Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

जोतिबा डोंगर | सीमा पाटील | Jyotibacha Dongar

जोतिबा डोंगर कोल्हापूर, जोतिबा डोंगर माहिती, jyotibacha dongar,

जोतिबा डोंगर

‘जोतिबाचा डोंगर’ हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात असणारे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूरच्या वायव्येस २०-२५ कि.मी. अंतरावर हा डोंगर आहे. सपाट प्रदेशात साधारणपणे १००० फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेच्या सारखा पसरलेल्या डोंगराला ‘वाडी रत्नागिरी’ असे नाव आहे. पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीचाच हा एक भाग आहे. या डोंगरावरील पठारावर जोतिबाचे मंदिर आहे. जोतिबा हे मंदिर शिव आणि सूर्याचे रुप मानले जाते. केदारलिंग, ज्योतिर्लिंग, रवळनाथ या नावानीही जोतिबास ओळखले जाते. तसेच हे बद्रिकेदाराचेही रुप मानले जाते. ब्रम्हा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचे तेज:पुंज रुप म्हणजेच ‘ज्योतिर्लिंग’ होय.

प्राचीन काळात कोल्हापूर शहर व इतर भागात दैत्यांनी हाहाकार माजवला होता त्यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीने जनतेची या दैत्याच्या छळातून सुटका व्हावी म्हणून तपश्चर्या करून केदारेश्वर यांना विनंती केली व केदारेश्वरांनी राक्षसांशी युद्ध करून त्यांचा प्रमुख रत्नासूराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. महालक्ष्मीच्या विनंती वरून कोल्हापूरवर सदैव कृपा दृष्टी राहावी म्हणून हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. हे मंदिर हेमाड पंथी पद्धतीचे व मराठा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ, सहा कुंडे व दोन विहरी आहेत. देवालयाच्या प्रांगणात प्रचंड दगडी दीपमाळ आहे. जोतिबाची सुंदर मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडवलेली आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातात खङग, पानपात्र, डमरू व त्रिशूल आहे. शेजारीच जोतिबाचे उपवाहन शेष आहे. जोतिबाचा शरीर रक्षक कालभैरव बाहेरच्या बाजूस असून तिथे मूळ ज्योत सदैव तेवत असते. जोतिबाच्या दर्शनापूर्वी कालभैरव आणि मूळ ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. जवळच यमाई देवीचे मंदिर असून देवीची मूर्ती दगडाची आहे, या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे.

जोतिबाच्या जन्मदिवशी म्हणजे रविवारी व श्रावण शुद्ध षष्ठीला इथे भाविकांची गर्दी असते. रत्नासुरावर मिळवलेल्या विजया प्रीत्यर्थ चैत्रीपौर्णिमेस इथे भव्य यात्रा भरते. “जोतिबाच्या नावाने चांगभलं” या गजरात वाजत गाजत सासन काट्यांसह मृर्तिची प्रदक्षिणा देवळासह यमाई मंदिराकडे निघते. ‘जोतिबा’ आणि ‘केदारर्लिंग’ या नावाचा उल्लेख यादवपूर्व काळ तसेच महानुभाव पंथांच्या पोथ्यांमध्ये पैठण, जळगाव येथील केदारेश्वराचा ही उल्लेख आढळतो. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतिक असे जोतिर्लिंगास मानले जाते.

(वरील माहिती मी संग्रहित केलेल्या माहितीच्या आधारे लिहिली आहे. )

- सीमा ह.पाटील (मनप्रीत)
कोल्हापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या