Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

फुकटचे पिक्चर | मराठी चित्रपट | सुचित्रा पवार

गावाकडचे चित्रपट

फुकटचे पिक्चर

    ही काय भानगड? असं वाटलं असेल ना? तर मग वाचा पुढील गंमत! खूप खूप वर्षांपूर्वी असं नाही म्हणणार नाही, मा‍झ्या लहानपणीची तीस-चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्या गावी प्रमुख दोन जत्रा भरतात, एक ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि श्री सिद्धिविनायक. पैकी सिद्धेश्वर ग्रामदैवत असल्याने गावस्वरूपी देणगी खूप मिळते. ही यात्रा एप्रिल-मे मध्ये भरते. या वर्गणीतून मग वेगवेगळ्या स्पर्धा आणि करमणुकीचे भरगच्च कार्यक्रम असायचे. सायकल-बैलगाडी शर्यत त्याचबरोबर मंदिराच्या चौकात कलापथके आणि हिंदी मराठी सिनेमे. तर सिद्धिविनायक मंदिर हे पटवर्धन देवस्थानचे असून त्यांच्या दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्याप्रित्यर्थ मोठी रथयात्रा भरते. ही यात्रा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी भरते. जवळ जवळ अडीचशे वर्षांची परंपरा आहे. गावभर छोटी-मोठी जवळ जवळ शंभर-दीडशे गणेशमंडळे आहेत. या गणेमंडळांचे छोटे मोठे देखावे असतातच पण अजून एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे गावातील ही वेगवेगळी गणेश मंडळ करमणुकीचे विविध कार्यक्रम आयोजित करायची. कलापथक, पोवाडे आणि हिंदी-मराठी सिनेमे.

    सिद्धेश्वराची जत्रा एप्रिल-मे मध्ये असते. त्यामुळं शाळेला सुट्टी त्यामुळं मजाच मजा, भरपूर खेळणे आणि वर ही करमणुकीची मेजवानी! चौकात सिनेमाची किंवा कलापथकाची जाहिरात असायची. मग घरातली पोरं संध्याकाळी गावातून फिरून येऊन सांगायची अन् पटपट जेवून निघून जायची. आम्ही मग गल्लीतल्या मैत्रिणींना सांगायला सुटायचो. नुसत्या पोरींना कुणी पाठवायचं नाही म्हणून मग आयांना पण तयार करायचे. या बायका पण मग गल्लीतल्या चार पाचजणी असल्याशिवाय तयार व्हायच्या नाहीत; मग त्यांनी सांगितलेल्या त्या बायकांच्या मिणत्या करायला घरोघरी जायचे. उन्हाळाच असल्याने शक्यतो ‘नाही’ कुणी म्हणायचे नाही. फक्त पुरुष माणसांची परवानगी लागे, पण कुणी ना करत नव्हतं. कारण असेही कुणाला टॉकीजमध्ये जाऊन सिनेमे बघायला मिळत नसत कारण बायका फक्त देवाधर्माचे सिनेमे बघत. तसे सिनेमे चुकूनच वर्षा सहा महिन्यातून फक्त ‘तंबूला’ लागत. म्हणून मग या फुकटच्या करमणुकीस कुणी मज्जाव करत नसे. चुकून एखाद्या मैत्रिणीचे वडील मज्जाव करायचे पण मागच्या दाराने पहिलं चप्पल बाहेर आणून ठेवायचं न मग हळूच डोळा चुकवून मागच्या दाराने थोडं लांब जाऊन थांबायचं अन तिथून मग घोळक्यात मिसळायच. पोत, पटकार, टॉवेल असलं काही बाही बसायला घेऊन घोळकेच्या घोळके गावात सिनेमाला जायचो. भूक - जेवण काही काही सूद नसायची. पहिला जाऊन पुढं जागा धरायची जास्त पुढं नाही, जास्त माग नाही, एका बाजूला मधोमध जागा धरायची. अन्यथा पाठीमागून खडे मारायचे. एका बाजूला स्त्रिया, एका बाजूला पुरुष. शक्यतो सुलट बाजूला स्त्रियांची व्यवस्था असे. कारण ही करमणूक खास त्यांच्यासाठीच असायची. या निमित्ताने तर बायका घरातून बाहेर पडाव्यात, त्यांचेही मनोरंजन व्हावे. स्वयंघोषित मोठी माणसे किंवा कमिटीतील लोक दंगा होऊ नये याची काळजी घ्यायचे. खरेतर गावच्या गाव लोटायचे. चुकून चार प्रतिष्ठित सोडले तर घरटी झाडून माणसे या सिनेमा/कला पथकाला जमायची. त्याला कारण म्हणजे ते गावस्वरूपी तर होतेच पण आपलेपणाची भावना होती. इतकी गर्दी होऊन कधीच दंगा गोंधळ झालेला कधीच अनुभव आला नाही किंवा कधी पोलि‍सांना बोलवल्याचे स्मरत नाही, उलट रात्रीची ड्युटी संपवून एखादा दुसरा पोलिसही तिथेच टेकायचा. रात्री ९ चे टायमिंग दिले असले तरी साडेनऊ - दहा वाजयचे. विजेच्या खांबावर एखादी ट्यूब चालू असायची ती पडद्यावर दिसायची म्हणून तिच्यावर काठीने पोत झाकायचं किंवा तात्पुरती ती लाईन बंद करायला सांगायची. पिक्चर सुरू व्हायच्या आधी ट्रायलला फोकस असायचा त्या फोकस पुढं मग पोरं बोटं, हात नाचवायची. बरेचदा कुठलीतरी डॉक्युमेंटरी किंवा ऍड लागायची. बायका म्हणायच्या कशाला “आडवी टाईज ? सिनेमा सुरू करा लवकर! “ मग 5 --- गोल गोल फिरायचं मग 4 --- 3 --- 2 करत थोडा आवाज बिवाज यायचा, पडद्याकड डोळे लावायचे तोपर्यंत अचानक बंद व्हायचं न परत नुसता पडदाच ! असं करतच पाट्या पडायला सुरुवात व्हायची अन एकदाचा पिक्चर सुरू व्हायचा. सुरू झाल्यावर मात्र संपेपर्यंत कमालीची शांतता असायची, संपेपर्यंत कुणी जागेवरून उठायचं नाही. मधेच कुणाचं तर बारक पोरगं रडायचं किंवा एखादं-दुसरी शिट्टी! याव्यतिरिक्त कुठलाच डिस्टर्ब, दंगा नसायचा, समजा कुणी केलाच प्रयत्न तर सरळ त्याला फटके देऊन बाहेर काढले जायचे किंवा तात्पुरती फिल्म बंद करायची पण असे शक्यतो चुकूनच एकदा व्हायचे. चुकूनच एखादी फिल्म तुटायची बाकी पूर्ण पिक्चर संपेपर्यंत बरी चालायची फिल्म. बऱ्याचदा एक मराठी एक हिंदी सिनेमा असायचा. पहाटे चार-पाच वाजायचे पण बसलेली जागा कुणी सोडायचे नाहीत. ‘मल्हारी मार्तंड’, ‘आरजु’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘मोसंबी नारंगी’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘ज्योतिबाचा नवस’, असे सिनेमे दाखवत. अश्लील दृश्ये नसत असेच सिनेमे असत. अन जुन्या सिनेमात ते नसायचेच त्यामुळं वावगं काहीच वाटत नव्हते. हिंदी भाषा पण कळायची नाही, बरेचदा उशीर झाल्यानं मधेच कधीतरी झोप लागायची पण पिक्चर बघायचा आनंद उत्साह कमी व्हायचा नाही. तिथंच दुसऱ्या दिवशी कलापथक असायची. त्या काळात गाजलेल्या हिंदी गाण्यावर सिंगल कलाकार किंवा स्त्री-पुरुष जोडीचा डान्स असायचा. ‘देखा मैने देखा है एक सपना’, ‘परदेशी आ’ अश्या गाण्यांवर पहिले डान्स व्हायचे. स्टेजवर लाईट चमचम करायचे, अंधार-उजेड, लाल, पिवळा, निळा प्रकाश, प्रकाशाचे ठिपके ठिपके कलाकारांच्या झगमगीत कपड्यावर पडायचे. आणि आम्ही भान हरपून बसायचो. सगळं कसं स्वप्नात असल्यासारखं वाटायचं. ती लाईट, कपडे, नाचगाणी आणि त्यानंतर एखादे नाटक. कार्यक्रम संपला की माणसांचे लोंढेच्या लोंढे झालेल्या पिक्चरवर किंवा कलापथकावर चर्चा करत घरी जायचे. दुसर्‍या दिवशी पापड लाटताना किंवा शेवया करताना कालची स्टोरी कुणीतरी न येणारीला ऐकवायची न म्हणायची, “या की दोडानो बघायला! रातचा पिक्चर किती गॉड हुता! मग दुसऱ्या दिवशी ती न येणारीन पण यायची.

    यानंतरच्या फुकटच्या पिक्चरची मेजवानी असायची ती मे महिन्यातल्या पीर चंदनवल्ली उरूसाची. तो पीर कुठाय ? अजूनही मला माहित नाही किंवा त्याचा दर्गा कुठाय ? तेही माहीत नाही पण या उरुसानिमित्त सात दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे. त्यात हिंदी-मराठी सिनेमे, कव्वाली, एखादं दुसरं नाटक. पोलीस परेडच्या मोठ्या ग्राऊंडवर हे सिनेमे असायचे. रिक्षातून सादवत जाहिरातीचे कागद वाटत सगळ्या गावभर ही रिक्षा फिरायची. कागदावर कोणते कार्यक्रम, कोणते पिक्चर कधी? याचे वेळापत्रक असायचे आणि आम्ही हरखून टूम्म्म. अख्खा गाव लोटायचा बघायला. ‘एकही भूल’, ‘मेरा गाव मेरा देस’, ‘उंबरठा’, ‘जिद्द’ , ‘सामना’ असे पिक्चर असायचे. बऱ्याचदा एखादा पिक्चर पुढील वर्षी रिपीट व्हायचा. कोण नट - नट्या काही कळत नव्हतं. पिक्चरमधील सगळं खरंच वाटायचं. मारामारी वगैरे बघितले की वाटायचे, ‘इतकं मारतात तर मग पिक्चरमध्ये का जात असतील लोक? ते रडले की आपण रडायचे, ते हसले की आपण हसायचे. इकडं तिकडं बघून आपल्याकडे कोण बघत नाही बघून डोळे पुसायचे’.

    एकदा असेच पीर चंदनवल्लीचा उरूस सुरू होता, आईचे अजून आवरायचं होतं. अंगणात अंथरुण टाकलेलं. गार वारा सुटला होता. मी आईला सांगितलं, “मला झोप येतेय, जाताना मला उठव”. आणि मी गाढ झोपून गेले. रात्री कधीतरी जाग आली. आईचे, भावांचे बोलणे कानावर आले. मी आईला म्हणलं, “चल की आई पिक्चरला”. आई म्हणाली, “आम्ही जाऊन आलो, “मग काय! भोंगा पसरला… ‘मला पिक्चरला जायचंय आत्ताच्या आत्ता’ म्हणून… भाऊ म्हणला, “आपण उद्या दुसरा बघू” “नाही, मला ह्योच बघायचाय”. म्हणून मी अंथरुणात उठून बसले आणि रडू लागले. आई झोपली, सगळे झोपले, मी मात्र मुसमुसत काहीतर हरवल्यासारखे, न माघारी येण्यासारखं रडत रडत झोपले.

    असेच फुकटचे पिक्चर असायचे ते गणेशोत्सवा दरम्यान. वेगवेगळ्या गणेश मंडळाचे अगोदर देखावे बघायचे. जिथं तिथं स्टेरिओवर त्यावेळची लोकप्रिय गाणी असायची. लैला हो लैला.. हम तुमहें चाहते है ऐसें.. पण आनंदी वातावरण असायचं, मनोरंजन हा मुख्य हेतू असायचा त्यामुळं ते देवाजवळ लावलंय म्हणून आक्षेप किंवा वेगळं काही वाटायचं नाही. ठराविक गणेश मंडळ पिक्चर आणायचे. त्या त्या ठिकाणी मग हे पिक्चर असत. एकदा त्या ठिकाणी जाऊन बसलं की कधी का सुरू होईना ते बघितल्याशिवाय परतायचे नाहीच. ‘नवरा माझा ब्रह्मचारी’ तल ते ‘आई तुझं लेकरू..’ गाणं ऐकून खूप वाईट वाटलं. अजूनही वाटते. पण तो पिक्चर तेव्हा मला काहीच कळाला नाही. एकदा एका मंडळाचे सलग दोन पिक्चर होते ‘मेरा गाव मेरा देश’ आणि गंगा जमुना. ‘पहाटे पाचला घरी आलो. पण तोही पिक्चर काही समजला नाही. हिंदी कळत नव्हतं. आमच्या आईला हिंदी येत असल्याने तिला सगळं समजायचे. रस्त्याने जाता जाता थोडं काहीतरी सांगायची. आशा, जितेंद्रिय, रीनाचा एका मोठ्या पटांगणात होता. सगळे शांतपणे पिक्चर पहात होते. पण थेंब थेंब पावसास सुरुवात झाली. थेंबाचे रूपांतर हलक्या सरीत झाले. पण जागेवरून उठायला कुणीच तयार नव्हते. काही जणांनी आजूबाजूच्या बाभळीच्या झुडुपाखाली आश्रय घेतला. कुणी पोत, टॉवेल डोक्यावर पांघरले. आम्ही अगोदरच झाडाखाली बसलो होतो, वरून आईने आम्हा सर्वांना परकळा पांघरला तरीपण आम्ही भिजलोच. पण कुणीही बघणे थांबवले नाही इतकं त्यात पब्लिक गुंग झालेलं पाहून फिल्मवल्याने पण फिल्म बंद केली नाही. भर पावसात भिजत पूर्ण पिक्चर बघूनच सगळे उठलो. एका मंडळाचा ‘मोलकरीण’, एका मंडळाचा ‘नणंद भावजय’, ‘चलती का नाम गाडी’, ‘वारणेचा वाघ’ बघितले. पुढे आमच्याच गल्लीत गणेशोत्सव मंडळ सिनेमे आणू लागले. तिथं मात्र मजा असायची. घरात कुणाचे मूल रडू लागले, कुणाचे रेडकू सुटले की पिक्चर थांबवून पुकारत आणि संबंधित व्यक्ती घरी गेली की पिक्चर पुन्हा सुरू करत. ‘अर्धांगी’, ‘मायबाप’, ‘सतीच वाण’, ‘पवना काठचा धोंडी’, ‘भक्त पुंडलिक’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘साधी माणसं’, ‘भुताचा भाऊ’, ‘हरियाली और रास्ता’, ‘दिल अपना प्रीत पराइ’, ‘आराम हराम आहे’ असे बघितले. ‘अर्धांगी’ बघून खूप भीती वाटलेली. ज्योतिबाच्या मंदिराकडे पण पिक्चर दाखवायला सुरुवात झाली, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘रेश्मा और सेहरा’, ‘दोस्ताना’ इत्यादी बघितले.

    तर असा हा बालपणीच्या अनेक सुखद आठवणीतील मनोरंजनाचा एक ठेवा मनाच्या कप्प्यात अजून ताजा आहे. जिथं जिथं पिक्चर बघितले, त्या जागेत आता खूप बदल झालेत. पण तिथून जाताना आठवणी पुन्हा जाग्या होतात अन् ‘याच जागेवर बसून कधीकाळी आपण पिक्चर पाहिलेलं आठवतं. पुढे व्हिडिओचा जमाना आला; जिथे तिथे व्हिडिओ हौसेस आणि गल्लोगल्ली भाड्याने व्हिडीओ आणून पिक्चर दाखवू लागले. नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पण मग आपापल्या वॉर्डात व्हिडिओवर पिक्चर दाखवू लागले. ‘सोंगाड्‍या’, ‘चोरावर मोर’, ‘त्रिदेव’, ‘तेरी मेहेरबानिया’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, असे जुने नवे. पडद्यावरचे पिक्चरचे महत्व कमी होऊ लागले. पुढे आमचं अंगण मोठं असल्याने आमच्याच अंगणात व्हिडिओ लावू लागले त्यामुळं अंगणात खुर्ची टाकून ‘आशकी, दयावान, दे दणादण, असे पिक्चर पाहिले. बऱ्याचवेळा परीक्षा असायच्या. बाहेर पिक्चर अन् मी आत अभ्यास करत असे. मधूनच कुणीतरी अभ्यासातून उठवून बाहेर ओढून न्यायचे, मग एखादा सीन पाहून यायचे. पण काही असो, असे सार्वजनिक सर्वांनी मिळून पिक्चर बघण्यात खरेच खूप मजा होती.

    पुढे आम्ही मोठे झालो, त्यामुळं बाहेर जाणे बंद झाले. पिक्चरचा सिलसिला ही कमी कमी होत गेला. घरोघरी टी.व्ही आले आणि मग या फुकटच्या पिक्चरांचे महत्व व गर्दी पण कमी झाली. ज्याने त्याने घरातच कोंडून घेणे पसंद केले. आमच्या लग्नातही वरातीनंतर ‘फटाकडी’ आणलेला. सगळं गाव लोटलं होतं बघायला. आम्हा दोघांची बाशिंग सोडून आम्हाला खुर्च्या दिलेल्या बसायला. बाजूला जाउबाई, पाठराखीण, नणंदबाई - जीवनातला शेवटचा सार्वजनिक पिक्चर तेव्हाच पाहिला.

    अजूनही असतात सार्वजनिक नाटके, सिनेमे पण माणसातला तो निकोपपणा नाही राहिला. भांडण, मारामाऱ्या अन् राजकारणच असतं बऱ्याचदा. अगदी घरासमोर असला तरीही बघावा वाटत नाही कारण त्या मैत्रिणी अन् ते दिवसच नाही राहिले. लोक वेड्यासारखे टकमक बघत रहातात बायकांचे चेहरे. आणि आता वयानुसार आपली रसिकताही कमी होऊ लागलीय. ज्या त्या वयातच ज्या त्या गोष्टी शोभून दिसतात हेच खरे!

    एक मात्र खरे की मराठी सिनेमात निळू फुले इतक्या आयाबायांच्या शिव्या कुठल्याच खलनायकाने खाल्ल्या नसतील. पण खऱ्या जीवनात निळू फुले नायक होते हे कुणालाच माहिती नाही. काळ बदलतो आपल्यालाही बदलावे लागते. सगळे दिवस सारखे नसतात पण जीवनात त्या त्या टप्प्यावरचा आनंद तिथेच घ्यावा कारण तो फिरून पुन्हा आपल्या जीवनात येत नाही आणि आलाच तर त्याचे तितके महत्वही जीवनात रहात नाही. पुलाखालून बरेच पाणी गेलेले असते. आणि आपण दमून गेलेलो असतो संसाराच्या चरख्यातून पिळून… रस शोषलेल्या उसाच्या चिपाडासारखे…

- सुचित्रा पवार, तासगाव
जि.सांगली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या