असं म्हंटलं जातं नावात काय आहे… मग ते नाव असो वा टोपणनाव. तसं पाहिलं तर जन्मानंतर बाराव्या दिवशीच आपल्याला नाव मिळतं. तेही विधीवत ‘नामकरण’ सोहळा करून अगदी गोडधोडाचे जेवण, घुगर्या, पेढे, बर्फी, पान, सुपारी वाटून. मग हे नाव म्हणजेच आपलं ‘नामकरण’ ही काय साधी गोष्ट नाही हे नक्की. कारण त्यासाठी पै-पाहुणे, डाम-डौल सजलेला असतोच. आपलं मानापानाने नाव ठेवणं म्हणजेच आपल्याला दिली गेलेली एक कायमची ओळखच. ती ओळख मरेपर्यंत आणि चिरकाल जिवंत राहते… पण कधीकधी मात्र आपले मूळ नाव सोडून. आपल्याला वेगळ्याच टोपण नावाने बोलवले जाते. अर्थातच हे टोपण नाव म्हणजेच विशिष्ट असे मिळालेले उपनाव किंवा उपाधी… ज्याला बोली भाषेत आपण ‘टोपणनाव’ म्हणून संबोधिले जाते. कित्येक लोक असे टोपण नावांनीच प्रसिद्ध असतात. तसेच साहित्यिक क्षेत्रातही असे बरेचसे साहित्यिक टोपण नावाने प्रसिद्ध झाले आहेत.
काहींनी स्वत:ही टोपणनावे धारण केलीत तर काही साहित्यिकांना ती आपोआपच मिळत गेलीत. तर काहींना टोपण नाव न धारण करताही त्यांच्या मूळ नावानेच प्रसिद्धी मिळली. त्यापैकीच शिवाजी सावंत, रणजीत देसाई, वि.स.खांडेकर, आनंद यादव, विश्वास पाटील अशा अनेक लेखकांची साहित्यिकांची यादी समोर येते. यांच्या लेखन कौशल्यामुळे त्यांच्या मूळ नावाला आपोआपच प्रसिद्धी मिळाली आहे. तर काही टोपणनावाचे साहित्यिकही आपल्या लिखाणामुळे साहित्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवून गेले… त्यापैकी ‘केशव प्रल्हाद अत्रे’, यांचे टोपण नाव “केशवसुत” ‘केशवरावांचा’ मुलगा “केशवसुत” तर ‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांना “केशवकुमार” या टोपणनावाने ओळखतो. ‘वि.वा.शिरवाडकरांचे’ टोपणनाव “कुसुमाग्रज” यांचा जन्मदिवस मराठी भाषादिन म्हणून आपण साजरा करतो. तसेच ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे’ यांना “बालकवी” म्हणून ओळखले जाते. हे टोपणनाव लोकमान्य टिळकांनी बालकवींना दिले आहे. तर “रानकवी” म्हणून ‘ना.धो.महानोर’ यांना ओळखले जाते. ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ म्हंटले की आठवतात कवी “बी”. ‘माधव त्र्यंबक पटवर्धन’ म्हणजे “माधव जुलियन”. ‘आत्माराम रावजी देशपांडे’ म्हणजे डोळ्यासमोर उभे राहतात कवी “अनिल”. अशी अनेक टोपणनावे असलेले साहित्यिक या साहित्य क्षेत्रात आहेत. ज्यांनी आपली ओळख आपल्या नावापेक्षा किंवा टोपणनांवापेक्षा आपल्या सुंदरतेने नटलेल्या, वेगळेपण जपणाऱ्या लिखाणामुळे निर्माण केली व ते अमर झाले. आपल्या खास नावांनी. ती खास नावं घेतली की डोळ्यासमोर उभे राहतात. त्या साहित्यिकांनीच लिहलेली पात्रे. ‘रणजीत देसाई’ नांव समोर येताच आठवतात ते “श्रीमान योगी”. ‘शिवाजी सावंत’ म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मृत्युवर जय मिळवलेला “मृत्युंजय कर्ण”. ‘विश्वास पाटील’, म्हंटलं की आठवतो “पानिपतचा इतिहास”. ‘तुकाराम महाराज’ आठवले की आठवतात “अभंग”. ‘तुकडोजी महाराज’ आठवले की आठवते ती “ग्रामगीता” आदर्श गावाची संकल्पना. ‘ज्ञानेश्वर’ म्हंटले की आठवतात “ओव्या”. ‘एकनाथ महाराज’ म्हंटले की डोळ्यासमोर येतात “भारुडे”. ‘गाडगेबाबा’ म्हंटले की आठवतात त्यांची “किर्तने”... ‘बहिणाबाई’ म्हणजे मधाळ शब्दातल्या “अष्टाक्षरी” रचना… ‘रामदास स्वामी’ म्हंटले की आठवतो तो “दासबोध”.. भुजंगप्रयास मात्रागण… ‘सुरेश भट्ट’ म्हणजे “मराठी गझल”. ‘कवी सुधांशु’ म्हंटले की डोळ्यासमोर उभे राहतात ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर.. आणि “औदुंबर” असे एकापेक्षा एक अनेक साहित्यिक आपल्या नावांनी किंवा टोपणनावांनी रसिक वाचकांच्या मनात युगानुयुगे घर करून राहतील यात तीळमात्र संशय नाही.. याला कारण म्हणजे त्यांची विशिष्ट एक वेगळेपण जपणारी मराठी भाषेला वेगळ्या उंचीवर नेऊन समृद्ध करणारी त्या साहित्यिकांची लेखनशैली किंवा लेखनकला होय !!
एकूण काय तर साहित्यिकांना टोपण नावाची गरज असण्यापेक्षा वेगळेपण जपणाऱ्या लिखाणाची गरज आहे. साध्या सोप्या, रूचकर आणि रसिक श्रोत्यांच्या हद्यात घर करून त्यांच्या गळ्यातील ताईत होणारे लेखन प्रत्येक साहित्यिकाकडे असायला हवे. त्याची गरज साहित्यिकांना आहे. आपलं लेखन कौशल्यच साहित्यिकांना टोपणनावे बहाल करते. तर ते काहींचे टोपणनावे तर काहींची नावे साहित्यक्षेत्रात अजरामर करते. शेवटी एकच वाटते. साहित्यिकांना खरंच गरज आहे ती म्हणजे आपल्या लेखनात आपला वेगळा ठसा उमटविण्याची…
लेखिका- सौ.क्रांती तानाजी पाटील,
मु.पो. दुशेरे, ता.कराड, जि.सातारा.
0 टिप्पण्या