Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

मळभ | प्रेम कथा | सुचित्रा पवार

मळभ कथा, सुचित्रा पवार, प्रेम कथा मराठी, प्रेम कथा दाखवा,

मळभ 

“रिम झिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन...”

रेडिओवर त्याच्या आवडीचे गाणे ऐकताच तिची पाऊले रेडिओकडे धावली गाणे रेकॉर्ड करण्यासाठी... पण ठेच लागल्यासारखी ती जागेवरच थांबली; कुणासाठी करणार होती रेकॉर्ड?... हजारो गाणी आवडणारा आणि सुरेल गाणी म्हणणारा तो तिचे जीवन बेसूर करून निघून गेला होता तिच्या आयुष्यातून, हे ती विसरलीच होती. तिला कसेसेच झाले. प्रत्येक रोमरोमात वसलेला तो तिला सोडून गेलाय हेच मुळी तिला स्वीकारणे अवघड होते. इतके दिवस मंदिरात वसलेली, पुजलेली मूर्ती अचानक गायब व्हावी न मंदिर सुनं सुनं व्हावं तसं झालं तिला. तिनं मोबाईल ठेवून दिला. खूप एकटं एकटं वाटू लागलं तिला. परवाचा प्रसंग तिला पुन्हा पुन्हा आठवू लागला

“ओ साथी रे ऽ ...तेरे बिना भी क्या जीना ..”

त्याचा आवाज तिच्या येण्या जाण्याच्या वाटेवरच्या त्या हॉलमधून तिला ऐकू आला नि तिला आश्चर्य वाटलं. त्याचा कार्यक्रम आहे आणि तो तिला बोलला नाही? आजपर्यंतच्या त्याच्या सोबतच्या दहा वर्षाच्या सहवासात पहिल्यांदाच असं घडलं होतं. नाहीतर त्याच्या गाण्याच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सरावापासून पासून कार्यक्रम पार पाडून गर्दी पांगेपर्यंत ती त्याला हवी असायची. प्रत्येक गाण्याला तिच्या प्रतिक्रियेसाठी तो आतुर असायचा. कार्यक्रम संपला की पॅकअप होईपर्यंत तो तिच्याजवळ जाऊन बसायचा मग तिला सोडायला तिच्या घरी. त्या प्रवासात मग त्याच्या त्या-त्या दिवशीच्या प्रत्येक गाण्याचे ती तोंड भरून कौतुक करायची त्याच बरोबर कुठल्या गाण्याचा स्वर चुकला हेही अचूक सांगायची; आणि तो इतका मुरलेला, नामांकित गायक असूनही तिच्या प्रत्येक बोलण्याकडे बारकाईने लक्ष द्यायचा. तिच्या घरी जाऊन मस्त वेलचीचा चहा घेऊनच तो परत घरी जायचा. ‘ओन्ली अमिताभ’ त्याच्या कार्यक्रमाचे नाव होते. फक्त अमिताभवर चित्रित झालेली गाणीच तो गायचा. ती हळूच त्या गर्दीचा एक भाग झाली. ओळखीच्या काही नजरा आश्चर्याने वक्र झाल्या. त्याला न दिसेल अशा पद्धतीने ती त्याचं गाणं ऐकू लागली. गाण्याशी एकरूप होऊन ते भाव त्याच्या प्रत्येक शब्दात उतरले होते. तिच्या डोळ्यांतून पाणी झरू लागलं. सगळा हॉल मंत्रमुग्ध झाला होता. कार्यक्रम संपला. तिला वाटलं आता त्याची नजर तिला शोधण्यासाठी भिरभिरेल आणि मी दिसले नाही की लगेच मोबाईल काढून विचारेल...

“आज तू नव्हतीस तर मला अजिबात करमले नाही, मी आलोच! चहा ठेव मस्त.”

तिची आशाळभूत चोरटी नजर अधीरतेने त्याच्या हालचाली टिपत राहिली; पण.. कार्यक्रम संपताच त्याने पहिल्या रांगेवर एका खुर्चीकडे पाहून स्मित केले. आता मात्र तिची नजर फारच उतावीळ झाली त्या खुर्चीवरील व्यक्तीला पहाण्यासाठी, पण गर्दीतून तिला स्पष्ट दिसत नव्हते. तिच्या नेहमीच्या राखीव खुर्चीवर आज कुणी ताबा घेतला बरं? इतक्यांत तो स्टेजवरून खाली उतरला तसं त्याची मुलं त्याला बिलगली. त्याने हात पुढं केला, त्याची पत्नी हात धरून हलकेच उठली. तिच्या केसातले भरगच्च अबोलीचे गजरे पाहून तिचे हात नकळत स्वत:च्या केसांकडे गेले. ‘या वयातही किती सुंदर दिसते नाही?’ ती स्वत:शीच पुटपुटली, अगदी त्याने वर्णन केले होते त्याहूनही सुंदर! ती बघतच राहिली. चाहत्यांच्या गराड्यातून तो अलवार तिला घेऊन बाहेर पडला, गाडीत बसला आणि निघूनही गेला... तिचे हातपाय लटपटू लागले. खुर्चीचा आधार घेत ती मटकन एका खुर्चीवर बसली. पर्समधून पाण्याची बाटली काढून दोन घोट घेऊन जडशीळ पावलांनी विमनस्क अवस्थेत घरी पोहचली. तिने मोबाईलवर त्याचा नंबर डायल केला. कित्येक रिंग वाजल्या पण पलीकडून फोन उचलला गेला नाही म्हणून व्हॉट्सॲप उघडले, डी पी गायब! घाईने तिने स्टेटस पाहिला, स्टेटसही गायब! ती कळून चुकली, तिला ब्लॉक केलेय! भीतीने तिच्या हातपायातले अवसान गळाले, तिचे डोके बधिर झाल्यासारखे झाले. तिच्या नजरे पुढून ते गाणे, स्टेजवरून उतरलेला तो... अबोलीचे गजरे माळलेली ती... गर्दीतून तिच्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत तिला बाहेर नेणारा तो... गर्दीला हात उंचावत भुर्रदिशी गाडीत बसून दिसेनासा होणारा तो... सगळीच दृश्य फिरून फिरून सरकू लागली. भीतीने तिच्या घशाला कोरड पडू लागली. क्षणा क्षणाला मोबाईल बघून बघून तर अजूनच अस्वस्थता आणि भीती वाढत होती.

तिन्हीसांज झाली, तिच्याभोवतीचा अंधार वाढू लागला. तिने जड जड शरीराने दिवे लावले न सगळा भूतकाळ अंधारातून लख्ख डोळ्यासमोर आला... दहा-पंधरा चुलत सख्ख्या भावंडातील ही धाकटी खेडेगावातील एकत्र कुटुंबात वाढलेली एकुलती एक लाडकी बहीण. अभ्यासाची आवड असणारी चुणचुणीत. रांगोळी, चित्रकला, गायन स्पर्धात कायम पहिल्या तीनमध्येच. लहानपणी आसपासची नात्यातली लग्न पाहून ‘माझे पण लग्न करायचे आहे’ म्हणून हटून बसणारी ती लग्नाचे वय झाल्यावर मात्र ठामपणे सांगून मोकळी झाली, ‘मला आताच लग्न करायचे नाही, अजून शिकून स्वावलंबी व्हायचे आहे आणि त्यानंतर मा‍झ्या विचारांशी, मा‍झ्या आवडी निवडीशी एकरूप होणार्‍या, मळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेवरून चालणार्‍या व्यक्तीबरोबरच मला लग्न करायचे आहे.’ खरेतर लग्न टाळण्याचा तिचा हा नामी उपाय होता. तिला माहित होते की असा नवरा मिळणारच नाही! आणि तिच्या ध्येयाची वाट मोकळी झाली. बी.एस.सी.झाली, मग एम.एस.सी ला केमिस्ट्रीत शिवाजी विद्यापीठात प्रथम आली. स्वप्नांची परिपूर्तता करण्याची झिंग तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तोवर इकडं सख्ख्या, चुलत भावंडांची लग्ने झाली. भावजया आल्या. एकुलती एक नणंदही सगळ्यांची लाडकी झाली. पुढे पी.एच.डी. आणि विद्यापीठात नोकरी. मग तिथंच स्थाईक झाली. सोबत बाबांना घेऊन गेली. मुलीची प्रगती पाहून बाबांना खूपच अभिमान होता. स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा वर संशोधन सुरू झाले. उच्चपदस्थ, सरकारी अधिकारी, प्राध्यापक, उद्योगपती सर्व स्तरातून स्थळे आली पण तिच्या वैचारिक पातळीचे त्यात कुणीच नव्हते. दिवस पुढे जात होते. ती तिच्या नोकरीत व्यस्त. लग्न हा विषय तिला नकोच होता. तिच्या सोबतच्या तिच्या मैत्रिणींचे संसार आणि नात्यातल्या कटकटी बघितल्या की ती स्वत:स भाग्यवान समजायची. इतक्या सर्व स्थळात ‘हाच योग्य आहे’ अशी तिच्या मनाची मधुर घंटी किणकिणलीच नव्हती.

दिवस पालटत राहिले. ती नोकरीत अधिक अधिक व्यस्त होत गेली. नवनवीन जबाबदार्‍या पेलत राहिली. एके दिवशी अचानक तिचे बाबा झोपेतच तिला सोडून गेले. कामातील व्यस्ततेत हळू हळू ती दु:खातून सावरली पण तरीही का कुणास ठाऊक? हल्ली तिला आतून एकटं-एकटं, पोकळ वाटू लागलं होतं. काहीतरी निसटलेय... सुटतेय... पण पकडता येईना असे झाले होते. उदास उदास वाटू लागलं होतं. आपल्या मनातलं प्रत्येक स्पंदन ओळखणारे, मनातली आंदोलन जाणणारे, आपले हक्काचे कुणीतरी सतत जवळ असावे असे वाटू लागले होते. बऱ्याचदा उदासीचा अतिरेक व्हायचा. कधी कधी वैताग वैताग व्हायचा, तर कधी एकटेपणाची अस्वस्थता बेचैन करून टाकायची. मनाची सतत घालमेल व्हायची. तिचे तिला आश्चर्य वाटू लागले होते. आजपर्यंत आपल्याला असे कधी वाटले नव्हते. तसेही आपल्याला नात्यांच्या आपुलकीने भावजया, भावंडानी एकटेपणा कधी जाणवू दिला नव्हता की तिला कसपटाचे दु:खही! मग?...

“प्री मेनोपॉज लक्षणे आहेत ही मिस अनघा, तुमची चाळीशी आलीय.”

तिच्या डॉ.नी सांगितल्यावर तिचे तिलाच हसू आले. वयाच्या या टप्प्यावर आपल्याला काय होऊ लागलंय? की आयुष्यभर करिअर मध्ये गुंतून आपण स्वत:ला कोरडं, निरस केलेय? त्या दिवशीही ती अशीच विचार करत संध्याकाळी टीव्हीकडे नजर लावून बसली होती इतक्यांत सुषमाचा फोन आला,

“हॅलो अनघा, गाण्याच्या प्रोग्रॅमचा एक पास शिल्लक आहे चल, येतेस का?”

गाणी हा तिचा विक पॉइंट होता. एका पायावर ती तयार झाली. आवरून दोघी कार्यक्रम स्थळी गेल्या. थोड्याच वेळात गायक अमितजींच्या हिंदी गीत गायनाला सुरुवात झाली आणि सगळा हॉल मंत्रमुग्ध झाला...

“छूकर मेरे दिलसे...”
“देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये...”
“ओ साथी रे...”

आपण किशोर कुमारला ऐकतोय की अमिताभला पहातोय? असा संभ्रम श्रोत्यांच्या मनात निर्माण झाला इतकी सुरेल श्रवणीय गाणी अमितजिनी गायली. डोळ्यासमोर किशोर आणि मन:पटलावर अमिताभ उमटत होते. तिची तर तंद्रीच लागली होती. कितीतरी दिवसांत तिला काहीतरी सापडल्या सारखे वाटले होते अन् ती मंत्रमुग्ध झाली होती. एक न एक गाणं ती कानात प्राण आणून ऐकत होती. प्रत्येक गाणं तिचे कान आणि मन तृप्त तृप्त करत होतं. कितीतरी गाण्यांना ‘वन्स मोअर’ मिळाला होता.

कार्यक्रम संपला. गर्दी पांगली अन् ती स्टेजकडे गायकाचे आभार मानायला हळू हळू सरकू लागली. अजूनही ती त्या गाण्यांच्या गारुडात भारलेलीच होती. स्टेजवरची गर्दी कमी झाल्यावर काहीशी भीत भीतच गेली आणि चाचरत चाचरत धीर एकवटून म्हणाली,

“हॅलो सर... खूपच सुंदर गाणी आणि आवाजही! फक्त...”

“काय मॅडम, बोला ना?” का... ही नाही... फक्त... मै पल दो पल का शायर हुं मधील ‘क्यूँ कोई मुझको याद करे?’ च्या एका ओळीचा सूर लागला नाही बाकी खूप खूप सुंदर गायलात धन्यवाद!” धीर एकवटून तिने सांगितले अन् पटकन तिथून निघाली.

“अनघा, इतक्या मोठ्या गायकाची छोटीशी चूक तू नाही काढायला पाहिजे होतीस... तुला इकडं आणून मी चूक केली काय असे वाटतेय.”

सुषमाच्या वक्तव्याने अनघा थोडीशी खजील झाली आणि खरेच आपण चुकलो ही अपराधी पणाची बोचही डाचू लागली. बोलत बोलत त्या बाहेर आल्या, इतक्यांत...

“ओ मॅडमऽ ओ मॅडमऽ अमितजी तुम्हा दोघींना आत बोलवत आहेत...”

गर्दीतून कुणी अनोळखी माणसाने हाक दिली. दोघीही घाबरल्या आणि घाबरत माफी मागण्याच्या उद्देशाने परत स्टेज कडे गेल्या.

“सर खरंच सॉरी हं...”

तिचे बोलणं संपायच्या अगोदरच अमितजींनी दोघींनाही बसायला खुर्ची दिली आणि झक्कास, कडक वेलची युक्त चहा दिला. जुजबी गप्पांत एकमेकांची जुजबी माहितीची देवाणघेवाण झाली. तो त्याच्यासोबत तिचा गाणे संपल्यावरचा पहिला चहा! पुढच्या कार्यक्रमाचे त्याने त्या दोघींना पास दिले. पुढे कळत नकळत फोन नेबर्स दिले-घेतले गेले आणि ती त्या सुरांशी कधी एकरूप झाली ते तिलाही कळले नाही. न चुकता ती त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावू लागली, आणि न चुकता कार्यक्रम संपल्यावरचा त्याच्यासोबत झक्कास चहाही! अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही गेली, तरीही..! त्याच्या नजरेच्या टप्प्यात तिची खुर्ची असायची आणि भावोत्कट होऊन गाताना त्याची नजर तिच्याकडे जायची; आणि तीही त्याच्या नजरेला कौतुकाची नजर मिळवायची, जणू तिची न त्याची प्रत्येक भावोत्कटता एकच होती. कितीतरी भावपूर्ण गाणी तिचे भाव व्यक्त करायला तिने त्याला पाठवली होती आणि त्यानेही कितीतरी गाणी केवळ तिच्या फर्माईशीवर गायली होती, वन्स मोअरही गायले होते. त्यातलेच एक ‘कब के बिछडे’ हे होते.

तिचा हात नकळत मोबाईलकडे गेला, पुन्हा पुन्हा अकाउंट चेक केले, डीपी रिकामाच... रात्रभर तळमळत त्याच्या प्रत्येक आठवणीने ती व्याकूळ होत होती. पहाटे केव्हातरी तिचा डोळा लागला पण झोपेतही त्याचेच सर्व भास होते, त्याच्यासोबतचे बरेच प्रसंग होते.

मघापासून ‘इट्स फाईव्ह ओ क्लॉक...’ आवाज देणार्‍या मोबाईलच्या स्क्रीनला टच करून तिने कूस बदलली. नेहमीची उठण्याची वेळ असूनही डोळे जडावले होते. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. दररोजची प्रसन्न, आनंदी वाटणारी पहाट तिला अचानक उदास उदास वाटू लागली. आज रविवार, सुट्टीचा दिवस. ड्युटीवर जायची घाई नव्हती. पांघरूण अंगावर घेऊन ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण...पण काहीतरी चुकल्यासारखे, काहीतरी हरवल्यासारखे, चोरीला गेल्यासारखे होऊन तिला अस्वस्थ होऊ लागलं. काही केल्या ती साखरझोप तिच्या डोळ्यांवर येईना. जड शरीराने ती उठून खिडकीशी आली-तिची आवडती जागा होती ती. सकाळची लोभस कोवळी किरणे तिथून आत यायची अन् घर प्रसन्न वाटायचं. तो लोभस तांबूस गोळा तिला दररोज नवचैतन्य, उत्साह द्यायचा. पण आज तोही ढगांनी झाकोळला होता. थंडीचे दिवस असूनसुद्धा आकाशात ढगांची दाटी झाली होती. तिला अजूनच उदास वाटू लागलं. जागरण आणि मनाच्या अस्वस्थतेने तिला गरगरू लागलं. तिची पावलं यांत्रिकपणे किचनकडं गेली. यांत्रिकपणेच तिनं चहा पिला. दहा वर्षातला त्याच्या गाण्यानंतरचा इतक्या उशिराने घेतलेला चहा तोच होता फक्त त्याच्याशिवाय तो फिका फिका होता. आवरून तिची पाऊले घराबाहेर पडली त्याच्या आठवांच्या मागे मागे त्याला शोधण्यासाठी...

त्या विस्तीर्ण माळावर त्यांच्या नेहमीच्या भेटीच्या ठिकाणी. जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळत असे त्या त्या वेळी कितीतरी वेळ ती या एकांत ठिकाणी दोघेच भटकत रहायची. तिची पाऊले त्या सुरंगीच्या झाडाकडे गेली.

“तू या सुरंगीच्या फुलांसारखीच मोहक आहेस...” ‘तुसडी, माणूसघाणी... गर्विष्ठ’ किती न काय काय विशेषणं तिला लागली होती, आणि प्रथमच तिची मनापासून स्तुती करून कुणी तर तिला मनोमन सुखावलं होतं. तिची बोटं त्याच्या केसांमधून फिरण्यासाठी वळवळली... सुरंगीच्या त्या खरखरीत खोडावर उगीचच ती फिरत राहिली. तिथूनच जवळ असणार्‍या नेहमीच्या भग्न मंदिराकडे ती वळली. पायऱ्या चढताना पाठीमागून हाक आल्यासारखे झाले...

“अनघा... भग्न मंदिरात जाऊ नये गं...”

त्या मोकळ्या माळावर ‘अनघा... अनघा...’ कितीतरी वेळ प्रतिध्व‍नी घुमत रहायचा आणि ती मंदिरात जायचीच! तो खाली पायरीजवळ तिची अगतिक होऊन वाट पहात रहायचा. पावसाळ्यात त्या पायरीवर हिरवेगार गवत असायचे. बरेचदा खाली उभा राहून मोबाईलमध्ये तिची छबी तो टिपत रहायचा. कितीतरी वेळ तिची पाऊले अडखळून ती पडताना धावत जाऊन त्याने तिला अलगद सावरले होते आणि दोन्ही हातावर उचलून अलगद खाली घेऊन आला होता, तिनेही मग त्याच्या गळ्यातील तिच्या नाजूक हातांचा विळखा अजूनच घट्ट केला होता... आजही तिची पाऊले अडखळली... क्षणभर तो खाली उभा राहिल्याचा भास झाला... पण ती सावरली. तिथूनच पुढं असणाऱ्या त्या नेहमीच्या पडक्या विहिरीकडे तिची पाऊले आपोआप वळली. दगडी बांधकाम असलेली आखीव रेखीव त्या विहिरीच्या पायऱ्या उतरून तो सहजच जाऊन तळाशी निवांत बसायचा अन् ही काठावरूनच आत डोकवायची. तळातल्या संथ डोहात तिची प्रतिमा दिसायची. “तुझे डोळे ना या विहिरीसारखे खोल गहिरे आहेत.” तो नेहमीच म्हणायचा आणि पाण्यात हळुवार खडा टाकून पाण्यात तरंग उठवायचा. तिला मात्र खूप भीती वाटायची या विहिरीची. वरून डोकावतानाच गरगरू लागायचं. एके दिवशी तिचा हात धरून त्याने तिला खाली नेले पण निम्म्या पायऱ्यावरच तिचे पाय थरथरू लागले न त्याला गच्च पकडून तिने डोळे मिटले. आज मात्र ती बिनधास्त त्या विहिरीत उतरून त्याच तळाच्या पायरीवर बसून त्याला तिथं अनुभवत होती, शोधत होती. कितीतरी वेळ ती तशीच बसली. डोळ्यातल्या पाण्याचे थेंब विहिरीतल्या पाण्याशी एकरूप झाले. आभाळ आता अजूनच गच्च झालं होतं. विहिरीत काळोख दाटून आला. भिंतीच्या आधाराने हळुवार ती वर आली. गुराखी लांबवर गुरे चारत झाडाखाली विसावली होती. लांबून हवेत कुठून तरी गाण्याचे स्वर हेलकावत तिच्यापर्यंत आले...

“मेरे यार को मना दे...
वो प्यार फिर जगा दे... ”

ती अजूनच व्याकूळ झाली. त्या विस्तीर्ण माळरानात कितीदा तरी एकांतात ते बसले होते आणि कितीतरी गाणी त्याने मोठमोठ्याने म्हणली होती; त्यांचा प्रतिध्व‍नी असाच उमटत रहायचा. ती रस्ता तुडवत घराच्या दिशेने निघाली. एक न अनेक त्याच्या असंख्य आठवणी तिच्याभोवती फेर धरून नाचत होत्या. दूरवर जिथपर्यंत तिची नजर जात होती, नजरेत त्याच्याशिवाय काहीच नव्हतं. तिला जोर जोरात ओरडावं आणि रडावं वाटत होतं पण ती तसं करू शकत नव्हती. ‘कॉइन टाकून कॉल करून बघावा का?’ तिच्या मनात आलं. पण दुसरं मन म्हणालं, ‘नको करेल तोच स्वत: नक्की मनात आल्यावर.’

“सावळे सुंदर, रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे...”

भजनाचे स्वर जवळच्याच मंदिरातून येत होते. तिची पाऊले आपोआप वाटेवरील कृष्ण मंदिराकडे वळली. आत आल्याआल्या तिला क्षणभर शांत वाटले. कितीदा तरी त्याच्यासोबत ती इथं आली होती. मंदिराच्या पाठीमागील बगिच्यात टपटपणाऱ्या चाफ्याखाली विश्रांती घेऊन तो तिला सोडायला घरी जायचा.

“मला आता समजतेय, कृष्ण सर्व गोपीना का हवाहवासा वाटत होता?” त्याचा हात हलकेच हातात घेत एकदा ती त्याला म्हणाली होती.

“का बरं?”

“सांगू?”

“कारण तो निर्लेप, निर्मोही होता, त्याच्या जवळ त्यांना कोणत्याही काळवेळी सुरक्षित वाटत होते, त्याच्या सहवासात एक ओढ होती, हवाहवासा होता तो सहवास-इतर विवाहित, अविवाहित पुरुषांपेक्षा. मनातील दु:खाची आवर्तने थांबत होती त्याच्याजवळ गेल्यावर... जसे मला तू सोबत असल्यावर वाटते.”

“ए, तू माझ्याबरोबर लग्न केलं असतेस का रे?”

“नाही बाई, या जन्मात तरी मला माझी बायको म्हणून माझी बायकोच प्रिय आहे!”

“हे हेच तुझं असं जगा वेगळं असणं मला वेडं करून गेलंय.” म्हणत तिने त्याचे हात नकळत ओठांजवळ नेले होते.

“ताई मंदिर बंद करायची वेळ आहे उठता का?”

पुजार्‍याच्या हाकेने ती भानावर आली. जड जड पावलांनी ती घराच्या दिशेने निघाली. रस्त्यावर खाद्यपदार्थांचे वास तिला भुकेची जाणीव करून देत होते पण त्याच्याशिवाय तिला एकही घास नको होता. दरवाजा उघडून तिने दिवाणावर डोळे मिटून स्वत:ला झोकून दिले पण डोक्यातील विचारांच्या ढगांनी तिचे मन कोंदटले होते. अनेक उलट सुलट विचारांची गर्दी तिच्या मन:पटलावर थैमान घालत होती. का? का? त्याचे अचानक सोडून जाणे आपल्या जिव्हारी लागलंय? आपल्याला एकटं राहायची सवय आहेच ना? मग? आताच एकटं रहायचं का जीवावर यावं? की दहा वर्षाच्या सहवासात आपण स्वत:ला पूर्ण विसरून त्याच्या अंतरात्म्याशी इतकं एकरूप झालोय, विरघळून गेलोय की आता वेगळं करणं शक्य नाही? प्रत्येक माणूस येतो न जातोच की! आजी, आजोबा, आई, वडील सगळे हळूहळू सोडून गेलेच ना? ते आपण स्वीकारलंच ना? मग हे का नाही स्वीकारू शकत? तो सहजच आला जीवनात आणि सहजच निघूनही गेला. तो का आपल्यासारखाच भावनांच्या गर्तेत अडकून गटांगळ्या खात नाही? त्याचे स्वत:चे एक छानसे प्रेमळ कुटुंब असूनही, लाखो चाहत्यांचा फॅन असूनही त्याला माझ्यासारख्या एका साध्या सुमार सौंदर्य असलेल्या मुलीच्या प्रेमात का पडावे वाटले? का सहवासात रहावे वाटले? की तो सोबत असूनही आपल्यात विरघळलाच नव्हता? पाण्याच्या थेंबात तेलासारखा अलिप्त राहिला की त्याला आपल्या प्रेमाची तितकीशी गरज नव्हती? की आपणच इमोशनल फूल आहोत? असे काहीच नाही तर मग आपल्या कोणत्याही क्षणी तो सोबत का आला? दहा वर्षे आपली सोबत का केली? ‘का? का?’ की या नात्याच्या अनपेक्षित शेवटाने आपण एकाकी झालोय? तिचे डोळे भरून आले. तिची नजर कोपर्‍यातल्या पियानोकडे गेली. या पियानोतील ओ की ठो तिला काही येत नव्हतं पण त्याच्यासाठी तिने हा पियानो खरेदी केला होता. त्याचा सहवास जास्तीत जास्त मिळावा म्हणून. किती तल्लीन होऊन सुरेल वाजवायचा तो! भान हरपून ती ऐकतच रहायची डोळे मिटून. कितीतरी रात्री या पियानोच्या सुरेल आवाजात सुरेल, धुंद झाल्या होत्या. कितीतरी रात्री कार्यक्रमाला उशीर झाल्यावर तो तिच्याकडे थांबला होता पण ना तिने तिच्या संस्कारांची मर्यादा ओलांडली होती ना त्याने त्याच्या बायकोशी प्रतारणा केली होती. विचारांच्या तंद्रीत ती हलकेच पियानोजवळ आली. हलक्या हाताने तिने पियानोवरील कव्हर दूर केले. त्याची बोटे लीलया सांभाळणाऱ्या त्या सुरेल बटणावर तिने हळुवार बोटे फिरवली. एक नाजूकसा झंकार बाहेर पडला...

“आ जा तेरा आंचल ये प्यारसे मै भर दू, प्यारसे मै भर दू... 
खुशीया जहाँभर की तुझको नजर कर दू... तुझको नजर कर दू...”

तिच्या एका वाढदिवसाला तिच्या डोळ्यांत डोळे मिसळून गायलेलं... “छुकर मेरे मन को किया तुने क्या इशारा?” गाणं तिला आठवलं अन्... तिची बोटे अधिकच जोरात दबली गेली. होय... केवळ केवळ आपल्या जीवनातला एक रिक्त आंचल भरण्यासाठीच देवाने त्याला आपल्या जीवनात पाठवले नसेल ना?? तिची विचारचक्रे अजूनच भर भर फिरू लागली. आपल्या प्रत्येक हाकेला धावणारा तो... आपला छोट्यात छोटा अगदी बालिश हट्टसुद्धा पुरवणारा तो... सहजच एखादी गोष्ट बोलून जावी अन् तिला अनपेक्षितपणे त्याने ती पुढे करावी! एकदा सहजच ती म्हणाली होती,

“लहानपणी मला झाडावर दगड मारून गाभूळलेल्या चिंचा पाडून खायला खूप आवडायच्या.”

पुढच्याच रविवारी त्याने तिला एका पडीक निर्जन ठिकाणी चिंचेजवळ नेऊन दगड मारून मनसोक्त चिंचा पाडायला लावल्या होत्या. मुंबई, दिल्ली, राजस्थान... कितीतरी ठिकाणाहून तिच्यासाठी न चुकता त्याने गिफ्ट आणले होते... एका वाढदिवसाला दिवसभर तिच्यासोबत राहूनपण तिला शुभेच्छा न देता घरी जाऊन फोनवरून शुभेच्छा देऊन गडगडून हसणारा तो अन् भावना वेगात डोळ्यात आलेले अश्रू तिला आवरता न आल्याने रडवेल्या स्वरात ‘हुं,हुं’ म्हणणारी ती... किती किती आठवणी तिच्यासोबत! आई, वडील... कुणाचीच आठवण आपल्याला त्याच्या सहवासात आली नव्हती. इयत्ता बारावी शिकून परिस्थितीसाठी छोटी मोठी कामे करत आपली आवड जोपासण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन छोट्याश्या गावातून इथवर आलेला तो किती साधा, सरळ न मायाळू होता! बायकोचे कित्ती कौतुक! आपल्यासोबत असला काय न अजून कितीजणींशी मैत्री केली काय, तो मनाने निखळ, निरागस होता. शेवटी माणसाच्या शिक्षणावर काही नसते हेच खरे! आभाळागत रहायला यायला हवं माणसाला. विचारांच्या आवर्तनात पियानोतून आवाज येत राहिला अन् तिला हलकं हलकं वाटू लागलं. ती हलकेच खिडकीशी आली. खिडकीतल्या गुलाबाच्या रोपावर एक कळी नुक्तीच उमलू लागली होती आणि पानांवरील कोळिष्टकाच्या जाळीत अडकून एक सुंदर फुलपाखरू फडफडत होतं. ती धावतच बाहेर गेली. हळूवारपणे तिने त्याला जाळीतून सोडवले अन् अलगद तळहातावर ठेवले. क्षणभर ते पंखांची उघडझाप करत राहिले आणि अलगद उडून तिच्या खांद्यावर बसले, एक गिरकी घेऊन उंच उडाले. थंडगार वारे वाहू लागले आणि टपोऱ्या थेंबांना सुरुवात झाली. तळहात पुढे करून डोळे मिटून ती त्या थेंबाशी एकरूप झाली. ‘हा पाऊस वसुंधरेच्या हट्टासाठी थोडाच तिला भेटतो? त्याच्या मनात येईल तेव्हा भेटतो आणि तीही तो कधीही आला तर नाराज न होता त्याच्या प्रीतीत सचैल होते आणि अंत:करणात रूजवत राहते नेहमीच प्रीतीचे नाजूक कोवळे अंकुर’ ती स्वत:शीच हसली. ढग आता विरळ झाले होते. मावळतीची किरणे ढगाआडून हसत होती. तिला प्रसन्न वाटलं. असा पाऊस पडला की त्याच्यासोबत गरम गरम पालकची भजी आणि वेलची-लवंग घातलेला फक्कड चहा पिली होती. तिने भजी मागवली, फक्कड चहा पिऊन ती टेबलाशी आली. ओथेल्लो, रोमिओ, ज्युलिएट, एनिमल फार्म, मेघदूत टेबलाजवळील रॅकमधील पुस्तकांवर हळूवार हात फिरवत पुटपुटली, ‘दहा वर्षे आपण वेगळ्या जादुई दुनियेत होतो.’ मोबाईलच्या रिंगने ती भानावर आली.

“हॅलो अनघाऽ अमितजींच्या प्रोग्रामला जाऊया?”

“हो सुषमा मी आलेच!”

तिच्या आवडीची पिस्ता कलरची साडी नेसून हलकासा परफ्युम मारून ती तयार झाली. हॉल गच्च भरला होता. कार्यक्रमाला अवकाश होता. त्याला न दिसेल पण तो मात्र स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी दोघीही बसल्या. कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याने सरावाप्रमाणे तिच्या नेहमीच्या जागेवर कटाक्ष टाकला. त्याच्या बायकोने दाद दिली. तिच्या हृदयातून आरपार सुरी गेल्यासारखे क्षणभर झाले पण तिने स्वत:स सावरले.

“पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है...”
“ये कहां आ गये हम...”
“रिमझिम गिरे सावन...”
“इंतहा हो गयी...”
“लोग कहते है मै शराबी हुं...”
“मंजिले अपनी जगह है,रास्ते अपनी जगह...”

गाण्यांच्या सरीवर सरी बरसू लागल्या. तिच्या मनातले विचारांचे मळभ हळू हळू दूर झाले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात कार्यक्रम संपला. ती पटकन उठून त्याला न दिसेल अशी बाहेर आली. आता आकाश निरभ्र झाले होते. असंख्य चांदण्या निळ्या नभांगणात लुकलुकत होत्या. मन:पटलावर पुनः पुनः लकेरी उमटत होत्या..

“आ जा तेरा आंचल ये
प्यार से मै भर दू...”

दहा वर्षांत त्याने भरभरून प्रीतीचे दान दिलेला तो आंचल तिने खांद्याभोवती घट्ट लपेटला... उर्वरित आयुष्य कितीसे असणार आहे? माहीत नव्हते. राधेला सोडून कृष्ण असाच गेला, परत कधीच तिला भेटला नाही. तिला थोडा का होईना त्याचा सहवास मिळाला होता पण मिरेचे काय?? मिराला कधीच तो भेटला नाही तरी तिचे निस्सीम प्रेम, अगाध भक्ती तसूभर ही कमी झाली नव्हती. आपल्यालाही असं जगता यायला हवं... त्या काळ्या धरेसारखं, मेघांसारखं...! ती मीरा, राधा कुणीच नव्हती... ती आता कृष्ण रूप होऊन चालणार होती शेवटच्या श्वासापर्यंत... अखंड... तो परत आला आणि नाही आला तरी!

- सुचित्रा पवार, तासगाव
ता.तासगाव, जि.सांगली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या