही. नाही यश तर किमान श्रीकृष्णासारखं रणछोडदास होणंही जमत नाही! माणूस शरणागती पत्करत पळ काढतानाच दिसतो! वेगवेगळ्या क्षेत्रात माणूस सतत पळ काढताना दिसतो. वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याचदा एक डॉक्टर म्हणून प्रत्येक रोग्यास यशस्वी उपचार देता येत नाही. अनेक रोग्याचा नेमका आजार (निदान) न कळणं, यथायोग्य उपचार नसणं तरी डॉक्टर जर त्या रोग्यास उपचार देत असेल, याचा उपयोग होईल का? हे पूर्ण माहीत नसूनही उपचार करत त्या रोग्यास झुलवत ठेवणं हे ही एक प्रकारचं पळ काढणंच म्हणता येईल.

    दहावीच्या वर्गात समजा वीस विद्यार्थी असून मला त्यांना क्रॅमर रुल नं द्विचल समीकरण कसं सोडवायचं हा घटक शिकवायचा आहे. पंधरा मुलांना यथायोग्य समजला. पण उर्वरित विद्यार्थ्यांना क्रॅमर्स नियम माहीत नसणं, उपयोजन करता न येणं, सहगुणक टाकता न येणं ही अपुर्णता असेल पण अभ्यासक्रम पूर्ण करणं, तासिकेची मर्यादेमुळं म्हणा वा ज्यांना समजलं त्यांना पुढचा भाग शिकवण्याच्या प्रयत्नात म्हणा वा एखाद्या विद्यार्थ्याला त्या आधीची प्राथमिक क्रियाही येत नसेल तर “तुम्हाला मी हा भाग नंतर समजावतो, थांबा तुम्ही!” म्हणत मी जर त्यांना त्याच स्थितीत सोडत पुढे जात असलो तर हे असलं पुढं जाणं हे ही एक प्रकारचं रण सोडून सपशेल पळ काढणंच म्हणता येईल! एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाच्या अध्यापनात असले प्रसंग येतात म्हणजे येतातच! ज्या शिक्षकाला असे प्रसंग येत नसतील त्याच्या चरणाशी लोटांगण! समोरच्या विद्यार्थ्याला सदर भाग समजला नसताना त्याला त्याच स्थितीत सोडत पुढं जाणं हे एक प्रकारचं रण सोडत पळ काढणंच. आपण वर्गातून सतत रण सोडून पळ काढतो का? हा प्रत्येकानं आपापल्या परीनं सिंहावलोकन करावं! निदान थांबलेल्या विद्यार्थ्यांना तशाच इयत्तेच्या पायऱ्या चढवताना नंतर आपण पुनर्भरण करण्याचा कसोशीनं प्रयत्न करायलाच हवा.

    प्रत्येक कुटुंबवत्सल प्रमुख संसाराचा रेटा पुढे रेटताना घरातील प्रत्येक सदस्यांच्या आशा अपेक्षा गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो पण यात त्याला बऱ्याचदा पळच काढावा लागतो. “बाबा मला खेळणी हवी”, “दादा मला बाईक हवी”, “अहो ऐकलंत का! या हंगामावर मला भुंड्या कानात काही तरी किडूकमिडूक घ्यायचंय!”, “पोरा, चष्म्याची दांडी तुटलीय रे” या साऱ्यांच्या गरजांचा प्राधान्य क्रम ठरवता ठरवता बिचाऱ्याच्या नाकी नऊ येतात. तो नाही पुरवू शकला की, पुढच्या बाजारावर,पुढच्या महिन्यात, पुढच्या हंगामावर, पुढच्या वर्षी, घेईन‌ म्हटलं ना! आजच थोडं म्हातारपण आलंय” असं आयुष्यभर पळ काढणं सुरू होतं. ना मागणाऱ्याच्या मागण्यांना अंत ना पळ काढण्याला अंत! परिस्थिती नुसार नाही करता येत पूर्ण साऱ्या अपेक्षा. पण मग पळ काढण्यापेक्षा ठामपणे नकार ही देता यायला हवा! योग्य त्या ठिकाणी समज देत नकार देणं हे ही एक लढणं असतं! खोट्या आश्वासनापेक्षा प्रामाणिक नकार देणं लढणंच!

    जगणं हा ही एक संघर्ष! काही आयुष्यभर दारिद्र्याशी लढत राहतात. परिस्थिती बदलो अथवा न बदलो, यश येवो अथवा न येवो पण आपण संघर्षाला सामोरे कसं जातो याला महत्व! म्हणून दारिद्र्याशी लढता लढता मातीत मिसळणारा ही एक वीरच! लिंबाच्या झाडाला दोरावर झुलणारा हिंदोळा, बांधा पाणंदीत, उभ्या पिकात फवारणीच्या औषधाचं डबं फोडणारा, रेल्वेला धडक देणारा, पुलावरून वा विहिरीत उडी घेणाऱ्या जिवाचं अवचित जाणं हे ही पळ काढणंच! आपल्यानंतर बिलोर फोडणारी, जिवाचा आकांत करत झिंज्या तोडणारी पत्नी, न पेलवणारं ओझं खांद्यावर घेताना खांदा देताना हंबरडा फोडणारा बाप! कावरीबावरी होणारी पिल्लं दिसत नसावीत का या पळ काढणाऱ्या जिवास! येतं काही लढायांत अपयश! अपयश हे मरणापेक्षा वोखटं असतं पण संघर्षात यश अपयश पेक्षा तुम्ही त्यास तोंड कसे देत आहात, किती प्रयत्न करत आहात हे यशापयशापेक्षा अधिक महत्त्वाचं! कितीही संकटं आली तरी न डगमगता अशावेळी गनिमी कावा वापरावा वा श्रीकृष्णा सारखं रणछोडदास व्हावं! माघार घ्यावी झडप घालण्यासाठी वा पळावं पुन्हा लढण्यासाठी! पण कायमचं पळून जाण्यात काय ठेवलंय! मरायचं तर साऱ्यांनाच आहे एक दिवस! मृत्यूसखाला कितीही थोपवलं तरी तो कुणाच्या बापाकडून थोपवला जाणार नाही! पण त्यास स्वत:च्या हातानं आवतण देत सारा कच्चा पसारा खुल्या आभाळात ढकलत असं अवचित पळून जाणं नकोच! जन्माचं सार्थक करत कृतकृत्य होत मृत्यूसखानं सोबत श्वास पळवत नेलं तर ते पळणं सार्थक! भले राहिल्या काही लिप्सा उरात शिल्लक तरी चालेल! कारण आशा आकांक्षा लिप्सा यांना अंत नाही! पण हयातीचं रण गाजवत, विहित कर्तव्य पार पाडत दत्ताजी शिंदे, कुडतोजी गुजरासारखं तुटून पडावं मृत्यूवर घजन्फरासारखं! पण रण सोडून अवचित पळणं वोखटेच!

लेखक - वासुदेव शिवदास पाटील, नंदुरबार
मो. नं -८२७५३१४७७४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या