Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

प्रिय मेंदीस | ललित लेख | सुचित्रा पवार

Mehandi mahiti, Mendi lekh, मेंदी,

प्रिय मेंदीस ...

पंचमी आली की मला तुझी आठवण येते अन विचार करते, तुझे माझे कधी तुटले नाते? नकळत्या वयात आलीस अन कधी माझा हात सोडून गेलीस? कळलेही नाही. इवल्या इवल्या हातावरील तुझं ठिपक्यांच रूप, गंध आवडायचा मला. किती निष्पाप निरागस रूप तुझं! जसा आकार तसं तुझं उमटणे ठसणं! सकाळी सकाळी हातावर तेलाचे थेंब टाकून तळहात चोळून बघायचं तुझा रंग चढला की नाही? पण माझ्या हातावर तू रंगायचीच नाहीस, तरीही पंचमीला, संक्रांतीला तुझी आठवण व्हायचीच. कुठून कुठून जाऊन चार -आठाण्याची मेंदी, मग लिंबू, काथ घालून भिजवायची अन हातावर नक्षी काढायची. डाव्या हाताने उजव्या हातावर अन उजव्याने डाव्यावर!

    शेजारच्या लग्नात सुद्धा गल्लीतल्या सगळ्या मुलींच्या तळहातावर तू सजायचीस! गोरे हात अजूनच नाजूक, सुंदर दिसायचे. जणू तो आमचा जन्मसिद्ध हक्कच होता तुला रेखाटण्याचा. मेंदीने रंगलेले हात पंचमीला झोक्याचे दोर गच्च पकडून अजून लाल व्हायचे, फोड यायचे तरीही झोका घ्यायचे थांबवू वाटायचे नाही. तो एक दिवस भरभरून झोके घेण्याचा, मन भरायचंच नाही! शाळकरी वयातही तू होतीस मैत्रिणीच्या हाताशी स्पर्धा करण्यात. कुणाची किती रंगली!

    खरेतर पूर्वी तू गरज होतीस कारण पूर्वी आम्ही बायका पाट्या वरवंट्यावर मसाला, चटणी वाटायचो. हात भडभडायचे मग दाह शमवण्यासाठी तुझी पाने चेचून ती तळहातावर चोळायची. तुला सांगू? घरोघरी प्रत्येकाच्या परसदारी तू असायचीस. तू औषधी पण आहेसच. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तळव्यांना अन तळहातावर तुला माखलं म्हणजे दाह शमायचा. तुझ्या बिया पाळण्यावर बांधायचे-बाळाला दृष्ट लागू नये म्हणून. खरे तर औषधी गुणांमुळेच तुझं आमच्या जीवनातील स्थान अनिवार्य होतं. तुझ्या या रंगण्याच्या गुणांमुळे तू सौंदर्यप्रसाधनात स्थान मिळवलेस. नृत्यांगना तुला हातावर रेखाटून हाताच्या पायांच्या सौंदर्यात भर पाडायच्या. तर अशी तू परंपरागत या ना त्या कारणावरून आमच्या जीवनात स्थिरावलीस आणि एकरूप झालीस आमच्या जीवनाशी आणि भावनांशी पण!

    तारुण्यात तर अजूनच माझं तुझ्याशी नाते घट्ट झालं. मेंदीच्या पानावर मन झुलू लागलं. हवेत तरंगू लागलं. गोड, नाजूक, सोनेरी स्वप्नं डोळ्यांत विसावू लागली. ज्याच्या नावे मेंदी लावायची तो कसा असावा हे कळू लागायच्या आत समजायच्या आत त्याच्या नावाची मेंदी लागली सुद्धा! ‘मेंदी जितकी रंगेल तितका सखा प्रेमळ’ असलं काहीबाही बिंबलेलं मनावर! अन खरं सांगू? तिथूनच तुझं माझं हवंहवंसं नातं कधी दूर गेलं कळलंच नाही.

    संसारचक्रात हौस-मौज, नटणं, ती तरल स्वप्नं सगळंच कुठं गेलं कधी कळलंच नाही गं! आणि मग तुझा रंग जीवनातून कधी फिक्कट फिक्कट होत जाऊन उडून गेला तेही कळलंच नाही. बेरंग झालं जीवन रंगीत व्हायच्या ऐवजी... आणि आता तुझी पुन्हा आठवण आली ती जीवनात रंग भरण्यासाठी नाही... कारण ज्या त्या वयात अन वेळेसच ते ते रंग आयुष्याची गोडी वाढवतात, आयुष्य रंगीत करून दुनियाच रंगीत करून टाकतात... आता पुन्हा आलीस तू अकाली आलेलं वार्धक्य झाकण्यासाठी केसांवर! रंगतात थोडी बोटं न तळहात पण नाही गं ते नातं राहिलं आपल्या दोघीत! परकी वाटतेस... आणि वाटते तू माझ्या हातावर रंगणार नव्हतीसच कधी; म्हणून चुकून लाल झालेली बोटं आता खोल खोल जखमा करतात आणि भळभळत राहतेस हृदयातून गडद लाल होऊन... आणि मग नकोच वाटते तुझं अस्तित्व त्या तळहातावर मनाला विव्हळ करणारं...

    काळानुरूप तू बदलत चाललीस कधी चहापत्तीची, कधी वेगवेगळ्या रसायनांची, पण... तुझे स्थान कमी नाही झाले स्त्रियांच्या जीवनातून. कदाचित तुझंही अस्तित्व लुप्त होईल... नाव मात्र कायम राहील... पुन्हा कधीतरी इतिहासाची पाने फडफडतील... तुझ्या अवशेषांचा शोध घेतला जाईल अन मी तू न रंगलेल्या तळहातावर शोधत राहीन तुझ्या माझ्या नात्यातल्या निष्पाप, निरागस, तरुण, अल्लड, नाजूक नात्यांच्या अवशेषांना... मन झुलत राहील तुझ्या पानावर अन... त्या पानांचा रस शमवत राहील हृदयातील खोल खोल जखमांना...

- सुचित्रा पवार, तासगाव
ता.तासगाव, जि.सांगली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या