Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

देणाऱ्याचे हात | मराठी सामाजिक कथा | प्रणिता खंडकर

प्रणिता खंडकर, Pranita Kandkar, Helping hand marathi story

देणाऱ्याचे हात !

शांतम्माच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस! ३३ वर्ष बँकेत नोकरी करून आज हा सेवानिवृत्तीचा क्षण येऊन ठेपला होता. तिच्या मनात अनेक आठवणी दाटून आलेल्या! या ब्रँचला तिला येऊन जेमतेम एक वर्ष झालं होतं. त्यामुळे ब्रँचच्या लोकांना तिच्याबद्दल विशेष काही जिव्हाळा नव्हता. आधीच्या मॅनेजरचं कोविडमुळे निधन झालं, म्हणून अचानक तिची बदली या शाखेत करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कामाचे ढीग जमा झालेले. त्यामुळे आल्या दिवसापासून तिनं कामाला जुंपून घेतलेलं. पेंडिंग कामं मार्गी लावण्यासाठी तिला जरा कडक धोरणचं ठेवावं लागलं होतं. त्यामुळे देखल्या देवा दंडवत, तशी दोन-चार जणांची साचेबद्ध भाषणं झाली. मग शांतम्मानेही सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि आपलं भाषण थोडक्यात आवरलं. आता कार्यक्रम संपला असं निवेदक जाहीर करणार, तेवढ्यात सुरेश, बँकेचा शिपाई, धावत-पळत येऊन तिथे हजर झाला. त्यानं शांतम्माच्या पायावर लोळणच घेतली आणि "मला इथे थोडं बोलायचं आहे" म्हणाला. या प्रकाराने सगळेच चकित झाले. खरं म्हणजे सगळे जण निघण्याचा मूडमध्ये होते, आता खाली-पिली उशीर होणार, म्हणून जरा वैतागलेही. पण शिष्टाचार म्हणून थांबणं आलं. शिवाय एक महिन्यापूर्वीच सुरेशची बायको कोविडमुळे गेली. स्वतःच्या जीवाच्या भीतीनं ऑफिसमधलं कोणीच त्याला भेटायलाही गेलं नव्हतं. सुरेश अजून रजेवरच होता.

    सुरेश बोलू लागला... "अहो, या मॅडम लई म्हणजे लईच चांगल्या आहेत. माझ्या बायकोला आडमिट केलं पॉझिटिव म्हणून, आणि मी हादरून गेलो. मला पण चौदा दिवस होम क्वारंटाईन केलं. दोन्ही लेकरांचं काय करायचं. ती निगेटिव्ह होती. पोरगं चार वर्षाचं आणि लेक सहा वर्षांची! या महामारीच्या भीतीनं कोणीच घरी ठेवून घेईना की आमच्या घरी येईना. माझे आई-बाप गावाकडे, ते तरी कसे येणार? पण ही माऊली ऑफिसची गाडी घेऊन माह्या घरी आली आणि माझ्या लेकरांना सोताच्या घरला घेऊन गेली. मला थोडे पैसे देऊन गेली आणि गरज लागली तर फोन कर म्हणाली. रोज ऑफिसला जाताना ड्रायव्हरच्या हातून चपाती-भाजीचा डबा बाहेर ठेवून जात होती चौदा दिवस. फोनवरून हॉस्पिटलमध्ये चौकशी करून बायकोची खबरबात मला कळवत होती. तिथे पेशंटची लाईन लागलेली हो. मला कोण दाद देणार? पण मॅडमनी आपल्या ओळखीचा, अधिकाराचा उपयोग करून ते बी केलं. माझी बायको तर वाचली नाही. मला फकस्त तोंड दावलं तिचं आणि म्युन्सिपालटीनीच तिला स्मशानात पोचवलं. चौदा दिवसानंतर माझ्या लेकरांना यांनी घरी पोचवलं. आणि काय सांगू, लेकरांनी जे सांगितलं, त्ये ऐकून मी या माऊलीला साक्षात दंडवतच घातला. इच्या पायाशी उभं राहायची बी लायकी न्हाई आपली!" शांतम्मानं सुरेशला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो गप बसायला तयारच नव्हता. आता बाकीच्यांची उत्सुकताही ताणली होती. त्यामुळे शांतम्माचं काही चाललं नाही.

    चाळीस वर्षांपूर्वी शांतम्माचं लग्न शिवाप्पाशी झालं. तिचं गाव आंध्र प्रदेशातलं एक छोटंसं खेडं. शांतम्मा नववीत नापास झाली आणि मग शाळेला रामराम ठोकला. शिवाप्पा आठवी झालेला, पण कोणाच्या तरी ओळखीनी मुंबईला, बँकेत, झाडूवाला म्हणून चिकटलेला. लग्नानंतर शांतम्मा मुंबईला आली. धारावीच्या झोपडपट्टीत एका खोपटात त्यांचा संसार सुरू झाला. तिला दोन मुली पण झाल्या. मुलींचं करण्यातच शांतम्माचा दिवस संपून जायचा. पण कशी कोण जाणे शिवाप्पाला दारूची सवय लागली. पगार घरी येईनासा झाला. दोन वेळेला पोटात घालायला अन्नही मिळायचं नाही कित्येक वेळा. आणि.. आणि.. या दारूच्या धुंदीतच शिवाप्पा एका ट्रकखाली चिरडला गेला. शांतम्मावर आभाळच कोसळलं. दोन लेकी पदरात होत्या. पोटासाठी काहीतरी करायलाच हवं होतं. तिनं चार-पाच घरी धुणी-भांडी करायला सुरुवात केली. कसेबसे दोन घास तिघींना मिळू लागले. ती काम करत होती, त्यापैकी एका कुटुंबातले... देशपांडे साहेब, बँकेत अधिकारी होते. त्यांनी खटपट करून शांतम्माला शिवाप्पाच्याच बँकेत अनुकंपा तत्त्वावर झाडूवालीची नोकरी मिळवून दिली. पोटापाण्याची सोय तर झाली. पण आपल्यासारखी मुलींची परवड होऊ द्यायची नसेल तर, त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं पाहिजे, हे शांतम्माला जाणवलं. शिवाय झाडूवाली म्हणून आपल्याला कमी लेखलं जातं हा अनुभवही येतच होता. तशात सायनहून बँकेच्या दादरच्या शाखेमध्ये बदली झाली. तिथल्या ब्रँच मॅनेजर सोनावणे मॅडम खूपच छान होत्या. त्यांनी शांतम्माची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांनीच तिला बाहेरून एस.एस.सी.ची परीक्षा द्यायचा सल्ला दिला. त्यासाठीचा फॉर्मही उपलब्ध करून दिला. प्रौढ शिक्षण वर्ग चालवणाऱ्या जोशी मॅडम आणि माने सर यांची गाठ घालून दिली. भाषेचा थोडा प्रॉब्लेम येत होता. पण प्रौढ साक्षरता वर्गातील काही सहकाऱ्यांनी तो सहज सोडवला. शांतम्माने मनापासून अभ्यास केला आणि ५५% मार्क मिळवून ती एस.एस.सी. झाली. तिचा आत्मविश्वास वाढला. मुलींनीही आईला प्रोत्साहन दिलं आणि मग शांतम्माने मागे वळून पाहिलंच नाही. बारावी पास केली आणि मुक्त विद्यापीठातून पदवी पण घेतली. एकीकडे बँकेच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि मजल दरमजल करत ती मॅनेजरच्या पदापर्यंत पोचली. वरच्या पदावर पोचताना साहजिकच पगारवाढ होत गेली. मग बँकेकडून कर्ज घेऊन घाटकोपरला एका अपार्टमेंटमध्ये दोन खोल्यांची जागा घेतली.

    या दरम्यान रेल्वेने प्रवास करताना तीन भटक्या मुलांकडे तिचं लक्ष गेलं. दोन मुलगे आणि एक मुलगी. स्टेशनच्या परिसरात पोटासाठी भीक मागत होती. लोकांपुढे हात पसरणारी ही मुलं पाहून तिचा जीव कळवळला. पोटाची भूक माणसाला किती लाचार बनवते हे तिनं अनुभवलं होतं. या मुलांशी तिनं संवाद साधला. त्यांचा बाप म्युन्सिपालटीत झाडूवाला होता. कंत्राटी कामगार. त्याच्या दारू पिण्याला कंटाळून आई घर सोडून निघून गेली होती. आणि आता आठवड्यापूर्वी बाप गटारात पडून मेला होता. भाडं थकलं म्हणून झोपडपट्टीच्या दादानं झोपडीवर कब्जा केला होता. मुलं अनाथ आणि निर्वासित झाली. प्लॅटफॉर्मवर एका कोपर्‍यात बसून, येणाऱ्या - जाणाऱ्यापुढे हात पसरत होती.

    शांतम्माने दोन दिवस त्या तिघांना वडापाव खायला घातला, पण तिसर्‍या दिवशी एका मुलाला वडापाव चोरताना, स्टॉलवाल्यानं पकडलं आणि बदडलं. पोलिसाच्या ताब्यात देणार होता, पण शांतम्माने मध्यस्थी केली. त्या दिवशी ती त्या मुलांना आपल्या घरी घेऊन आली. मुलींनी जरा कुरबूर केली, पण शांतम्माने त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कल्पना देऊन, त्यांना समजावलं. अपार्टमेंटमधल्या लोकांनाही कोणीतरी मुलं शांतम्माने घरी आणल्याची खबर लागली. त्यांना ही गोष्ट फारशी पटली नाही. मग त्यांनी उगाचच काहीतरी तक्रारी करायला सुरुवात केली. शांतम्माने ही मुलं आपल्या भावाची आहेत, असं सांगून त्यांची तोंडं बंद केली. तिनं आठ दिवस सुट्टी घेतली. म्युन्सिपालटीत संपर्क करून मुलांच्या भवितव्यासाठी काही आर्थिक मदत मिळेल का, याची चौकशी केली. पण कंत्राटी कामगारांच्या भविष्याची काही तरतूद त्यांच्याकडे नव्हती. तरीपण निदान मुलांना म्युन्सिपालटीच्या शाळेत प्रवेश देण्याची सोय झाली.

    शांतम्माने मुलांना नीट समजावून सांगितलं. मुलांना कपडे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू आणून दिल्या. व्यवस्थित जेवण खाणं मिळायला लागल्याने मुलंही रोज शाळेत जाऊन अभ्यास करू लागली. ती घरातल्या कामातही मदत करत होतीच पण बिल्डिंगमधल्या लोकांनाही मदत करू लागली. तीन-चार वर्षे शांतम्मा आणि पाच मुलं असं एकत्रच राहात होते. पण मुलं मोठी होत होती. जागा अपुरी वाटायला लागली. मुलींनाही कॉलेजच्या अभ्यासासाठी थोडी शांतता आवश्यक होती. नशिबाने शांतम्माच्या शेजारची जागा रिकामी झाली. सिंगल रूम होती, पण सेल्फकंटेंड होती. शांतम्माने पैशाची जुळवाजुळव करून ती ताब्यात घेतली. त्यामुळे जागेची अडचण दूर झाली.

    आता शांतम्माच्या मोठ्या लेकीचं लग्न झालंय. ती पदवीधर होऊन सरकारी नोकरीत आहे. दुसरी मुलगी पॅथॉलॉजिस्ट होतेय. तिचं शेवटचं वर्ष आहे. त्या तीन मुलांपैकी मोठा बारावी नंतर इलेक्ट्रिशियनचा कोर्स करून एका कंपनीत कामाला लागला आहे. दुसरा आता बारावीत आणि मुलगी दहावीत आहे. ही सर्व मुलं शांतम्माला आईच मानतात. माझ्या दोन्ही लेकरांना पण त्यांनी खूप प्रेमानं सांभाळलं. जीव लावला आहे एवढ्या थोड्या दिवसात.

    आज या माऊलीचा नोकरीचा शेवटचा दिवस. तिनं तोंड उघडून कधी काही सांगितलं नाही. पण तिचं चांगलं काम समद्यास्नी समजावं, असं मले वाटलं, म्हूनशान येथवर आलो. मला काय छान भाषाण करता येत न्हाई. पण तरीबी माजं ऐकून घ्येतलंत म्हणून आभारी आहे." त्यानं पुन्हा एकदा शांतम्माला वाकून नमस्कार केला आणि तिचं काय सामान घरी न्यायचं आहे ते विचारू लागला. शांतम्माची ही हकीकत ऐकून सगळेजण भारावून गेले होते. नि:शब्द झाले होते. 'देणाऱ्याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हातच घ्यावे', ह्या विंदांच्या कवितेतल्या ओळी शांतम्माने प्रत्यक्ष आचरणात आणल्या होत्या.

- प्रणिता खंडकर, डोंबिवली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या