Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सप्तसुरांची भैरवी.. | सुरेश नावडकर

लता मंगेशकर, lata mangeshkar

सप्तसुरांची भैरवी..

१९९० साली ‘धडाकेबाज’ चित्रपटाचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. त्या निमित्ताने महेश कोठारे यांनी मुंबईतील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये रौप्यमहोत्सवाचा सोहळा आयोजित केला. चित्रपटाचे वितरक अरविंद सामंत यांनी आम्ही चित्रपटाची पेपर डिझाईन केली होती म्हणून आम्हाला बोलावून घेतले. त्यावेळी लतादीदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते कलाकार व तंत्रज्ञांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली. गणेश कान्हेरे सोबत मी देखील या समारंभाचे फोटो काढत होतो.. समारंभाच्या शेवटी लतादीदींच्या सुमधुर आवाजातील भाषण ऐकून, माझे कान तृप्त झाले...

    २००३ साली ‘सातच्या आत घरात’ चित्रपटाचं शुटींग दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे चालू होतं. त्या दोन दिवसांच्या शुटींग दरम्यान लतादीदी त्यांच्या कामासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या होत्या.. तेव्हा त्यांना पुन्हा एकदा जवळून पहाण्याचा मला योग आला... एक असामान्य गायिका, सर्वसामान्य व्यक्तीसारखी वावरताना पाहून, त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला..

    दीदींच्या जन्म इंदूरचा, बालपण गेलं कलानगरी, कोल्हापूरमध्ये! मूळचं नाव हेमा, वडिलांच्या नाटकातील ‘लतिका’ च्या भूमिकेमुळे ते ‘लता’ झालं... अवघी तेरा वर्षांची असताना, पहिलं मराठी गाणं गायलं.. नंतर ‘पहिली मंगळागौर’ चित्रपटातील छोटी भूमिका!

    ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला...’ या गीतापासून प्रसिद्धीच्या झोतात... त्यानंतर अनेक नामवंत संगीतकारांकडे विविध भाषेतील शेकडों चित्रपटांसाठी, हजारों गाणी गायली...

    दादींनी मराठी चित्रपट गीतं व भावगीतं गाऊन भाषेला समृद्ध केलं आहे. अनेक मराठी चित्रपटांना ‘आनंदघन’ नावानं संगीतही दिलेलं आहे. मराठी चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक पाठिंबाही दिलेला आहे..

    सुमारे सत्तर वर्षांच्या या कारकि‍र्दीत लतादीदीने असंख्य पुरस्कार व सन्मान मिळविले. पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारांनी भारत सरकारने गौरविले.. देशात परदेशात सन्मान मिळाले.. एका भारतीय गायिकेनं मिळविलेलं हे यश ‘न भुतो न भविष्यती’ असंच आहे..

    सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाला, घटनेला जुळणारी गाणी लतादीदींनी गायलेली आहेत.. ती ऐकली की, आपण त्या काळात जाऊन येतो.. म्हणूनच त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता शतकानुशतके अबाधित राहील..

    माणूस जन्माला आला आहे, कधीना कधी जाणारच आहे.. लतादीदींना कोरोनाचं निमित्त झालं, वयोवृद्धपणामुळे तब्येत खालावत गेली..

    आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी स्वर्गात प्रवेश केला... तिथे त्यांच्या स्वागतासाठी शेंकडोंजण उभे होते.. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दीदींचं स्वागत केलं... आणि हात जोडून विनंती केली, ‘लताजी, मेरे लिये वो गाना फिर से गाईये... जो सुनकर, तब मेरे आँखो से आंसू बह रहे थे...’ लतादीदींनी सुरुवात केली, ‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँखो में भर लो पानी... नेहरूंना राहवलं नाही’, त्यांनी दीदींच्या पाठीवर थोपटलं व म्हणाले, ‘अठावन्न साल मेरे कान, इस गाने को फिर से सुनने के लिये तरस रहें थे.. अब मेरी कुछ भी ख्वाईश नहीं रही…’ नेहरूंच्या मागे हिंदी, मराठी व प्रादेशिक भाषेतील असंख्य नामवंत संगीतकार व गायक आणि गायिका उभ्या होत्या.. दीदींच्या आगमनामुळे ते सर्वजण भावुक झालेले होते...

- सुरेश नावडकर, पुणे
मो.नं. ९७३००३४२८४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या