Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

कंदील | मराठी लेख | सुचित्रा पवार

kandil, kandilache varnan, ratricha kandil, kandhil

कंदील

    कंदील म्हणलं डोळ्यासमोर येतात ते कंदिलाचे प्रकाशमान दिवस. चाळीस वर्षांपूर्वी घरोघरी अंधार पळवून उजेड करण्यासाठी लोक सर्रास रॉकेलची चिमणी किंवा कंदील वापरत. त्रिकोणी आकार असलेली सुतळीची, सुताची किंवा अगदीच चिंधीची वात असलेल्या चिमण्या रात्री घरभर प्रकाश द्यायच्या. त्याही पूर्वी कुणाकडे गोलाकार पितळी चिमण्या असायच्या त्या गोडे तेलावर चालत कदाचित रॉकेलचा शोध तेव्हा लागला नसावा. (चिमणी हे गरिबीचे प्रतिनिधित्व करायची. चिमणी बकबक धूरही फेकायची त्यामुळं रात्रभर नाका तोंडात तिचा काळा विषारी धूर जायचा. कंदीलाची ज्योत मंद जळायची आणि कंदिलाच्या वरच्या बाजूस काच बसवण्याच्या गोलाकार पट्टीस धूर जाण्यासाठी गोल छिद्रे असायची.) त्यामुळं तर अशा या चिमणीच्या काळातच कंदिलही असायचा.

    दोन उभट पत्र्याच्या पट्ट्यांना वर धरायला तारेची कडी, या पट्ट्यांना वर एक छोटा गोलाकार झाकणासारखा भाग असायचा त्याला एक छोटी गोलाकार कडी बसवलेली असायची जिचा उपयोग कंदिलाची काच काढण्यासाठी व्हायचा. खालच्या बाजूस जोडणारा गोलाकार डब्यासारखा रॉकेल भरायला तळ (छोटीशी टाकीच) असायचा. त्यालाच वात वर-खाली करता येणारा पुढे गोल असणारा तारेचा खटका असायचा. उभट पट्टीला उजव्या बाजूला खाचेत एक खटका बसवलेला असायचा तो खटका खाली दाबून वरच्या झाकणासारख्या भागाची कडी वर ओढली की काच बसवलेला तारेचा सांगाडा सैल व्हायचा. तो एका बाजूला व्हायचा मग काच बाजूला काढता यायची. काच सोडून सर्व भाग लाल, हिरव्या किंवा गडद काळ्या रंगाने रंगवलेला असायचा. त्यामध्ये प्रकाशमान काच अतिशय आकर्षक दिसायची.

    संध्याकाळ व्हायच्या अगोदर आठवणीने खुंटीला टांगलेले किंवा चुलीच्या आधार भिंतीवर ठेवलेले कंदील काढून खाली घ्यायचे, खटका दाबून एका हातात वर निमुळती व खाली डेरेदार गोल काच काढून घ्यायची चुलीतली थंड मऊ राख घेऊन कागदाने आतली काजळी स्वच्छ पुसून घ्यायची. मग किंचित ओल्या मऊ कपड्याने आतून, वरून चकचकीत पुसायची. (ओगल्याचे कंदील काच त्यावेळेस प्रसिद्ध होते. काचेवर एक छोटा चौकोनी ठिपका ही त्यांची काच ओळखण्याची खूण होती.) मग नाळके घेऊन बाटलीने कंदिलात पांढरे रॉकेल ओतायचे, अगदी तुडुंब पण नाही कारण कंदील भडकायची शक्यता असायची. हवा खेळती राहील इतकी जागा ठेवायची. टोपण लावून टाकी बंद करायची आणि काडी पेटवून कंदिलाची वात पेटवायची. मग तो खुंटीला अडकवून ठेवायचा. रात्री झोपताना कंदिलाची वात बारीक करायची अथवा विझवायची. कंदील साफ करायचे काम नित्याचे असायचे. दिव्याच्या अवसेला दिव्याबरोबर कंदिलांचीही पूजा व्हायची.

    असा हा कंदील रात्रीच्या काळोखात प्रकाश द्यायचा. वादळी वारा असो की धुवांधार पाऊस! चिमणीसारखे कंदिल विझायची भीती नसायची, म्हणूनच शेतावर जाताना हातात कंदील घेतला की पाया पुरता उजेड पडायचा रस्ता नीट दिसायचा आणि वाटेत आलेलं एखादं लांबड, विंचू काटाही! पीक राखणीला, खळ्यात पीक पडल्यावर कंदिलाची सोबत असायची. शेतातल्या वस्तीसाठी तर कंदील लाख मोलाचा.

    पूर्वी लोक पायी प्रवास करायचे कुणी बैलगाडीने. हातात कंदील धरून प्रवासी वाट चालायचे. बैलगाडी चालवताना गाडीवानही शेजारी कंदील अडकवायचा. बाहेर धो धो पाऊस पडताना कांबळी पांघरून सर्वांनी कंदिलाभोवती कोंडाळे करून अभ्यास करण्याची मजा औरच! कांबळीच्या ऊबीने आणि पावसाच्या तालावर कुणीतरी मधेच मान खाली टाकून बसलेल्या जागेवरच लुडकायचे.

    आज खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर वीज पोहचली, शहरात तर चोवीस तास वीज असते, दिवा, कंदील अडगळीत गेले. कंदिलाच्या काचेचे कारखाने बंद पडले. आता तर सरकारने रॉकेलच बंद केलंय, पण अजूनही दुर्गम भागात, आडवळणी खेड्यात चुली आहेत. शंभर टक्के लोक गॅस वापरत नाहीत. पावसाने चिंब झालेल्या जळणावर रॉकेल टाकल्याशिवाय चूल पेटत नाही. अजूनही काही भागात पूर्ण वेळ वीज नसते. बऱ्याचदा खेडी अंधारात असतात, तिथं रॉकेलची चिमणी लावावी लागतेच. रॉकेलविना तिथं काय स्थिती असेल हे त्या चूल पेटवणाऱ्या माऊलीलाच ठाऊक! असो, फिरून कंदील येतील शो पीस म्हणून कुठे कुठे तर इलेक्ट्रिक कंदील आहेत. त्यातच अजून नावीन्य पूर्ण प्रकार येतील.. कंदिलाला चांगले दिवस आले असेच मग म्हणू. पण तूर्तास आपल्या परीने आपण इतरांना प्रकाश देत रहाण्याचा कंदिलाचा गुण आत्मसात करून आपल्या परीने आपण इतरांना आनंदरुपी प्रकाश देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

- सुचित्रा पवार, तासगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या