
पावसाच्या आगमनाची चाहूल \ दूर अगदी दूर \ मराठी कविता \ कवी प्रमोद मोहिते
दूर अगदी दूर कुठेतरी
झिमझीम पाऊस बरसत असेल
ओल्याचिंब शिडकाव्यातून
आभाळपक्षी गात असेल
गर्भारल्या मातीचं
डोहाळ पुरं होत असेल
रानपाखरं पंख सावरून
फांदीआड बसले असतील
पानापानांतून... थेंबाथेंबांतून
नव्यानव्याने गात्रागात्रातून
नवे धुमारे खुलत असतील
झोका बांधून आभाळाला
ओळखीच्या रानामध्ये
भावभिजल्या गाण्यामध्ये
मेघराजा गुणगुणत असेल
दूर... अगदी दूर कुठेतरी!!
- प्रमोद मोहिते
मो.नं. ९५ ६१ ७०० ८००
0 टिप्पण्या