उमेद
श्रीकांतचा आज तेराव्याचा विधी आटोपला आणि सगळे नातेवाईक एक एक करीत निघाले. “धीर धर, काळजी घे स्वत:ची व मुलांची, होणार्या गोष्टी टळत नाहीत. परमेश्वराच्या इच्छेपुढे आपले काय चालणार इत्यादी, इत्यादी...” सगळी कोरडी माया, मानभावीपणा नुसता. मदतीचा हात मात्र कोणीच पुढे केला नाही. माझी तशी अपेक्षाही नव्हती. माझ्यावर दु:खाचा पहाड कोसळलाय, सामोरं मला जायला हवं. मलाच यातून हिंमतीनं, नव्या उमेदीनं बाहेर पडायला हवं. “संकटे, वादळे जीवनात येतच राहतात. पण बेटा सुनीता लक्षात घे, वादळाला घर नसतं, क्षणात येतात तशी निघूनही जातात. कधी तर होत्याचं नव्हतंही करून जातात. पण हीच वादळे अनुभवाने तुम्हाला समृद्ध करून जातात, आत्मिक बळ देतात, संघर्षाची शक्ती देतात, चहूबाजूने अंध:कार असताना प्रकाश किरण शोधण्याची हिंमत देतात”. आईचे शब्द जणू पुन्हा माझ्या कानी पडले. मी क्षणभर बावरले, आजूबाजूस पाहिले, पण लगेच सावरले. तंद्रींतून बाहेर आले.
“आई, काय झाले?” माझी साक्षी माझ्या कुशीत शिरतच बोलली.
“काही नाही बेटा.”
“मग रडतेस काय? बाबा पुन्हा कधीच येणार नाहीत काय ? का आम्हाला सोडून गेले ? आमचं काही चुकलं का? का रागवलेत आमच्यावर ? मी आणि दादा तर चांगला अभ्यास करत होतो. नेहमी पहिला नंबर येतो आमचा.”
“नाही बेटा, तुमच्यावर रागावून नाही गेलेत बाबा.”
“मग का गेलेत बाबा..”
“बाळा ईश्वराने बोलावलं म्हणून जावं लागलं.”
“का बोलावलं देवानं बाबांना..”
“बेटा , जे सगळ्यांना आवडतात ते देवालाही आवडतात”.
“मग भेटीला बोलवावं, असं घेऊन का जावं, थांब मी देवाला फोन लावते व चांगली भांडते त्याच्याशी, पण फोन लावण्यापेक्षा मला पत्ता दे त्याचा, मी जाते त्याच्याकडे आणि बाबांना घेऊन येते.” मी साक्षीला हृदयाशी घट्ट कवटाळले. “असं बोलू नये सोनी, माझी लाडकी, आई आहे ना तुझ्याजवळ, आणि बाबाही असतीलच आपल्या आसपास, तुम्ही फक्त चांगला अभ्यास करा, बाबांची स्वप्नं पूर्ण करा, त्यांनाही आनंद होईल. देवाच्या घरी असले तरी तुमच्याकडे लक्ष राहणार आहे त्यांचं. त्यांचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहतील माझ्या पाखरांनो. आता रडायचं नाही. आईचं ऐकायचं न तुला, मग नाही रडायचं.” साक्षीनं उत्तरादाखल मान हलवली पण हुंदक्यांनी तिचा ऊर अजूनही धपापत होता. मी तिला हळुवारपणे थोपटत शांत केलं. मी साक्षीला तर शांत केलं, पण स्वत:ला कसं शांत करू?. श्रीकांतच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही हे मला ठाऊक होतं, पण मुलांसाठी स्वतःला सावरायला हवं मला. हिंमत धरलीच पाहिजे. मी स्वत:चीच समजूत घातली.
श्रीकांतची प्रॉव्हीडंट फंड, विम्याची काही रक्कम मिळणार होती पण ती किती दिवस पुरणार. वाहत्या नदीचं पाणीसुद्धा पुरत नाही, त्यासाठी पावसाळे व्हावे लागतात, तेव्हाच जलस्त्रोत टिकून राहतो. मग या रकमेवर घरखर्च, मुलांचं शिक्षण, आणि अडीनडीला बचत कशी राहणार होती. मलाच उत्पन्नाचं साधन शोधावं लागणार होतं. मी नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. माहेरी गरीब परिस्थिती होती, पण वडिलांनी शिक्षणाला आडकाठी घेतली नाही, पण पैशांची अडचण राहायची. मग मी लहान मुलांच्या ट्यूशन्स घ्यायची, त्यामुळे माझ्या शिक्षण खर्चाला हातभार लागायचा. आई शिवणकाम करायची, मग मी पण फॉल पिकोला मदत करायची. उन्हाळ्यात आई ऑर्डरीप्रमाणे हळद, तिखट, मसाले, वाळवणाचे पदार्थ बनवून द्यायची. त्यामुळे घरात गरीबी असली तरी कष्टाची लक्ष्मी प्रसन्न राहायची. कुटुंबाला सुखशांती, समाधान द्यायची. आमची ही उमेदच आम्हाला आनंद द्यायची.
अशा सुसंस्कारी, हरहुन्नरी कुटुंबात वाढलेली मी. कष्ट करण्याची तयारी होतीच माझी. पण बेरोजगारीचे चटके मला बसू लागले. माझ्याजवळ शिक्षण होतं, पण पैसा नव्हता की कोणाचा वशिला नव्हता. काय करावं अशा विचारांच्या गर्तेत असतानाच वीज चमकावी तसा विचार मनात चमकला. मी घरातच कोचिंग क्लास का सुरू करू नये. शिकवण्याचा अनुभव होताच मला, शिवाय मी घरातच राहिल्याने मुलांकडे दुर्लक्ष होणार नव्हतं आणि मी त्यांचा अभ्यासही घेऊ शकणार होते. सुरुवातीला चार ट्यूशन्स मिळाल्या. मग माझं शिकवणं आवडू लागल्याने हळूहळू माझ्या शिकवणी वर्गातील विद्यार्थी संख्या वाढू लागली. माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांच्या मधील भिंत पाडून मी एक हॉल बनवला व त्यात क्लासला आवश्यक सामग्री, बसायला बेंच, टेबल खुर्ची, खडू, फळा सुसज्ज केला. मुलांची संख्या वाढली तशी दुसरा हॉल बांधला. मदतीसाठी दोन शिक्षिकाही नेमल्या.
माझी उमेद माझी प्रेरणा स्त्रोत बनली होती. माझ्या मुलांची दोघांची उच्च शिक्षणे झाली होती. माझा मुलगा सुजय इंजिनियर होऊन अमेरिकेत ग्रीन कार्ड होल्डर होता. सुलक्षणी सून मिळाली होती. दोन नातवंडे होती. माझी साक्षी शहरातील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ होती.
“आई, खूप केलेस तू. आता आराम कर.” मुले म्हणायची. पण मी त्यांना सांगितले, “जोपर्यंत शक्य आहे तोवर मला काम करू देत, उगाच घरात बसून शारीरिक कुरबुरी सुरू होतील, माझे हातपाय आखडतील. ज्या दिवशी माझेकडून काम होणार नाही तेव्हा तुम्ही आहातच बाळांनो.”
“Yes grandma, as you wish.” माझा नातू बोलला.
“होय आई, तू प्रेरणास्त्रोत आहे आमची. तुझ्याठायी असलेल्या उमेदीनेच तू संकटांवर मात केलीस, आम्हाला घडवलंस, सुसंस्कारी केलंस, व तीच उमेद आमच्यातही ठासून भरलीस.”
“मी तर केलं बाळांनो तुमचं, पण माझ्या पाठीशी तुमचे बाबा होते.” सांजवातीची वेळ झाली होती. सुनेने देव्हारा, तुळशी, व श्रीकांतच्या फोटोसमोर दिवे लावले. सगळ्या मुलांनी त्यांना नमस्कार केला.
“बघताय ना हो, घराचं भरलं गोकुळ झालंय. आशीर्वाद द्या मुलांना.” नकळत दोन गरम अश्रू केव्हा गालावरून ओघळले मला कळलेही नाही...
- डॉ.शैलजा करोडे
नेरूळ, नवी मुंबई
0 टिप्पण्या