Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

भद्रसेना | रहस्यमय मराठी कथा | सौ हेमा येणेगूरे

bhadrasena in marathi, भद्रसेना रहस्यमय मराठी कथा

सौ हेमा येणेगूरे यांची एक जबरदस्त मराठी ऐतिहासिक व काल्पनिक रहस्यमय मराठी कथा - 'भद्रसेना'

सेनापती अंगद आणि सेनानायक अमर्त्य सेन यांचं काहीतरी खलबत थोडा वेळ चाललं. अंगद उठून बाहेर गेला तर अमर्त्य सेन चोरवाटेने कुठंतरी निघून गेला. त्याचवेळी राजकुमार सुबाहू भद्रसेनेच्या दालनात जात होते. महाराज सुकेतू यांना आज झोप येत नव्हती. काहीतरी अशुभ होणार आहे असं सारखं त्यांना वाटतं होतं. भद्रसेनाही दरबार नर्तकी तसेच मुख्य वेश्या. त्या काळात वेश्येला विशेष मान असे. भद्रसेना राजा व राजकुमार व्यतिरिक्त फक्त सेनापती अंगद यांना जवळ येऊ द्यायची आणि त्यांच्याशी संबंध ठेवून असायची. राजमाता आपारदेवी व राणीमाता सुकेशनीदेवी यांना राजकुमार भद्रसेनेकडे जाऊ नये असे वाटायचे. पण राजकुमार सुबाहू ऐकतील तर ते राजकुमार कसले. अतिशय मद्यपान करणारे आणि छंदी व्यक्ती होते. पाच मुलींच्या पाठीवर झाले म्हणून त्यांचा खूप लाड केला गेला. ते ज्यावर बोट ठेवतील ते देत गेले त्यामुळे ते बिघडले. राजकुमारी सुपर्णा, सुवर्णा, सुहेनी, सुदक्षा, सूर्या या पाच मुली महाराजा सुकेतू यांना होत्या. त्यातील सुपर्णा व सुवर्णा महाराणी अचलादेवी यांच्या होत्या तर सुहेनी, सुदक्षा व सूर्या, सुबाहू सुकेशनी देवी यांच्या होत्या. तर महाराणी आंबिकादेवी यांना मुलबाळ नव्हते. पण राजगादी आपल्याकडे असावी ही इच्छा त्यांच्या मनात खूप होती म्हणून त्यांनी सेनापती अंगद यांना हाताशी धरलं होतं. तर‌ अमर्त्य सेन हे अचलादेवीसाठी काम करत होते. सुबाहू याचं राजकारभारात लक्ष नाही पाहून ते राजगादी बदलायच्या खटपटीत होते. त्याची कुणकुण महाराज सुकेतू यांना लागली होती. ते रात्रभर‌ बैचेन होते. तसं त्यांनी तासाभरापूर्वी भद्रसेनेकडे गेल्यावर बोलून दाखवलं होतं. भद्रसेना राजनर्तकी व राजवेश्या असली तरी तिचं आपल्या देशावर व राजावर खूप प्रेम आणि निष्ठा होती. तिनं या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवलं.

    राजकुमार सुबाहू भद्रसेनेच्या दालनांत गेल्यावर तिचे नृत्य पहात अति मदिरा सेवन केल्यामुळे तेथेच झोपी गेले. आज त्यांनी रतिसुखाची मागणी केली नाही. भद्रसेनेने सेवका करवी त्यास आतल्या दालनात नेण्यास सांगितले. त्या दालनाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करून ती अंतर्वस्त्र बदल्यासाठी आपल्या दालनात निघून गेली. ती वस्र बदलत असताना तिला आरशातून खिडकीत कोणीतरी असल्या सारखं दिसलं. तो तरूण भद्रसेनेकडे चोरून पाहत होता. तिने पाहिले हे न‌भासू देता. तिने आपल्या सेविकेच्या कानात पुटपुटली. ती सेविका बाहेर निघून गेली. तोपर्यंत भद्रसेनेने‌ आपले वस्र बदलले. ती मंचकावर बसून वाट पाहू लागली. तेवढ्यात‌ सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला पकडून आत आणले. तो अतिशय सुंदर पण भेदरलेल्या अवस्थेत होता. त्याला आत सोडून सर्वांना बाहेर थांबायला सांगितले. भद्रसेना त्याच्या डोक्यावर,कधी खांद्यावर तर‌ कधी पाठीवर हात फिरवू लागली. त्यामुळे तो चलबिचल होऊ लागला. ज्या स्रिला आपण दररोज चोरून पाहतो ती आज आपल्या समोर अर्धं वस्रात, अतिशय सुंदर अप्सराच जणू. तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. ती त्याच्या अतिशय जवळ गेली. तिचा श्वास त्याच्या नाकावर पडू लागला, त्याची छाती धडधडू लागली. तिने थोडंस स्मित हास्य करत विचारलं की, “तू कोणासाठी काम करतोस”. तो गांगारून गेला. तो कोणासाठी काही करत नाही. तो‌ बांदल देशाचा असून कामानिमित्त या राज्यात आला होता आणि या नगराच्या मध्य भागात रहायला होता. आता तो तिच्याच महाला शेजारी असलेल्या बागेत काम‌ करत होता. तो आल्यापासून तिला पहात होता आणि तिच्या प्रेमात पडला होता. म्हणूनच तो नेहमी तिला चोरून पाहत असे. दिवसा राजे महाराजे असल्यामुळे इकडे जास्त यायचा नाही पण रात्री मात्र तो गुपचूप यायचा. तसा तो अतिशय तगडा, तरणाबांड, एखाद्या योद्धा असल्या सारखा होता. भद्रसेनेने त्याला जवळ ओढले. तो कावराबावरा झाला. तिने त्याला कबूल केले की त्याने जर तिचं काम केले तर ती दहा रात्री सेवा करेल. तो तयार झाला. तिने त्याला तिने आपली गुप्त कल्पना सांगितली. तो तयारही झाला करण्यासाठी. त्याने भद्रसेनूला एक आलिंगन देऊन तेथून बाहेर पडला. भद्रसेनेने एका विश्वासू सेवकाला त्याच्या पाठीमागे पाठवले. तो तरूण म्हणजे बलबाहू होता. तो अंधाऱ्या गल्लीत कुठेतरी गायब झाला. रात्रीचा तिसरा प्रहर सुरू होता. त्याच वेळेला एक काळी आकृती महाराजा सुकेतू यांच्या दालनात प्रवेश करत होती.

    ती काळी आकृती महाराज सुकेतू यांच्या दालनात प्रवेश केली. महाराजांना नुकताच डोळा लागला होता. त्या आकृतीने महाराज्यांच्या भोवती चक्कर मारून त्यांच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी पुढे सरसावली पण तिस आत शिरता येईना. महाराजांच्या दंडावर शंकमणी तर गळ्यात सुर्यरुद्राक्ष बांधले गेलेले होते. त्यामुळे ती शरीरात प्रवेश करू शकत नव्हती. ती थोडावेळ फूत्कार सोडत तेथेच फिरली मग ती खिडकीतून बाहेर निघून महालाच्या चोरवाटेने जाऊन त्या भुयारातील गुहेत शिरली. तेथे जाऊन ती तेथील भिंतीवर धडका देऊ लागली. “शांत हो अप्समारी, तुला अजून खूप कामे करायची आहेत. सगळी शक्ती इथेच संपवणार आहेस का?” तो घन गंभीर आवाज ऐकून ती काळी आकृती शांत झाली आणि तिथे ठेवलेल्या बाटलीत गेली. हा झालेला प्रकार अमर्त्य सेन घाबरून पाहत‌ होता. अचला देवीच्या सांगण्यावरून अमर्त्य सेन याने अघोरी साधू भार्गवा यांना जाऊन भेटला होता. त्यांच्या कडून या वाईट शक्ती द्वारा महाराज सुकेतू यांना वाटेतून दूर‌ करायचे होते. कोणाला संशयही आला नव्हता. झालेला आपला पराभव भार्गवा यांना सहन होत नव्हता. ते अजून जोराने पुजा करू लागले. त्यांना असे का घडले हे शोधून काढायचे होते.

    इकडे बलबाहू तडक आपल्या घरी गेला आणि पुढच्या तयारीला लागला. त्याच्या मागावर‌ गेलेला सेवक त्याच्या घराबाहेरच झोपला. पाचव्या प्रहरी बलबाहू उठून तयार झाला आणि घराबाहेर आला तर त्याला सेवक झोपलेला दिसला. तो गालात हसत आवाज न होऊ देता आपल्या कामावर निघून गेला. त्याला कोणत्याही परिस्थितीत भद्रसेनेचे काम करायचे होते. तिच्या स्पर्शाने तो अजून वेडावला होता. तिला मिळवण्यासाठी तो काहीही करून तिने दिलेले कार्य तडीस नेणार होता. काही वेळ चालल्यावर तो एका मध्यम आकाराच्या महालासमोर आला. तेथे थोडे दूर थांबून तेथील निरीक्षण करू लागला. थोडे बहुत सेवक उठून कामाला लागली होती. तो आतील दिसेल अशा ठिकाणी थांबून निरीक्षण करत होता. मागच्या द्वारा जवळ कोणी नाही पाहून तो आत शिरला. सगळीकडे तो लपून छपून निरीक्षण करू लागला. सहावा प्रहर होऊन सर्व जण उठण्या अगोदर तो महाला बाहेरही आला. एका कोपऱ्यात जाऊन एका कपड्यावर कुकुंमद्रवाने काही रेघोट्या मारू लागला. जवळपास अर्धा तास तो हे कार्य करत होता. ते कापड सुकल्यानंतर त्याने त्याची घडी केली आणि घरी निघून गेला. तो सेवक अजूनही झोपलेला होता. तो अलगद आवाज न करता आत गेला. ते कापड आपल्या घरातील सुरक्षित दालनात लपवून ठेवले आणि पुढच्या तयारीला लागला. सकाळची सर्व कार्ये उरकून तो परत घराबाहेर पडला. आता तो सेवक उठून समोर भिंतीला लागून थांबला होता. त्याने त्याच्याकडे पाहिले आणि चालू लागला. तो परत त्याच महालात गेला जेथे तो चोरून शिरला होता. पण आता तो समोरच्या दरवाजाने परवानगी घेऊन गेला होता. तेथील सेवकाने आत जाऊन सेनापती अंगद यांना वर्दी दिली की तुमच्याकडे एक तरुण आला आहे.

    तो तरुण आत जाऊन सेनापती अंगद यांची वाट पाहू लागला. सेनापती अंगद जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी अंगणात एक सृदृढ व तगडा तरुण पाहिला. काय काम आहे असे विचारले, “सेनापतीजी मी बांदल देशाचा असून काम शोधत या राज्यात आलो होतो. मला कामही मिळाले पण ते बागकाम आहे. मला सैन्यात भरती व्हायचे आहे. मला सर्वजण म्हणतात की मी एक चांगला शिपाई होईन”. सेनापती अंगद यांनी त्याच्याकडे वरून खाली पाहिलं. नंतर ते म्हणाले, “तलवार चालवता येते का?” “नाही जी”, “पण तुम्ही शिकवाल तर दोन दिवसांत शिकेन”,तो तरुण म्हणाला. सेनापती अंगद हसले आणि त्यास घेऊन घरा मागच्या रण मैदानात घेऊन गेले. त्याला एक प्रहर तलवार चालवायला शिकवली. सराव करायला सांगून निघून गेले. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून बलबाहू होता. तो पुढच्या सैनिकांना झपाट्याने हरवत चालला होता. त्याला पाहून तो आताच तलवार बाजी शिकला आहे असे वाटत नव्हते. दुपार नंतर सेनापती अंगद महालात घरी परत आल्यानंतर त्यांना ही बातमी कळाली. ते तडक मागच्या रणमैदानात गेले. तेथे हा अजूनही सराव करत होता. ते त्याला बघून हसले. हातात तलवार घेऊन त्याच्यावर चालून गेले. पण बलबाहूने तो वार वरच्या वरी झेलला. जवळपास अर्धा प्रहर त्यांच्याशी तो लढला. मग थकून हार पत्करली. पण सेनापती अंगद मात्र त्याच्यावर खूश होते. त्यांनी त्याला आपल्या कटात सामील करून घेतले. नवखा तरुण कोणी याच्यावर संशय घेणार नाही. याच्या करवी महाराज व राजकुमार यांचा काटा काढायचा. महाराणी आंबिकादेवी मधे आल्यातर त्यांना कारावासात पाठवायचे. असे ठरवून त्यांनी त्याला कामास नेमले. त्या रात्री बलबाहू भद्रसेनाकडे आला. सेनापती अंगद काय गुप्त कावा करतात ते सांगितले. त्या दिवशी भद्रसेनेने त्यास रतिसुख दिले. त्यामुळे तर तो आता हवेतच उडू लागला. भद्रसेना त्याच्या कामावर खूश‌ होती. बलबाहूला मात्र राजवाड्यात काम हवे होते.

    बलबाहूने भद्रसेनेच्या महालाचेही नक्षे बनवून ठेवले होते. त्याला नेमकं काय करायचं होते हेच कोणाला उमगत नव्हते. बलबाहू काय करणार नेमकं कळतं नव्हते. आज तो परत भद्रसेनेच्या महालात शिरला होता पण चोरून त्याने सर्व महालाची पाहणी केली. एका दालनात कोणी नाही हे पाहून एका कपड्यावर त्या महालाचा नक्षा कुकुंमद्रवाने काढला. वाळल्या नंतर तो कमरेला अडकवून भद्रसेनेच्या दालनात गेला. ती मंचकावर शांत पहुडली होती. केससभांर खुले होते ते मंचकावर पसरले होते. ती जरी दिवसभर पूर्ण वस्त्रात असली तरी रात्री मात्र अर्धं वस्त्रात म्हणजे वर उरोजाला कपडा बांधायची तर कमरेला शेला,तोही गुडघ्यापर्यंत. ती दिसायला अप्सरेसारखी सुंदर होती. तिचे गोरे हस्त आणि पद पाहून बलबाहूचा संयम ढळत चालला होता. तो तिचे चुंबन घेण्यासाठी वाकलाही पण आपण पकडले गेलो तर आपला हेतू उघडकीस येईल असे वाटल्याने तो त्या दालनातून झटकन बाहेर पडला. पण त्याच्या अस्तित्वाने भद्रसेनेची झोप चाळवली. ती उठून सगळीकडे पाहू लागली. तिने घाबरून सेवकांना आवाज देऊ लागली. त्यामुळे महालातील सर्व लोक जागे झाले. बलबाहूला बाहेर पडणे अवघड झाले. तो अंधार्‍या कोपर्‍यात लपून बसला. खूप वेळ शोधाशोध झाल्यावर सगळे परत झोपी गेले. बलबाहूला बाहेर पडेपर्यंत तीन प्रहर झाले. घरी जाऊन सगळं जागच्या जागी ठेवून झोपे पर्यंत चवथा प्रहर सुरू झाला होता. सकाळी सहाच्या सुमारास भद्रसेनेचा एक सेवक त्यास बोलवयास आला. तो तयार होऊन तिकडे गेला पण डोळ्यात अमाप निद्रा घेऊन. भद्रसेनेने ते ओळखले, “काय झालं बलबाहू रात्रीच्या प्रहरी तुमची निद्रा झाली नाही का?”. बलबाहू खोटं बोलला की, तो सेनापती अंगद सोबत होता. पण पुढचं सर्व खरं सांगितले. त्यांनी महाराजा विरूद्ध काय कट रचला आहे. भद्रसेनेने बलबाहूस राजवाड्यात काम मिळवून देईन पण महाराजांना मारायचे नाही तर त्यांचं संरक्षण करायचं, हे सांगितले. तो सर्व हो म्हणून निघून गेला. घरी पोहचल्यावर त्याने एका व्यक्तीला दोन्ही महालाचे कापड देऊन आपल्या देशात पाठवले. सुमारे दहाच्या सुमारास राजवाड्यात दाखल झाला. सेनापती अंगद आपले काम होणार तर भद्रसेना आपलं काम होणार यासाठी खूश होते. पण बलबाहू वेगळ्याच कारणासाठी खूश‌ होता.

    इकडे अघोरी साधू भार्गवाने अप्समारीला अजून ताकदवान बनवले होते. ती येत्या अमावस्याची वाट पाहत होती. भार्गवाने तिच्या सोबत अजून एक ताकद निर्माण केली होती. त्याचे नाव चामुंडा, तो अप्समारीची मदत करणार होता. बलबाहूला याची कुणकुण लागली होती. तो अमर्त्य सेनवर लक्ष ठेवून होता. अमर्त्यसेन भर्गवाला भेटून गेल्यावर तो भार्गवाला भेटला. त्याच्या जास्त दाम देऊन महाराजा सोबत अमर्त्य सेनला मारायला सांगितले. दुसऱ्या दिवशी नदीकाठी अमर्त्य सेनचा मृतदेह आढळून आला. पण बलबाहू असे का करत होता. कोण होता तो? अमर्त्य सेनचा मृतदेह अतिशय विद्रुप झाला होता. डावा डोळा, हात व पाय गायब होते. आप्समारीने असं का केलं होतं. तिला नवीन आयुष्य हवं होतं. तिच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पण तिला नवीन शरीर व आयुष्य मिळवण्यासाठी बारा जि‍वांचे आयुष्य लोकांना मारून काढून घ्यायचे होते. त्यांचे एक एक अवयव ती आपल्या शरीराला जोडत होती. माणसाच्या आयुष्याच्या सहा अवस्था, बाल्यवस्था, किशोर अवस्था, तारूण्य अवस्था, प्रोढावस्था, उतारवय आणि वृद्धावस्था. यापैकी तिला चार अवस्था हव्या होत्या. एक अवस्था पूर्ण करण्यासाठी तीन जीव घ्यावे लागणार होते. चारसाठी बारा. अप्समारीला तारुण्य अवस्थापर्यंत आयुष्य हवे होते. अमर्त्यसेन नंतर सेनापती अंगद याचा नंबर लागणार होता. पण बलबाहूला आधी राजवाड्याची पूर्ण माहिती काढायची होती. सेनापती अंगदच राजवाड्यात त्याला महत्त्वाचे काम देणार होते. महाराजा सुकेतू यांना बलबाहू कसा प्रत्येक कामात निष्णात आहे. तो त्यांच संरक्षण किती चांगल्या प्रकारे करू शकेल हे पट‍वून दिले. बलबाहू हा दिवस रात्र महाराजा सुकेतू यांच्या संरक्षणासाठी राजवाड्यात राहू लागला. तो दररोज जितका राजवाड्याचा भाग बघत असे ते घरी आल्यावर कपड्यावर कुकुंमद्रवाने रेखाटत असे सुमारे महिनाभर त्याने हे काम केले. शेवटी त्याने त्या सर्व भागाचे एकच चित्र बनवून आपल्या देशात पाठवून दिले. या काळात तो अधूनमधून भद्रसेनेच्या महालात येत असे. भद्रसेना त्याच्यावर खूश होती. तो जेव्हा म्हणेल तेव्हा रतिसुख देत असे. आता सेनापती अंगद यांना बाजूला काढायचे होते. बलबाहूनी‌ भार्गवा यांना हे काम सांगितले.

    त्या रात्री सेनापती अंगद आपल्या घरी काही विषयावर आपल्या पत्नीशी बोलत असताना भद्रसेनाने जलमहालामध्ये बोलवलं आहे असं एका सेवकाने त्यांना गुपचूप निरोप दिला. महाराजांचे बोलवणे आले आहे असे खोटे वृतांत पत्नीशी कथन करून ते जलमहालाकडे निघाले. ते अतिशय शांत वातावरण निर्माण झाले होते. एकही सेवक व दासी तेथे नव्हती. समोरच्या दालनात‌ दिवे लागलेले होते. भद्रसेना फक्त पातळ वस्त्र ओढून शेजेवर पडली होती. सेनापती अंगद यांना भद्रसेना अशा प्रकारे कधी स्वत:हून रतिसुख देत नसे. पण आज वेगळंच काहीतरी चालू होते. ते‌ थोडेसे बावरले पण तिच्या जवळ जाताच मंत्र मुग्ध होऊन पाहू लागले. ते तिच्या सौंदर्याकडे कधी आकर्षीत झाले त्यांनाही कळाले नाही. ते तातडीने तिच्याजवळ गेले, तिच्या अधरावर आपले अधर ठेवले. दोन चार क्षण गेले आणि सेनापती अंगद यांना असे वाटू लागले की कोणीतरी त्यांच्या शरीरातून सर्व हवा शोषून घेत आहे. ते बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागले पण भद्रसेनेने घट्ट पकडून ठेवले होते. हळूहळू त्यांच्या शरीरातून रक्त आणि मांस ही शोषून घेतले जाऊ लागले. सेनापती अंगद तडफडू लागले. पहाट झाली, भद्रसेना निघून गेली. सकाळी सेवकांना सेनापती अंगद यांचा देह जलमहालामध्ये एका दालनात आढळून आला. पण फक्त सांगाडा, सर्व कातडी हाडाला चिटकलेली. कोणी मारले कळत नव्हते, इकडे अप्समारी अजून आयुष्य वाढवत होती. अप्समारीने भद्रसेनेचं रुप घेऊन सेनापती अंगद यांना मारलं होतं. पण भद्रसेना व महाराज यांना कळत नव्हतं की आपल्या देशातील अतिशय महत्त्वाचे दोन प्रधान अधिकारी का मारले गेले.

    बलबाहूला महाराजा सुकेतू यांच्याकडून काय हवे होते हे कोणालाही कळतं नव्हते. राजकुमार सुबाहू आता पूर्णपणे वाया गेले होते. दिवसरात्र ते नशेत आणि वेश्येसोबत घालवू लागले. एके रात्री ते भद्रसेनेकडे गेले असताना तिने त्यांना चांगलेच सुनावले होते. नाकर्ते असून या दालनात येऊ नये असे सुनावले होते. त्या दिवसापासून ते अतिशय दु:खी होऊन असे वागत होते. खरं तर ते बिघडण्यास सर्वस्वी अचलादेवी कारणीभूत होत्या. ते पुढे जाऊन राजगादी सांभाळू नये म्हणून लहानपणापासून त्यांना त्या बिघडवत होत्या. त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवत होत्या. त्यांच्या सख्ख्या आईसाहेब त्यांना कधीच प्रेम करत नाहीत हे त्यांच्या बालमनावर बिंबवत होत्या. शेवटी ते‌ सर्व गोष्टी अचला देवीच्या ऐकू लागले. आताच्या त्यांच्या अवस्थेला त्याच जबाबदार होत्या. राजकुमार सुबाहू मनाविरूद्ध काही घडले की अति मदिरापान करत असत. आजची रात्र राजकुमार सुबाहू साठी. घातक ठरणार होती. अप्समारी डाव साधणार होती पण बलबाहूला ते नको होते. अप्समारी जर पुन्हा जिवंत झाली तर तिला परत मृत्यू नव्हता. ती बलबाहूलाही घातक ठरणार होती.

    अप्समारी सोबत भार्गवा व चांमुडाही घातक ठरणार होते. चांमुडा हा जरा भडाग्नी असला तरी तो कोणाचाही गुलाम होऊन शांतपणे काम करत असे. त्याला अगोदर आपल्या ताब्यात घ्यायचे हे बलबाहूने ठरवले. त्याने आपल्या योग साधनेने चामूंडाला आपल्या ताब्यात घेतले. तो आता सर्व काम बलबाहूचे ऐकत होता. बलबाहूने अप्समारीला भार्गवाला मारावे तिची त्यामुळे शक्ती वाढेल, असे चामुंडाला सांगायला लावले. अप्समारीला ते खरे वाटले. आपण ऐवढे लोक मारून जिवंत होणार त्यापेक्षा भार्गावाला मारले तर तिच्या शक्ती वाढून ती लगेच जिवंत होऊ शकेल. तिने भार्गवा पुजेत लीन असताना त्याच्यावर वार केला. दोघात खूप युद्ध झाले अप्समारीने शेवटी भार्गावाला मारून टाकले पण या युद्धामुळे ती क्षीण झाली. लपून पाहणारा बलबाहू याने चामुंडाला आदेश दिला की, “अप्समारीला मारून टाक”. त्याने थकलेल्या अप्समारीला मारून टाकले. बलबाहूला आता सर्व मार्ग मोकळे झाले होते. पण शेवटी तो असे का करत होता, तो कोण होता. हे अजूनही कळाले नव्हते. भद्रसेनेला त्याची भणकही लागली नव्हती. ती फक्त आपल्या राजाला मारायच्या प्रयत्न करणाऱ्यांना बलबाहूने दूर केले हे वाटून खूश होती. तिने ठरल्या प्रमाणे बलबाहूला दहा दिवस सेवा दिली. बलबाहू पण भद्रसेनेवर खूश होता. तो हळूहळू तिच्या प्रेमात पडत होता.

    एके दिवशी अचानक राजकुमार सुबाहू यांच्यावर हल्ला होऊन तो त्यात मारला गेला. भद्रसेना व महाराजा सुकेतू खूप दु:खी झाले. पण बलबाहू पण चकीत होता, त्याने त्याच्या वर हमला केला नव्हता मग मारलं कोण? भद्रसेनेला सुबाहूच्या मृत्यूमुळे खूप मोठा धक्का बसला. ती त्याच्यावर अतोनात प्रेम करत असे. तो फक्त सुधारावा आणि राज्य करावे. महाराजा सुकेतू यांना पुढचे आयुष्य समाधानाने जगू द्यावं एवढंच वाटतं होतं. पण आता वेगळंच घडलं होतं. महाराजा सुकेतू तर आजारीच पडले. भद्रसेनेला बलबाहूचा खूप राग आला होता. बलबाहू जेव्हा तिला भेटायला तिच्या महालात आला तेव्हा तिने सेवका करवी जेरबंद केले. बलबाहू तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. भद्रसेना रागाने लाल होऊन बलबाहूला विचारू लागली, “सांग का मारलंस माझ्या सुबाहूला, तुला माहित होतं ना की मी सुबाहूवर खूप प्रेम करते”. “काय? मी मारलं सुबाहूला? तुझं काही तरी चुकतंय भद्रसेना. मी नाही मारलं त्याला, मीही तेच शोधतोय? कोणी मारलं त्याला. तुला वाटत असेल मी मारलं सुबाहूला, तर मला येथेच जेरबंद कर आणि शोधून काढ. मी मारले असे कळाले तर मला ठार कर पण मला वाटतं आता महाराजांच्या जिवालाही धोका आहे”. त्याचं असं कमालीचं थंड बोलणं आणि विश्वास पूर्ण डोळे बघून तिने त्याला मोकळं केलं. बलबाहूने दोन दिवसांत शोधून काढायचं वचन दिले. तरीही भद्रसेनेने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी एक गुप्त हेर नेमला. बलबाहूने दोन दिवसांत शोधून काढले की सुबाहूचा जीव कोणी घेतला. अचलादेवींना सुबाहू वेश्येच्या घरी असतो हे माहीत झाले होते. तेथे कडक पहारा नसतो हे माहीत झाले होते. त्यामुळे तेथे मारेकर्‍यांना पाठवून त्याला यमदासनी पाठवले. मुख्य मारेकरी बलबाहूच्या ताब्यात आला. त्याने सर्व सत्य कथन भद्रसेनेच्या समोर केले. बलबाहूने त्यास स्वत: ठार केले. तो भद्रसेनेच्या महालातून बाहेर पडून स्वत:च्या घरी गेला. चामुंडाला आपल्या सोबत घेतले व राजवाड्यात दाखल झाला. त्याने महाराजा सुकेतूला सर्व सत्य सांगितले पण त्यांना ते खरे वाटेना. त्याने महाराजा सुकेतू यांना अचला देवीच्या महालात घेऊन गेला. अचलादेवी आपल्या दालनात कोणाशी बोलत होत्या. बलबाहू आणि महाराजा सुकेतू बाहेरचं थांबून ऐकू लागले. तो मुख्य मारेकरी अचलादेवींना मारण्यासाठी पुढे सरकत होता. त्या घाबरून म्हणत‌ होत्या, “काय हवं तुला, आम्ही तर तुला खूप धन द्रव्य दिले आहे. तू सुबाहूला मारण्याचे कार्य चोख केलं आहेस. मग आता काय हवं तुला? तू मला का मारत आहेस?” हे ऐकून महाराजा सुकेतू यांना खूप क्रोध आला. त्यानी आपली तलवार उपसली आणि दालनात शिरून अचला देवीच्या पोटात घुसवली. अचलादेवी स्वामी असं म्हणत धर्तीवर कोसळल्या. बलबाहूचा अजून एक शत्रू संपला होता. सुबाहूला त्याने मारले नव्हते पण तो एक शत्रू आपोआप वाटेतून बाजूला झाला होता. बलबाहूने चामुंडाला मुख्य मारेकरीच रुप घेऊन अचलादेवींना फक्त घाबरायला सांगितले होते. जेणेकरून त्या सत्य वदन करतील. झालंही तसंच. पण बलबाहू कोण होता? तो सर्वांना आपले शत्रू का मानत होता. तो भद्रसेना व महाराजा सुकेतू यांना का मारत नव्हता. किंवा एखाद्या राजकुमारी सोबत प्रेमाचे नाटकही करत नव्हता. तो असं का करत होता?

    महाराजा सुकेतूची तब्येत बिघडत चालली होती. भद्रसेना चिंतीत होती. आता राज्यात शूरवीर असा एकही व्यक्ती नव्हता जो सेनापती झाला असता. बलबाहू हा अतिशय शूरवीर होता. भद्रसेनेने महाराजांना विनंती केली की त्याला सेनापती बनवावे. महाराजांनी तशी घोषणा केली आणि त्याला सेनापती बनवले. बलबाहूला आता सेनेचीही व्यवस्थित माहिती मिळाली. त्याने काहीतरी गोष्टी आपल्या राज्यात पाठवल्या. त्यानंतर आठच दिवसात महाराजा सुकेतूनां बातमी कळाली की बांदल देशाचे त्यांच्यावर आक्रमण झाले आहे. दोन दिवसांत बांदल देशाचे सैन्य राजधानी पर्यंत पोहोचतील. महाराजा सुकेतूनी बलबाहू व इतर सरदारांना घेऊन सल्ला मसलत केली. युद्धाची रणनीती बनवली. पण भद्रसेनेला बैचेन वाटत होते. बलबाहू बांदल देशातूनच आलेला आहे. त्याचे तर काही काळेबेरे नाही. पूर्वी कधी या देशाने आपल्या राज्यावर आक्रमण केले नव्हते. मग आताच का?

    तसेही बलबाहूचे वागणे बोलणे एखाद्या योध्या सारखे, राजघराण्यातील व्यक्ती सारखे वाटत होते. त्याने एकच दिवसांत तलवार बाजी व युद्ध कौशल्य आत्मसात केले होते. हे कसे शक्य आहे. तो पहिलेच यात तरबेज असेल. तिने आपल्या गुप्तहेर करवी त्याची माहिती काढायची ठरवले. पण गेलेला गुप्त हेर परत येतच नव्हता. कारण बलबाहूने अगोदरच भद्रसेनेवर गुप्त हेर पाळत म्हणून ठेवला होता. युद्धाचा दिवस आला, सगळे रणभूमीवर जमा झाले. युद्ध सुरू होणार इतक्यात बलबाहूने महाराजा सुकेतू यांना जेरबंद केले. महाराजा यांना तर काहीच कळेना. बाकीच्या सरदारांनी युद्धासाठी तलवारी काढल्या पण त्यांनाही सैनिकांनी गराडा घातला. महाराजांनी सैनिकांना आदेश केला की बलबाहूला पकडा पण सैनिक जागचे हालले नाहीत. सर्वजण बलबाहूचे ऐकत होते. भद्रसेनेलाही बातमी कळाली. ती धावत पळत रण मैदानात आली. बलबाहूवर तलवारीने हमला केला. पण तो सजग असल्याने तिच्या तलवारीचे पाते त्याच्या हाताला चाटून गेले. ती पुढे काही करणार इतक्यात बलबाहूने तिला हाताने घट्ट पकडून तिला बेशुद्ध केले. सुकेतू यांना पकडून बांदल देशाला घेऊन गेला. चार दिवस सतत प्रवास करून सर्व जथ्यां बांदल देशात पोहचला. जाताना जेव्हा जेव्हा भद्रसेनेला शुद्ध येई तेव्हा दासी तिला जेवण देऊन परत बेशुद्ध करत. त्यामुळे तिला कोठे जात आहोत हे कळतं नव्हते. ती जेव्हा तेथील महालात पोहचली तेव्हा मात्र तिला बेशुद्ध केले गेले नाही. तिने तेथून सुटण्यासाठी प्रचंड आरडाओरडा केला पण फायदा झाला नाही. आपण नेमकं कोठे आहोत हेही तिला कळतं नव्हते. कोणी दासीही सांगत नव्हत्या. बलबाहूही तिला भेटायला आला नव्हता. महाराजा सुकेतू यांना तेथील दरबारात नेण्यात आले. महाराजा सुकेतू अजूनही चक्रावून पहात होते. तेवढ्यात तेथील राजा शुकमणी दरबारात हजर झाले. त्यांच्या शेजारच्या सिंहासनावर राजकुमार शुकधातू, शुकराज, महाराणी इंदुमती आणि महाराजा शुकमणीची बहीण तारामती बसल्या. तारामती यांना पाहून महाराजा सुकेतू जोरात दचकले. ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. पण तारामती करारी चेहरा ठेवून त्यांच्याकडे पाहत होत्या. तेवढ्यात दरबारात वर्दी देण्यात आली की राजकुमार आणि सेनानायक, सेनापती बलबाहू येत आहेत. आता महाराजा डबल चक्रावून गेले. बलबाहू आणि एक राजकुमार, सेनापती आहे. त्याने दास म्हणून आपल्या राज्यात आला. आपला विश्वास संपादन केला आणि आता आपल्याला पकडून, आपला घात करून येथे आणले आहे. तेवढ्यात राजकुमार बलबाहू सेनापतीच्या वेशात दरबारात हजर झाला. महाराजा सुकेतूने महाराजा शुकमणी यांना प्रणाम केला. बलबाहूने आपल्या सोबत असे का केले हे स्पष्ट सांगावे व नंतर जी शिक्षा द्यायची ती द्यावी. ती मला कबूल आहे असे सांगितले.

    महाराज शुकमणी काही बोलणार इतक्यात तारामती उठल्या, दादा मला काही बोलायचं आहे. ते बोलू का? महाराजांनी अनुमती दिली, “महाराज सुकेतू मी तारामती, मला ओळखलं असेलचं. मी जेव्हा संभवी श्ऋषीच्या आश्रमात गौपुजनासाठी गेले असता तातच्या सांगण्यावरून तेथे काही दिवस राहून ज्ञानार्जन करावे असे सांगण्यात आले. मी तेथे राहू लागले. तेथील नियमानुसार मी वनकन्येच्या वस्रात राहू लागले. सर्वजण सम दिसावे असे ऋषींचा आग्रह होता. ऐके दिवशी वनात फळे आणावयास गेल्यावर तुम्ही तेथे भेटलात. तुम्ही शिकारीसाठी आला होतात. चार दिवसाच्या भेटीत आमचा तुमच्यावर जीव जडला पण तुम्ही ते मनावर घेतला नाहीत. मला एक वनकन्या समजून गंधर्व विवाहाचं नाटक करून उपभोगून निघून गेलात. खुपदा सांगितले की मी बांदल देशाची राजकुमारी आहे. तेंव्हा तुम्ही हसण्यावरी नेलात. तुम्ही गेल्यावर निसर्गाने आपले काम चोख बजावले. आम्हाला दिवस गेले. आम्ही खरं काय ते ऋषींना सांगितले. त्यांनी ते स्वीकारले. आमच्या तातकडे ही बातमी कळवली. पण तातनी आम्हाला घरी परत न येण्याचा निर्णय सांगितला. आम्ही खूप दु:खी झालो. जीव देण्याचा प्रयत्न केला पण ऋषींनी मला पोटातील अंशाची आठवण करून दिली. तुम्हाला निरोप कळवला पण फायदा झाला नाही. तुम्ही आम्हाला घ्यायला आला नाहीत. पुढे तुमच्या मुलाला खरं कळाले. त्याने अचलादेवींना अनेक निरोप पाठवले पण काहीही फायदा झाला नाही. उलट निरोप्या मारला जाऊ लागला. त्यातच आमच्या तातच निधन झाले. आमचे बंधु शुकमणी यांनी आम्हाला आपल्या देशात परत नेलं. तुमचा मुलगा एक राजकुमार आणि सेनानायक झाला पण तो शांत बसला नाही. तुम्हाला तुमच्या कृत्याची शिक्षा द्यायची आणि आमच्या समोर आणून आमची माफी मागायला लावायची हे त्याने ठरवलं आणि तुम्हाला येथे आणलं”.

    तेवढ्यात बलबाहू पुढे आला, महाराज मी तुमचा पुत्र बलबाहू, मी जेव्हा तेथे आलो तेव्हा कळाले की तुम्हाला आमच्या बाबत कधीच‌ काही कळाले नाही, कारण अचलादेवींनी तुमच्या पर्यंत या गोष्टी येऊ दिल्या नाहीत. उलट आम्हाला मारण्यासाठी त्यांनी कित्येकदा सैन्य पाठवले. त्यांना अजून एक वारस नको होता. सुबाहूला त्यांनीच बिघडवले. त्यांना मारले. त्यांना सेनानायक अमर्त्य सेन मदत करत होते तर सेनापती अंगद हेही आपल्या राज्यावर डोळा ठेवून होते. ते आपल्या करणीने वारले. तुम्हाला आमच्या माता देतील त्या शिक्षा आम्हाला मान्य आहे.

    तारामतीने महाराजा सुकेतू यांना माफ केलं. त्या महाराणी होऊन त्यांच्या राज्यात यायला तयार झाल्या नाहीत. त्या वनवास घेऊन वनात ऋषींची सेवा करण्याचे व्रत घेतले. त्यांना फक्त आपल्या मुलाला न्याय मिळावा ऐवढंच हवं होतं. समाजाने त्यांच व महाराजांच झालेलं लग्न मान्य करावे इतकंच होतं. महाराजांन त्यांच आता प्रेम नव्हतं असं नाही. पण ज्या प्रेमासाठी इतके वर्ष दु:ख भोगावे लागले ते आता जिवनात परत नको असे त्यांना झाले होते. महाराजा सुकेतू यांना साखळ दंडातून सोडवल्या नंतर त्यांनी तारामतीची गुडघ्यावर बसून माफी मागितली. पण तारामती यांनी त्यांना हे शोभत नाही हे सांगितले. महाराजा सुकेतूनेही आपलं राज्य बलबाहूच्या हाती सोपवून तारामती यांच्या सोबत वनवास घेणार हे घोषित केले. पण एकदा तारामती आपल्या देशात यावे, प्रजे समोर त्यांना पत्नी व बलबाहू यास राजकुमार मान्य करू देत ऐवढं वचन मागितले. तारामती यांनी ते मान्य केले.

    इकडे भद्रसेनेला कळाले होते की बलबाहूने महाराजा सुकेतू यांनाही पकडून आणले आहे आणि साखळदंडाने जखडून दरबारात नेले आहे. ती प्रचंड चिडली होती. ती रागाने सर्व वस्तू सर्वत्र फेकत होती. तेवढ्यात राजकुमार बलबाहू येत असल्याची तिला वर्दी आली. बलबाहू, या देशाचा राजकुमार, म्हणजे त्याने आपल्याशी आणि आपल्या राजाशी, देशाशी कपट केले आहे. ती द्वेषाने, घृणेने दरवाजाकडे पाहू लागली. बलबाहू आत आल्यानंतर तिच्या डोळ्यात आग भडकत होती. बलबाहू तिच्या जवळ जाऊन माझं तुझ्यावर‌ खूप प्रेम आहे. मी तुला महाराणी बनवणार, तू कोण हे मी नाही बघणार असं म्हणत तो तिच्या जवळ जात होता. पण भद्रसेनेने आपल्या कमरेला असलेला खंजीर बाहेर काढला आणि स्वतःच्या पोटात खुपसला. बलबाहू भद्रसेने म्हणत पळत गेला आणि खाली पडत असलेल्या भद्रसेनेला आपल्या मांडीवर घेतले. ती आचके देत म्हणाली, शक्य नाही ते मी माझ्या देशाशी आणि राजाशी गद्दारी नाही करू शकत. वेश्या असले म्हणून काय झाले. मी स्वामीनिष्ठ आणि देशनिष्ठ आहे.

    भद्रसेने तू हे काय केलंस ग, मी कोण हे तर‌ जाणून घ्यायचे होतेस. अगं मी महाराजा सुकेतू यांचा जेष्ठ पुत्र आहे गं. सुबाहूचा मोठा बंधु. महाराजांनी आमच्या मातेस सोडले म्हणून आम्ही हे कारस्थान केले. पण मी महाराजांना यांना काहीही केलेलं नाही. आमच्या माता महाराजा सोबत आपल्या देशात येत होत्या. मी हेच तुला सांगण्यासाठी आलो होतो. तू हे काय केलंस. त्या अवस्थेतही भद्रसेनेने बलबाहूच्या पायावर डोके ठेवले आणि प्राण सोडले. केवढी ही स्वामीनिष्ठा, देशनिष्ठा. भद्रसेने सारखी स्री स्वामीनिष्ठ आणि देशनिष्ठ असू शकते याच सर्वांना नवल वाटत होतं. महाराजा सुकेतू यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना आतोनात दु:ख झाले. भद्रसेनेच्या अस्थी घेऊन सर्व जण महाराजा सुकेतू यांच्या देशात परत आले. बलबाहूने भद्रसेनेच्या अस्थी तिच्या महालात, तिच्या दालनात पुरून तिचं छानसं स्मारक बांधले. जेंव्हा जेव्हा बलबाहू यास तिची आठवण येत असे तो तेथे येत असे. महाराजा सुकेतू व तिनी महाराण्या वनवासात निघून गेल्या. बलबाहू भद्रसेनेच्या आठवणीत राज्य करू लागला.

लेखिका - सौ हेमा येणेगूरे, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या