Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

मायबाप हो...| सुंदर विचार | विजया पाटील

Maybap ho, marathi vichar, marathi suvichar,

मायबाप हो...

काही माणसे आपल्या आयुष्यात अशी असतात की ती आपल्याला भाग्यवान बनवून जातात. पण आपल्याला त्यांची कदर नसते. एकतर आपण त्यांना जमेत तरी धरत नाही किंवा गृहीत तरी धरतो. म्हणजे ती आपल्या खिसगणतीतच असत नाहीत. ती असली काय नि नसली काय, काय फरक पडतो? इतके बेपर्वा आपण काही माणसांबद्दल असतो. कुठे जाणार ती आपल्या शिवाय? प्रेमाने काय पोट भरते का? आमचं काय नडतं यांच्या वाचून? उगाचच काळजी करण्याची सवय यांची.. त्याला कोण काय करणार? यांना एंटरटेन करायला वेळ कुणाकडे आहे? यांनी विचारपूस करून काय होणार? काळजी दाखवून काय उपयोग? आमची कामे आम्हालाच करायला हवीत ना? आमचे प्रश्न यांना काय कळणार? आमचं आम्ही पाहून घेऊ, यांना काय करायचं? या सर्व प्रश्नांत होरपळणारं नातं म्हणजे आईबाबांचं. यांनी काय केले आमच्यासाठी? असं म्हणत आम्ही आमच्या बेपर्वाईचं दर्शन घडवतो. दुर्लक्षित करतो. इरिटेट झाल्याचा आव आणतो. आणि ज्यांच्या लेखी आपले य:कश्चितही मोल नाही त्यांच्यासाठी स्वत्व गहाण ठेवतो.

कधीतरी हे बदलायलाच हवं, नाही का? आपल्यासाठी झुरणाऱ्या, आपल्या सुखाची आस करणाऱ्या लोकांची कदर करूया. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहू या. जन्माबरोबर करोडो रूपयांचा नरदेह सहज बहाल करून आपल्या सुंदर आयुष्यासाठी तन-मन-धन देणार्‍या मायबापांचे ऋणाईत होऊ या.

मायबाप हो, तुमचं अस्तित्व आम्हाला जगण्यासाठी बळ देईल. प्रेरणा देत राहिल. उभारी देत राहिल..

- विजया पाटील, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या