Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

गूढता | वैचारिक लेख | वासुदेव पाटील

meaning of gudhata, गूढता in marathi

गूढता

वास्तवाच्या विविध पैलूंचे किंवा जाणि‍वेच्या अवस्थांचे किंवा अस्तित्वाच्या स्तरांचे सामान्य मानवी संवेदने पलीकडील ज्ञान आणि प्रामुख्याने व्यक्तिगत अनुभव म्हणजे ‘गूढता’ होय गुढतेविषयी आकर्षण नसणारा माणूस विरळाच! हे सारे विश्व अनेक गूढ गोष्टींनी व्यापलंय. जन्म एक गूढ! मृत्यू एक गूढ! जन्मा आधीचं जग (असेल तर!) एक गूढ! मृत्यूनंतरचं जग (हे ही आहे की नाही?) एक गूढ! आणि सर्वात मोठं व हवंहवंसं वाटणारं गूढ म्हणजे जन्म व मृत्यू यामधला माणसाचा प्रवास-जीवन हे एक गूढ? अवकाश हे ही एक गूढ? अर्णव तळे, तिथल्या खोल खोल गर्ता व त्यामध्ये नांदणारी शांतता वा खवळणारी वादळे हे ही एक गूढ! गर्दीतला एकांत व एकांतातील गर्दी हे ही एक गूढ! रात्रीच्या गर्भात सुन्न क्षितिज सांदीत वा कभिन्न कपारीत, गच्च रानजाईत चालणारी वळवळ, च्याव म्याव हे ही एक गूढ! सौंदर्य हे ही एक गूढ! मानवी मन (त्यातल्या त्यात स्त्रीचं मन) हे ही एक गूढ! माणसाचा चेहरा हे एक गूढ! चेहर्‍यावरच्या सुरकुत्या कपाळावरच्या आढ्या (आठ्या) व त्याच्या घळ्या यात ही गूढ सापडेल! शोधता आलं पाहिजे! सयंमानं, धीरोदात्तपणे. या घळ्यात, आठ्याच्या जाळीत हरवलेल्या आयुष्याचं, निसटलेल्या मयुरपंखी सोन क्षणाचं लेणं व भावनाचं गूढ दडलेलं असतं.

संसारात किती किती गूढता आहे. अगम्य, दुर्बोध निरस भितीदायक असलेली ही गूढता कधीकधी सुरस, अचंबीत करणारी व हुरहुतेचे पंख लावत उडवणारी ही असते. माणसाचा जन्म होतो. ‘स्व’ ची जाणीव येते जन्मापासून म्हणण्यापेक्षा ‘स्व’ ची जाणिव आल्यापासून जीवन प्रवास सुरू होतो असं धरलं‌ तरी. त्या आधी माणूस कुठं होता, कुठून आला? कसा आला? का आला? आल्या वेळीच का आला? ही सारी गूढता घेत मुल मोठं होतं. जीवनात सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर हेलावताना भविष्यात पुढे काय? कुठे जाणार? कसं जाणार? ही सारी गुढताच?

तारुण्याची गूढता त्या मानानं सुबोध, सरल, साहजिक व हुरहुर लावणारी हवीहवीशी. पण तरी ती देखील गूढच. गूढतेबाबत वाटचाल करताना सौंदर्याची गूढता त्याला ओढते. या मोहमयी गूढतेत तो आपलं अस्तित्व भुलायला करतो. ही गूढता कधी भरभरून दान देते तर कधी होत्याचं नव्हतं करून टाकते. सात जहाज भरतील एवढं ऐश्वर्य गमावून ही भावास कळत नाही हे सारं कुठं गेलं? अशी ही सौंदर्याची गूढता. संसार रुपी गूढतेच्या गुहेत तो आपसूक प्रवेश करतो व पुढे पुढेच ओढला जातो. परतीच्या वाटा हातात असूनही त्याला परतता येत नाही. जे परततात ते सन्यस्त जीवनाच्या गूढतेत अडकतात. एका गूढतेतून दुसर्‍या गूढ गूढतेत.

भव सागरात वावरताना अनेक नात्याशी माणसांशी संबंध येतो. प्रत्येकाचा चेहरा ही एक अजब गूढता. चेहऱ्या आड काय दडलेलं आहे हे खूप मोठं गूढ. बिलंदर वाटणारा कमालीचा हळवा तर सोज्वळ वाटणारा एकदम आपितर वा अस्सल बेणं! दिसणारा माणसाचा चेहरा व चेहऱ्याआड दडलेला माणूस यात कमालीची गूढता असते. काही माणसे नजरेत वा चेहर्‍यात गूढता घेऊनच वावरत असतात. नात्या-नात्यातली वीण ही ही एक गूढताच! न उकलेली! वय वाढत जातं तशी मरणाची गूढ छाया दिसू लागली की सुरकुत्या, आठ्या, आढ्या यायला लागतात. या सुरकुत्यांच्या गूढ घळ्यात मग वाकल्या कमरेनं काठीच्या वा नातवाच्या आधारानं हा निसटलेलं तारूण्य, गमावलेली पत, निसटलेलं ऐश्वर्य वा कमवलेलं ऐश्वर्य शोधत राहतो. पण शोधशोध शोधूनही पश्चात्तापच हाती येतो. मृत्यूची गूढ भीती त्याला दस्तक देऊ लागते. गात्रातला जोर, मनातला जोश, मेंदूचा होश नष्ट होऊ पाहतो! माती, हवा, पाणी, तेज, घेऊन वाढवलेला देह साथ सोडतो. साथ सोडताना डोळ्यात पुढच्या गूढ प्रवासाची भीती दाटते व सुरू होतो अनामिक गूढ प्रवास! सुरू होतो की इथेच संपतो! तपास नाही? सर्व कल्पना, वावड्या, वाऱ्यावरच्या वराती?, बाता? की लाथा? देह दफन होतो, दहन होतो, जलदान होतो. काहीच्या नशिबी कुजणं, सडणं येतं; गूढ रहस्य सोबत वागवत! श्वास थांबला की, हवा हवेत मिसळते. हाडातला रस, पाणी, हिरव्या देठातला ओलावा पाण्यात मिसळतो! सारं जेथून घेतलं त्याला साभार परत? की न आभार मानता परत. पण परत. एकतर राख! किंवा माती! कुणाकुणा सूक्ष्मजीवांचं उदरभरण! कण बनून पडतो स्मशान भूमीत लावारीस. आपल्याच्याच जत्रेत बेवारस होऊन. किंवा राख होऊन उडत राहतो मेघडंबरात एकाकी. माती होऊन पडतो मातीच्याच कुशीत. शोधत असावा गूढतेत गूढता होऊन गूढपणे गूढतेचं रहस्य! तर्पणापर्यत वा कावळा शिवेपर्यतमी कोण? मी एक शून्य. पोकळ शून्य. पोकळ शून्याच्या परीघावर भटकंती करत केंद्राचा शोध घेऊ पाहणारा. केंद्र की अवकाश व्यापत जाणारा भरीव गोल? अवकाश! पुन्हा गूढता! याला मर्यादाच नाही. केंद्र फिरत राहतंय अवकाशात वर खाली समोर मागे जवळ दूर! किती दूर? योजन, प्रकाशवर्षे की युगे युगे! गूढतेच्या शोधात? मी कोण? नाही. मी तो नाहीच! माझी सुरुवात कणापासून? व‌ शेवट ही कणाणेच! मातीच्या कुशीत विसावलेला माती होऊन पडलेला कण! की दहनातून राख होऊन राखेचा कण? पाण्याचा कण! तेजाचा कण! कण रेणुने बनलेला! रेणू अणूने बनलेला? पुन्हा शोध. मी कोण? मी कण नव्हे! सूक्ष्म अणू. पुन्हा अणुच्या गर्भात घुसत गूढता उकलणं. अणुच्या परिघावरुन केंद्रकात घुसणं. केंद्र आलंच. भरीव की पोकळ? गोल गोल अवकाश! जेथून सुरुवात तेथेच इति! मी कोण? ही गूढता तशीच शेष? राख, माती... राख राखुंडी भस्म... देहाची राख भस्म अंगारा होत किती कितीच्या भाळी माखला गेलोय मी? भस्माच्या आडव्या उभ्या पट्ट्यात मी दडलोय. सारं मिसळून ही उरलोय भस्माच्या रेखात! देह नि:शेष की उरल्या शेषात! देह गेला पण आत्मा? आत्म्याचा प्रवास पुन्हा गूढतेकडे! ही गूढता मृत्यूनंतर ही पाठ सोडत नाही! अरे! पाठी लागायला पाठ उरलीच कुठे? ती तर जळाली, दफन झाली! मग? पण उरली असावी भस्म होऊन ज्याच्या कपाळी रेखाटली त्याच्या पाठीला चिकटून! निरनिराळ्या धर्माच्या आत्म्याच्या कल्पना वेगवेगळ्या. तेजोमय प्रकाशाची ज्योत झेपावतेय अवकाशात. खगोलीय पोकळीत! स्वर्गाकडं की नरकाकडं? की रौरवाकडं की आणखी कुठं? गूढता! देह टाकल्यावर केव्हा? टाकताच की एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, दसवं तर्पण नंतर? देह गेला की निघत असावा बिचारा एकटा वावदुक सारखा निराशेने, दु:खाने की आनंदाने? गूढच. काय सांगावं नंतरचं जग या जगापेक्षाही रम्य असावं? सारे आधीच मुक्त झालेले आप्तजण ही भेटत असावेत गळ्यात गळा घालून! व वरून खालून पाहत असावेत जेथून आलोत तेथली गटार गंगा! इथली नग्नता, भग्नता? धोका, लांडी लबाडी, फरेब! संग करताना दुज्यालाच आठवण्याचं महापातक! चेहऱ्याआडचे मुखवटे? मुखवट्याआडचे चेहरे? सौदर्याआडची कुरूपता? पतीचं पत्नीला, पत्नीचं पतीला फसवणं? स्त्रीचं न‌ कळालेलं अगाध मन? काय वाटत असेल त्यांना पाहून घृणा? घीण? किळस? सुटल्याचा आनंद की दु:ख? सारी सारी गूढता!

देह गेला. आत्मा गेला की रेंगाळतोय कणासारखा राखेसारखाच आसमंतात? की लगेच प्राप्त झाला असेल पुनर्जन्म? गर्भाच्या खोळीत आपल्या उगू पाहणाऱ्या देहानं टाकलेली घाण प्राशत? मी कोण? देहधारी? आत्माधारी? की मोक्षधारी? मोक्षानंतर काय? जन्म मरणाच्या फेऱ्यातून निवृत्ती घेत पेंशनरासारखं जगणं? की निवृत्त झाल्याचं पुन्हा दु:खं! इथं ही गूढताच. गूढता! गूढता! जन्मात, मरणात, मुक्ततेत, मोक्षात भवसागरात अवकाश पोकळीत सारीकडे गूढताच मातली. शेवट मी कोण? हा प्रश्न गूढतेत शिल्लक राहतोच गूढ बनून! बहुधा मी हीच गूढता तर नसेल? अनादी काळापासून चालत आलेली? कणापासून उगम पावत अवकाश व्यापणारी? गुह्य? रहस्यमयी? भेदक? केद्राचाच स्फोट घडवून ही लेण्यात रात्री नांदणाऱ्या शांततेसारखी?

- वासुदेव शिवदास पाटील, नंदुरबार
मो.नं- ८२७५३१४७७४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या