रानमळा
माझ्या रानमळ्यामंधीघाम अंगाचा गळतो
माय बापाच्या कष्टानं
जोम जित्राबा चढतो.
माझ्या रानमळ्यामंधी
झाकर झुडूप रांगा
कळकीच्या बेटामंधी
चाले भोरड्यांचा पिंगा.
माझ्या रानमळ्यामंधी
धुंदी मनाला चढते
कोकीळ गाणं गाईते
मोर लांडोर नाचते.
माझ्या रानमळ्यामंधी
शीळ घाली सांजवारा
झाडा वेलींशी छेडुनी
करी खट्याळ नखरा.
माझ्या रानमळ्यामंधी
औत तराटं चालतं
ललकारीनं दादाच्या
सारं शिवार घुमतं.
माझ्या रानमळ्यामंधी
उडे बगळ्यांची रांग
बळे बळे कात दे गं...
पोरं हुत्याती रं दंग.
माझ्या रानमळ्यामंधी
उभी बांधावर खोप
शिणलेल्या जिवास रं
मिळे पारभर झोप.
माझ्या रानमळ्यामंधी
गड्या चल रं फिराया
गच्चं पोटभर तुला
देतो रानमेवा खाया.
माझ्या रानमळ्यामंधी
काळी आई शेतसरी
बळीराजाच्या कष्टाची
उभ्या जन्माची भाकरी!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५६१७००८००
0 टिप्पण्या