केवळ गरजेपोटी…
प्रेम वगैरे या काव्यात मांडायच्या कल्पना आहेत. थोडक्यात तो एक “कल्पनाविलास” आहे. अन् सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे ती “गरज” असते. अगदी कोणत्याही नात्यात… बारकाईने पाहिले तर तुम्हाला प्रेमात गरचच प्रकर्षाने जाणवेल. आणि या गरजेलाच आपण प्रेम हे गोंडस नाव देतो. आणि कायमचे फसतो…
तसंही माणूस एकटा राहणारा प्राणी नाही. तो समूहाने राहतो. एकमेकांवरती डिपेंड असतो. म्हणजे आपल्याकडून प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ हा असतोच… आपलाही इतरांकडून असतो. नि स्वार्थ नातं फक्त लेकराचं आणि आईचच. बाकी नात्यात स्वार्थ आणि व्यवहारच असतो!
अहो, बावीस, पंचवीस वर्ष अगदी तद्रूपतेने संसार करणारी स्त्री जर थोडासा स्वत:साठी वेळ काढू लागली की लगेच घरच्यांच्या भुवया धनुष्यासारख्या वक्र होऊ लागतात… बदलली की ही!! अलिकडे वेगळीच वागते! विक्षिप्त वागते वगैरे, वगैरे बोलायला लागतात. का हो? थोडं स्वत:साठी जगणं गुन्हा आहे का?
आताशा, मुलं थोडी मोठी झालेली असतात. आता मुलांचं फारसं तिला बघावं लागत नसते. तिची ही काही स्वप्ने असतात ना हो! इतके वर्षे तिने मन मारून जीवन जगलेले असते, सारा वेळ कुटुंबाला दिलेला असतो. किती कित्ती खस्ता खाल्लेल्या असतात. रात्रीचा दिवस करून मुलांसह सर्वांची सेवा केलेली असते. पण कधीही तिच्या या त्यागाची पोचपावती तिला कोणाकडून मिळालेली नसते. अहो दोन शब्द गोड बोलावण्या इतपत सुद्धा कोणीच मोठेपणा कधी दाखवलेला नसतो. मग, केलं म्हणून काय झालं? उपकार करते की काय? असे वरती टोमणे ऐकून घेतलेले असतात. आता असे अनेक अपमान झेलायची सवय झालेली असते म्हणा… ते काय बाईला नवीन नसते. त्यात जर तिची प्रकृती नाजूक असेल म्हणजे आधीपासूनची नव्हे. सासरी आल्यावर तिला सतत आजारपणाचा सामना करावा लागत असेल तर मग तर काय न बोललेलच बरं! तिची अवस्था तिचे घरचे बोलून बोलून अशी काही करतात की तिला आपल्याला लवकर मरण यावे वाटते! नव्हे ती बिचारी कंटाळून खरंच देवाकडे मरण मागते! नको देवा मला हे असलं जगणं असच वाटतं तिला! कारण त्या घरात तीचं अस्तित्वच शून्य झालेलं असतं. हे झाले एखाद्या स्त्रीच्या बाबतीत…
पण याउलट एखाद्या पुरूषाने जर आपली जबाबदारी पार पाडली नाही तर त्या घरात त्याचीही हीच अवस्था होत असते. त्याचीही किंमत शून्य होते. हे माझे निरीक्षण मी स्वत: डोळ्यांनी पाहिलेले आहे. फक्त खरडायचे म्हणून खरडलेले नाही. एखादा अपवाद कुठेतरी असू शकतो. मग ते नि स्वार्थ नातं समजावं. पण हे फार दुर्मिळ आहे. हेपण तितकंच खरं…
थोडक्यात काय तर तुम्ही घरातील थोडीशी जरी जबाबदारी स्वत:च्या खांद्यावरून झटकली की मग बघा, तुमच्याबद्दल घरातल्यांची मते लगेच चेंज होतात. हाच मुळ मुद्दा मला आपणास सांगायचा होता.
एखादा शाळा कॉलेजातील छंद तुम्ही जोपासावा म्हटलं तर नक्कीच घरातून तुम्हाला विरोध होणार. काही लोक समंजस असतात ते छंद जोपासायला प्रोत्साहन देतीलही. पण ही संख्या खूप कमी आहे. विरोध करणारेच जास्त भेटतील. एखाद्या स्त्रीने काही नवीन शिकायचा प्रयत्न केला तर ते तुला जमणार नाही इथून सुरुवात करतील… आता हौशी लोकं सुद्धा असतात पण प्रमाण कमी आहे! असो, मला हेच सांगायचे आहे की नातं गरजेतून जन्म घेते आणि जोवर गरज आहे एकमेकांना तोवर ते टिकत फुलतं, बहरतं, अजून काय बाय बरंच होतं… पण एकदा का तुमच्याकडून त्या नात्यातील गरज पूर्ण होतं नाही असे लक्षात आले की तुमच्या नात्यातील त्या प्रेम नावाच्या भावनेला उतरती कळा लागते, प्रेम विरत जातं, ओसरत जातं, परिणामी तुम्हाला मग उदासीनता येते. नात्यात कुरबुरीचा व्हायरस लागतो, वेळीच इलाज नाही केला तर व्हायरस आख्ख नातं खाऊन टाकतो म्हणजे बरबाद करतो. तेंव्हा जबाबदारी झटकू नका. शेवटापर्यंत पार पाडत रहा. जोवर तुम्ही नेटाने जबाबदारी पार पाडत आहात तोवर तुमचं नातं हेल्दीच राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्या जबाबदार्या पार पाडा. आणि हो सारखे आजारी पडू नका स्वत:ची तब्बेत जपा म्हणजे जबाबदारी कर्तव्य तुम्ही नीट पार पाडू शकाल.
इतकं सगळं तुम्ही पंचवीस वर्षे, तीस वर्षे इमाने इतबारे, अत्यंत प्रेमाने तुमच्या घरासाठी सारी कर्तव्य नीट पार पाडत आला आहात. जोडीदाराबरोबर प्रामाणिकपणे पंचवीस तीस वर्षं संसार केला आहात. आणि अचानक तुम्हाला एखादा मोठा आजार झाला. उदा. समजा कॅन्सर सारखा भयंकर आजार झाला, तुम्ही बरे होत नाही. औषधोपचार चालू आहेत लाखाने पैसा जातोय तरी आजार बळकावतोय तुमची मनस्थिती नाजूक आहे. अशावेळी तुम्हाला घरातील पहिल्या इतकेच प्रेम करतील ही अपेक्षाही करू नका! मी हे बोलतेय ते कटू आहे, पण तेच अंतिम सत्य आहे… डोळ्यांनी पाहिलेले बोलतेय. ऐकेकाळी तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा, तिला ती ठीक असताना सगळीकडे सोबत मिरवणारा नवरा ती कॅन्सरने पडल्यावर ती मरायच्या आधीच दुसरं लग्न करायची भाषा करतोय? कसली ही घाणेरडी मानसिकता? म्हणजे तुम्ही कर्तव्य करता तोवर तुम्ही सर्वांना प्रिय असता. हे आणि हेच खरं आहे. कटू वाटेल पण हेच सत्य आहे… आणि जग असंच आहे…
लेखिका: सौ. वैशाली हेमंत पाटील.
कोल्हापूर.
0 टिप्पण्या