Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

आत्महत्या करणे, प्रेमविवाह केला म्हणून जिवे मारणे ही विकृती कधी संपणार ? | मिनाक्षी जगदाळे

Marathi Articles - When will the perversion of committing suicide with family due to depression, killing for love marriage end?

 नैराश्यातून सहकुटुंब आत्महत्या करणे, प्रेमविवाह केला म्हणून जिवे मारणे, ही विकृती कधी संपणार ? 

    आजमितीला दररोज वर्तमानपत्रातून, सामाजिक माध्यमातून बहुतांश बातम्या या वैयक्तिक आत्महत्या, कुटुंबातील सदस्यांना जिवे ठार मारून स्वत: आत्महत्या करणे, सर्व कुटुंबाने सामुदायिक आत्महत्या करणे अश्या स्वरुपाच्या वाचायला मिळतात.याबरोबरच मुलाने अथवा मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, आंतरजातीय, आंतरधर्मीय, खालावलेल्या आर्थिक परिस्थिती मधील कुटुंबात केला, घरी न कळवता परस्पर लग्न लावून घेतले, घरच्यांनी पसंद केलेल्या मुलाला अथवा मुलीला लग्नासाठी नकार दिला, यासारख्या कारणांवरून त्या दोघांनाही अथवा त्यातील कोणाला एकाला कुटुंबातील सदस्यांनी संगनमत करुन जिवे मारून टाकणे, अश्या घटना सातत्याने पाहायला मिळतात.

    एकमेकांवर प्रेम असलेले परंतु घरातून विवाहाला परवानगी मिळणार नाही हे माहिती असल्या कारणाने आधीच प्रेमी युगुलाने एकत्रित आत्महत्या करून जीवन संपवलेले उदाहरणे पण समाजात मोठ्या प्रमाणावर आहेत.

    मुलांना लहानपणापासून आपण चांगलं-वाईट, चूक-बरोबर काय, आयुष्यात निर्णय घेण्याचे महत्त्व, चांगल्या वाईट निर्णयांचे आयुष्यावर होणारे परिणाम याबद्दल सांगत असतोच, त्यांचेवर उत्तम संस्कार देखील करीत असतो. तरीही काही बाबतीत आपल्याच मुलांची मतं आपल्यापेक्षा वेगळी असू शकतात, त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो, हे स्वीकारणे आपल्याला इतके जड का जावे?

    मुलांना त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत, जरी तो आपल्याला पटला नसेल तरी, त्याचे संभाव्य परिणाम, फायदे तोटे लक्षात आणून देणे पालक म्हणून नक्कीच आपली जबाबदारी आहे. पण आपल्या सांगण्याला छेद देऊन पण मुलांना त्यांचा अट्टाहास, मग तो कोणत्याही बाबतीत असो, पूर्णच करायचा असेल तर आपण त्यांना ते व्यक्तिगत स्वातंत्र्य देऊ केलं पाहिजे. त्यांना स्वत:ला त्या गोष्टीचा अनुभव घेऊन पाहू देणे, त्यांना स्वत:ला चांगलं वाईट समजणे, त्यांना बाहेरील जग, व्यवहार कळणे, माणसं ओळखणे हे स्वत: शिकू देणे आवश्यक आहे. यातूनही त्यांचा स्व: मनाने स्व: मताने घेतलेला कोणताही निर्णय चुकला अथवा त्यांना पश्चाताप झाला तरी पालक म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे, त्याला परत पाठिंबा देणे, आपल्या पाल्याला सावरणे आणि पुनश्च नवीन आयुष्य सुरू करायला उमेद देणे हेच आपलं कर्तव्य आहे.

    अशी कितीतरी लग्न आहेत जी पालकांच्या, नातेवाईकांच्या पसंतीने, साग्रसंगीत पद्धतीने होऊन सुद्धा अपयशी ठरली आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे पालकांच्या चुकीच्या निर्णयामुळे मुलांचं आयुष्य, भविष्य बरबाद झालेलं आहे. त्यामुळे आयुष्यात असा कोणताही मूलमंत्र नाहीये जो अंगिकारला तर सगळं मानाप्रमाणेच आणि सकारात्मक होईल. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीचा विचार करताना, आपल्याच मुला मुलीचा जीव घेताना पालकांनी कुठेतरी स्वत:ची सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवणे अपेक्षित आहे.

    अनेक तरुण मुला मुलींनी घरातून आपल्या प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही या भीतीने स्वत:चे आयुष्य संपवलेले आहे. पालकांविषयी इतकी दहशत, इतकी भीती मुलांच्या मनात असणे रास्त आहे का? आपल्या मुलांना रागवण्याचा, ओरडण्याचा, थोडाफार धाक दाखविण्याचा पालकांना हक्क आहे. पण 'मुलांनी आपल्या भीतीने आत्महत्या करावी' यासारखे दुर्दैव पालकांचे काय असू शकते. जर आपत्य आणि पालक यांच्या मध्ये विश्वासाचा इतका आभाव, संवादात इतकी दरी आणि इतकी वैचारिक भिन्नता असेल तर आपणच पालक म्हणून कुठेतरी कमी पडतोय का, यावर विचार होणे आवश्यक आहे.

    एकीकडे आपण जागतिक मैत्री, जागतिक स्तरावर व्यवहार, परदेशात नौकऱ्या, उद्योग, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय सलोखा, शांतता, सर्वधर्म समभाव या विषयांचा पुरस्कार करीत असताना, ‘हे विश्वची माझे घर’ या उक्ती नुसार ‘माणुसकी ही एकच जात आणि तोच एक धर्म’ ही विचार प्रणाली अंगीकारत असताना आपल्याच समाजात राजरोसपणे घडत असलेल्या अश्या घटना पाहिल्या की खरंच मन विषण्ण होते.

    ज्या मुलांना आपण, प्रतिकूल परिस्थिती मध्ये देखील लहानाचे मोठे करतो त्यांना शिक्षण, उत्तम दर्जाचे आयुष्य, रहाणीमान देण्याचा प्रयत्न करतो, ज्या पाल्याला आपण फुलांसारखे जपतो, त्याचा आपल्याच हाताने जीव घेताना कुठेही जराही या कुकर्माची भीती जन्मदात्या आई वडिलांना, भावांना, इतर नातेवाईकांना वाटत नाही का?

    प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात. सख्खे भाऊ बहीण, स्वत:ची सख्खी मुलं मुली यांच्या छोट्या छोट्या आवडी निवडी एकमेकांपासून वेगळ्या असतात. कुटुंबात प्रत्येकाच्या आवडी निवडी, सवयी, स्वभाव, दिनचर्या भिन्न असतात, तरीही सर्व जण त्यात एकमेकांना सांभाळून घेतात, परस्परांच्या आवडीत, आनंदात समाधान मानतात, आणि त्यालाच कुटुंब म्हणतात. परंतु पालकांच्या पसंती शिवाय लग्न करणे म्हणजे असा कोणता अक्षम्य गुन्हा आहे ज्याला मृत्यूदंड ही शिक्षा पालकांनी कायदा हातात घेऊन द्यावी.

    आपल्या जीवनात अशी कोणतीही समस्या नसते ज्यावर उपाय नाही अथवा पर्याय नाही. गरज असते स्वभाव आणि डोकं शांत ठेवून, सगळ्यांना विश्वासात घेऊन, आलेल्या समस्या कशामुळे आल्या याची कारणे शोधणे, आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो यावर विचारविनिमय करणे, सातत्याने त्याच चुका परत करण्याचे टाळणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मदतीच्या पर्यायांना तपासणे, जात, पात, धर्म, पंथ, समाज, गणगोत या सगळ्याच्या पलीकडे देखील दुनिया आहे. गरीबी, श्रीमंती, घराणं, खानदान यापलीकडे देखील आयुष्य आहे आणि ते आपल्या मुलांना अनुभवायचं असेल, जगून पहायचं असेल तर त्यांचा जीव घेऊन स्वत:च्या आयुष्याची उर्वरित वर्ष गुन्हेगार म्हणून जगण्यापेक्षा, कायदेशीर शिक्षा भोगत आयुष्य बरबाद करण्यापेक्षा मुलांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात समाधान मानणे कधीही उचित असेल.

    सर्व कुटुंबाने मिळून एकत्र आत्महत्या करणे, अथवा सर्व कुटुंबाला ठार मारून स्वत:चे जीवन संपवणे हा प्रकार आजकाल समाजात वाढत चाललेला आहे. मुळात आत्महत्या हे पाप आहे आणि तो कायदेशीर गुन्हा देखील आहे. त्यातून स्वत:च्या कुटुंबातील इतरांना जिवे मारून टाकणे हा अजून गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले, सर्वसामान्य कुटुंबातील लोक जेंव्हा असे कृत्य करतात त्या वेळेस जाणवते की समाजात मानसिक ताण तणाव किती मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेले आहेत.

    समाजाने मानसिक आरोग्य सांभाळणे किती अनिवार्य झालेले आहे आणि स्वत:वर वैचारिक संयम मिळवणे, स्वत:च्या भावनांना आवर घालणे किती आवश्यक आहे. आपल्याला इतकं सुंदर आयुष्य मिळून देखील देशासाठी नाही, समाजासाठी नाही, इतरांसाठी नाही, पण स्वत:साठी सुद्धा आपल्याला धड जगता येऊ नये या पोखरलेल्या, उद्विग्न झालेल्या मानसिकतेला काय म्हणावे. कितीही मनाविरूद्ध परिस्थिती असली तरी त्यावर मात करणे जमलेच पाहिजे, तरच आयुष्य सुखकर होईल.

    आजकाल अश्या आत्महत्या वाढण्याच्या मागील कारणे जर शोधली तर अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कुठेतरी आपणच जबाबदार असतो असे वाटते. खूप लवकर मोठे होण्याचे स्वप्न पाहणे, त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी नसणे, उच्च जीवनशैली मिळण्यासाठी सतत कर्ज काढत राहणे, आहे त्यात समाधानी न राहता चुकीचे आर्थिक व्यवहार करून त्याची परतफेड न करता आल्यास आपले आयुष्य संपवणे दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

    थोडाही तणाव आला की व्यसनांचा सहारा घेणे, त्यातून अतिशय तरुण वयापासूनच तब्बेतीच्या समस्या उद्भवायला सुरुवात होणे, स्वत:हून चुकीच्या मार्गाने पैसे मिळविण्यासाठी चुकीच्या कृतींमध्ये सहभागी होणे, बेकायदेशीर काम करणार्‍यांची संगत धरणे, कुटुंबापासून लपवून परस्पर बाहेर उधाऱ्या, व्याजाने पैसे घेणे, खोटी कागदपत्रे बनवणे, खोट्या फसव्या आर्थिक योजना याला बळी पडणे, चुकीच्या ठिकाणी आपले पैसे गुंतवणूक करणे, घर, शेती, मालमत्ता गहाण ठेवणे आणि यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग राहिला नाही की मृत्यू ला कवटाळणे हा अनेकांच्या आयुष्याचा भाग झालेला आहे.

    घरातील एखाद्या माणसाच्या चुकीची शिक्षा मात्र संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते आणि इच्छा असो नसो मृत्यू ला जवळ करावे लागते. अशा प्रकारच्या सामुदायिक आत्महत्यांमध्ये लहान मुलांचा तर हकनाक बळी जातो. त्यांची काहीही चूक नसताना, त्यांना परिस्थितीची यत्किंचितही जाणीव नसताना आई वडील स्वत: केवळ स्वत:च्या चुकांची शिक्षा मुलांना देखील जिवे मारून देतात.

    कोणत्याही स्वरुपाचे मोठे आर्थिक संकट, कर्जबाजारी होणे, प्रकृतीच्या समस्या, आजारपणाची भीती, असहाय आजार, भाऊबंद, नातेवाईक यांचा मानसिक त्रास, नोकरीच्या ठिकाणी मिळणारी उपेक्षित वागणूक, अपमान, समाजातून दिला गेलेला अथवा करून घेतलेला त्रास, कोणत्याही कारणास्तव समाजात झालेली नामुष्की, कोणाकडून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना, मिळणारी अपमानास्पद वागणूक त्यातून होणारे मानसिक खच्चीकरण, पती पत्नी मध्ये कोणाचे विवाह बाह्य संबंध उघडकीस येणे, उद्योग व्यवसायात येणारा तोटा, या सर्वसाधारण कारणांमुळे सामुदायिक आत्महत्या अथवा कुटुंब प्रमुखाने सर्वांना जिवे मारून स्वत:चे जीवन संपवणे यासारख्या घटना घडताना दिसतात.

    या जगात कोणालाच स्वत:च्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे, शंभर टक्के स्वप्नवत जीवन जगता येत नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या वाईट दोन्ही बाजू असतात. आयुष्य म्हंटलं की अडथळे, आव्हाने, अघटित अनपेक्षित घटना या आल्याच, ते कोणालाही चुकलेले नाही. हे आपल्या सर्वांना ठाऊक असते तरीही 'कळतंय पण वळत नाही' अशी मानसिकता तयार होऊन माणूस इतका का खचतो की त्याचा स्वत:च्या कर्तृत्वावर, स्वत:वर देखील विश्वास राहत नाही.

    नकारात्मक परिस्थितीशी लढणे, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे, त्यांच्या कडून प्रेरणा घेणे, अडीअडचणीवर मात करून पुन्हा उभे राहिलेल्या, शून्यातून विश्व निर्माण केलेल्या लोकांचा सल्ला घेणे आणि आपलं आयुष्य वेळेत सावरणे हे चांगल्या सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांना देखील का जमू नये? हा प्रश्न आजही अनुत्तरीत राहतो. त्यामुळे आपल्या जवळच्या, विश्वासू लोकांशी मन मोकळे बोला, चर्चा करा, चुका असल्यास मान्य करा, त्यावर सल्ला मसलत करा, मार्ग काढा पण मृत्यू ला कवटाळून आपल्या माघारी जिवंत राहणार्‍या लोकांना आयुष्यभरासाठी वेदना देऊन जाऊ नका. आपण आत्महत्या केल्यावर देखील लोक आपल्याबद्दल उलट सुलट चर्चा करणारच आहेत, आपल्याला दोष देणारच आहेत, आपल्या घरच्यांना लोकांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला लावण्यापेक्षाही स्वतः आव्हान स्वीकारून परिस्थिती शी दोन हात करा आणि प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवातून स्वतःचे आयुष्य घडवा.

- सौ.मिनाक्षी जगदाळे, नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या