Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

दिशाहीन | प्रेरणादायी मराठी कथा | दीपक तांबोळी

दीपक तांबोळी कथा, प्रेरणादायी प्रेरक मराठी कथा,

दिशाहीन


“मग काय ठरलं तुझं? कोणत्या फॅकल्टीला घेतोय ॲडमिशन?” घरात आल्या आल्या राजेशने निरजला विचारलं

“अर्थातच मेकॅनिकल” निरज विश्वासाने म्हणाला.

“मला खूप इंटरेस्ट आहे मशीन्समध्ये. त्या कशा बनतात, कशा चालतात हे जाणून घ्यायला मला आवडेल. शिवाय मेकॅनिकल इंजीनियर्सना पुण्या मुंबईतल्या फँक्टरीत खूप डिमांड आहे असं मी ऐकलंय".

“तरी पण मला वाटतं आपण ॲप्टिट्युड टेस्ट करून घेऊया म्हणजे आपला निर्णय कन्फर्म होईल”.

“तशी गरज तर नाही म्हणा पण तुम्ही म्हणताय तर करून घेऊया” निरज म्हणाला.

निरजचा नुकताच सीईटी आणि जेईईचा रिझल्ट लागला होता. चांगले मार्क्स मिळाले होते. त्या अगोदर बारावीचा रिझल्ट लागला होता. त्यातही त्याला चांगले मार्क्स मिळालेले होते. निरजला मुंबईतल्या कॉलेज मध्ये मेकॅनिकल इंजीनियरींगला ॲडमिशन घ्यायची इच्छा होती. तिथल्या शिक्षणाला बाहेर चांगली मागणी असते शिवाय मुंबईत शिकणारी मुलं स्मार्ट होतात असं त्याचं म्हणणं होतं.

मुंबईत निरजला एका नामांकित कॉलेजमध्ये दीड लाख फी भरून विनासायास ॲडमिशन मिळाली. राजेशने स्वत: होस्टेल लाईफचा वाईट अनुभव घेतलेला असल्याने निरजला होस्टेलमध्ये ठेवायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून मग कॉलेजपासून बारा किलो मीटर. वरच्या अपार्टमेंटमध्ये कॉट बेसिसवर त्याला फ्लॅट घेऊन दिला. महिन्याला बारा हजार भाडं होतं. शिवाय मेससाठी महिन्याला पाच हजार लागणार होते. पाच हजार वरचा खर्च. असे बावीस हजार महिन्याला पाठवावे लागणार होते. पैशाचा हा चुराडा राजेशला मनातून खटकत होता. अकोल्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली असती तर हा सर्व खर्च वाचला असता. शिवाय निरज त्यांच्या डोळ्यासमोर राहिला असता. त्याचा अभ्यास, त्याची प्रगती, अधोगती याचा आढावा त्यांना घेता आला असता. पण निरजचा मुंबईलाच ॲडमिशन घेण्याचा हट्ट होता. एकुलत्या एक मुलाचा हट्ट त्याला आणि जयूला मोडता आला नाही.

निरजचं बस्तान बसवून राजेश घरी परतला. अकोल्याला घरी परतल्यावर त्याने जयूला सर्व माहिती दिली. मुलगा मार्गाला लागला याचं तिलाही समाधान वाटलं. आपला मुलगा मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकतोय असं दोघंही अभिमानाने नातेवाईक आणि परिचितांना सांगू लागले. निरजचं आयुष्य सुरळीत चालू होतं. दर दोनतीन दिवसाआड राजेश आणि जयू त्याला फोन करून हालहवाल विचारायचे. त्याच्या अभ्यासाबद्दल चौकशी करायचे.

कॉलेजमध्ये यूनिट टेस्ट झाली. त्यात निरजला सगळ्याच विषयात कमी मार्क्स मिळाले. जयू धास्तावली. राजेश संध्याकाळी घरी आल्यावर जयूने त्याबद्दल त्याला सांगितलं. राजेशने निरजला फोन लावला.

“काय रे बेटा, कमी मार्क्स मिळालेत म्हणे तुला?”.

“बाबा बहुतेक मुलांना कमीच आहेत. ही गोष्ट खरी आहे की काही विषय खरोखर कठीण आहेत. बहुतेक मुलांना ते समजतच नाहियेत”.

राजेश स्वत: इंजीनियरिंगचा डिप्लोमा धारक होता. पहिलं वर्ष आपल्यालाही जरा कठीणच गेलं होतं हे त्याला आठवलं. पण नंतर त्याने चिकाटीने अभ्यास करून उत्तम मार्क्स मिळवले होते.

“हरकत नाही बेटा. चिकाटीने अभ्यास कर. पहिलं वर्ष सर्वांनाच जड जातं”.

“अहो त्याला विचारा. काही विषयाचे क्लासेस लावायचे असतील तर लावून घे” जयू मध्येच म्हणाली. निरजने ते ऐकलं.

“हो बाबा. आमच्या वर्गातल्या ज्या मुलांनी क्लासेस लावले होते, त्यांना चांगले मार्क्स आहेत.”.

“मग तुलाही लावायचे असतील तर लावून घे” राजेश म्हणाला.

“बरं चालेल. पण बाबा ते क्लासेस खूप दूर दूर आहेत. तिथं जाणार कसं? बाईकशिवाय तिथे जाणं शक्य नाही. बसेस आहेत पण त्यांना खूप गर्दी असते. शिवाय त्या बऱ्याच दूर सोडतात".

“ठीक आहे, तू चौकशी करून ठेव. मी इथून बाईक पाठवत़ो”.

“बाबा पाठवाल तर चांगली रेसर बाईकच पाठवा. तुमच्याकडे आहे तशी साधी बाईक पाठवू नका”. राजेशला निरजची ही डिमांड अजिबात आवडली नाही. “तू शिकायला गेला आहेस की मजा करायला?” असा प्रश्न विचारायचं त्याच्या ओठावर आलं होतं पण त्याने मनाला आवर घातला.

“बरं बघतो. तू अभ्यास मात्र नीट कर” एवढं बोलून त्याने फोन ठेवला.

पंधरा दिवसांनी राजेशने सोसायटीचं कर्ज काढून निरजने सुचवलेल्या ब्रँडची दीड लाखाची बाईक घेऊन मुंबईला पाठवून दिली. हे करताना खरं तर तो मनातून नाराजच होता. त्याला त्याचे दिवस आठवले. एक एक पैशाचा हिशोब ठेवून मोठ्या काटकसरीने त्याने आपलं शिक्षण पार पाडलं होतं. आपल्या शिक्षणाचा वडिलांवर जरासुद्धा भार पडू नये याचा तो आटोकाट प्रयत्न करायचा. दुसरं म्हणजे तो काही धनाढ्य नव्हता. त्याच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळातल्या नोकरीत त्याला काही लठ्ठ पगार मिळत नव्हता. आधीच निरजला दर महिन्याला बावीस हजार पाठवावे लागत होते. आता बाईकच्या कर्जाचे हप्ते आणि बाईकच्या पेट्रोलचा खर्च त्याच्या डोक्यावर बसला होता. निरजच्या क्लासेसची फी वेगळीच होती. पाच वर्षापूर्वी त्याने नवीन घर बांधलं होतं. त्याचे हप्ते सुरू होतेच. पण निरजला हे गणित समजत नव्हतं. सांगून फायदाही नव्हता. विशेष म्हणजे जयूची त्याला साथ होती. आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलासाठी थोडा खर्च केला तर काय बिघडतं? त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे? असं तिचं म्हणणं होतं. यावरून दोघांचे नेहमी वाद होत. “आपण कसं काटकसरीत शिक्षण पार पडलं” याबद्दल राजेश सांगू लागला की जयू म्हणायची “तो तुमचा काळ होता. आता तसं शक्य नाही. प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन येत असतो. आज आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे. मग तुमच्या सारखं निरजने काटकसरीत शिक्षण का करावं? असाही तो काही उगीच पैसे उडवणारा मुलगा नाहीये” तिने असं म्हंटलं की राजेश चुप् व्हायचा.

दिवाळीत निरज घरी आला. आईला म्हणाला, “आई बाहेरचं खाऊन आम्ही खूप कंटाळलोय. आम्ही मुलांनी आता ठरवलंय की घरीच सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करायचा. मेसचे पैसेही वाचतील आणि शुद्ध, सात्विकही खायला मिळेल”. जयूला आपला लेक काटकसर करतोय हे पाहून त्याचं खूप कौतुक वाटलं. तिने मग त्याला भाज्या, वरणभात, पोळ्या कशा करायच्या ते शिकवलं. राजेशला मात्र निरजने स्वयंपाक शिकण्याच्या भानगडीत न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं वाटत होतं. त्याने तसं बोलूनही दाखवलं. तेव्हा जयू त्याला म्हणाली, “अहो बाहेरगांवी राहून शिकणाऱ्या मुली सहसा स्वयंपाक घरीच करतात. मेस लावत नाहीत. मग या मुलांनी तसं केलं तर बिघडलं कुठे? आणि तुम्हाला हवी तशी काटकसर तो करतोय तर करू द्या ना!”. राजेश चुप् बसला. अभ्यासावर परिणाम होणार नसेल तर राजेशलाही तशी काही हरकत नव्हती.

दिवाळीनंतर लगेचच निरजची सेमिस्टरची परीक्षा झाली. पेपर्स चांगले गेलेत असं त्याने आईवडिलांनी फोन केल्यावर सांगितलं. जयू आणि राजेश दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि ते त्याच्या रिझल्टची वाट पाहू लागले. दुसरं सेमिस्टर सुरू झालं. जयू त्याला फोन केल्यावर त्याच्या जेवणाचे हालहवाल विचारायची. “मी आता खूप चांगला स्वयंपाक करतो. मा‍झ्या मित्रांना मा‍झ्या हातच्या भाज्या खूप आवडतात. युट्युबवर पाहून मी बऱ्याचदा नवनवीन पदार्थ बनवतो. तेही त्यांना खूप आवडतात” असं तो आनंदाने सांगायचा. जयूला खूप बरं वाटायचं. राजेश त्याला वारंवार रिझल्टबद्दल विचारायचा. त्यावर त्याचं 'अजून लागला नाही. लागला की कळवेन' हे उत्तर ठरलेलं होतं. एक दिवस निरजने जयूला फोन करून रिझल्ट लागल्याचं सांगितलं. पाचपैकी चार विषयात तो नापास झाला होता. जयूला धक्काच बसला. ही बातमी राजेशला कशी सांगावी हेच तिला कळेनासं झालं. राजेश निरजसोबत तिलाही दोष देणार होता. संध्याकाळी तो घरी आल्यावर तिने भितभित ही बातमी त्याला सांगितली. ती ऐकून राजेशही गंभीर झाला. एवढा हुशार मुलगा चक्क चार विषयात नापास व्हावा याचा त्यालाही जबरदस्त धक्का बसला. त्याने ताबडतोब निरजला फोन लावला. “बेटा असं कसं झालं? तू तर चांगला अभ्यास केला होतास ना?” त्याने विचारलं “बाबा खूप मुलं फेल झालीयेत. आम्ही सर्वांनी रिचेकींगचे फॉर्म भरलेत.” माणसाचं एक असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही वाईट झालंय हे पाहून त्याच्या दु:खाची तीव्रता कमी होते. राजेशचंही तेच झालं. बरेच जण नापास झालेत याचा अर्थ विद्यापीठाच्या पेपर तपासण्यात गडबड झालीये असं त्याला वाटून गेलं. धक्क्याची तीव्रता कमी झाली. “तू धीर सोडू नकोस निरज. तुझा अभ्यास नीट सुरू ठेव. रिचेकींगचा रिझल्ट काहीही येऊ दे, फेल झालेल्या विषयांची तयारी सुरू ठेव. पुढच्या सेमिस्टरला तुला सगळे विषय क्लियर करायचेत. कोणत्याही परिस्थितीत वर्ष वाया घालवू नकोस. त्याचे परिणाम फार वाईट होतात बरं बेटा”. “हो बाबा मला कल्पना आहे त्याची. मी प्रयत्न करेन”. राजेशने फोन ठेवला खरं पण शंकाकुशंकांनी त्याचं मन भरून गेलं.

पंधरा दिवसांनी अचानक निरज घरी आला. राजेश ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. जयू त्याचा डबा बनवत होती.

“अरे अचानक कसा आलास?.काही गडबड तर नाही?” राजेशने धास्तावून विचारलं

“नाही बाबा. कॉलेजचं गॅदरींग सुरू आहे. मला त्यात काही इंटरेस्ट नाही म्हणून मी घरी आलो. माझे काही मित्रही घरी गेलेत”

“अरे पण मग फोन तर करायचा. घ्यायला आलो असतो मी तुला स्टेशनवर”

“मी काही आता लहान नाही राहिलो बाबा आणि मला तुम्हाला दोघांना सरप्राईज द्यायचं होतं”

“ओके ओके. तुम्ही मायलेक गप्पा मारा. संध्याकाळी मी आलो की बोलू मग”

“हो चालेल” संध्याकाळी राजेश घरी परतला. फ्रेश होऊन चहा घेतल्यावर राजेशने निरजला डायनिंग टेबलवर बोलावलं. निरज थोडा अस्वस्थ वाटत होता.

“अरे तुझा रिचेकींगचा रिझल्ट लागला की नाही?” जयूने विचारलं. निरजने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला.

“आईबाबा मी तुमच्याशी खास बोलण्यासाठीच आज अचानक आलोय. मी एक निर्णय घेतलाय. मी इंजीनियरिंग सोडतोय”.

“काय ऽऽऽ” दोघंही मोठ्याने ओरडले.

“हो आईबाबा. माझा रिचेकींगचा रिझल्ट लागला. मी त्या चारही विषयात फेल झालोय. आता हे चार विषय आणि पुढच्या सेमिस्टरचे पाच विषय अशा नऊ विषयांचा अभ्यास मला जमणार नाही. माझ्या लक्षात आलंय की इंजिनियरिंग मा‍झ्या कपॅसिटीच्या बाहेरचं आहे. म्हणून मी इंजिनियरिंग सोडण्याचा निर्णय घेतलाय”

मुलाचं बोलणं ऐकून जयू रडायलाच लागली. राजेश डोळे फाडून निरजकडे बघत होता. आतापर्यंत त्याने निरजसाठी खर्च केलेल्या पैशाचा हिशोब त्याच्या डोळ्याभोवती नाचू लागला. आतापर्यंत पाच लाखाच्या वर खर्च झाला होता आणि हाती शून्य लागलं होतं. जरावेळाने तो सावरला. स्वत:च्या संतापावर नियंत्रण ठेवून तो म्हणाला,

“असा आततायी निर्णय घेऊ नकोस. नेटानं अभ्यास केलास तर हे सुध्दा विषय निघू शकतात. मा‍झ्या मित्राच्या मुलाचे तर पाचही विषय राहिले होते पण त्याने ते पुढच्या सेमिस्टरला क्लियर केले. पहिल्या वर्षी असे प्रॉब्लेम्स् येतातच. एवढं काय घाबरून जायचं?”.

“पण बाबा मला त्यात इंटरेस्टच उरला नाहीये. तुम्हाला माहित नाहिये बाबा, मेकॅनिकलला सध्या कुठलीच व्हॅल्यू राहिली नाहिये. थ्रूआऊट डिस्टिंक्शन मिळवून पास होणाऱ्या मुलांनाही नोकऱ्या नाहियेत. तीन तीन, चार चार वर्षापासून घरी बसलेत नाहीतर पाचपाच हजारावर नोकऱ्या करताहेत. दरवर्षी लाखो इंजीनियर्सचं प्रॉडक्शन होतयं. कुणाकुणाला नोकरी देणार? समजा मी पास होत गेलो तरी शेवटी मा‍झ्या हातात काय येणार? तर फक्त डिग्रीचे कागद? ज्यांना कसलीही किंमत नाही.”

“अशी कशी किंमत नाही? जेव्हा सरकारी खात्यात जागा निघतात तेव्हा हेच कागद कामास येतात ना? पुढे तुला जर एम. एस. करावसं वाटलं तर हेच कागद उपयोगी पडणार आहेत. याच कागदावर तुम्ही किती उच्च शिक्षित आहात हे कळतं. याच कागदांमुळे तुम्हाला समाजात इज्जत मिळते” राजेश चिडून म्हणाला. “बाबा तुम्ही अजून हे जग पाहिलं नाहिये. या जगात कायकाय घडतं याची तुम्हाला कल्पना नाहिये”

त्याच्या या बोलण्यावर राजेश स्तब्धच झाला. एक अठरा वर्षाचं पोरगं संपूर्ण देश फिरलेल्या पंचेचाळीस वर्षाच्या प्रौढ माणसाला म्हणत होतं की तुम्ही जग बघितलेलं नाहिये

“निरज तू तुझ्या बापाला म्हणतोय असं?” जयू ओरडून म्हणाली. निरज वरमला.

“बाबा मला काय म्हणायचंय ते समजून घ्या. तुम्ही जुन्या पिढीतले लोक. आज काय ट्रेंड्स सुरू आहेत, कमी शिकलेले लोकही कसा खोऱ्याने पैसा कमावताहेत हे आमच्या नव्या नेटसॅव्ही पिढीला जास्त कळतंय. सध्या फूड इंडस्ट्रीज तुफान पैसा कमवतेय. मॅकडोनाल्ड, डॉमिनोज याबरोबरच स्विगी, झोमॅटो यासारख्या ॲपवरुनही माणसं प्रचंड पैसा कमावताहेत. अशी वेळ येणार आहे की माणसं घरी स्वयंपाकच करणार नाहीत. सगळं बाहेरूनच मागवणार आहेत. इंजीनियरिंगची डिग्री घेऊन पाचपाच हजारावर नोकऱ्या करण्यापेक्षा अशा फूड इंडस्ट्रीजमधे बिझनेस केलेला चांगला”

“तुझ्या मनात आहे तरी काय?” राजेशने उद्विग्न होऊन विचारलं

“माझे सगळे मित्र म्हणतात,'तू एवढा चांगला स्वयंपाक करतोस, तुला नव नवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे तर तू इंजीनियरिंगला का आलास? तू हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं '

मलाही जाणवतंय की माझी लाईन चुकलीये”

“पण मेकॅनिकल इंजीनियरिंगला जायचा चॉईस तुझाच होता. आम्ही तुझ्यावर कुठलीच जबरदस्ती केली नव्हती” जयू रागाने म्हणाली.

“हो मला त्यावेळी एवढं नॉलेज नव्हतं. मी खूप रिसर्च केला आणि मला माझी आवड कळली.”

“मग आतापर्यंत तुझ्यासाठी एवढा खर्च केला तो पाण्यात गेला म्हणायचा” राजेश निराशेने म्हणाला

“चार वर्ष इंजीनियरिंग केलं तर खूप पैसा वाया जाणार आहे बाबा. आणि उपयोग शून्य. मग आताच आपण शहाणं झालेलं काय वाईट?”

जयूने राजेशकडे पाहिलं. राजेशला काय बोलावं समजेना. मोठी द्विधा मनस्थिती झाली होती त्याची. क्षणभराने तो म्हणाला-

“हे बघ निरज, तू इंजीनियरिंग व्हावं हे माझं स्वप्न होतं. ते तू पूर्ण करावंस असं मला वाटतं. एकदा इंजीनियरिंग झालं, एकदा का तुझ्या हातात डिग्रीचे कागद पडले की तू वाटेल ते करायला मोकळा. तो पर्यंत प्लीज आम्हाला त्रास देऊ नकोस. आम्हाला तुझे ते कागदच हवे आहेत. लक्षात आलं ना तुझ्या”

निरजचा चेहरा आक्रसला. तो रडू लागला.

“मला इथे कुणी समजूनच घेत नाहिये. मा‍झ्या काय इच्छा, महत्वाकांक्षा आहेत याचं कुणालाच काही देणंघेणं नाही. स्वत:च्या इच्छा मात्र लादताय माझ्यावर”

जयूने त्याच्याजवळ जाऊन त्याला जवळ घेतलं

“नको रडूस. याच्यातूनही काही मार्ग निघेल" तिने राजेशकडे पाहून त्याला शांत रहायची खूण केली. राजेश तिथून उठला आणि बैठकीत जाऊन बसला. त्याच्या मनात वादळ उठलं होतं. निरजचा निर्णय त्याला अजिबात आवडला नव्हता.

निरजला फोन आला म्हणून तो बाहेर अंगणात जाऊन बोलू लागला. ही संधी साधून जयू राजेशजवळ जाऊन म्हणाली, “अहो त्याच्यावर चिडू नका. तुम्हाला माहितीये ना आजकाल मुलं थोडं काही बोललं की लगेच जीवाचं बरंवाईट करून घेतात”

राजेशने मान डोलावली. त्याच्याच मित्राच्या मुलाने “सदोदित मोबाईलवर गेम का खेळत असतो” असं विचारून त्याच्या हातून मोबाइल हिसकावून घेतल्यामुळे आत्महत्या केली होती ते त्याला आठवलं. आजकालच्या मुलांमध्ये अपमान, कष्ट, दु:ख सहन करण्याची ताकत उरली नव्हती हे त्यालाही माहित होतं पण आपल्या मुलाने असं करीयरशी खेळत रहावं हे त्याला अजिबात पसंत नव्हतं.

“हो पण म्हणून नेहमी त्याच्या मर्जीसारखंच वागायचं का?” तो रागाने म्हणाला तशी जयू तोंडावर बोट ठेवत म्हणाली “ओरडू नका, तो ऐकेल. जरा शांततेने घ्या”

खूप काही बोलायचं असूनही राजेश चूप बसला. जेवताना राजेश त्याला समजावत म्हणाला, “हे बघ निरज. आता लगेच तुला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन मिळणार नाही. त्यासाठी जून महिन्याचीच वाट पहावी लागणार. आमचं असं म्हणणं आहे की हे वर्ष तू पूर्ण करावंस. समजा तुला नाहीच जमलं तर घे तू हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन. पण समजा तुला मेकॅनिकल इंजीनियरींगमध्येच इंटरेस्ट वाटू लागला. तू सगळे विषय सुटलास तर हे सुध्दा तू सुरू ठेवू शकतोस.” हा मुद्दा निरजला पटला. त्याचा चेहरा उजळला.

“हो चालेल. पण मला नाही वाटत माझे विषय निघतील”

“ठीक आहे. पण तू निगेटीव्ह थिंकींग का ठेवतोस? जे करशील ते फुल डिव्होशनने कर एवढंच आमचं म्हणणं आहे” जयू म्हणाली. निरजने हसून मान डोलावली. बापलेकातलं तणाव दूर झालेला पाहून जयूला हायसं वाटलं.

वार्षिक परीक्षा झाल्या. नऊपैकी तीनच विषयात निरज पास झाला. अर्थातच त्याचं पुढचं वर्ष वाया जाणार होतं. राजेशपुढे त्याला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊन देण्याव्यतिरिक्त मार्ग उरला नाही. पुन्हा दोन लाख खर्च करून त्याने पुण्याच्या एका कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घेऊन दिली. परत एकदा होस्टेलचा, मेसचा खर्च सुरू झाला.

पहिले सहा महिने निरजचा उत्साह चांगला होता. जयू आणि राजेशलाही तो पाहून आनंद वाटत होता. हॉटेल मॅनेजमेंटलाही सध्या चांगला स्कोप होता. मोठ्या शहरातल्या थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये अनेक संधी उपलब्ध होत्या. काही संधी विदेशातही होत्या. निरजने मनावर घेतलं तर या फिल्डमध्येही चांगलं करीयर घडू शकलं असतं. का कुणास ठाऊक पण त्याला आणि जयूला आपला मुलगा विदेशातल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरीला लागलाय अशी स्वप्नं पडू लागली.

एक दिवस जयूने निरजला फोन केला. त्याची चौकशी केली. त्याचा सूर काही तिला योग्य वाटला नाही.

“काय झालं बेटा ,काही प्रॉब्लेम आहे का?”

“आई तुला खरं सांगू का, इतकं कंटाळवाणं आहे ना सगळं. काय काय ते विषय आहेत, फूड प्रॉडक्शन, हॉस्पिटिलीटी, हाऊस किपींग, लाँड्री. अक्षरश: बोअर आहे सगळं. इथे येऊन तर माझी स्वयंपाक करण्याची इच्छाच मरून गेलीये”

जयूला त्याचा खूप राग आला. ती संतापाने म्हणाली, “हे बघ निरज. तुझ्या इच्छेनेच तू तिथे ॲडमिशन घेतलीये. आम्ही तर तयारच नव्हतो. आता तुला ते पूर्ण करावंच लागेल. तुला बाबांनी समजावलं होतं की अरे हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणं नाही. तो फक्त एक भाग आहे. हॉटेल चालवणं म्हणजे गंमत नसते. त्यात अनेक गोष्टी असतात. त्यातल्या काही कंटाळवाण्या पण असू शकतात. अरे बाबा रोजचा तीन चार माणसांचा स्वयंपाक करणंही काही सोपं नसतं. हे तर हॉटेल असतं. सांगितलं होतं ना बाबांनी?”

“सांगितलं होतं. पण ते इतकं किचकट असतं असं मला वाटलं नव्हतं”

“शांत रहा. मन एकाग्र कर. आता तुला कुठलाही चॉईस नाही. हेच तुला पूर्ण करावं लागेल”

निरजने फोन ठेवला पण जयूचं मन उदास झालं. त्याच्याशी झालेलं बोलणं नवऱ्याला सांगायची जयूची हिंमत झाली नाही.

मध्यंतरी काही कामानिमित्त राजेशला पुण्याला जायची संधी मिळाली. निरजला सरप्राईज देऊ या असा विचार करून त्याला काही न कळवता राजेश त्याला भेटायला गेला. पण निरज बाईकने लोणावळ्याला गेल्याचं कळलं. राजेशने इतर मुलांकडे चौकशी केली तेव्हा निरज बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारून बाईकने भटकत असतो असं त्याला कळलं. राजेशला वाईटही वाटलं आणि संतापही आला. त्याने ताबडतोब त्याला फोन केला पण त्याने उचलला नाही. चडफडत राजेश घरी परतला. संध्याकाळी निरजचाच फोन आला. आपला मोबाईल रुमवरच राहून गेला होता त्यामुळे उचलता आला नाही असं तो म्हणाला. तसंच आपण बाईकवर निष्कारण भटकत नसून हॉटेल्सची कार्यपद्धती बघायला जातो असं त्याने राजेशला समजावलं. राजेश काही बोलू शकला नाही पण निरजच्या उत्तराने त्याचं समाधान झालं नाही.

वार्षिक परीक्षेनंतर निरज घरी आला पण त्याच्या चेहर्‍यावर कसलाही उत्साह दिसत नव्हता.

“काय झालं, आता का नाराज आहेस?” जयूने विचारलं

“आई मला पेपर बरे गेलेत पण हॉटेल मॅनेजमेंट मध्ये काही मजा नाही. सध्या इथंही खूप सॅच्युरेशन आहे. एक तर आपल्याकडे चांगल्या हॉटेल्सची कमतरता आहे त्यात लाखो मुलं हॉटेल मॅनेजमेंट करताहेत. त्यामुळे नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसलंय”

“हे बघ बेटा आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी अफाट आहे. त्यामुळे प्रत्येक फिल्डमध्ये गर्दीही ठरलेली. मग काय आपण शिक्षणच नाही घ्यायचं? त्या देवाने सगळ्याच्या रोजीरोटीची व्यवस्था करून ठेवलीये. न शिकलेली माणसंही नोकरी, व्यवसाय करतातच ना? तू तुझं शिक्षण पूर्ण कर. नाही नोकरी मिळाली तर एखादं हॉटेल टाक”

“आई थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेल सुरू करण्यासाठी किती प्रचंड पैसा लागतो माहितीये? तेवढी ऐपत आहे का आपली?” त्याने एकदम ऐपत काढल्यावर जयूने संतापाने त्याच्याकडे पाहिलं

“आमची ऐपत काढू नकोस. हॉटेल काय फक्त थ्री स्टार, फाइव्ह स्टारच असतात? आपल्या अकोल्यात किती अशी हॉटेल्स आहेत रे? साधारण हॉटेल्सही चालतातच ना अकोल्यातली? तुम्हा आजकालच्या मुलांना सगळं काही उच्च दर्जाचं लागतं. रस्त्यावर वडे भजे विकणारेही पुढे मोठ्या हॉटेल्सचे मालक होतात. त्यांचा आदर्श तुम्ही घेणार नाहीत. मुंबईच्या ऑर्किड हॉटेल्सचे मालक विठ्ठल कामत याचं चरित्र वाच एकदा”

“माहितेय मला ते”

“आणि तरीही असं बोलत़ोस?”

निरज चूप बसला.

मुलाच्या या दिशाहीन वागण्याला कंटाळून जयू त्याची कुंडली घेऊन ज्योतिषाकडे गेली. बरंच निरीक्षण केल्यावर ज्योतिषी म्हणाले,

“अहो तुम्ही त्याला चुकीचं शिक्षण देताय. त्याच्या कुंडलीत इंजिनिअरचे योगच नाहियेत आणि हॉटेल व्यवसायाचेही कुठलेच योग दिसत नाहियेत. तुम्ही त्याचं आयुष्य वाया घालवताय”

निरजने आईकडे आनंदाने पाहिलं

“पण मग करायचं तरी काय?” जयूने वैतागून विचारलं.

“मला विचाराल तर मी सांगेन की त्याने सरळ डि.एड.किंवा बी.एड करून शिक्षकाची नोकरी पत्करावी. कुंडलीत शिक्षकी पेशाचे योग प्रबळ आहेत. तो प्राध्यापकही होऊ शकतो”

जयूने कपाळावर हात मारून घेतला. परत नवीन फिल्डमध्ये ॲडमिशन घ्यायची या कल्पनेनेच तिचा जीव घाबराघुबरा होऊ लागला. तिने निरजकडे पाहिलं. निरजला शिक्षक होण्याची कल्पना अजिबात पसंत पडलेली दिसत नव्हती.

“हा असा चंचल मनाचा आहे. एक धड काही करत नाही. याला काही उपाय नाहीत का?”

ज्योतिषाने बरेच उपाय सांगितले. पन्नास हजाराच्या आसपास खर्च सांगितला. जयू त्याला तयार झाली. काही इलाजच नव्हता. आपल्या मुलाने आयुष्याची महत्त्वाची वर्ष अशी धरसोड करून वाया घालवावी असं कोणत्या आईला वाटेल? अर्थात राजेश काही ते उपाय करायला तयार झाला नाही. दिशाहीन मनाला ताळ्यावर आणणं हाच खरा उपाय आहे असं त्याचं म्हणणं पडलं.

रिझल्ट लागला. अपेक्षेप्रमाणे निरज पाच विषयात नापास झाला. मुलाचा धीर खचू नये, त्याने हे अपयश मनाला लावून जीवाचं काही बरं वाईट करू नये या भीतीने राजेश आणि जयू दोघंही त्याला काही बोलले नाहीत. पण जसजसे निरजच्या रिझल्टची चौकशी करणारे नातेवाईकांचे फोन येऊ लागले तसे दोघंही अस्वस्थ होऊ लागले. बहाणे करून तरी किती करणार? नातेवाईकांचं एक असतं, जेव्हा आपल्या बाबतीत चांगल्या घटना घडतात तेव्हा ते त्यांची दखलही घेत नाहीत. वाईट, बदनामीच्या घटना घडल्या की शंभर वेळा चौकशी करतात. जखमेवर मीठ चोळण्याची संधी अशी कशी ते वाया घालवणार? एक दीवस राजेशचा संयम संपला. मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या निरजच्या. हातून त्याने मोबाईल हिसकावून घेतला.

“निरज तुला काही गांभीर्य आहे की नाही. एवढा नापास होऊनही कसलंच टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. रिझल्ट लागल्यापासून पहातोय खाणं, पिणं, झोपणं, बाईकवर भटकणं आणि उरलेला वेळ मोबाईल घेऊन बसणं याव्यतिरिक्त दुसरा काही उद्योग नाही का तुला? काय ठरवलंय तू? इंजीनियरिंग सोडलं, हॉटेल मॅनेजमेंट सोडलं, आता काय करायचं ठरवलंय तू?”

“मी अजून काहीच ठरवलेलं नाहिये” त्याच्याकडे रागाने पहात निरज म्हणाला, “ते ज्योतिषी म्हणतात डि.एड.कर म्हणून...”

“खड्ड्यात घाल त्या ज्योतिषाला. तुला तुझं काही मत नाही का? अरे वीस वर्षाचा झालाय तू आता. तुझ्या बरोबरची मुलं इंजीनियरिंगच्या थर्ड इयरला पोहचलीत. पुढच्या वर्षी ते इंजिनिअर होतील आणि तुझा अजून मार्गच निश्चित नाही. काही लाज वाटते की नाही तुला”

निरज रडवेला होऊन आईकडे पाहू लागला. जयू पुढे होऊन राजेशला म्हणाली

“अहो शांत व्हा. असं डोक्यात राख घालून कसं चालेल? सापडेल काही तरी मार्ग”

“तुम्ही दोघं मला करोडपती समजता का? जवळजवळ दहा लाख खर्च झालेत आतापर्यंत. काही उपयोग झाला? दोन वर्ष वाया गेलीत आणि तिसरं वर्षही वाया घालवणार आहेत साहेब. तुला माहीत नाही, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मला द्यावी लागतात. किती दिवस खोटं बोलणार?”

जयूला नवऱ्याची अडचण समजत होती. तिलाही तर महिला मंडळातल्या आणि शेजार पाजारच्या बायका निरजबद्दल विचारून भंडावून सोडायच्या आणि पुरुषांपेक्षा बायका जास्तच चहाटळ असतात असं जयूचं मत होतं. राजेशचा संताप पाहून ती निरजला आतल्या खोलीत घेऊन गेली.

त्या प्रसंगानंतर निरज अबोल झाला. त्याचं बाहेर भटकणं कमी झालं. त्याचे सगळे मित्रही पुढे निघून गेले होते. जे काही अकोल्यात होते. ते भेटल्यावर त्याची टिंगलटवाळी करायचे. निरज अजूनच निराश होऊन घरी परतायचा.

एक दिवस तो जयूला म्हणाला, “आई मी वडापावची गाडी सुरू करू? मुंबईला वडापाववाले खूप श्रीमंत झालेत”

जयूला भडभडून आलं. इतका हुशार मुलगा, ज्याची इंजीनियर होण्याची स्वप्नं पाहिली, आज सामान्य मुलासारखा वडापावची गाडी टाकणार? तिला त्या विचारानेच कसं तरी झालं. पदराने डोळे पुसत ती त्याला म्हणाली

“इतकी वाईट वेळ नाही आली बेटा आपल्यावर! तू अजूनही विचार कर. कुठंतरी ॲडमिशन घे. हे वर्ष तरी वाया घालवू नकोस”

निरज म्हणाला, “आई काय करावं ते मलाही सुचत नाहिये. डोकं नुसतं चक्रावून गेलंय. सगळीकडे नुसता अंधार दिसतोय.

आजकाल कुठंही ॲडमिशन घ्यायला जा. पैशाचा नुसता चुराडा असतो. त्यामुळे बाबांना ते सांगायची मला भीती वाटते. असं वाटतं आपल्याला तेही नाही जमलं तर?”

जयूला त्याची अवस्था समजत होती. पण काहीतरी करावं तर लागणारच होतं. तिला अचानक एक कल्पना सुचली.

“निरज तू बारावीच्या बेसवर बी.एस्सी. ला का नाही जात? आजकाल मायक्रो बायोलॉजीसारखे वेगळे विषय आहेत. ते फारसे कठीण जाणार नाहीत आणि तुझं वर्षही वाया जाणार नाही. शिवाय पुढे नेटसेटच्या परीक्षा देऊन तू प्राध्यापकही होऊ शकतो”

निरजला ती कल्पना पटली तो तयार झाला. जयूने राजेशलाही ते पटवून दिलं. राजेश आता या ॲडमिशन प्रक्रियेलाच कंटाळला होता. निरजने त्याला पटेल ते करावं अशी त्याने भूमिका घेतली.

एक दिवस राजेशचा कॉलेजचा मित्र रात्री जेवायला आणि रहायला आला. निरज तेव्हा बाहेर गेला होता. गप्पांच्या ओघात निरजचा विषय निघाला तेव्हा राजेशने त्याला निरजबद्दल सगळं सांगितलं.

“तुझी परवानगी असेल तर मी काही त्याला समजुतीच्या गोष्टी सांगू?” त्याने विचारलं

“जरूर सांग. बाहेरच्यांनी कान टोचले की त्याचा राग येत नाही”

निरज आला. जेवणं झाल्यावर राजेशच्या मित्राने निरजला करीयरबद्दल विचारलं. तेव्हा निरजने बी.एस्सी.करत असल्याचं सांगितलं.

“तुला एक छोटीशी गोष्ट सांगू बेटा? त्यातून तुला झाला तर फायदाच होईल”

“सांगा ना काका”

जयूही बाहेर येऊन बसली

“साधारण तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एका खेड्यात एक मुलगा राहत होता. खूप हुशार. शाळेत नेहमी पहिला येणारा. त्याचे वडील शेतमजूर होते. तुटपुंजं उत्पन्न. पण वडिलांना वाटायचं माझ्या मुलाने इंजीनियर व्हावं. मुलाला मात्र संगीताचं वेड. तो बासरी छान वाजवायचा, चित्र खूप सुरेख काढायचा. नाटकात काम करायचा. इंजीनियरींग म्हणजे सगळं कठीण, रूक्ष, त्यात अशा कलावंतांना कुठून स्कोप असणार? म्हणून मुलाला ते नको होतं. त्याला कलेच्या क्षेत्रात नाव कमवायचं होतं. दहावीचा रिझल्ट लागला. मुलाला चांगले मार्क्स मिळाले. त्याला आर्ट्स कॉलेजला ॲडमिशन घ्यायची होती. पण बापाचं स्वप्नं होतं, मुलाला इंजीनियरच करीन. इच्छा नसतानाही मुलाला बापाचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी यवतमाळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागली. गावाबाहेरचं कॉलेज. होस्टेल सोडलं तर कसल्याही सुविधा नाहीत. जेवायला सुध्दा पाच किलोमीटर वरच्या हॉटेलमध्ये जावं लागायचं. सकाळ संध्याकाळ वीस किलोमीटर पायपीट ठरलेली. बाकीच्या मुलांनी सायकली विकत घेतल्या. पण या मुलाला सायकलीसाठी वडिलांना पैसे मागवेनात. घरची गरीबी तो जाणून होता. वडील फक्त महिन्याच्या जेवणापुरते पैसे पाठवत. म्हणून या मुलाने चहा सोडला. इतर मुलं कॉलेजजवळच्या टपरीवर चमचमीत वडा, मिसळ खायचे. त्यावासाने आपली भूक खवळू नये म्हणून हा तिकडे फिरकायचाच नाही. अभ्यासाला पुस्तकं नव्हती. रुम पार्टनर झोपले की हा त्यांची पुस्तकं घेऊन रात्र रात्र अभ्यास करायचा. वह्या, ड्राईंग शीटस्, पेन्सीली, साबण यांना लागणारा पैसा कुठून आणायचा म्हणून याने गावात पेपर वाटायला सुरुवात केली. त्यासाठी भल्या पहाटे बाकी मुलं साखरझोपेत असताना आपल्या रुम पार्टनरची सायकल घेऊन तो जायचा. महिन्याला पगार झाला की या सायकलचं भाडं तो पार्टनरला द्यायचा. त्याच्या या परिस्थितीची त्याच्या मित्रांना दया यायची. मग तेच कधीतरी त्यांच्या पैशाने त्याला सिनेमा दाखवत. कधी बाहेरची चटपटीत पाणी पुरी, भेळ खाऊ घालत. इतक्या कठीण दिवसातही या मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू कधी मावळलं नाही. वागण्यातली नम्रता कधी कमी झाली नाही. बाकी मुलांनी कठीण विषयाच्या ट्युशन्स लावल्या होत्या. याला ते परवडणारं नव्हतं. पण रिझल्ट लागला की पहिला नंबर याचाच असायचा. डिप्लोमाची तीन वर्ष संपली. शेवटच्या वर्षीही हा कॉलेजमधून पहिला आला.

आनंदाने तो घरी आला तर वडिलांनी अंथरुण धरलेलं. टि.बी.मुळे त्यांची अवस्था वाईट झालेली. पहिल्या नंबरने पास झाल्याचा आनंद विरुन गेला. वडिलांनी सांगितलं “आता शिक्षण पुरे. काहीतरी कामधंदा कर. माझ्याकडून आता काम होणं शक्य नाही”. दोन लहान बहि‍णी आणि एका भावाची जबाबदारी अंगावर पडलेली. घरात दोन वेळेचं जेवण मिळायची मारामार. त्याला आठवलं. त्याच्या मित्राचे वडील तालुक्याला इलेक्ट्रिकल कान्ट्रेक्टर होते. लगोलग तो त्यांच्याकडे गेला. इंजीनियर असूनही वायरमनची कामं करायची तयारी दाखवली. मित्राच्या वडिलांना दया आली. महिन्याला पाचशे रुपये पगारावर ठेवून घेतला. तालुक्याचं गाव याच्या गावापासून वीस किमी. अंतरावर. बसची व्यवस्था चांगली नाही. पहिल्या पगाराला एक जुनी पुराणी खटारा सायकल विकत घेतली. तिला डागडुजी करून हा रोज तिच्यावर तालुक्याला येजा करू लागला. नंतर एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पगार वाढला. दोन तीन वर्षांनी एका सरकारी खात्यात जागा निघाल्या. त्यात ह्याची निवड झाली. पण अजून संघर्ष संपला नव्हता. आईवडिलांचं आजारपण, दोन बहि‍णींची लग्न, धाकट्या भावाचं शिक्षण अंगावर होतं. त्यांच्यासाठी काटकसर चालूच राहिली. बिचाऱ्याला मनसोक्त कधी जगताच आलं नाही. मन मारून बिचारा जगला.

“काका ही तुमची तर गोष्ट नव्हे?” निरजने मध्येच उत्सुकतेने विचारलं. एवढ्यात त्याचं लक्ष आईकडे गेलं. ती डोळ्याला पदर लावून मुसमुसत होती. राजेशचेही डोळे भरून आले होते.

“अरे वेड्या तुझ्या लक्षात नाही आलं? ही तुझा बाप, राजेशची गोष्ट आहे”

निरज चपापला. आई का रडतेय हे त्याच्या लक्षात आलं

“पण बाबांनी मला हे कधी सांगितलं नाही”

“कसं सांगणार? आपल्या दु:खाची, कष्टांची सावली आपल्या मुलावर पडावी असं कोणत्या बापाला वाटतं?”

निरज खाली मान घालून बसला. आपल्या वडिलांसारखं कष्टमय जीवन आपल्या वाट्याला कधीच आलं नाही. याची जाणीव त्याला झाली.

“आता बघ. तुझ्या आयुष्याशी तुझ्या बापाच्या आयुष्याची तुलना करून बघ. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही तुझ्या वडिलांनी हार मानली नाही. त्यांची आवड, स्वप्नं, महत्वाकांक्षा वेगळी होती. पण केवळ वडिलांच्या इच्छे खातर त्यांनी आपल्या स्वप्नांना तिलांजली देत इंजीनियरिंग केलं. तेही रडत कुथत नाही तर सर्वस्व ओतून, पहिल्या क्रमांकाने पास होऊन. हे असं सर्वस्व ओतण्याची भावना तुम्हा मुलांमध्ये का नाही? कुणीतरी सांगितलं, मेकॅनिकल इंजीनियरिंगमधे राम नाही म्हणून तू सरळ रामराम ठोकला. हॉटेल मॅनेजमेंट सुरवातीला आवडलं पण नंतर आवडेनासं झालं म्हणून तू ते सोडून दिलंस. काय करायचं तुझ्या बापाने? तुझ्या लहरी खातर लाखो रुपये बर्बाद करायचे? अरे तुझ्या बापाचा मी रुम पार्टनर होतो. त्याचं संपूर्ण आयुष्य मी मा‍झ्या डोळ्याने बघितलंय. तुझ्या मोबाईलच्या किमतीएवढेसुध्दा पैसे त्याने आपल्या शिक्षणाला खर्च केले नसतील.”

आता मात्र निरजला गहिवरून आलं. वाया गेलेली दोन वर्ष आणि या दोन वर्षात झालेली पैशाची उधळ पट्टी त्याच्या मनाला कुठेतरी बोचू लागली.

“सॉरी काका”

“मला सॉरी म्हणून काय उपयोग? माफी तू आईवडीलांची माग. मुलं जेव्हा नालायक निघतात ना तेव्हा आईवडिलांच्या मनाला किती यातना होतात हे तुला आता नाही, तू स्वत: बाप होशील तेव्हा कळेल. मी मा‍झ्या आईवडिलांना अशाच यातना दिल्या. तीन वर्षाचा डिप्लोमा मी पाच वर्षातही पूर्ण केला नाही. शेवटी बापाने मला आमच्या किराणा दुकानावर बसवलं. आज माझी मुलं मला त्रास देतात तेव्हा मला बापाच्या यातना कळतात”

घरात शांतता पसरली. वातावरण एकदम जड होऊन बसलं. जयूला काहितरी बोलायचं होतं पण राजेशने तिला गप्प रहाण्याची खूण केली.

शेवटी मित्रानेच शांततेचा भंग केला

“सॉरी बेटा मी तुला खूप बोललो. राग मानू नको. तुझ्या भल्यासाठीच मी बोललो. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाम निर्णय घे. आवडो न आवडो एक काहीतरी शिक्षण पूर्ण कर. तुझ्या आईवडिलांची सगळी स्वप्नं तुझ्याभोवती केंद्रित झाली आहेत. त्यांना तडा जाऊ देऊ नकोस”

दोन दिवसांनी निरज राजेशला म्हणाला,

“बाबा मला परत मेकॅनिकल इंजीनियरिंगला ॲडमिशन घ्यायचीय”

“काय? आता परत कुठलं खुळ तुझ्या डोक्यात शिरलंय? तू तर बी.एस्सी. ला ॲडमिशन घेणार होतास ना?”

“नाही बाबा. मी तो विचार कॅन्सल केलाय. आणि मी इंजीनियरींग मुंबईला नाही इथे अकोल्यातच करणार आहे”

“अरे पण मग तुला परत सीईटी आणि जेईई द्याव्या लागतील”

“देईन मी. आणि क्वालिफायही नक्की होईन. आणि हो बाबा मला फक्त ॲडमिशनसाठी तात्पुरते पैसे द्या. मी माझ्या मित्राच्या वर्कशॉपमध्ये पार्टटाईम जॉब शोधलाय. त्याच्या पगारातून मी तुमचे पैसे परत फेडेन”

राजेशने त्याला जवळ घेतलं,

“अरे बेटा अजून तुझा बाप जिवंत आहे. आणि तू नोकरी करण्याइतकी आपली परिस्थिती इतकी काही वाईट नाही”

“नाही बाबा मी निर्णय घेतलाय. माझं शिक्षण मी माझ्याच पैशावर करणार आहे. प्लीज नाही म्हणू नका”

जयू जवळच उभी होती. मुलाचा तिला अभिमान वाटला.

चार वर्षानी निरज आपला रिझल्ट घेऊन घरात शिरला.

“आईबाबा मी पास झालो. आणि तेही मेरीटमध्ये”

निरज आनंदाने ओरडूनच म्हणाला. राजेशने त्याला मिठी मारली. जयूने त्याला ओवाळलं. त्याला पेढा खाऊ घातला. पेढा खाऊ घालता घालता जयू रडायला लागली. अखेर तिचा मुलगा इंजीनियर झाला होता.

“आई रडू नकोस. अजून एक आनंदाची बातमी आहे. मी ज्या वर्कशॉपमध्ये काम करत होतो. त्याच्या मालकांना नवीन इंडस्ट्री सुरू करायचीय फ्रान्सच्या कोलॅबोरेशनने. मला त्यांनी पार्टनरशीपची ऑफर दिलीये कारण आजकाल त्यांचं वर्कशॉप मीच तर सांभाळत होतो. त्यांचा विश्वास बसलाय माझ्यावर”

“पण कारे ती इंडस्ट्री चालली नाही तर?” जयूने शंका येऊन विचारलं

“आई आपण मराठी माणसं याच शंकेने कोणताही व्यवसाय न करता पाच दहा हजारावर नोकऱ्या करतो. काही घाबरू नकोस तसं काही होणार नाही. आणि समजा तसं झालंच तर आता मला इतका अनुभव आहे की मी लाथ मारेन तिथं पाणी काढेन”

“वारे मेरे पठ्ठे! याला म्हणतात कॉन्फिडन्स” राजेश त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.

निरज बाहेर गेल्यावर राजेश जयूला म्हणाला,

“अगं त्या ज्योतीषालाही पेढे देऊन ये. निरजच्या कुंडलीत इंजीनियरिंगचे योग नाहीयेत असं म्हणत होता ना तो”

जयू हसायला लागली आणि म्हणाली

“आपलं ध्येय मजबूत असेल तर नियतीचे योगसुध्दा आपल्याला साथ देऊ लागतात... ”

- दीपक तांबोळी,
मो.नं. ९५०३०११२५०
कथासंग्रह- रंग हळव्या मनाचे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या