Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

मेघा रे, मेघा रे | ललित लेख | श्रीनिवास बेलसरे

पावसाळा, ललित लेख, मेघा रे ,marathi lekh on life,
[मेघा रे, मेघा रे | ललित लेख|megha re megha re |marathi lalit lekh | Marathi article on rainy season ]

मेघा रे, मेघा रे... 

बायबलमध्ये एक वाक्य आहे. ख्रिस्ती भाविक त्याला ‘वचन’ म्हणतात. माणसाने सतत कार्यरत राहावे, उत्साही असावे आळस करू नये अशी शिकवण देण्यासाठी राजे शलमोन यांनी लिहिलेल्या ‘उपदेशक’ या भागातील हे वचन म्हणते,‘जो वारा पाहत बसतो, तो पेरणी करणार नाही, जो मेघांचा रंग न्याहाळत राहतो, तो कांपणी करणार नाही.’ खरेच आहे! पण हे झाले धर्म ग्रंथातल्या उद्बोधक शिकवणुकी विषयी! तरीही इहलोकातले जीवन जगणार्‍या एखाद्या माणसाला जर फक्त ढग न्याहाळत बसायचाच मूड होत असेल तर काय करायचे?

    खरेतर हा ऋतु फक्त ढगच नाही तर कितीतरी गोष्टी न्याहाळण्याचा असतो. पावसाला सुरू होण्याच्या या दिवसात आपण जर गावाबाहेर गेलो, तिथल्या शेतात एखाद्या गर्द सावलीच्या लिंबाखाली किंवा पारंब्यांनी घेरून टाकलेल्या वडाखाली बसलो आणि समोर पाहिले तर लांबच लांब नांगरून पडलेली काळपट तपकिरी रंगाची जमीन दिसते, तिच्यात वेडीवाकडी पडलेली टोकदार ढेकळे, त्यात झुडुपांच्या वेड्यावाकड्या काटेरी पानांचे अवशेष आणि दूर वरची गूढ अनोळखी स्कायलाईन दिसते! खरेतर ते असते शांतपणे जमिनीवर विसावलेले खेड्यातले आश्वस्त आणि आश्वासक क्षितिज!

    या दिवसातले आकाश काही वेगळेच असते. ते नेहमीच्या तटस्थ आकाशासारखे, सगळ्याच गोष्टीपासून अंतर राखून वावरणाऱ्या भावना शून्य शहरी विद्वानासारखे नसते. या दिवसात ते भावुक, ग्रामीण, मनस्वी झालेले असते! खरे पाहिले तर या दिवसात ते आकाश राहिलेच असते कुठे? त्याचे तर केव्हाच ‘आभाळ’ झालेले असते.

    नाटकाच्या फिरत्या रंगमंचासारखे या आकाशातले सीन्स दिवसभर बदलत राहतात. कधी पांढुरके ढग उगाचच इकडून तिकडे धावत सुटतात. तर कधी दिवस-दिवस एखाद्या तपस्व्यासारखे एकाच ठिकाणी ढिम्म बसून राहतात. शिवाय त्यांच्याही किती छटा! स्वच्छ पांढरा कापूस शेतात पिंजून पडल्यासारखे ढग, त्यांचा किंचित फिकट पांढरा भाग, किंवा जुनी गादी उघडून तिचा कापूस उन्हात वाळत ठेवावा तसा गढूळ, काळपट कापसाचा ढीग! कधी त्या पांढऱ्याशुभ्र ढगांना चिकटलेली चंदेरी किनार लक्ष वेधून घेते! त्यावर पडलेली सूर्याची चकचकीत किरणे. त्यातून शेजारच्या ढगात उमटलेली त्याची प्रभा, आणि त्यावर कधी काळसर रंगाची वेडीवाकडी किनार!

    ढग नुसते ढग राहत नसतात या दिवसात, ती माणसाच्या मनात उठणाऱ्या विचारांची प्रतिबिंबे बनतात जवळजवळ! मधेच एखादी पांढर्‍या शुभ्र पक्षांची माळ सावकाश उडत जाताना दिसते आणि पंखावर पडलेल्या किरणांमुळे त्यांच्या कडा सोनेरी बनून चमकत राहतात. कधी एखाद्या विरहिणीच्या मनात दु:ख दाटून यावे तसे आभाळभर गच्च ओले ढग घेरून येतात या दिवसात आणि कितीतरी वेळ नि: स्तब्ध उभे राहतात! तर कधी शेतकर्‍याच्या आशा जिवंत ठेवणारे काळे ढग त्यालाही अनंतकाळापर्यंत तिष्ठायला लावतात. कधी एखाद्या नवख्या चित्रकाराने नुसता अर्धा ओला-कोरडा कुंचला आकाशाच्या कॅनव्हासवरून सहज फिरवावा तसे विरळ पांढरे ढग अनाकलनीय आकृती रेखाटून तरंगत राहतात.

    या दिवसात ढगांकडे पाहत बसणे निरर्थक आहे असे फक्त राजा शलमोनच म्हणू शकतो किंवा पावसासाठी आतुर झालेला बिचारा शेतकरी! जरा निरखून पाहिले तर केवढी प्रचंड उलाढाल सुरू असते आकाश नावाच्या या निळ्यापांढऱ्या छतावर! त्यात लहानपणी कधीकधी वरची म्हातारी आजीबाई दळण घेऊन बसली की विचारूच नका. ती तिच्या गतीने किती पायल्या दळत बसायची कुणास ठाऊक. अंधार पडेपर्यंत तिचे दळण सुरूच रहायचे. मग अचानक सुरू व्हायचा वि‍जांचा कडकडाट! क्षणार्धात एखादी चांदीची पेटलेली रेघ उभी आडवी नाचून क्षणात गायब होऊन जायची. आमच्या कॉलनीत मुरलीधर कल्हईवाला यायचा ना, तो काळपट पडलेली पितळी परात लालभडक होईपर्यंत तापवायचा. मग हातातली जस्ताची कांडी घाईघाईत त्या परतीवरून फिरवायचा. तेंव्हा त्या कांडीची रेघ वितळून अशीच चमकायची क्षणभर! पण तो मुरलीधर वेगळा, हा मुरलीधर वेगळा! घालमेलीचा, घुसमटीचा निचरा होण्याचाही हा ओला ऋतु पूर्वी काय काय न्याहाळत बसायला लावायचा. आतून बाहेरून चिंब करणाऱ्या दोनचार जोरदार सरी पडून गेल्या की शाळेकडे गवत उगवायचे. जवळून एक कॅनॉल वाहत होता. त्याच्या बाजूला तर हे हिरवेगार गवत चांगलेच उंच झालेले असायचे. कसे कुणास ठाऊक नेमके याच वेळी त्या गवतावर पाणघोडे येऊन बसायचे! त्यांचे दिवसभर एकच काम - इकडून तिकडे उडत राहायचे! सायंकाळची तिरपी उन्हे त्यांच्या पारदर्शक पंखांवर पडली की त्यात क्षणभर इंद्रधनुष्याचे सगळे रंग दिसून जायचे. आम्ही त्यांच्या मागेमागे पळत हे इंद्रधनुष्यच न्याहाळत असायचो.

    तेवढ्यात जर मोठी सर येऊन गेली असेल तर कुणीतरी सवंगडी दुरूनच ओरडायचा, ‘ए तिकडे बघ!’ पश्चिम क्षितिजावरून सुरू होणारे आकाशातले खरोखरचे इंद्रधनुष्य अलगद येऊन उत्तरेकडेच्या आकाशात विसावलेले असायचे. ते न्याहाळत बसणे हा तर केवढा आनंद असायचा. मधेच ते पूर्ण धनुष्याकृती दिसायचे तर मधेच त्याचे दोन तुकडे व्हायचे. मधला भाग पुन्हा आकाशाने ताब्यात घेतलेला असायचा! मग पळत जाऊन ते इंद्रधनुष्य आईला नाहीतर लहान भावाला घरातून बाहेर ओढत आणून दाखवायचे!

    शाळा गावाबाहेर होती म्हणून की काय पावसाळ्यातल्या अनेक निवांत गोष्टी त्या बाजूलाच घडायच्या! सायंकाळी आजूबाजूच्या गवतात नितळ पाण्याची डबकी साचलेली असायची. त्यातून पाय भिजवत चालायचे हीसुद्धा एक गंमत होती. पायांना लागलेला चिखल अलगद निघून जायचा आणि पाण्याचा थंडगार स्पर्श खूप सुखद वाटायचा! चालताना होणार्‍या चाहुलीमुळे बेडकांची बोटाएवढी चिमुकली पिल्ले घाबरून इकडून तिकडे धडाधड उड्या मारत पळायची. आम्हाला खूप मजा वाटायची. मधेच कुठेतरी एखादा मोठा बेडूक आपला पिवळ्याजर्द रंगाचा स्थूल देह घेऊन धापा टाकीत अवघ्या जगाला शाप देत बसलेला असायचा. त्याचे वटारलेले डोळे आणि घशाखाली होणारी हालचाल स्तब्ध होऊन आम्ही कितीतरी वेळ पहात रहायचो!

    कधीकधी पावसाची संततधार लागून रहायची. मग घराच्या खिडकीतूनच बाहेरची गंमत बघावी लागे. पाऊस उघडल्यावर मात्र शाळा सुटल्यासारखे आम्ही पाण्यात खेळायला बाहेर पळायचो. झाडावर बसलेले पक्षी नुकतीच अंघोळ झाल्याने स्वत:कडे पहात जसा कुणी भांग पाडावा तसे चोचीने आपलीच पिसे नीट करताना दिसायचे. पाऊस सुरू असताना चिडीचूप बसलेल्या कोकिळा पुन्हा धीट होऊन मोठमोठ्याने ओरडत सुटायच्या. दिवस संपवताना ऑफिसच्या टेबलावरून नजर फिरवून काही राहिले तर नाही ना ते पहावे तसा सूर्य पश्चिम क्षितिजावरील मिळेल त्या झरोक्यातून जगाकडे एक बारीक नजर टाकून घ्यायचा. त्याच्या सायंकाळच्या उन्हाची छटा वेगळीच असायची. सकाळच्या उन्हातला आल्हाददायकपणा तिच्यात अजिबात नसायचा. मावळतीची ही निवालेली शांत किरणे जाता जाता एक गूढ उदासी मात्र सोडून जायची!

    अचानक कुठूनतरी एखाद्या गाण्याची लकेर ऐकू यायची. कुणीतरी हातात चामडी कव्हरमधला ट्रान्झीस्टर घेऊन फिरायला निघालेले असायचे. सगळे विश्व एक सुंदर बाग वाटणाऱ्या आमच्या उत्सुक डोळ्यांना उन्हात ट्रान्झीस्टरची ती दुरून चमकणारी एरियल बघत रहावीशी वाटायची. कधीकधी दोन-चार दिवसांची उघडीप राहिली तर जमिनीचा वरचा एक पापुद्रा वाळून वेगळा व्हायचा. एखाद्या फळाची साल निघावी तशी जमीन उलायाची. आम्हाला काय, आणखी एक खेळ! पायांनी चालत चालत आम्ही त्या सगळ्या वड्या मोडून टाकायचो.

    जुन्या आठवणीत हरवलो असताना आज सहज ‘उपदेशक’ हे पुस्तक आठवले. पण निदान या पावसाळी दिवसात तरी राजे शलमोन यांची शिकवण पाळता येणे शक्य नाही. उलट आता तर अनेकदा गावाबाहेर जायला हवे. निसर्ग सगळीकडे साजरा करीत असलेल्या या ऋतु सोहळ्याची गंमत न्याहाळत बसायलाच हवी! कारण पेरणी असो की कापणी, नेहमी बाहेर थोडीच करायची असते!

    - श्रीनिवास बेलसरे.
      मो.नं. ९९६९९२१२८३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या