“क्षणिक आहे ते ही बाळा, मेळ माणसांचा..
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा”.
अनेकदा याची प्रचिती येत राहते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. जगण्याची, वागण्याची दिशा वेगळी. सुख-दुख-वेदना वेगळी. अनेकदा असे प्रसंग आयुष्यात येतात की ते निमूट स्वीकारण्या खेरीज पर्याय उरत नाही. अन्यथा आपली अगतिकता प्रकट करण्यात कुणाला सन्मान वाटेल? अंधारात चाचपडताना माणूस मेणबत्तीचा शोध घेतो तद्वत कठीण प्रसंगी तो प्रेरणेचे दीपस्तंभ शोधतो.
अशा कठीण परिस्थितीत बोलकी माणसे अबोल होतात. आनंदी माणसे गंभीर होतात. कार्यक्षम माणसे हतबल होतात. विचार खुंटतात. मती कुंठित होते. ही वेळ निघून जात असताना कासवाची गती घेते. अशावेळी माणसाला आपल्या माणसांच्या संवेदनेची गरज भासते. कुणी कुणाचे नशीब बदलू शकेल असंही नाही. पण ती वेळ निभावून नेताना, “मी आहे ना..”, हा जिव्हाळ्याचा शब्द, पाठीवरील आश्वासक हात, काळजी, आपुलकी, सह वेदना माणसाला आपत्तितून सुखरूप बाहेर आणते. निदान येणार्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्याची प्रेरणा निश्चित देते.
“कसे आहात? काय चालले आहे? काही अडचण आहे का? हे ही दिवस जातील…” हे आधाराचे शब्द संकट काळी संजीवनी ठरतात. हरलेल्या आयुष्याला नवी उभारी देतात. समज-गैरसमजाच्या पार जाऊन सत्य समजून घेणं, स्नेहल शब्दांनी आपल्यांची आपुलकीने विचारपूस करणं हाच तो जिव्हाळा… इतरांचं दु:ख जाणताना, “शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले…” हा भाव असायला हवा. कारण लाखो स्नेह्यांच्या भाऊगर्दीत “आधार देणारे खांदे” खूप दुर्मीळ झालेत…
- विजया पाटील, कराड
0 टिप्पण्या