स्वसुखाच्या शोधात
माणसाची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची भूक असते ती ‘मनाची भूक’. सुख-दु:ख, समाधान अतृप्ती, शांती-अस्वस्थता, आनंद-वेदना अशा सर्व भावभावना मनातून जन्म घेतात. पोटाची भूक भागली की निदान काहीवेळ तरी माणूस निश्चिंत होतो. मात्र मनाच्या भुकेला निश्चिंती माहीत नसते. मनाची भूक माणसाला सतत भरकटत ठेवते. नानाविध आशा-अपेक्षांच्या ओझ्याने मानव बध्द होतो आहे. एखाद्या सुखद गोष्टीचा आनंद घेत असताना दुसरीकडे कुठली तरी सल त्याचं मन कुरतडत रहाते.
सुखाच्या शोधात मनुष्य आयुष्यभर धावत रहातो. या सुखाच्या शोधात अधिकतर सोसावे लागतात ते अनुभवाचे असह्य चटके. या चटक्यातून माणूस जेव्हा तावूनसुलाखून निघतो तेव्हा “सुख-दु:ख समानत्व” हे तत्व त्याच्यात रूजलेला असतं.
खरं तर माणसाला गरज असते ती मानसिक सौख्याची, मानसिक स्वास्थ्याची, आपल्यांच्या आपुलकीची, पाठबळीची, सदैव बरोबर रहाण्याच्या खात्रीची, “माझे अखेरपर्यंत ‘माझेच’ राहतील” या निश्चिंतीची. पण तो या आत्मीय सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तो भौतिक गोष्टींमधून. शारीरिक आणि मानसिक सुखाची जेव्हा गल्लत होते, तेव्हा माणूस गलितगात्र होतो. विचारातला नेमकेपणा हरवला की जगण्याची दृष्टी भरकटते. यावर उपाय म्हणजे “आत्मबल, आत्मशोध आणि आत्मशुध्दी.”
सुखाची व्याख्या ज्याची त्याने शोधावी लागते. आत्मबल येतं ते स्वावलंबनाने, आत्मशोध घ्यायचा तो विवेकाने आणि आत्मशुध्दी होते ती शुद्ध विचाराने, सेवाभावी वृत्तीने. चला तर मग डोकावू या अंतर्यामी “स्वसुखाच्या शोधात...”
- विजया पाटील, कराड
0 टिप्पण्या