आत्मविश्वास
तू रूजवलेली ती आत्मविश्वासाची वेल आत्ता कुठे मनाप्रमाणे वाढू लागलीय, कारण तू तिची 'बी' सुसंस्काराच्या मातीमध्ये पेरून तिला धाडसाचे पाणी आणि स्वबळाची ताकद दिली आहेस आणि बघ ना तिची वाढही किती निकोप होत आहे. दररोजच्या रवीकिरणांनी प्रत्येक सुकार्यातून उजळून गगनाला भिडण्याचं जणू स्वप्न ती बघत आहे.
मधूनच येणार्या जीवघेण्या वादळ वाऱ्याने, होरपळणाऱ्या ऊनामुळे ती कदाचित काही काळापूर्ती कोमजून ही जाईल म्हणून का ती स्वत:च अस्तित्व हरवून बसणार आहे का? उलट ती आणखीच बहरेल तुझ्या विश्वासाच्या, कर्तव्याच्या भक्कम आधाराने आणखीच तेजाळून!
आणि जेव्हा तिच्या हिरव्यागार प्रयत्नांच्या वेलीवर सुंदर सुंदर कर्तव्यात डोलणारी फुले उमलतील आणि स्वत:च्या अस्तित्वाची छाप प्रत्येक मनावर पाडतील ना तेव्हा त्या वेलीच्या निखळ निस्वार्थी स्वअस्तित्वासोबत बहरण्याचा तुला नक्कीच अभिमान वाटेल. बांडगुळे काय रे एखाद्या मोठ्या वृक्षाचा आधार शोधून जगण्याचा प्रयत्न करतील पण ही आत्मविश्वासाची वेल स्वकर्तृत्वावर नक्कीच तिला हवे ते आकाश शोधेल आणि म्हणूनच ती नाजूक, हळवी वेल इतरांच्या नकारार्थी उद्देशांना न जुमानता त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून आपली मुळे मातीत भक्कम रुजविण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ती मातीत जितकी जास्त खोलवर असतील तितकीच ती वेल निरभ्र आकाशात उंचच उंच स्वछंद वाढेल आणि जेव्हा का ती सक्षम बनल्याची तिला जाणीव होईल तेव्हा तिला कोणत्याच गोष्टींची खंत उरणार नाही कारण तिने तिचं स्वत:च आकाश गाठून एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले असेल! आणि तेव्हाच तिच्या विकासाच्या मार्गातील काट्यांनाही स्वत:ची चूक आणि वेलीच्या अंगी असणार्या गुण वैशिष्ट्यांची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही मग ती निसर्गनिर्मित संकटे असतील किंवा संकुचित सामाजिक मनोवृत्तीची पुनरावृत्ती!
फक्त हे विसरून चालणार तिला यासाठी साथ हवी कोणत्याही परिस्थितीत भक्कम विश्वासासह सकारात्मक समर्थ साथीच्या आधाराची !
- सीमा पाटील (मनप्रीत),
कोल्हापूर
0 टिप्पण्या