Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

लळा | मराठी ग्रामीण कथा | दीपक पवार

Lala, Dipak Pawar Marathi Katha

लळा...

    संध्याकाळचे पाच वाजून गेले तरी ऊन चांगलंच जाणवत होतं. मे महिन्यात संध्याकाळचे सात वाजेपर्यंत तरी अंधार होत नाही. आमचं खोपटीत लाकडं भरण्याचं काम सुरू होतं. बाबा लाकडं रचून ठेवत होते, मी आणून देत होतो. बघता बघता अंधारून आलं. पाऊस पडण्याची चिन्हं दिसू लागली, आई वाळत टाकलेले कपडे काढायला धावली, आम्ही भरभर लाकडं खोपटीत टाकू लागलो. सगळ्यांची धांदल उडाली. लहान मुलं अंगणात उड्या मारत ‘येरे येरे पावसा’ गाणं म्हणू लागली. आणि बघता बघता जोराचं वादळ सुरू झालं. सगळी लहान मुलं आंब्याखाली धावली. त्यांना सांभाळणाऱ्या आज्यांची धांदल उडाली. त्यांच्या हाताला पकडून घरी आणेपर्यंत पावसाचे थेंब पाडावेत तसे झाडावरून आंबे पडू लागले. मुलं हात सोडून आंबे जमवू लागली. त्यांना घरी आणायचं विसरून म्हाताऱ्या सुद्धा आंबे जमवू लागल्या. मुलांना घरी आणायचं सोडून म्हाताऱ्या, आंबे जमवत बसल्या हे पाहून सुनांचा पारा चढला, त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला, “ह्या म्हाताऱ्यांना पण कळत नाय का? पोरांना घरी घेऊन यायचं, एखादी फांद तुटली-बिटली तर केव्हढ्याला पडलं!” सुनांची किरकिर सुरू झाल्यावर म्हातार्‍यांनी पोरांचे हात पकडून त्यांना ओढत ओढत घरी घेऊन जाऊ लागल्या. दहा-पंधरा मिनिटांनी वादळ शांत होऊन पावसाची सर बरसून गेली. सर्वत्र मातीचा गंध दाटून आला

    आता मे महिना संपत आलेला. गावी आलेले चाकरमनी मुंबईला जाण्याची तयारी करू लागले. कुणी आंबे काढून आणत होतं. कुणी करवंदाच्या जाळ्यावरून करवंद, मला सुद्धा मुंबईला जायचं होतं पण, अजून गावाशी असणार भावनिक नातं तुटलं नव्हतं. आम्ही गाव सोडून मुंबईत आलेली सगळी मित्र मंडळी जोपर्यंत घरातून पिटाळून लावत नाहीत, तोपर्यंत मुंबईला जायचो नाही. आम्हाला विचारलं जायचं, “अरे, मुंबईला कधी जाताय?” आमचं ठरलेलं उत्तर असायचं, “पहिला पाऊस झाला की दोन दिवसांनी”. मग का? म्हणून कुणी विचारायचं नाही. कारण सगळ्यांना माहीत असायचं, पहिल्या पावसाच्या रात्री खेकडे पकडून आणल्याशिवाय पोरं मुंबईला जाणार नाहीत.

    पहिल्या पावसाची आम्ही चातकासारखी आतुरतेनं वाट पाहायचो. जोराचा पाऊस पडून पऱ्याला पूर आला की आम्ही मशाल किंवा टॉर्च घेऊन रात्री खेकडे पकडायला जायचो. आम्हाला खेकडे खायला आवडायचे अशातला भाग नव्हता. एक वेगळंच भारलेपण असायचं. रात्रीचा भयाण अंधार, धो-धो करत वाहणार्‍या पऱ्याचा आवाज. सो सो करत झाडांना गदगदा हलवणारा वारा. त्या काळोखात फक्त निसर्गाचं अस्तित्व जाणवायचं. त्याच्या सोबतीला कोसळणाऱ्या पावसानं चिंब भिजलेलो आम्ही. पहिला पाऊस पडला आणि आम्ही रात्री पऱ्यावर गेलो नाही असं कधीच झालं नव्हतं. त्यामुळे पहिला पाऊस पडण्यापूर्वी गाव सोडायला जि‍वावर यायचं. शिवाय अजून बरीच कामं शिल्लक होती. मांडव मोडायचा होता, खोपटीत लाकडं भरायची, घराचे सरकलेले कोणे व्यवस्थित लावायचे, आणि घरी असणारी गाय घेऊन जायला नातेवाईक येणार होते. बाबांची तब्बेत सारखी बिघडत असल्यानं, “गाय देऊन टाकायची” म्हणून आईनं तगादा लावलेला. बाबा नको नको म्हणत होते, पण आई ऐकत नव्हती. बाबा आजारी असले म्हणजे गाय चरवायला आईला घेऊन जावी लागायची. तसेच कुणाकडं पाव्हणं जाता येत नव्हतं. शेवटी एकदाचे बाबा तयार झाले. पण जी माणसं गाय घेऊन जायला येणार होती, ती पेरणी झाल्यावर, त्यामुळे तोपर्यंत मला गावीच थांबावं लागणार होतं.

    भरभर दिवस उलटून गेले. जून सुरू झाला आणि पावसानं जोर पकडला. रस्त्यानं चालताना लाल चामटे दिसू लागले. रात्री ओरडून ओरडून बेडकांचा घसा बसू लागला. जमिनीतून कोंबानी डोकं वर काढलं आणि बघता बघता जिकडे तिकडे हिरवळ दाटून आली. परे ओसंडून वाहू लागले. शेतकऱ्याची नांगरणी सुरू झाली, आणि एके दिवशी गाय घेऊन जाण्यासाठी माणसं आली. मी नुकतंच तिला चरवून आणलं होतं. आल्याआल्याच त्यांच्यातील एकजण म्हणाला, “आम्ही आता बसत नाय, नायतर घरी जायपर्यंत उशीर होईल.” आईनं त्यांना पाणी दिलं, गाय, वासराला भाकर भरवली. त्यांच्यातील एकानं आपल्या जवळची एक रस्सी गायीला आणि एक वासराला बांधली. आणि त्यांना घेऊन जाऊ लागले, पण गाय जागची हलत नव्हती. जणू काही तिलासुद्धा कळून आलेलं, ही माणसं आपल्याला घेऊन जाण्यासाठी आलेली आहेत. एकानं रस्सी पकडून दोघं पाठून ढकलू लागले पण काही केल्या ती एक पाऊल सुद्धा पुढं टाकत नव्हती. जर आम्ही तिथं नसतो तर त्यांनी काठीचा वापर केला असता, पण आमच्या समोर ते तिला मारू शकत नव्हते, कारण आम्ही तिला विकत दिली नव्हती. फक्त तिला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे एवढीच आमची अट होती. शेवटी त्यांच्यातील म्हातारा माणूस म्हणाला, “वासराला पुढं घ्या, बघू या पाठून येते का?” त्याप्रमाणे एकजण वासराला घेऊन पुढं झाला, वासराला घेऊन जात असलेलं पाहून, गाय मुकाट्यानं वासरा पाठोपाठ जाऊ लागली. ती अंगणातून बाहेर पडली आणि मला रडायलाच आलं, पण मी कसं तरी स्वतःला सावरलं, बाबा पण उदास दिसत होते. त्याचा या गुरांवर भारी जीव. कधी अंगणात बसले असताना ती चरून आली की त्यांच्याजवळ जाऊन चाटू लागायची. मग बाबा म्हणायचे, “काय मस्का लावते काय?” आणि तिच्या मानेवरून हात फिरवू लागायचे.

    तो संपूर्ण दिवस खूप उदासवाणा गेला. आता मी मुंबईला जायला मोकळा होतो, पण पावसानं चांगलाच जोर पकडला. पऱ्याना पूर आला. शेतात ओहळात बघावं तिकडं पाणीच पाणी, शेतकऱ्यांना कामं करणं कठीण झालेलं. नांगराला बैल चालत नव्हते, घोंगडी इरली असून सुद्धा माणूस चिंब भिजून थंडी भरून येत होती. तीन-चार दिवस न थकता कोसळणाऱ्या पावसानं विश्रांती घेतली, आणि दुसऱ्याच दिवशी तीच माणसं पुन्हा येऊन,
“इकडे गाय आली का?” म्हणून विचारू लागली.
“गाय तर तुम्ही घेऊन गेलात, आमच्याकडं कशी येईल?” बाबा म्हणाले. तसा तो म्हातारा माणूस सांगू लागला,
“ज्या दिवशी तिला नेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी गुराख्याची नजर चुकवून ती सटकली, आम्ही आजूबाजूला शोधाशोध केली, पण सापडली नाय, म्हणून तुमच्याकडं चौकशीला आलो.”
“आणि वासरू?” बाबांनी विचारलं.
“तर, त्याला पण संग नेलंय.” तो माणूस म्हणाला.
“तीन-चार दिवस जोराचा पाऊस झाला होता. चुकून एखाद्या पऱ्यात उतरून वाहून गेली असली तर?” ती माणसं निघून गेल्यावर बाबा मला म्हणाले.
“चल जरा बाजूच्या गावातून चौकशी करून येऊ.” कपडे बदलून आम्ही जायला निघालो. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडत होतो. इतके दिवस पाऊस असल्यानं घराबाहेर पडू नयेसं वाटत होतं. तीन-चार दिवस आराम करून शेतकरी पुन्हा कामाला लागले होते. जमीन भुसभुशीत झाल्यानं बैलांना नांगर ओढायला त्रास होत नव्हता. झऱ्यांनी जोर धरल्यानं पऱ्याच पाणी वाढलं होतं. आम्ही साकवावरून पऱ्या ओलांडून कातळावर आलो. कातळ एकदम स्वच्छ धुतल्यासारखा वाटत होता. गुराखी गुरं गोठ्यात आणण्याची तयारी करत होते. काही मुलं शेताच्या बांधाचे दगड उलटून खेकडे शोधात होती. मधूनच एखादी पावसाची सर बरसून जात होती. चालत चालत आम्ही बाजूच्या गावात येऊन पोहचलो. रस्त्यालगत असणाऱ्या वाड्यामधून चौकशी केली. पण कुणीच वाट चुकलेली गाय पाहिली नव्हती. रस्त्यालगतच्या सगळ्या वाड्या पालथ्या घातल्या, पण गाय सापडली नाही. कुणाला काही कळलं तर निरोप पाठवा सांगून शेवटी घरी परतलो. घरी येईपर्यंत दुपार उलटून गेली. दुसर्‍या दिवशी पुढच्या गावात जायचं होतं. सकाळी लवकर उठलो, पण रात्रीपासून पावसानं पुन्हा जोर पकडला. एस.टी. स्टॅण्डवर येईपर्यंत आम्ही भिजून चिंब झालो. कामाचे दिवस असल्यानं स्टॅन्डवर गर्दी नव्हती. दोन-तीन माणसं कुठंतरी निघाली होती, त्यांना सुद्धा गाय हरवली असून काही कळलं, तर निरोप पाठवा म्हणून सांगितलं. थोड्याच वेळात एस.टी. आली, आम्ही एस.टी. त चढलो आणि पंधरा मिनिटात पुढच्या गावी जाऊन उतरलो. तिथून पायीपायी चौकशी करत हिंडलो पण काही उपयोग झाला नाही. दुपारपर्यंत शोधाशोध करून दुपारच्या एसटीनं घरी परतलो. गाय हरवून आठ-दहा दिवस उलटून गेले. सापडेल याची शाश्वती नव्हती. आणि एके दिवशी गावातील एकजण निरोप घेऊन आला. “बाजूच्या गावातील एका माणसानं रस्ता चुकलेली गाय बांधून ठेवली आहे. ती गाय तुमचीच आहे का? जाऊन बघून या.” सकाळची एसटी निघून गेली होती. पाच-सहा किलोमीटर पायीच जावं लागणार होत. रवीला “बरोबर येतो का?” विचारलं. तो तयार झाला. सोबत कुणी असलं म्हणजे रस्ता भरभर संपतो, चालायचा कंटाळा येत नाही. रहदारी कमी झाल्यामुळं वाटेवर बऱ्यापैकी गवत वाढलं होत. पायवाट संपवून मुख्य रस्त्यावर आलो. रस्त्यालगतच्या झाडावर बसलेला धुळीचा राप धुऊन जाऊन पानांचा हिरवारंग चांगलाच लकाकत होता. गावाच्या पश्चिमेला असणार्‍या डोंगरावरून वाहणारे ओहळ डोंगराच्या सौंदर्यात भर घालत होते. एखाद्या लहान मुलानं आईच्या कुशीत शिरण्यासाठी दुडूदुडू धावत सुटावं तसं, ते पाणी नदीला भेटण्यासाठी धावत सुटलं होतं. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चोंढ्यातून गुरं हिरवा चारा खाण्यात दंग होती. चालता चालता आमच्या गप्पा सुरू होत्या. रवी म्हणाला, “गाय सारखी सारखी घरी यायला बघत असणार, त्या शिवाय तो माणूस निरोप पाठवणार नाय?” त्याचं म्हणत मला पटत होतं, कारण त्या गावातून सुद्धा आम्ही शोधून आलो होतो. बहुतेक त्यानं गाय गुरांमध्ये रमते का पाहिलं पण तिला आमच्या घराची ओढ लागलेली पाहून त्यानं निरोप पाठवला असणार. गावात पोहचायला आम्हाला तास-दीड तास लागला. आम्ही चौकशी करत त्या माणसाचं घर शोधून काढलं. चार पडव्यांचं भलं मोठं कौलारू घर, घराच्या खालच्या बाजूला गुरांसाठी कौलारू वाडा. आम्ही अंगणात उभे राहून आवाज दिला. तसा दहा-बारा वर्षाचा मुलगा बाहेर आला, त्याच्या पाठोपाठ एक म्हातारी. आम्ही कुठून आणि कशासाठी आलो ते म्हातारीला सांगितलं. तसं म्हातारीनं मुलाला आपल्या बापाला बोलावून आणण्यासाठी पिटाळलं. थोड्या वेळानं चिखलाने बरबटलेला एका माणूस मुलाबरोबर आला. तो त्या म्हातारीचा मुलगा होता. म्हातारीनं आम्ही कशासाठी आलो आहोत सांगितलं तसा तो माणूस म्हणाला,
“अहो, लोकांच्या पेरण्या झालेल्या, शेतात रोप उगवलं, आणि तुम्ही गायीला उनाड कशी सोडली?”घडलेली सगळी हकीकत आम्ही त्याला सांगितली. तसा तो समजूतदारपणे म्हणाला,
“ठीक हाय, पण इतके दिवस गाय सांभाळली त्याचं काहीतरी द्यावं लागल.”
“तुम्हीच सांगा काय द्यायचं ते,” बाबा म्हणाले.
“काय ते समजून द्या.” बाबांनी शंभर रुपये काढून त्याला दिले. त्यानं शंभराची नोट म्हातारीकडं दिली, आणि आम्हाला घेऊन वाड्याच्या दिशेने निघाला. आम्ही वाड्यात शिरताच गाय आम्हाला पाहून हंबरली. बाबा गायीजवळ गेले, पाठीवर थाप मारून तिच्या मानेवरून हलकेच हात फिरवू लागले.
“गुरांना तुमच्या घराचा लळा हाय, नायतर गुरु परत येणार नाय,” तो माणूस म्हणाला. बाबा फक्त हसले. बरोबर नेलेली रस्सी गाय आणि वासराला बांधली. दावी सोडताच ती वाड्यातून बाहेर पडली. आमच्या पेक्षा तिलाच घरी जायची घाई होती. जाताना वाटलं होतं. येताना सोबत गाय असणार तेव्हा उशीर होईल,पण जाण्यासाठी जेवढा वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळात घरी परतलो. माहेरी परतणाऱ्या माहेरवाशिणी सारखी तिला घराची ओढ लागलेली. ती रस्त्यानं नुसती धावत होती. अंगणात येताच हंबरून आपण आल्याची आईला जाणीव करून दिली. आवाज ऐकून आई घरातून भाकर घेऊन आली. गाय वासराला भाकर भरवली. ती आईचा हात चाटू लागली. खरं सांगायचं तर त्यादिवशी मला खऱ्या अर्थानं ‘लळा’ या शब्दाचा अर्थ कळला...

लेखक - दीपक शांताराम पवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या