Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

देव 'देवाघरी' धावला.. सदाबहार नायक रमेश देव

ramesh deo abhineta, ramesh deo marathi actor, ramesh deo

देव 'देवाघरी' धावला..

१९८६ सालातील गोष्ट आहे. आम्ही नुकतंच ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपटाच्या डिझाईनचं काम केलेलं होतं. रमेश देव ‘सर्जा’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत असं आमच्या कानावर आलं होतं.. ‘शेलारखिंड’ हे पुस्तक आम्ही वाचलेलं होतं. त्याच कथेवर आधारित हा चित्रपट असल्याने व शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदर असल्यामुळे या चित्रपटाची डिझाईन्स आपणच करावीत अशी आम्हाला प्रबळ इच्छा झाली..

    बाळासाहेब सरपोतदार यांचेकडून, रमेश देव यांचा मुंबईतील पत्ता घेतला व ‘सर्जा’ चित्रपटाची डिझाईन करण्याची इच्छा व्यक्त करणारं, एक आर्जवी पत्र सुंदर हस्ताक्षरात लिहिलं. पत्राच्या खाली, गडावरील दोन तोफांचं रंगीत चित्र काढलेलं होतं. पत्र पाठवलं व उत्तराची वाट पहात बसलो..

    काही महिन्यांनी ‘सर्जा’, पुण्यातील 'प्रभात' थिएटरला प्रदर्शित झाला. थिएटर डेकोरेशनमध्ये बॅनरशेजारी मोठ्या तोफेची प्रतिकृती ठेवलेली होती. आमचं रमेश देव यांच्या चित्रपटासाठी काम करण्याचं स्वप्न, अधुरच राहिलं...

    लहानपणी गणेशोत्सवात अनेक मराठी चित्रपट पाहिले. त्यातील मनात ‘घर’ करून राहिलेला चित्रपट होता.. ‘मोलकरीण’! १९६३ सालातील हा चित्रपट साने गुरुजींच्या, कथेवर आधारित होता. पटकथा संवाद व दिग्दर्शन यशवंत पेठकरांचे होते. या चित्रपटांतील सुमधुर गीतं लिहिली होती, गदिमांनी व संगीत होतं वसंत देसाई यांचं!

    आपल्या मुलाला प्रेमानं वाढवून मोठं केल्यानंतर, त्याला अधिकार व संपत्ती प्राप्त झाल्यावर तो आई-वडिलांना विसरतो. त्यांना ओळख देण्याचीही त्याला लाज वाटू लागते. या मानसिक आघाताने वडील प्राण सोडतात व आई आधारासाठी स्वत:च्याच मुलाच्या घरी, मोलकरीण होऊन राहते. एके दिवशी अळूची भाजी खाताना, त्याला आईची आठवण होते. तसं तो बोलतोही.. मात्र बायकोपुढे तो काही करू शकत नाही. नातू आजारी पडल्यावर आई ‘देव जरी मज कधी भेटला..’ गाऊन देवाला आळवणी करते. नातू आजारातून बरा होतो व मुलाला पश्चाताप होऊन तो आईची क्षमा मागतो. मुलगा, सून व नातवासह आई आनंदात राहते.

    यामध्ये मुलगा होता रमेश देव व आई सुलोचना. सूनबाई सीमा देव. सोबत इंदिरा चिटणीस, परशुराम सामंत, बर्चीबहाद्दर, शांता तांबे, राजा पंडित, इ. होते. सीमाने त्या काळातील फॅशनप्रमाणे सहा वार साडी नेसून, दोन वेण्या पुढे घेतलेल्या होत्या. ‘दैव जाणिले कुणी..’ या अप्रतिम गीतासाठी हा चित्रपट असंख्य रसिकांच्या, दीर्घकाळ स्मरणात राहिलेला आहे...

    १९५१ साली सुरू झालेली रमेश देव यांच्या चित्रपटांची कारकीर्द, साठ वर्षांहून अधिक काळ चालू राहिली. मराठी सोबत हिंदी चित्रपटांतून विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. मद्रासच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी खलनायकही रंगविले. ‘आनंद’ चित्रपटातील डॉ.कुलकर्णी हे रमेश देव व सीमा देव, दांपत्य कोण विसरेल?

    ‘आदमी सडक का’ या हिंदी चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा याने केलेली भूमिका, मराठीत ‘दोस्त असावा तर असा’ या चित्रपटात रमेश देवने साकारलेली होती.

    या ‘मेड फॉर इच आदर’ जोडीचे अनेक मराठी चित्रपट पुन्हा पुन्हा पहावेत, असेच सुंदर आहेत. लग्नाच्या पन्नास वर्षांनंतर त्यांच्या मुलांनी, पुन्हा त्यांच्या ‘लग्नसोहळ्याचं’ आयोजन केलेलं होतं.

    चित्रपटांच्या पुरस्कार सोहळ्याला, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रमेश देव आवर्जून हजेरी लावायचे. गेल्या वर्षी समजलं होतं की, सीमा देव यांची स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे.. त्यांचीच काळजी वाटत असताना, तीन दिवसांपूर्वीच ९३ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर अचानक हृदय विकाराच्या झटक्याने, देव ‘देवाघरी’ गेले... आणि मन सुन्न झालं..

    देव कधीही जात नाहीत, ते अजूनही आपल्यातच आहेत.. फक्त सूर छेडले की, त्यांच्या असंख्य गीतांतून ते पुन्हा पुन्हा उमटत राहणार आहेत..

मराठीतील सदाबहार नायक, रमेश देव यांना विनम्र श्रध्दांजली!!!

- सुरेश नावडकर, पुणे
मो.नं. ९७३००३४२८४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या