
कशास त्याची वाट बघावी ?
वृत्त- वनहरिणी (८+८+८+८=३२)
दिले सुखाचे सुवर्ण क्षण का? रुतती आता होउन आठव
कशास त्याची वाट बघावी? जे घडणे आहेच असंभव.
कधीच नव्हत्या ऊंच अपेक्षा, नकोत तारे आकाशीचे
ह्रदयी त्याच्या मागितली मी, थोडी जागा करून आर्जव.
कधी न रमले स्वप्नांमध्ये, झगडत सारे जीवन गेले
खुशीत आहे मी या जगती, भान ठेउनी सदैव वास्तव.
दया नको मजला कोणाची, मला निजूद्या रस्त्यावरती
नभांगणाचा मस्त चांदवा, खरे खरे ते माझे वैभव.
तिला न कळले बाळांना का अडगळ आता आई झाली?
देवा आधी मला वंदुनी, कशास करता माझा गौरव.
जन्मा आधी गळा घोटला, प्रश्न करी ती भगवंताला
आरंभाला शेवटचा का राग छेडला विरही भैरव?
नळास पाणी येते जाते, परावलंबी झाले जीवन
कुठे हरवले गावामधले ओढे, विहिरी आणिक बारव?
निबंध त्यांनी कसा लिहावा? बालपणीच्या आठवणींचा
धडपड सारी खळगी भरण्या, हरवुन गेले ज्यांचे शैशव.
कुरापतीचा देश नशीबी, पश्चिम सीमेवरचे दुखणे
सदैव झगडा दोघांमध्ये, कधी न जाई अडवा विस्तव.
नकाब इतका बेमालुम की सताड उघड्या डोळ्यांनाही
कठीण आहे पारख करणे, समोरचे कौरव की पांडव.
- निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.नं.- ९८९०७ ९९०२३
0 टिप्पण्या