आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई हे एक जागृत देवस्थान मानले जाते. ही देवी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. पुराणात उल्लेख असलेल्या १०८ पीठांपैकी एक तसेच महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी एक हे पीठ आहे. मंदिराचे बांधकाम राष्ट्रकुट किंवा त्या आधीचा शिलाहार राजानी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणात सापडलेली कागदपत्रे, जैनग्रंथ, ताम्रपत्रे यावरून महालक्ष्मी मंदिराच्या पुरातनत्वाचा अंदाज येतो. ‘कधी काळी मोंगलांनी या मंदिराचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती’ असे सांगितले जाते.
१७१५ ते १७२२ या कालखंडात या मंदिराचे पुनरूज्जीवन करण्यात आले. १७२२ मध्ये दुसर्या संभाजींनी मूर्तीची या मंदिरात स्थापना केल्याचे सांगितले जाते. हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा, उत्तम कोरीवकाम असणार्या या मंदिराचे महाद्वार पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर जो मंडप लागतो त्यास 'गरूड मंडप' म्हणतात. या मंडपातील दगडी चौथऱ्यावर आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा ठेवून देवीची पूजा केली जाते. मंदिराच्या भिंतीवर मृदुंग, टाळकरी, वीणाधारी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, अप्सरा, किन्नर यांची शिल्पे कोरलेली आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्याचे किरण देवीच्या मुखावर पडतात. हे या वास्तु कलेचे वैशिष्ट्य आहे.
मंदिराच्या परिसरात गणपती, दत्तात्रय, विष्णू, शेणशाया, नवग्रह, हरिहरेश्वर, मंदिरे तसेच काशी, मनकर्णिका ही कुंडे आहेत. मंदिराच्या चार भागात निरनिराळे चार देवनागरी शिलालेख आढळून येतात. चैत्र पौर्णिमेला दिव्यांनी सुशोभित केलेला शिखराचा देखावा अतिशय विलोभनीय दिसतो.
महालक्ष्मीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्ती जवळ असणारा सिंह आणि शिरावर मातुलिंग यामुळे ही देवी जगदंबेचे रुप आहे असेही मानले जाते. मूर्तीच्या डोक्यावर नागमुद्रा आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्ये नागाचे वर्णन केले आहे. आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि माघ पौर्णिमेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. नवरात्रात देवीची नऊ दिवस निरनिराळ्या स्वरुपात वाहन पूजा बांधली जाते.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके !!
'महालक्ष्मी'च्या पाद स्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीत भक्तांचे तसेच पर्यटकांचे तितक्याच अगत्याने स्वागत केले जाते.
(वरील माहिती मी दिलेली भेट आणि संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे लिहिली आहे)
लेखिका : सीमा एच.पाटील, (मनप्रीत)
कोल्हापूर.
0 टिप्पण्या