Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

चुकलेली वाट | रहस्यमय कथा | सौ हेमा येणेगूरे

chuklelee Vat, bhaykatha, Marathi katha मराठी भयकथा ,

चुकलेली वाट

डॉ.सुषमा आपल्या केबिनमध्ये रडत बसल्या होत्या. एवढ्या मोठ्या सर्जन पण आपल्या मुलीला म्हणजे अनघाला वाचवू शकल्या नव्हत्या. त्या हमसून रडू लागल्या. डॉ.संयम त्यांना समजावत होते. त्यांचही दु:ख मोठंच होतं. पण म्हणतात ना, पुरुषांना रडता येत नाही. आणि आलं तरी दाखवता येत नाही. वडील म्हणून त्यांनी खूप काही केलं होतं अनघासाठी. अनघा ही डॉ.सुषमाची पहिल्या नवऱ्याची मुलगी पण डॉ.संयमने ते कधी जाणवू दिलं नाही की तो सावत्र बाप आहे. अनघाच लग्न ठरले तेंव्हा सुषमाने खरं सांगितले. पण अनघाने ते सत्य मानलं नाही. अनघा संयमाच्या घरी दीड वर्षाची असताना आली. त्यालाच ‘बाबा’ म्हणू लागली. बोबडं बोल बोलणारी अनघा कधी संयमाची मुलगी झाली हे संयमालाही कळाले नाही.

        डॉ.सुषमा जेंव्हा शिकायला हैद्राबादला होती. तेंव्हा तिची ओळख हॉस्टेल शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर्समधे काम करणाऱ्या आशिषशी झाली. आशिष बारावी पास पण दुकानात सगळ्यांना सांगे की तो‌ बी फार्मसी केलेला आहे. सहा वर्षे त्या दुकानात काम केल्याने एकन एक गोळीची माहिती त्याला होती. जवळ खोटं सर्टिफिकेट होतंच. त्याच्या प्रेमाला भुलून सुषमानं त्याच्याशी लग्न केले पण झाले वेगळेच...

        सुषमाने आशिष बरोबर लग्न करण्यासाठी आई-वडीलांची परवानगी मागीतली पण त्यांनी नाही दिली. जाती बाहेरील मेडिकल मधला जावई त्यांना नको होता. आपली मुलगी तर जावईही डॉक्टर हवा असं त्यांचं मत होतं. आई-वडीलांनी नातं तोडल्यावर भावानेही बोलणं बंद केले. तरीही सुषमाने प्रेमाखातर लग्न केलंच. लग्न झाल्यावर त्याने तिला एका मोठ्या बंगल्यात नेलं. तिथे आई-वडीलांची ओळख करून दिली. तिथे तिचं स्वागत हसतमुख झाले पण दारात ओवाळले गेले नाही. तास दोन तास बसल्यावर तो तिला घेऊन निघाला. तेंव्हा त्यांनी तिची साडी खणांनी ओटी भरली. घराबाहेर पडल्यावर कळाले की ते मानलेले आई-वडील आहेत. परत ती रिक्षात बसून निघाली. आता रिक्षा अर्धा तास प्रवास करून एका वस्तीत शिरला. जराशी गलिच्छ आणि जवळ जवळ चिकलेली छोटी जुनी घरे दिसू लागली. तेवढ्यात रिक्षा एका चाळीवजा इमारती जवळ थांबली. अतिशय जुनी व अस्वच्छ अशी ती बिल्डींग होती. रस्त्यावरील पसारा व घाण ओलांडत एका घरासमोर ते येऊन थांबले. त्याने घराची बेल वाजवली. तशी एक बाई खेकसतच दरवाजा उघडली. कुठं खपला होतास रं सकाळ पासून ? तेवढ्यात तिचं लक्ष सुषमावर गेलं. ‘ही कोण’ बया?. ही माझी बायको ‘सुषमा’!. आरं देवा ! मा‍झ्या कर्मा ! किती जणींचं वाटोळं करणार हायस रं तू ? असं म्हणत बडबड करत ती आत गेली. आशिष म्हणाला, आईकडे लक्ष देऊ नकोस ती काय पण बडबड करते. तिच्याकडं लक्ष देऊ नकोस चल आत. इथं तर स्वागत सोडा पण साध तिला आत सुध्दा ये म्हंटलं नाही कोणी. ती आत गेली, घरात. घरभर पसारा. अस्वच्छ अस घर. पलंगावर खोकलणारा बाप. बसायला जुना सोफा. त्याने तिला एका खोलीत नेलं. ती घाबरून अवघडून बसली. तो येतो म्हणून निघून गेला. दुपारचे चार वाजलेले, सुषमा तशीच बसून राहिली. खोलीत पण पसारा होता पण जरा आवरलेला. हलायला जागा नाही एवढा पसारा. फक्त पलंगावर झोपता येईल एवढीच जागा. भिंतीवर एक फोटो जरा आशिष सारखाच चेहरा पण थोडा मोठा शेजारी एक बाई. कोण असेल ही असा विचार करत सुषमा बसली. सहा वाजले पण तिला कोणीही बोलेना. तिची एक झोप पण झाली. आशिष अजूनही घरी आला नव्हता. ओंगळवाणं घर बघून सुषमाला कसंतरी होत होतं. आशिषने तिच्याशी खोटं बोललं होतं. तेवढ्यात एक बाई व पुरुष घरात आले आणि सरळ खोलीत आले. ती बाई सुषमावर वसकलीच. ‘ये कोण ग तू?’ ‘इथे मा‍झ्या खोलीत काय करतेस?’. आरडाओरडा ऐकून आशिषची आई आली आणि सुषमा आशिषची बायको आहे हे सांगितले. बापरे! ही तिसरी, किती लग्न करणार आहे तो. एकीला धड सांभाळता येत नाही. हे ऐकून सुषमाला धक्काच बसला. ‘काय,मी तिसरी बायको?. हो त्यानं तुला काही सांगितलं नाही का? एकीनं आत्महत्या केली आणि दुसरी पळून गेली त्याच्या जाचानं. तू कशी भुललीस माहित नाहीस. चांगल्या घरची दिसतेस. काय करतेस. ‘डॉक्टर आहे’ एवढं उत्तर देऊन ती भोवळ येऊन पडली. तिच्या हाताला धरून उठवलं आणि जा बाहेर बस मला साडी बदलायची आहे. असं ती म्हणाली. सुषमा रडत रडत बाहेर सोफ्यावर येऊन बसली. ते दोघं आशिषचे भाऊ वहिनी होते. सुषमाला खूप मोठा धक्का बसला होता. आशिषने तिची घोर फसवणूक केली होती. आता परत आई-वडीलांकडे जाता येत नव्हते.

        पुढे आशिषने तिचा छळ केला. त्यातच ती गरोदर राहिली. एक मुलगीही झाली आणि तो एका अपघातात गेला. सुषमा परत रस्त्यावर आली. तिने स्वत:ची हॉस्पिटलच्या रूमध्ये रहायची सोय केली. तेथेच संयमाची तिची ओळख झाली होती. पुढे त्यांनी लग्नही केलं. अनघाला त्याने आपली मुलगी मानली. पुढे त्यांना मुलगा अनयही झाला. सुषमाची चुकलेली वाट आता योग्य दिशेला आली होती. पण आज अनघा जाऊन परत चुकलेली वाट दिसू लागली होती.

        अनघानेही तीच चूक केली होती जी सुषमाने केली होती. अनघाही डॉक्टर होण्यासाठी जेव्हा मुंबईला शिकायला गेली तेंव्हा तिच्याच वर्गातील‌ अतिशय स्मार्ट आणि श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडली होती. लाख जणांनी तिला समजावून सांगितले होते की तो तुझ्याशी फक्त खेळतोय पण ती मानायला तयार नव्हती. ती तिसर्‍या ईयरला असताना समीर सिंधीया हा दुसर्‍या मुलीसोबत‌ फिरताना दिसू लागला. अनघा जेंव्हा सुट्टी संपवून कॉलेजमध्ये गेली तर तो तिच्याकडे पाहतही नव्हता. ती खूप रडली, त्याला विनवलं, पाया पडली. ती रागावून म्हणाली, तू फसवलं मला. प्रेमाच नाटकं केलंस आणि आता सोडून देतोस. तर तो जोरात हसला आणि म्हणाला, मी आणि तुझ्याशी प्रेम. तुझी लायकी तर आहे का माझ्या‌सोबत थांबायची. लग्न आणि प्रेम दूरच राहिले. तिला खूप मोठा धक्का बसला. सगळ्यांनी सांगितले तेंव्हा आपण ऐकलं नाही, याचा तिला पश्चात्ताप झाला. तिने कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला. पण नशीबाने ती वाचली. पण तिच्या डोक्यावर परिणाम झाला. तिचं लास्ट ईयर बाकी होतं एम.बी.बी.एस पूर्ण करण्यासाठी, पण ते राहून गेलं. तब्बल दोन वर्ष लागली तिला ठीक होण्यासाठी. तिने मग बी.एस.सी. केलं आणि एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली. आपल्या मुलीचं झालेलं वाटोळं आई-वडीलांनी गुपचूप सहन केलं. दुसरा पर्याय नव्हता. पुढे अनघानेच शाळेतील एका शिक्षका सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हाही आई-वडीलांना विचारलं नाही. सुषमाने अनघा कोणाची लेक असून तिच्यासोबत काय घडलं याची पूर्ण कहाणी सांगितली. पण अनघाने त्याकडे दुर्लक्ष केले. ती सून म्हणून पाटील वाड्यात दाखल झाली. लग्न म्हणावं तसं आनंदात झाले नाही. विवेक पाटील हा तिचा नवरा. लग्नात‌ सगळे विचित्र नजरेने अनघाकडे व‌ सुषमाकडे पहात होते. काहीतरी आपापासात‌ कुजबुजत‌ होते. काय होतं पाटलांच आणि पाटील वाड्याच रहस्य.

        अनघाने पाटील वाड्यात पाऊल टाकले तसे स्वागत करायला कोणी आले नाही. सगळे जरा विचित्र नजरेने पाहत होते. तिला खोलीत येऊन जास्त कोणी बोललं नाही. दुपारी तिला जेवणाला बोलावण्यात आलं. ती गेली तेंव्हा विवेकही तेथे आला होता. सकाळपासून तो खोलीत आला सुध्दा नव्हता. जेवण झाल्यावर कामवाल्या बायका ताट उचलू लागल्या. सर्वजण हात धुण्यासाठी उठले. तेवढ्यात आजीमाई म्हणजे विवेकच्या आजी म्हणाल्या, ‘सुनबाई दुपारी चांगली झोप घे! रात्रभर जागायचं आहे’. अनघाला ऐकून कसंतरी वाटलं. लाजही वाटली, तिने माईआजीकडे लाजून पाहिलं पण त्या करारी चेहर्‍याने म्हणत होत्या. त्यांनी विवेकच्या आईला तिच्यासोबत झोपायला सांगितले. विवेकला आताच रूमध्ये जाऊन यायचं तर ये संध्याकाळी सहानंतर जाऊ शकणार नाहीसं हे ही बजावलं. अनघाला तर काहीच कळत नव्हते. एकीकडे रात्रभर जागायचं म्हणत होते आणि सासूबाईला सोबत झोपायला सांगत होते. ती खोलीत निघून गेली. विवेक खोलीत आल्यावर तिने त्याला विचारलेच की असं का? पण तो म्हणाला संध्याकाळी कळेल. ती न समजून झोपी गेली. तिला पाच वाजता बाईने उठवलं. चहा देऊन सहा अगोदर सजून धजून रुममध्ये बसायचं. पण झोपायचं नाही. आठ वाजता जेवण येईल ते खायचे व बसून रहायचे. अनघाला काही समजेना. ती फक्त सांगलं तसं करत होती. आता सासू खोलीत आल्यावरच हे काय चाललंय ते कळणार होतं.

        रात्रभर जागून काढल्यानंतर चार वाजता नानजीकाका व मोतीअप्पा सावत्या घेऊन आवाज देत वाड्यात फिरू लागले. तेंव्हा घरातील सगळ्या स्त्रिया झोपी गेल्या. सकाळी आठलाच सर्वजणी उठल्या. फक्त माई आजी झोपल्या होत्या. त्या उठून पूजेच्या तयारीला पाच वाजता लागल्या. विवेक पण उठून तयार होऊन शाळेला निघून गेला होता. अनघाने नोकरी करावी पण दहा-बारा दिवसांनी असं ठरलं. दोन दिवस देवाला जाऊन येणे यात गेले. तेथे मात्र सर्व लोक हसत खेळत होते. घरी आल्यावर मात्र रोजच्या सारखे वातावरण झाले. पहाटेच सत्यनारायण पूजा सुरू करून दुपारपर्यंत जेवण संपवले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची सुहागरात ठरली. रात्रीचे दिवसा घडत असल्याने अनघा बावरली. तिला काही कळत नव्हते आणि कोणी काही सांगत नव्हते. पाच वाजता अनघाला अंघोळ घालून तयार केलं. आज मात्र रात्री अनघाला तयार केले नाही. पण आजही तिला जागतच ठेवलं. दुसर्‍या दिवशी अनघाने ठरवलं, काम करायला येणार्‍या राधाला पैसे खाऊ घालून खरं काय ते शोधायचं. दुपारी जेंव्हा सगळे निवांत झोपले तेंव्हा तिने राधाला विचारले. या वाड्यात काय चालले आहे. तर राधा एवढंच म्हणाली, विवेक दादाशी जास्त जवळीक ठेवा. या वाड्याला लवकर वंशज द्या. हा पण रात्री झोपू नका. नाही तर दादांच्या तीन‌ बायका जशा गायब झाल्या तशा तुम्ही पण व्हाल. राधा एवढं बोलून तेथून निघून गेली. अनघा तर हादरलीच. तिने या वाड्यात घडणार्‍या घटनांची जास्तच धास्ती घेतली. नोकरीच्या बहाण्याने या वाड्यातून निघायचं तिने ठरवलं. पण तिचं मन तिला स्वस्थ बसू देईना. ‘विवेकच्या बायका कोणी गायब केल्या, का त्यानेच त्यांना गायब केलं असेल. मुल होत नाही म्हणून ! त्यांना मारून वाड्यात कुठे तरी पुरलं असेल. एवढा मोठा वाडा कोणाला काय कळणार होतं. का दुसरंच काही कारण आहे. आपल्याला शोधलं पाहिजे’ या विचाराने तिने वाडा सोडण्याचा निर्णय बदलला. वाड्याच गुपित ती शोधणार होतीच. पण कुठून सुरू करावे कळत नव्हतं.

        वाड्यातील गूढ शोधण्यासाठी अनघा प्रयत्न करू लागली. डॉक्टरकी शिकल्यामुळे भूत खेतावर तिचा विश्वास नव्हता. तिला वाटू लागले की विवेकनेच काहीतरी केलं असेल. ती त्याच्यावर पाळत ठेवू लागली. पण वावगं काही दिसून आले नाही. शेवटी तिने त्याला तडक प्रश्नच केला. तुझे अगोदर चार लग्न झाले आणि तुझ्या त्या बायका गायब झाल्या. हे तू मला का सांगितला नाहीस?. तिच्या प्रश्नाने तो दचकला. तुला कुठून कळले सर्व?

        मी काय विचारले त्याचे उत्तर दे विवेक, नाही तर मी ‘तू माझी फसवणूक केल्याची आणि चार बायका गायब केल्याची केस दाखल करेन’ .

        नको, सांगतो मी! मा‍झ्या बायका मी गायब केल्या नाहीत, त्या रात्री अचानक कोणीतरी गायब केल्या. पहिली एक वर्षाने, दुसरी सहा महिन्यांनी तर तिसरी चार महिन्यानी चौथी तर मधु चंद्राच्या रात्रीच‌ गायब झाली. तुझ्यावर‌ माझं प्रेम होते. तू माझ्याशी लग्न करणार नाहीसं वरून माझं चरित्र तुला खराब वाटेल म्हणून मी काही सांगितले नाही. पण देवाशप्पथ सांगतो मी काहीही केलेलं नाही. उलट मीच तपासत आहे की हे कोण करतं आहे. माझे एक मोठे काकाही गायब झाले आहेत. मी सगळ्यांना शोधतोय. का? बाकीच्या काकांची मुलं कुठं आहेत ते का येत नाहीत शोधायला, अनघा. मा‍झ्या कोणत्याही काकांना मुलं नाहीत, मी सुद्धा दत्तक घेतलेला मुलगा आहे. सगळ्यांना मुलं का झाली नाहीत याच्यामागे मोठी कहाणी आहे. मा‍झ्या मोठ्या काकांचे नाव अप्पासाहेब पाटील. अतिशय कडक आणि लोभी वृत्तीचे होते. त्यांनी आपल्याच मित्राला दगा देऊन त्यांची पूर्ण इस्टेट बळकावली. हा वाडाही त्यांचाच होता. त्या धक्क्याने ते आजारी पडले पण जाताना काकांना तळतळाट दिला की तुला आणि तुझ्या पुढच्या तीन पिढ्यांना कधी मुलं होणार नाहीत. ज्यांच्यासाठी हे बळकावून बसलास तेच राहणार नाहीत. निर्वंश राहशील तू आणि तुझं घराणं. झाले तसेचं, त्यांना व कोणालाही मुलं बाळं झाले नाहीत. माझे वडील बाहेर नोकरीला होते त्यांनी दोन मुलं दत्तक घेतले. मी व वैभव पण वैभव या नाटकांना कंटाळून परदेशात निघून गेला. मी इथेच राहिलो. त्यानंतर माझं लग्न झाले. मलाही वर्षभरात मुल राहिले नाही. त्यानंतर एका दिवशी ती बायको गायब झाली. पुढचं तर तुला सांगितले आहेच. वाड्यातील सर्व बायका भेदरलेल्या आहेत. वाडा सोडून जाण्याचा म्हणून एकदा प्रयत्न केला. पण दोन नंबरच्या काकांचा खून झाला. मग कोणीही वाडा सोडून गेले नाही. पण बायका गायब होतात म्हणून रात्री सर्व बायका जागतात. चारला पुरुष उठून वाड्यात पहारा देतात तेंव्हा बायका झोपी जातात. मधुचंद्राच्या रात्री चौथी बायको गायब झाल्याने आपला मधुचंद्र दुपारी साजरा झाला. रात्री जाणून बुजून मी तुझ्या खोलीत येत नाही झोपायला. मला माफ कर मी तुझ्या पासून लपवलं.

अनघाकडे काहीच उत्तर नव्हतं. तिने आई वडीलांना सगळं कथन केले पण तेही काही बोलले नाहीत. बोलले आणि अनघाने काही करून घेतले तर.

        सुषमाला खरं तर खूप रडू येत होते. आपल्या मुलीनं कसल्या आगीत उडी घेतली हे बघून. पण काही करता येत नव्हते. तिला सावरायला संकेत आला होता पण अनघाला कोण सावरणार? तिला दोन धक्के सहन होतील का? या विचाराने ती हैराण झाली. पण अनघा शांत होती. तिने या गोष्टींच्या मुळाशी जायचं ठरवलं. तूर्तास तरी तिने विवेकला माफ केलं. पण तिचा अजूनही विवेकवर संशय होता. ती वाड्यात परत आल्यावर रात्री जागायचं आहे तर मग आपण लक्ष द्यायचं की काय घडतं. विवेकच्या बायका वाड्याबाहेर गेल्या नाहीत म्हणजे वाड्यातच कुठंतरी असणार. तिने वाड्यात कुठे तळघर वा असे कोणते ठिकाण आहे का, जे कोणालाही माहित नाही. दिवसा या गोष्टी शोधायच्या ठरवल्या. नोकरीतून काही महिन्याची सुट्टी घेतली. राधाला पैसे खाऊ घालून मदतीला घेतले. त्या दिवशी तिला वाड्यात काही सापडले नाही. पण त्या रात्री अचानक वाड्यातील दिवे गेले. टेंबे पेटवे पर्यंत अनघाला कोणीतरी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित तो पुरुषच असावा. ती हाताने चाचपडून पहात होती. घाबरून चालणार नाही, सुटका करून घेतली पाहिजे या विचाराने अनघाने आपली एक लाथ जोरात त्याच्या पोटात मारली त्यामुळे तो कळवळला आणि तिला सोडून दिले. ती धपकन खाली पडली. तोपर्यंत नानामामा व सावत्या टेंबे घेऊन तिच्या खोलीत आले. तिच्या ओरडण्याने तिची सासू पलंगाखाली जाऊन बसली होती. तर अनघा जमिनीवर पडली होती. पुढच्या पाच मिनिटांत घरचे सर्व जण तेथे आले. विवेकही त्यात होता. अनघाची छाती अजूनही धडधडत होती. विवेकने तिला पकडून उठवलं. आई कोठे आहे अनघा? सगळे घाबरले. आईच गायब झाली की काय? तेवढ्यात त्याची आई पलंगाखालून बाहेर आली. अनघाने काय घडलं ते सांगितले. तो एखादा पुरुषच होता. अंगावर‌ आणि डोक्यावर केस वाढलेले होते. पण तिने त्याच्या पोटात लाथ घाल्याने तिला सोडले. पण अजूनही वाड्यातच असेल चला शोधूया. पण नानामामा म्हणाले, काही फायदा होणार नाही. पन्नास रुमचा वाडा आहे, त्यात दिवे गेले आहेत. कोण आहे तो माहित नाही. परत कोणावर हल्ला केला तर. त्यापेक्षा आज तुम्ही सगळ्या बायका एका खोलीत झोपा आम्ही सर्वजण पहारा देतो. खिडक्या दार घट्ट लावून घ्या. सगळ्या आत झोपल्या खरं पण घाबरून डोळा लागतच नव्हता.

        अनघाने सांगितलेल्या त्या पुरुषाच्या वर्णनावरून बायका तर घाबरल्या होत्या. पण पुरुष मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. दिवे लागल्यावर नानामामा, सावत्या, मधले‌ काका, विवेक सगळे वाड्यात फिरू लागले. शोधू लागले, पण वेगळं काही दिसेना. वाड्याचे दोन्ही भक्कम दार आतून बंद होते. मग आत कोण येणार. दुसर्‍या दिवशी अनघाला बहुतेक अंधाराची भीती वाटली असेल आणि तिला भ्रम झाला असेल‌ असे सर्व लोकांच मत झालं. अनघा म्हणाली, नाही मी जागीच होते. मला तहान लागली होती, मी उठून पाणी पीत होते तेंव्हा अचानक लाईट‌ गेली. मी उठून दिवा लावेपर्यंत खोलीत कोणीतरी आलं. तेही खिडकीतून, कारण मी दरवाजा लावला होता. पण मला उचलून नेताना त्याने दरवाजा खोलला होता. बाहेरून‌ कोणी आले नाही, पण घरातील व्यक्ती अशी वेषभूषा करून येऊ शकतो. तो या घरातील कोणीतरी आहे. हे बोलणं चालत असताना, इन्स्पेक्टर विजय देसाई तेथे आले. सगळे घाबरले आणि आश्चर्याने पाहू लागले. अनघाने सांगितले तिनेच त्यांना बोलवलं आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी. इनस्पेक्टर विजय देसाई यांनी सर्व लक्ष देऊन ऐकले. मग घरच्या सर्व पुरूषांना समोर यायला सांगितले. नानामामा, राजाकाका, मधले काका, विवेकचे वडील विश्वासराव‌, सावत्या, बाकीचे दोन नोकर सर्वजण समोर उभे राहिले. अनघाला सर्वांची कदकाठी बघायला लावली. साधारण तो कसा वाटला. अनघाने सांगितले की तो एकदम रांगडा पैलवान वाटत होता. यापैकी असं कोणी नाही. त्याचे केस लांब आणि खरे होते, कारण तिने ते जोरात ओढले होते. अंगाला अतिशय उग्र दर्प येत होता. घरातले तर कोणी नव्हतं आणि बाहेरून कोणी आलं नाही. मग होतं कोण?

        खूप शोध‌ घेऊनही हाताला काही लागलं नाही. इन्स्पेक्टर देसाई संध्याकाळी घरी निघून गेले. वाड्यात थोडंस वातावरण भितीदायक होतं. पुरुष मंडळी कोणी माणूस वाड्यात आले असेल यावर विश्वास ठेवत नव्हतं. माईअक्कांनी सगळ्यांना रात्री एकत्र बोलवलं. हे बघा तो कोण आपल्याला माहीत नाही. भूत आहे की अमानवीय शक्ती आहे, की वाड्यातीलच कोणी आहे की अजून काही आहे माहित नाही. समजा अनघाचा भ्रम जरी असला तरी पहिल्या चार सुना गायब झालेल्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणून आता अनघाच्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्या. जागरूक रहा, तो कोण‌ आहे हे लवकरच कळेलच आणि आपण ते शोधून काढूच.

        या सगळ्या वातावरणाचा ताण पडल्यामुळे अनघा आजारी पडली. तिला काही दिवस माहेरी पाठवले. सुषमाने तिला आता वाड्यावर जाऊ नकोस. इथेच रहा नोकरी कर. ते सगळे तुझ्याशी‌ खोटं बोलत आहेत. वंशाला दिवा देत नाही म्हंटल्यावर तेच लोक सुनांना मारत असतील आणि उगीच भुता खेताचं नाव पुढे करत असतील. पण अनघा ऐकायला तयार नव्हती. तिला हे सत्य शोधायचच होतं. अनघा माहेरी असेपर्यंत ‌सगळं शांत चालू होतं. वाड्यातही रोज प्रमाण चालू होतं. फक्त दोघांना अनघा येण्याची वाट पहावी लागत होती. एक विवेक आणि दुसरा तो रात्री अंधारात येत होता. तब्बल पंधरा दिवस अनघा माहेरी राहून परत आली. त्या माणसाने पंधरा दिवसात काही न केल्याने कोणाच्या हाती काहीच लागले नव्हते. इन्स्पेक्टर देसाईही काही वावगं वाटलं तर कळवा म्हणून निघून गेले होते.

        अनघाने आज रात्री या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवले. ती आज जाणून बुजून ‌खोली बाहेर फिरू लागली. माईंनी व‌ सगळ्यांनी तिला समजावलं पण ती ऐकेना. शेवटी सगळे अंधारात लपून बसले आणि ती झोपाळ्यावर बसून राहिली. मध्यरा‍त्र उलटून गेली पण कोणीही आले नाही. शेवटी खोलीत निघून गेली. तिने दुसर्‍या दिवशी सांगितले की घरातलंच‌ कोणी आहे कारण आपलं गुपित कळल्याने ते समोर आलं नाही. पण एकना एक दिवस मी शोधणारचं. त्या रात्री माईअक्का मात्र जेवणाच ताट घेऊन अंधारात कोठेतरी जात होत्या.

        माईंना ताट गुपचूप घेऊन जाताना पाहून अनघाला संशय आला. थोडं विचित्रही वाटलं. त्या कोणासाठी ताट नेत आहेत हे पाहण्यासाठी ती त्यांच्या मागे हळूहळू जाऊ लागली. पायाचा आवाजही न होऊ देता. पण माईंना वाटलं की कोणीतरी मागे येत आहे. त्या घाबरून मागे पाहू लागल्या. पाच मिनिटे चालल्यावर वाड्याच्या शेवटच्या टोकाला कोपर्‍यात असलेल्या खोलीचे हळूच कुलूप उघडून आत गेल्या. अनघाला आत जाता आले नाही. आत काय आहे आणि कोण आहे हे ‌पाहणे जरूरीचे होते. ती सगळीकडे फिरल्यावर एक खिडकी दिसली. ती खोलण्याचा प्रयत्न करू लागली पण ती खुलेना. तिचं लक्ष‌ खिडकीला लावलेल्या एका पुठ्ठ्याकडे गेलं. खिडकीचे दार थोडे तुटल्याने त्याला पुठ्ठा लावला होता. तिने तो बाजूला सारून त्याला एक डोळा लावून पाहू लागली. आत जे दिसलं ते पाहून तिला आश्चर्य वाटले.

        आत माई एका फोटोसमोर‌ उभ्या होत्या. समोर टेबलवर ताट ठेवलं होतं. त्या म्हणत होत्या. मला माहित नाही तुम्ही कुठं आहात पण हे जेवणाच ताट मात्र दररोज संपत. त्यामुळं मला एक वेगळं समाधान मिळतं. मी ठेवलेलं ताट कोणीतरी खातं म्हटलं तर मला वेड्यात काढतील किंवा ताट देणं बंद होईल म्हणून मी सांगत नाही. खावून घ्या. एवढं बोलून त्या बाहेर आल्या आणि दाराला कुलूप लावून तडकाफडकी निघून गेल्या. त्या गेल्यावर ती खोलीत पाहू लागली. पण आत‌ मिट्ट अंधार पसरला होता. काहीही दिसत नव्हते. तिने ही गोष्ट विवेक व सर्वांना सांगावी म्हणून जाऊ लागली पण माई म्हंटल्याप्रमाणे ताट बंद झाले तर कोण खातं, कोण आहे आत‌ हे कळणार नाही. म्हणून ती चूप बसली. दुसर्‍या दिवशी शाळेत जाण्या अगोदर आईकडे जाऊन येते म्हणून ‌ती इन्स्पेक्टर विजय देसाई यांना भेटायला गेली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनी माईवर लक्ष‌ ठेवण्यास सांगितले. ते वाड्यात येऊन सगळ्या खोल्या तपासणे हे अश्वासन दिले.

        ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर विजय देसाई पाटील वाड्यात दाखल झाले. माईंची व नाना मामांची परवानगी घेऊन सर्व खोल्या तपासून पहाणार आहोत हे सांगितले. माईंना थोडासा धक्का बसला. त्या खोलीतील रिकामं ताट जर यांना दिसलं तर पुढे ताट ठेवता येणार नाही. याची भीती वाटू लागली. तसेच हे ताट कोण ठेवतं याचीपण तपासणी होईल. आपलं नाव पुढे येईल. उगाच आपण गायब झालेल्या सुनांच्या घटनेत सामील आहोत असे वाटेलं. नानाविध प्रश्नांनी त्यांचे डोके भंडावले. इन्सपेक्टर विजय देसाई यांनी ती खोलीही तपासली पण तेथे वेगळं काही दिसलं नाही. पण त्यांनी सगळ्यांच्या नकळत‌ त्या फोटोच्या समोर दुसर्‍या एका फोटोत छुपा कॅमेरा लावला. जेणेकरून ते ताट घेण्यासाठी कोण येते हे दिसेल. तपासणीत काही आढळून आले नाही. हे त्यांनी सर्वांना सांगितले पण त्या कॅमेरा होल्ड अनघाच्या खोलीत लावला. जेणेकरून ती त्यावर लक्ष ठेवू शकेल. ते लॅपटॉपमध्ये सेव्ह करून इन्स्पेक्टर विजय देसाई यांना दाखवेल. रात्र झाली सगळ्यांची जेवण आटोपली. सगळे आपल्या खोलीत गेले. अनघाही शाळेचं काम आहे म्हणून लॅपटॉप घेऊन उघडून बसली. सासूबाईंना दिसणार नाही असे. रात्रीचे बारा वाजले, माई हळूच गुपचूप उठून ताट घेऊन त्या खोलीत गेल्या. ताट फोटोसमोर ठेवून लाईट बंद करून निघाल्या, पण त्यांनी त्या फोटो शेजारी एक छोटासा कंदील लावून ठेवला. जेणेकरून खोलीत हलकासा अंधुक प्रकाश पडेल. ताट ठेवून त्या गेल्या. अर्धा एक तास गेला, अनघाला डोळ्यावर झापड येऊ लागली. उठून तोंडावर पाणी मारावे यासाठी उठणार इतक्यांत तिला खोलीत काही तरी हालल्या सारखं वाटलं. ती समोरची अप्पाराव‌ पाटलांची फोटो बाजूला सरकली आणि आतून एक केस वाढलेली, दाढी वाढलेली धिप्पाड अंगाची व्यक्ती बाहेर आली आणि ताट घेऊन आत गेली. सुमारे वीस मिनिटांनी ते ताट ठेवून आत गेली. फोटो पूर्ववत जसाच्या तसा तेथे येऊन बसला. ती कोण होती हे स्पष्ट दिसले नाही पण कोतीतरी होतं हे नक्की कळाले. ते बघून तर अनघाला दरदरून घाम फुटला. रात्रभर झोपही आली नाही. कोणाला सांगताही येत नव्हते. नवऱ्यालाही तिने सांगितले नव्हते. वाड्यात कळाले तर ती व्यक्ती पळून गेली असती. ती सकाळी उठून शाळेला निघाली आणि विजय देसाई यांच्याकडे गेली. रात्रीचे रेकॉर्ड दाखवले. तेही आश्चर्याने पाहू लागले. सर्व कुमक जमा करून पोलीस जिपा सहीत व अनघाला घेऊन ते वाड्यावर‌ आले. पन्नास पोलीस आणि अनघाला पाहून सगळे हादरले. अनघावर रागावलेही तिने हे काय चालवले आहे. माई आणि विवेकने रागावलेही. हे करण्या अगोदर आम्हाला कुणाला सांगितलेही नाहीस. पण विजय देसाई यांनी सर्वांना थांबवून ते तडक शेवटच्या खोलीकडे निघाले. सर्वजण परत आश्चर्याने पाहू लागले. माई परत हादरल्या. सगळे कुलूप उघडून खोलीत गेले. आज फोटोसमोर टेबलवर जेवणाचे रिकामे ताट होते. हे‌ कोठून आले व कोणी ठेवले कोणासाठी हे कोणाला कळेना. इन्सपेक्टर देसाई माईंना हा प्रश्न विचारला. माई चुपचाप खाली पहात थांबल्या. सगळे आश्चर्याने माईंनकडे पाहू लागले. माई काही न बोलता खाली पहात थांबल्या होत्या. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. विजय देसाई दहा वेळेस विचारूही माई काही सांगेनात‌. तेंव्हा त्यांनी लेडिज हवालदारला माईंना अटक करायला सांगितले. माई घाबरून बोलल्या, मी काही केलं नाही हो.

        आज मी गेली तेरा वर्षे झाली, या फोटोसमोर ताट लावून ठेवते. कोण येऊन खातं ‌माहित नाही. ज्या दिवशी माझे पती घर सोडून निघून गेले त्या दिवशी मी रडून रडून गोंधळ घातला होता. दोन दिवस जेवलेही नव्हते, नंतर सगळ्यांच्या आग्रहावरून मी‌ यांच्या फोटोसमोर जेवणाच ताट ठेवून मग जेवून घेतले. दुसर्‍या दिवशी ताट रिकामं दिसलं. मी मग रोज ताट ठेवू लागले. पण कोण खातं, कोण आहे मला काहीच माहिती नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.

        शेवटी इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी चौकशी सोडून आप्पारावांचा फोटो बाजूला काढायला सांगितला. पण मागे दरवाजा वा काहीही दिसत नव्हतं. मग कॅमेरात तर‌ तेथूनच कोणी आलेलं दिसत होते. फोटोच्या मागे काही दिसत नव्हतं. तो कुठून आला कळतं नव्हते. विजय देसाई सगळीकडे शोधत होते. बाकीचेही खूप शोधत होते पण दरवाजा कोठेच दिसत नव्हता. तेवढ्यात इन्स्पेक्टर विजय देसाई यांना टेबलावरील बाईच्या मृर्तिकडे गेलं. फोटोखाली घेत असताना एका हवालदाराने ती मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला, पण ती हालली नाही. ते मूर्तीकडे गेले आणि उचलू लागले, पण ती हलेना. ती टेबलाला चिटकलेली वाटली. ते जोर लावून उचलू लागले. बाकीही मदत करू लागले. ती थोडीही जागचं‌ हलेना. या गडबडीत ती मूर्ती गोल‌ फिरली आणि फोटोमागील भिंत एकदम सरकली. तेथे एक दरवाजा दिसू लागला. सगळे त्या दरवाजाकडे बघू लागले. त्यांच्यापैकी कोणालाही हा दरवाजा माहीत नव्हता. देसाई पुढे येऊन पाहू लागले. आत अंधार ‌पसरला होता. देसाई सावध रीतीने पुढे सरकले. ते बॅटरी लावून आत गेले. मागोमाग सगळे गेले. माई मात्र चक्रावून जाऊन तेथेच बसून राहिली. सगळे आत उतरले, सगळीकडे अंधार आणि एक प्रकारची शांतता. कुबट वास येत होता. आत खाली मोठे दालन होते. त्यात काही खोल्याही होत्या. सगळीकडे धूळ पसरली‌ होती. छोट्या तावदानातून अंधुकसा उजेड पडला होता. आत जागोजागी ‌टेंबे लावण्याची सोय होती. काही ठिकाणी टेंबे कधी कधी पेटवले गेले होते, हे दिसत होते. टेंबे पेटवून सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तास दोन तास गेले पण कोणी सापडत नव्हतं. इथंही कोठेतरी असं दालन आहे का जे कोणाला दिसत नाही. हे विचार चालू असतानाच अनघाची किंकाळी ऐकू आली. ते पळत तिकडे गेले. सगळेही तेथे गेले पण अनघा कोठेही नव्हती. ती अचानक गायब झाली होती. आता देसाई समोर अजून एक समस्या निर्माण झाली होती. विवेक तर गडबडून गेला होता. देसाई यांना एका कोपर्‍यात अस्पष्ट रुपात थोडा उजेड दिसला. त्यांनी तो दगड सरकावला. अनघा तेथे पडलेली दिसली. तिला भरपूर जखमा झाल्या होत्या. कोपर्‍यात एक दाढी वाढलेला व्यक्ती अंग चोरून थांबलेला. देसांईनी त्याला ओढत बाहेर आणला. सगळे हादरून मागे सरकले. नानामामांनी त्याला ओळखलं.

        कोण होता तो?

"दादा, तू! तू जिवंत आहेस? इथं काय करतोस? सगळ्यांनी तुला किती शोधलं, असं का लपून बसलास. माई वहिनी अगदी वेड्या सारख्या तुझी वाट बघतायेत."

        नानामामाच्या वाक्याने सगळ्यांना कळाले की ते अप्पाराव पाटील आहेत. विजय देसाई यांनी त्यांना बाहेर आणायला लावलं. ते बाहेर येताचं, माई त्यांना बघून थरथरायला लागल्या. त्यांचे ओठ थरथरू लागले. डोळ्यात पाणी जमा झाले. त्या पळत त्यांच्याकडे गेल्या आणि कुठे होतात तुम्ही हे वाक्य बोलतचं घेरी येऊन पडल्या. त्यांना पाणी मारून शुद्धीवर आणले गेले.

        इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी अप्पाराव यांची चौकशी सुरू केली. ते इतके वर्ष या भुयारात का लपून बसले होते. जगापासून, घरापासून व‌ बायकोपासून दूर का रहात होते? त्यांच्या चार सुना गायब होण्यात त्यांचा हात होता का? बेशुद्ध अनघालाही दवाखान्यात घेऊन गेले होते. विवेक अनघा जवळ थांबला. अनघाचे डोके भिंतीवर आदळल्याने मेंदूला मार बसला होता. अंगावरही जखमा झाल्या होत्या. पोटात काहीतरी अणकुचीदार वस्तू खुपसली गेल्याने पोटावर जखम झाली होती. ती एक महिन्याची गरोदर होती. ते माहित नसल्याने ते बाळ मारले गेल्याने तिच्या जीवाला धोका होता. घरच्यांना व अप्पारावांना हे कळाल्यावर सगळे हादरले.

        अप्पाराव पाटील रडू लागले. माझे चुकले, मीच मा‍झ्या वंशाला मारले. मी नीच आणि हैवान आहे. मीच‌ सगळ्या सुनांना मारले.

का मारलतं पाटील सुनांना? इन्स्पेक्टर विजय देसाई यांनी पाटलांना विचारले.

        अप्पाराव सांगू लागले. मित्राला धोका देऊन हा वाडा व संपत्ती मिळविली. सगळ्यांना घेऊन या वाड्यात रहायला आलो. पण त्याचा शापही मागे मागे या वाड्यात आला. माझं लग्न होऊन सहा वर्षे झाली होती. मला एक पाच वर्षांचा मुलगा होता. नानाच लग्न होऊन दोन वर्षे झाली होती पण मुल झाले नव्हते. तिसऱ्याच व चौथ्याच नुकतच लग्न झालं होतं. वाड्यात आता येऊन दोन वर्षे संपली पण कोणालाच मुलं झाली नव्हती. त्यातच माझाही एकुलता एक मुलगा पायऱ्यांवरून पडून वारला. मा‍झ्या डोक्यात मित्राचा शाप फिरू लागला. शेवटचा भाऊ या सर्वांचा परिणाम म्हणून तो‌ कंटाळून दुसर्‍या शहरात नोकरीला गेला. पण तेथेही त्याला मुल झाले नाही. त्याने‌ मग दोन मुले दत्तक घेतली. माझं त्याने काही ऐकून घेतले नाही. त्यांच्या मुलांचं अशा गोष्टी वर विश्वास नव्हता. विवेक मोठा झाल्यावर आई वडीलांसोबत वाड्यात रहायला आला. धाकटा विश्वास मात्र परदेशात निघून गेला. मला वाटले, विवेक तर दत्तक घेतलेला त्याला हा शाप भोवणार नाही असे वाटले. पण तसे झाले नाही, विवेकचे लग्न होऊन वर्षे उलटले, वर तीन‌ महिने झाले. त्याच्याकडून कोणतीच खबर येईना. मी बैचेन झालो. काहीही करून हा शाप मोडून काढायचा. आपल्या घराण्याला वारस मिळवून द्यायचाच या विचाराने मी पुरता वेडा झालो. त्यातूनच ही भयंकर आणि अतिशय घाणेरडी विकृत कल्पना मा‍झ्या डोक्यात आली. आपल्या वाड्या खाली भुयार आहे हे फक्त मला माहित होतं. तेथे आधी आपण जाऊन रहायचं. नंतर विवेकच्या बायकोला न्यायचं. आपल्याला तर मुलं झालं होतं, मग आपलंच मुलं तिच्या उदरात वाढवायचं. वंशज मिळण्याशी मतलब. चार महिने झाले की तिला वर सोडायचं आणि आपण वाडा सोडून दूर‌ कोठे तरी निघून जायचं असं ठरवलं. मी घर सोडून निघून जात असल्याचे ऐके दिवशी असं लिहून, मी तळघरात निघून गेलो. जाताना दोन दिवस पुरेल इतक अन्न व फळे घेऊन गेलो. तिसर्‍या दिवशी मी या खोलीत आलो. मागच्या दरवाजाने बाहेर पडून अंधारात लपून पाळत ठेवू लागलो .पण विवेकची बायको रात्री खोली बाहेर आली नाही. परत जात असताना टेबलावर जेवणाच ताट दिसलं. भूक लागली होती. मी अधाशा सारखं खाऊन घेतलं. मग रोजचं जेवणाच ताट मला टेबलवर मिळू लागलं. मी पाळत‌ ठेवून होतोच. ऐके रात्री विवेकची बायको पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घराकडे जात होती, तिला मागून घोंगड टाकून उचलली. ती‌ घाबरून बेशुद्ध पडली. तिला मी जवळ जवळ वर्षभर त्रास दिला. सुरवातीला तिने भरपूर विरोध‌ केला. मी तिला खूप मारायचो. उपाशी ठेवायचो. मग नंतर ती शांत राहू लागली. वाड्यात तर विचित्र वातावरण तयार झाले होते. एक वर्षे पूर्ण झाले तरी तिला मुल होईना मग मी तिला मारली आणि एका खोलीत पुरून टाकली. त्यातच विवेकने दुसरे लग्न केले .

        दुसरीची सुद्धा मी सहा महिने वाट पाहीली पण तिच्याकडून काही खबर येईना. मला राग येत होता, मी वर्षभर थांबू शकत नव्हतो. मी दुसरीला सहा महिन्यांत उचलली. यावेळेस मात्र विवेकला शिक्षा झाली. त्यानेच बायकोला गायब‌ केली म्हणून. मी दुसरीला दीड वर्ष त्रास दिला. तिच्याकडूनही काहीच कळले नाही. तिलाही मारून पहिलीला ज्या खोलीत पुरले त्याच खोलीत तिला पुरले. तिसरीला तर तीन महिन्यांनी उचलले, तिच्याशीही‌ तसेच केले. पण विवेकने चौथे लग्न केले. मला कळतच नव्हतं की विवेकला लोक बायका कशा देतात तेही तीन तीन प्रकार घडलेले असताना. पण तो दूरवरची मुलगी करतो. तिला तर मी मधुचंद्राच्या रात्रीच‌ उचलली. विवेक गाढ झोपेत होता. तो व त्याची बायको उठू नये म्हणून मी अफूच्या पानांचा धूर केला. तिलाही वर्षभर ठेवलं आणि मग सगळ्या सारखं तिचीही विल्हेवाट लावली. नंतर विवेकने दोन तीन वर्ष लग्नचं केलं नाही. मी पण घाबरून वर येऊ शकत नव्हतो. पण तीन वर्षाने विवेकने अनघाशी लग्न केलं. मी खूप रागावलो, तडफडलो, मला आता कोणालाही मारायचं नव्हतं. मी अनघाला उचलून नेणार नव्हतो. मी या प्रकाराला कंटाळलो होतो. पण अनघा हुशार निघाली. तिला मागचा इतिहास कळल्यावर ती सगळ्या प्रकाराचा शोध घेऊ लागली. मला काहीही करून येथून बाहेर पडायचं होतं पण अनघाने अवघड केलं. मी पकडला गेलो. सगळे आत आल्यावर मी अंधारात लपून बसलो. अनघा समोर आल्यावर मी आधीच चिडलेलो, तिच्यावर हल्ला केला आणि आज ती शिरीयस आहे. मला माफ करा. आपल्या नवऱ्याच्या या वागण्यामुळे माईतर हादरून गेल्या. त्या रागाने आणि तिरस्काराने पहात बाहेर निघून गेल्या. इकडे दवाखान्यात अनघाची तब्येत जास्तच बिघडली, सुषमाने पण शर्थीचे प्रयत्न केले पण अनघा वाचू शकली नाही. जिने वाड्यातील गुपित शोधून काढले तिलाच शेवटी काही कळाले नाही. ज्या घराण्याचा शापाला मोडण्यासाठी व वंशजाला मिळवण्यासाठी अप्पारावांनी एवढा घाण खेळ खेळला त्याच घराण्याच्या वंशजाला अप्पारावांनीच‌ संपवलं होतं. अप्पारावांची चुकलेली वाट, अनघाची चुकलेली वाट परत सुधारण्यासारखी नव्हती आणि आता सुधारता येणारही नव्हती. सुषमाला रडण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. वंशाच्या मागे लागून कोणीही वाट चुकवू नये एवढंच...

- सौ हेमा येणेगूरे, पुणे.

#Marathi-Katha, #Bhay-katha, #Marathi-Rahashyamay-katha, #Marathi-story, ;code-box

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या