रानमळ्यातले हुंदके...
शेवटल्या खुरप्यालानीट चालवं चालवं
मूळ तनाचं धरून
हात हालवं हालवं.
हात हालवं हालवं
तवा पोटाला मिळलं
रोज नव्या बांधावर
घास ओठांत घोळलं!
रोजंदारीवर बाई
तुझा चालतो संसार
घरा दाराचा पडला
तुझ्या डोईवरी भार.
नाही जमीन जुमला
नाही नवऱ्याची साथ
काय लिहून ठिवलं
बाई तुझ्या नशिबातं.
दोन चिमुकल्यांसाठी
तुला जगायचं बाई
नशिबाचं भोग सारं
तुला भोगायचं बाई...!!
-प्रमोद मोहिते, टाळगाव
ता.कराड, जि.सातारा
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या