Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

उतरती | मराठी वैचारिक लेख | वासुदेव पाटील

उतरती मराठी लेख, Utarati

उतरती


माणसाला माणूस म्हणून जगताना किती ताठा, रग, गुर्मी, अहंकार असतो. माणूस जीवन जगतो म्हणजे काय? जगण्यासाठी जीवन जगतो की जीवनासाठी जगतो? जन्म व मरण यातला प्रवास म्हणजे ‘जीवन’! काळाबरोबर क्रमण करणं, काळाच्या रेषेत चालणं म्हणजे ‘जीवन’!

    जन्मापासून काळाबरोबरचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात काळाबरोबर माणूस अंगानं, मनानं, वयानं, बदलत जातो. त्याचा विकास होत जातो. काळाबरोबर बदलत चालत राहणं म्हणजे जीवन. काही बदल स्वीकारत नाही ते ही जगतात. पण कुठल्याना कुठल्या अंगानं त्यांचा विकास थांबतो. जीवन जगतात पण प्रगती खुंटते. तर जे काळाबरोबर बदलतात, किंबहुना बदलणाऱ्या काळा बरहुकुम स्वत:ला अपडेट करतात वा काळाची पाऊले ओळखून काळावरच स्वार होतात ते अधिक प्रगत होतात. भौतीक, ऐहिक जीवन समृद्ध करतात.

    काळाबरोबर जीवन जगताना माणसास आप्तगण, नातेवाईक, समाज त्याला सोबत करतात. तर कधी माणूसच या घटकाचा अविभाज्य भाग बनत त्यांचा उतराई होतो. समाज आला की मग जात, पंथ, संप्रदाय, धर्म आला. मग माणसास श्रेष्ठ - कनिष्ठच्या पट्ट्या चिकटतात. प्रगतीची गणना चलनात होऊ लागली की गरीब श्रीमंतीची कसोटी येते. मग मनातल्या सुप्त भावना जागृत होत उगम होतो रग, ताठा गुर्मी, प्रौढी, अहंमतेचा!

    जीवनाची तुलना सकाळ, दुपार व रात्रीशी केली जाते. जीवनाची दुपार म्हणजे माणसाचा भरभराटीचा काळ! अंगात ताकद असते, रक्त उसळत असतं, कधी हातात पैसा खुळखुळत असतो, सत्ता असते. लाथ मारीन तिथं पाणी काढीन! वा हात लावेन त्याचं सोनं करीन हा भाव उत्कट स्तरावर असतो! या वयात संयमाची गरज असते. ज्यानं संयम दाखवत काळाबरोबर प्रगती करत राहिला तो अधिक प्रगत होतो तर काही संयम न दाखवता वाहवत जात लयास जातात. पण हा मनात अहंमता माजवणारा टप्पा. ज्यांची सकाळ होतेय वा काहीची संध्याकाळ झालीय त्या घटकांना सावरत आधार द्यावा लागतो. पण सळसळतं तारूण्य वेगळ्याच धुंदीत असतं. नंतर मात्र चढती दुपार झुकू लागते. माणूस काळाबरोबर नाही धावू शकत! वारंवार होणारे बदल त्याला झेपावत नाही! तर कधीकधी काळही कात टाकत अनपेक्षित बदल घडवून आणतो. किती ही अपडेट होण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या मॉडेलमध्ये तसलं सॉफ्टवेअर नसलं की ते मॉडेल‌च कुचकामी ठरतं अडगळीत जावं तसंच आपलं जीवन होतं. धावण्याची कास सुटते व जीवन ठप्प होते. पण जे काळाबरोबर वारंवार बदलत राहतात. त्याच्यात ताठा अधिक वाढत जातो. पण एक बाब कायम लक्षात ठेवावी. काळ प्रत्येकास संधी देतो वा कंबरडं ही मोडतो. कधी भकास जागेवर वस्ती उठवतो तर वस्ती असलेल्या जागी स्मशान निर्माण करतो. म्हणून आज जे उच्च शिखरावर आहेत त्यांनी आपण कायम त्याच ठिकाणी राहू या भ्रमात राहत ताठा, रग दाखवू नये! हे समजण्यासाठी कधीकधी सहज फेरफटका मारत निसर्गातील भग्नता नक्की अनुभवावी. आज जे अनुपम आहे ते केव्हा ना केव्हा भग्न होणारच! सौंदर्याची चरम सिमा गाठली की भग्नता आलीच. पण या भग्नतेतच उद्याची बेनझीर निर्मिती दडलेली असते. म्हणून येणारा काळात होणार्‍या दु:खाची तीव्रता कमी व्हावी वा निदान आपल्या आत्मप्रौढीला वेळीच सावध करण्यासाठी म्हणा पण ही भग्नता नजरेखालून घालावीच.

    पापुद्रे निघू पाहणाऱ्या वा गिलावा सुटणाऱ्या भिंती खपली उलू पाहणाऱ्या जखमा, ठसठसणाऱ्या, भळभळणाऱ्या जखमा, पूर ओसरलेल्या नद्यांची कोरडी पात्रे, उठलेल्या, पांगलेल्या जत्रा, उलगलेल्या राया, माळ, मळे सहज फिरता फिरता नजरेखालून घालावीत. कुसे मोडलेली, पोखरलेली लाकडे आढ्यातून - वास्यातून फिरलेली घरे, कडे मोडत्या धाब्यावर उगवलेले कुसळ, कुठे तरी पडलेली जात्याची चाळे, भंगलेल्या तुटलेल्या मुर्त्या, काठ तुटलेली पाळे, फुटलेली गाडगी, मडकी तडकलेल्या काचा, पारा उडालेल्या काचा, सुरकुतलेले चेहरे, खिळखिळलेली हाडे, खिचपत पडलेले चेहरे, दुभंगलेली मने, निझूर डोळे, आस गळलेल्या नजरा पहाव्यात.

खचून चिरा व चुना उघड्या पडलेल्या हवेल्या, काटवन उगवलेल्या गढ्या, भग्न वाडे, मांजरी, पाकोळ्या, कुत्र्यांचा वास असलेली बंद घरे, पडकी मंदिरे, वठलेलं झाड, कुजणारं खोड, शेवाळलेलं पाणी, नाकाला झोंबणारी दुर्गंधी, उदास गल्लीबोळ, शांतता व भीतीनं संपृक्त स्मशान, पडलेल्या अर्धवट जळालेल्या ताटल्या, कलश, गाद्या, मडक्याच्या ठिकऱ्याचा खच व खिचडी ठेवलेले विसावे, गोरी, ढासळलेल्या विहिरी, लिंबू गंडे दोरे काही बाही पडलेले तिठे, चौफुले, मरीआई - म्हसोबाचं दूर एकाकी देऊळ, मुजाचा पिंपळ, गिऱ्हा लागणारा नाला, नदी, साती आसराचा डोह, आटत साकोळणारा तलाव, वेताळाचा वाडा, भगताची मढी सारं सारं धुंडाळत पाहताना कधी काळी इथली नांदती समृद्धी, सौंदर्य, जीवन का भकास झालं याचा धांडोळा घेताना रग जिरल्याचं जाणवतं का ते पहावं.

    मावळती आशा, घेरणारी निराशा, पोखरणारं एकाकीपण, मृत्यूचं भय, स्वप्नाचा चुराडा करत उडून गेलेला आपल्याच पिलांचा थवा, दुरावलेला गोतावळा, रक्त आटवत वाट पाहणारे दु:खी खोकणारे जीव, खायला उठलेलं घरं, जीवघेणी सन्नाट दुपार, निसटून गेलेल्या क्षणाची सय करून देत चोर पावलांनी येणारी भोरी कातर संध्या नी मग काळ्या कभिन्न अंधारात पुढचं अधांतरी भविष्याचे वेध घेताना पळ पळ युगासमान वाटणारी रात, किरकिरणाऱ्या रातकिड्याच्या सहवासात डोळे फाडून फाडून अंधारात आपल्या अस्तित्वाचा शोध घेताना गात्रे गर्भगळित होणं, धाप लागणं, नी मग डोळ्यात कुठेतरी डुलकी येत असल्याचं समाधान उगवण्या आधीच उगवणारी मलूल पहाट! अनुभवावं हे सारं पांघरलेल्या गुर्मीच्या जाणीवा फेकत. सजलेल्या नववधूसारखी घोंगट उतरवणारी सांज ही किती कातर व बोहरी असते! शृंगारानं सजलेली, भाव विभोर करत स्वर्ग सुख देणारी, मोहमयी मीलनात कवेत घेणारी पावसात सौंदर्य रसात निथळणारी, थंडीत कुडकुडणारी रात ही इतकी भयाण भेसूर असते? हे पहावं. तीच संध्या, तीच रात, तीच पहाट मग अशा का भासाव्यात? काळ! काळाचा महिमा! असा उतरता काळ प्रत्येकाच्या नशिबात नसेल ही! पण अनुभवण्याने फुकाचा माज, रग ,ताठा नक्कीच उतरतो व माणूस माणूस म्हणून जगू लागतो. देवासारखं जीवन जीवन जगण्याचा अट्टाहास मुळीच नको! देव कुणी पाहिला! पण माणूस होता आलं पाहिजे! ताठा नसलेला माणूस!

- वासुदेव शिवदास पाटील, नंदुरबार
मो.नं- ८२७५३१४७७४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या