Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

प्रीत | मराठी ग्रामीण प्रेम कथा | रहेमान पठाण

रहेमान पठाण , marathi katha, Raheman Pathan,

खडकत, एक ग्रामीण भागात डोंगर पायथ्याशी वसलेलं दोन हजार लोकवस्तीचं खेडेगाव. ऊन मी म्हणत व्हतं, जीवाची पार लाही-लाही झाली व्हती…गावातील शिकलेली पोरं पुण्या-मुंबईला पसार झाली अन् गाव सारं भुंडं टेकाडागत दिसायला लागलं व्हतं. म्हातारी-कोतारी, गावातील पुढारी अन् उरलेली गावकरी आपलं जिणं जगत व्हती. त्यात आज नाम्या खेडकराच्या पोराचं, म्हणजे आपल्या मोहनचं लग्न व्हतं. गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण दिसत व्हतं, त्याला कारण बी तसंच हाय बरं का… अव्हं आपला मोहन्या लय शिकला, पुण्याच्या मोठ्या कॉलेजमधी. चांगला इंजिनिअर झाला, अन् तिकडंच एका कम्प्युटरच्या कंपनीत कामालाबी लागला. गड्याचं वय वाढत चाललं व्हतं पण तरीही लग्न काय जमत नव्हतं. शेवटी वयाची बत्तीशी ओलांडली अन् मोहन्यानी गणेगावची घुले पाटलाची छायडी पसंद केली. नाम्यानी आज अख्या गावाला आवातनं दिलं व्हतं. गाव सारा लग्नाला गोळा झाला व्हता… तर दत्या, रंज्या अन् गण्या ही मित्रमंडळी कुलवरा बनूनच सजली व्हती.

        “धनगर वाड्यात घुसला” म्हणत परण्या गावातून एकदाच्या मंडपात दाखिल झाल्या. अन् तळीराम, वऱ्हाड स्पेशालिस्ट, वाजंत्री यांनी विसावा घेतला… लग्नाची वेळ झालेली आहे, तरी नवरी मुलीचे मामा नवरदेवाचे मामा यांनी ताबडतोब लग्नमंडपात यावे. तसेच वऱ्हाडी मंडळी व सर्व गावकऱ्यांनी लग्न मंडपात बसून घ्यावे, अशी बामन काकाची मधुरवाणी कानावर पडली. छायडीची अन् मोहन्याची जोडी अगदी लक्ष्मी-नारायणावानी वाटत व्हती. तिचं निरागस व गावरान सौंदर्य अगदी खुलून दिसत व्हतं, गुलाबी साडीत तर आज तिच्या म्होरं एखादी हिरोनी झक मारण… असं तिचं देखणं रूप न्याहाळत आपला बत्तीस वर्षाचा तरुण, मोहन तिच्या म्होरं उभा व्हता. छायडी बारावीपर्यंत शिकलेली जेमतेम अठरा ते एकोणिस वर्षाची कोवळी पोर आपल्या भविष्याच्या लढाईसाठी सज्ज झाली व्हती. “आता सावध, सावध समयो…” अशी मंगलाष्टीका कानावर पडली अन् वाजंत्र्यांनी ढोल वाजवला. दत्या, रंज्या अन् गण्या वऱ्हाडयांच्या पंगतीला वाढायला लागले. वऱ्हाडी मंडळींनी जेवणासाठी पहिल्या व गावकऱ्यांनी दुसऱ्या पंगतीला बसून घ्यावे, असं माईकमधी पुकारलं गेलं. म्हणता-म्हणता सारा गाव बुंदीवर तुटून पडला !!

        पाहुणे-रावले आपआपल्या गावी निघून गेली व्हती… रात्रीची वेळ व्हती.. गोठ्यात म्हशी, वट्यावर नाम्या त्याची बायको शेवंती, मुली-जावई झोपली व्हती. तर आतल्या माळवदात मोहन्या अन् छायडी आपल्या ‘दिवाणावर’ डोकं टेकवून बसले व्हते… छायडी ती छायडी अन् मोहन्या तो मोहन्या… कुणीच कुणाशी बोलंना… शेवटी आपल्या रखडलेल्या गाड्यानंच पुढाकार घेतला अन् छायडीचा हात हळूच हातात धरून बोलू लागला… छायडी मात्र लाजूनच भिजली व्हती. तिने तो हात हळूच बाजूला सारला, पण मोहन्या काय दम काढेना… उतावीळ झाल्यागत कसं धरू अन् काय धरू, अशी बोंब होऊन बसली व्हती. मोहननी छायाच्या केसात हात घातला अन् तिची पप्पी घेणार इतक्यात शेवंताने दार वाजवलं… मोहन्या, ये मोहन्या.. दार उघड. तोंडापर्यंत आलेला घास हिरावून गेल्यागत मोहन्याची हालत झाली व्हती. आईचा आवाज ऐकून बळजबरीने दार उघडतो, तर शेवंता त्याच्यावर रागावते. मोहन्या बाहीर पालता पडलेला आत कधी उताणा झालास रं..! काय नस्ता कार तर नाहीना केलास. मोहन्या म्हणतो अगं आये.. तेवढ्यात शेवंता म्हणते, आधी बाहीर चल अन् गोठ्यात जाऊन तुझं काळं कर. आरं आपल्या कुलदैवताला ज्योतीबाला जायचंय, बाकीचे देवदेव करायचेत, मग सोळावा झाला की, कर तुला काय करायचंय ते. मोहन्या नीट उठून तावातावानं बाहीर जाऊन झोपतो… छायडी लाजून झोपी जाते.

        दोन तीन दिवसात गुळण्यापाणी आणि आपल्या रीती-भाती पूर्ण झाल्या. रानातील, गावातील नवसाच्या देवाला जाऊन झालं. हिकडं मात्र मोहन अन् छाया आपला दुरूनच डोंगर साजरा करायची. एक दिवस सगळे मिळून त्यांच्या कुलदैवताला ज्योतिबाला कोल्हापूरला गेले आणि एकदाचं दर्शन घेतलं. मोहन्या मनातल्या मनात ज्योतीबाला म्हणाला, पाव रे देवा लवकर. सोळावा जवळ येत व्हता पण मोहन्याला काय दमच निघत नव्हता. सारखा संधी साधून तो छायडीला भेटायला येयचा, पण शेवंता काय मेळ जमू देत नव्हती. छायडीला बी मोहन्याचं दुःख समजायचं, तिलाही आतून गुदगुल्या व्हायचा, पण बिचारी ती तरी काय करणार… रिवाज हाय म्हणल्यावर तो पाळलाच पाहिजे. पाणी पिण्याच्या, कपडे घेयच्या बहाण्याने मोहन घरात येऊन छायडीला पाहून, स्पर्श करून येयचाच. दुधाची तहान ताकावर भागवायचा. शेवटी बामन काकाच्या आशीर्वादाने एकदाचा सोळावा पार पडला अन् या जोडप्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

        रिवाजाप्रमाणे सगळ्या विधी पार पडल्या व्हत्या. आता उरला तो एकच विधी, ज्या विधीसाठी संपूर्ण मानवजात अतुरलेली असते. रात्रीची वेळ व्हती, शेवंतानं आज मात्र मोहन्याला स्वतःच माळवदात ढकललं होतं. माळवदात फक्त मोहन्या अन् छायडी, दोघेही एकमेकांना एकटक पाहतात, मोहन्या पेटलेला असतो, तो छायडीला मिठीत घेतो, तिच्या गालाची, ओठाची पप्पी घेतो. छायडी मात्र शांत दिसत व्हती, अंगात थोडा ताप ही आला व्हता, तिने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मोहन्या काय थांबायला तयार नव्हता. मोहन्या तिचा पदर दूर सारायला लागला अन् छायडी त्याला म्हणाली… हे बघा, माफ करा पण, मला पाळी आलीय… आज पहिलाच दिवस हाय, अंग खूप दुखतंय, पोटात बी दुखतंय, कसं करायचं तुम्हीच सांगा. मोहन्या थोडा दूर झाला, मग तिनेच त्याचा हात आपल्या हातात घेतला, हातावर ओठ टेकवलं अन् म्हणाली मला तुम्ही असं बेचैन होताना नाही पाहवत… पण मी तरी काय करू? थोडी कळ काढा. मोहन्या मात्र सुतक पडल्यागत खाटेवर शांत पडला व्हता. मग तिनेच त्याला मिठीत घेतलं, अंगा-खांद्यावरून, केसावरून हळुवारपणे हात फिरवला अन् म्हणाली तुम्ही माझ्याजवळच झोपा. फक्त ‘तेवढ’ सोडून… काय… मोहन्या तिला बळच हसत हो म्हणला अन् तिला मिठीत घेत खाटेवर पडला.

        असेच चार दिवस गेले अन् मोहन्याला त्याच्या कंपनीतून फोन आला. मोहन्याची सुट्टी संपली व्हती, त्याला अर्जेंट कामावर बोलावलं व्हतं. मोहन फोनवर साहेबाला येतो... येतो असं म्हणत असताना छायडी पाहते आणि निराश व्हते. मोहन कामावर जाऊ नये असंच छायडीला वाटत व्हतं. पण मोहन्यातरी काय करणार? त्या रात्री मोहन्या छायडीला सगळं समजावून सांगतो की, घरात आई-वडिलांशी नीट रहा. मी लवकरच सुट्टी घेऊन माघारी येईन, तिकडे रहायची सोय करीन अन् तुला घेऊन जाईन. स्वतःची काळजी घेत जा. तेवढ्यात छायडी रडायला लागते अन् त्याच्या गळ्यात पडते. मलाबी तुमच्या संग येयचंय, मी तुम्हाला सोडून हिथं नाय राहणार, मला नाय करमायचं. मोहन्या तिला सावरतो, अगं तुला सोडून मलाबी नाही जाऊ वाटत, पण जावं लागेल. माझा सारा जीव तुझ्यातच आहे, तू एकटी नाहीयस हिथं. छायडी भरल्या कंठाने म्हणते, आज पाळीचा पाचवा दिवस हाय… पण तुम्ही म्हणत असाल तर… मी नाही अडवणार आज तुम्हांला. या वेळेस मात्र मोहन्या तिला सावरतो आणि म्हणतो, अगं वेडे थोड्यासाठी कशाला तुलाबी त्रास अन् मलाबी त्रास… पुढं सारं आयुष्य पढलंय की आपल्याला. दोघंबी मेणबत्तीगत शांतपणे झोपी जातात.

        मोहन्या पुण्याला येऊन कामावर रूजू झाला व्हता. छायडीचं अन् त्याचं फोनवरच बोलणं व्हायचं, मोहन्या जित्ता व्हता तो फक्त छायडीच्या फोनवर अन् आपल्या कामावर… फोनवरच सारं बोलणं सुरू व्हतं. छायडीची त्याला लै आठवण यायची, दिवस तर कामात निघून जायचा पण रात्र कटता कटत नव्हती. म्हणून तो रात्रीचा पण ओव्हर टाईम करायला लागला. छायडी हिकडं मोहन्या कधी येतोय याची वाट पाहत व्हती तर तिकडं मोहन्यानी साहेबाला गोड बोलून सुट्टी मंजूर करून घेतली. ही गोड बातमी त्यानी पहिल्यांदा छायडीला सांगितली, छायडीला इतका आनंद झाल्ता की त्याला कधी भेटू अशी हालत तिची झाल्ती. मोहन्यानी आपल्या मित्रांना पण मी ३० मार्च ला गावाला येतोय असं सांगितलं. आता छायडी अन् मोहन्या आपली गुलाबी स्वप्न सत्यात उतरवणार व्हती, त्यासाठी फक्त काही दिवडच कळ सोसावी लागणार व्हती. छायडी आता दररोज आरशात बघून नटायची… घर सजवायची.. त्याची वाट पाहत बसायची. मोहन्यानी खास छायडीसाठी मॉलमधून सुंदर अशी साडी घेतली व्हती. तिला भेटल्यावर काय काय करायचं याचं अख्ख पुस्तकंच मनात तयार केलं व्हतं. आता आतुरता व्हती ती फक्त ३० तारखेची.

        देशात अचानक कोरोनाची लाट वाऱ्यासारखी पसरली, जागतिक महामारी म्हणून या साथीच्या रोगाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर येऊन केली. अन् छायडीच्या पोटात गोळाच आला, मोहन्याला तर आता स्वतःच कमनशिबी असल्याचा भास व्हत व्हता. त्यानं छायडीला फोन करून काहीबी झालंतरी ३० तारखेला मी तुला भेटायला येईनच असं सांगितलं. तवा कुठं छायडीच्या जीवात जीव आला. सगळेजण रात्री जेवायला बसलेले व्हते, टिव्हीवर कोरोनाच्याच बातम्या चालू व्हत्या, अन् माननीय मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्या बंद केल्या गेल्या. जिल्हाबंदी, जनता कर्फ्यु अशा घोषणा ऐकून सगळेच हवालदिल झाले. जेवण अर्ध्यावर सोडून छायडीनं मोहनला फोन लावला… मोहन्यानी तिला धीर दिला, तू काळजी करू नकोस, आईवडिलांची काळजी घे अन् मी नक्की तुला भेटायला येईन असं वचन दिलं. शेवंता तर मोहन्याशी बोलताना खूपच हळवी झाली व्हती.

        शेजारची वंचामाय तर म्हणायची की, अगं हौसे "त्या" लोकांनीच कुरोना आणलाय भारतात. त्यांची रंडकी झाली पाहिजी बघ, मुडदयांचा नुस्ता हुरसुळा उठलाय. आमच्या टीव्हीवर सगळं दाखवीत व्हती, टिव्हीवाले खोटं नसत्यात दाखवीत, अन् रात्री पप्प्याचं बाप पण हीच सांगत व्हतं. तर हौसा म्हणायची की अगं वंचे ह्या पुण्या-मुंबईच्या लोकांनी वाढवलाय बघ कुरोना. त्यांना गावाकडं येऊच देऊ नाय गावातल्यांनी… अशा प्रकारच्या चर्चा शेजारी पाजारी अन् गावभर चालूच व्हत्या. तर टीव्हीवर नको नको त्या बातम्या पाहून छायडी पार खचून गेली व्हती. बघता बघता गावबंधी झाली, रस्ते खोदले गेले, रस्त्यावर काटे टाकण्यात आले, माणसाला माणसाचा विटाळ झाल्यागत माणसं वागू लागली. जणू काय पुणेकर मुंबईकर हे सारे कोरोनाचे रुग्णच आहेत अशी बातमी पसरली व्हती. आता मात्र छायडीच्या डोक्यात विचारांचा थैमान माजला व्हता.

        पोलीसांची नजर चुकवत मोहन्या गाडीवर पुण्याहून गावाला आलाच… आल्या आल्या त्यानी छायडीला फोन करून सांगितलं की, मी स्टँडवर आलोय लगेच घरी येतो म्हणून. या वेळेस छायडीला मोहनशी काय बोलावं अन् काय नाय कळेना… तेवढ्यात तिथं दत्या, रंज्या अन् गण्या आली, मोहन्याला त्यांना पाहून आनंद झाला. त्यांच्या हातात हात देयला गेला तर सगळेच गपकन चार हात मागे गेली… मोहन्याला हा धक्का लै जिव्हारी लागला. लगेच दत्या म्हणाला की, माफ कर मित्रा पण तुला चौदा दिवस गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेत होम कोरोन्टाईन व्हावं लागल. ग्रामपंचायतीचा तसा नियम हाय, त्याला आम्ही काही करू शकत नाय. मोहन्या नुस्ता त्यांना पाहतंच राहिला…

        प्लास्टिकमधी जेवणाचा डबा येयचा तो बी ग्रामपंचायतीचाच माणूस छायडी कडून आणून देयचा. पण छायडी एकदाबी आली नाय. शेवंता अन् नामाला तर मोहन्यानीच येऊ नका असं सांगितलं व्हतं. छायडी आता पहिल्यासारखं फोन करीत नव्हती. मोहन्या तिला विचारायचा की फोन का करीत नाय, तवा ती चार्जिंग नसते असं सांगून मोकळी व्हायची. मोहन्या तिला सांगायचा की उद्या माझा होम कोरोन्टाईनचा शेवटचा दिवस हाय… तयार रहा, लै दिवसाचा ओव्हर टाईम पूर्ण करायचा बाकी हाय… छायडी मात्र बळच हसून विषय बदलायची. काळ्या पाण्याची सजा भोगल्यागत मोहन्यानी हे चौदा दिवस भोगलं.

        मोहन्यानी गाडीला किक मारली तसं थेट घरासमोर येऊनच ब्रेक लावला. आपल्या लेकराला पाहून शेवंता अन् नामाच्या जीवात जीव आला. शेवंताच्या डोळ्यातून गंगा वाहाय लागली, आलं गं बया माझं लेकरू असं म्हणत शेवंता मोहन्याला कुरवाळू लागली. मोहन्याबी थोडा हलका झाला अन् म्हणाला अगं आये, छायडी कुठंय… दिसत नाय. शेवंता म्हणाली की सकाळीच रानात गेलीय म्हशी घेऊन. मोहन्या थेट रानात.. त्याला दुरूनच छायडी दिसली, मोहन्यानी तिला आवाज दिला. छायडी द्विधा मनस्थितीत दिसत व्हती. ती त्याच्या समोर उभी राहिली, दोघबी एकमेकांना एकटक बघत व्हती. कितीतरी दिवसांचा विरह आज संपणार व्हता… उन्हानं लाही-लाही झालेलं शेत, दुष्काळानं माखलेला परिसर आज कुठंतरी ओलावा शोधत व्हता. मोहन्या लोकांचा कानोसा घेत छायडीच्या जरा जवळ जात आहे… छायडी त्याला न्याहाळत आहे… दोघंबी नजरेला नजर भिडवत आहेत… हळूच छायडीच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसत आहेत… आणि ती त्या मिठीत घेणार इतक्यात मोहन्याला जोरात खोकला येतो. तो खोकतो… पुन्हा खोकतो… अन् वर पाहतो तर छायडी मात्र त्याला तिथं दिसत नाही..!!

- रहेमान पठाण,
मो.नं. ८८८८७२४९६०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या