Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सदमा | मराठी कथा | सौ.वंदना हुळबत्ते

sadama, Marathi Shocking strory, वंदना अशोक हुळबत्ते
सदमा ... 
    नवीन घराच्या अंगणात मोठ्या हौसेने बाग फुलवली होती. वेगवेगळी फुलझाडे, फळझाडे लावली होती. वेळोवेळी झाडांच्या मुळाजवळची माती सारखी करावी लागे. खत घालावे लागे, एखादं जंतुनाशक फवारावे लागे, ही सारी देखभाल अनुजा करीत असे. आपलं मन बागकामात गुंतवून ठेवत असे. आता ही ती अंगणातील झाडांची पिकली पानं काढून टाकण्यात मग्न होती. तेवढ्यात “काकू, काय करता? येऊ का...मी?” आवाज ऐकू आला. मागे वळून बघते तर दिपासमोर उभी होती. निळी जिन्स्, त्यावर पिवळा टॉप, मानेवर रूळणारे मोकळे केस, हसरा चेहरा किती स्मार्ट दिसत होती. अनुजा तिला बघतच राहिली तिच्याकडे आपण बघतोय हे लक्ष्यात येता ती काहीशी ओशाळली. भानावर येत म्हणाली “ये ना दिपू. ये फार वर्षांनी आलीस, कुठे आहे पत्ता? आम्हाला विसरलीस वाटतं?” “मी कशी विसरेन? लहानाची मोठी तुमच्याच घरात झाले. मागे एकदा सांगलीत आले होते तेव्हा समजले तुम्ही कुठे दुसरीकडे शिफ्ट झाला आहात. आता मी बेंगळुरूला जॉब करते. आजच आले, दोन दिवसांत माझी ऐंगेजमेंट आहे. ही बातमी आधी मा‍झ्या सखीला द्यावी, म्हणून धावत इकडे आले. कुठे आहे विजू? मला भेटायचं आहे तिला. आधी तिच्याशी खूप भांडणार आहे. मला सोडून तिने लग्न केले. मी मावशी झाले. हे ही मला काही कळवले नाही. मी मात्र तिला सोडून लग्न करणार नाही.” दिपा बोलत होती. अनुजाला दिपाच्या जागी विजू दिसू लागली. किती आत्मविश्वास आहे हिच्या बोलण्यात. क्षणभर तिचा हेवा वाटला. आज माझ्या विजूने ही अशीच उंच भरारी घेतली असती. पण प्रारब्धा पुढे कुणाचे चालते. एक मोठा उसासा सोडत अनुजा म्हणाली, “चल पोरी, चल. भेट तुझ्या सखीला” सावकाश पावले टाकत त्या घरातील हॉलमध्ये आल्या, उजव्या बाजू जिन्याने वर गेल्या. दिपा नवीन घर न्याहाळत काकू मागून चालत होती. एका खोली जवळ त्या थांबल्या, त्यांनी हलक्या हातानी खोलीचे दार उघडले तर दारात काही खेळणी पडली होती. ती बाजूला करून आत गेल्या “विजू ऽ विजू ऽ बघ कोण आलं आहे? बघ.. बघ!” हूं नाही की चू नाही. शांत. शून्यात नजर हरवलेली विजू. स्वत:शी बडबडत होती, काही तरी विचित्र हातवारे करत होती, अंगात एक गाऊन अडकवला होता, त्याची ही तिला शुद्ध नव्हती, ती पुढ्यातील बाळाला झोपवत होती. ही.. विजू... आहे? यावर कसा विश्वास बसणार माझा? माझ्या नजरेसमोर शाळा, कॉलेज मधील चुलबुली विजू उभी राहिली. नेहमी हसतमुख असणारी आणि प्रचंड उत्साही विजू. विजू म्हणजे आनंदाचे गाणं, विजू म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत, विजू म्हणजे साक्षात चैतन्य, विजू म्हणजे एक लोभस रेखीव व्यक्तिमत्व. जे रंगमंचावर उभं राहिलं की अख्खा रंगमंच व्यापून टाकणार. सर्वांच्या गळ्यातील ताईत होती. बारावीपर्यंत आम्ही एकत्रच शिकलो. या पाच सहा वर्षांत असे काय झाले? की होत्याचे नव्हते झाले. मी नाही बघू शकत अशी मी हिला, “शू ऽऽ हळू आई, हळू बोल! परी उठेल ना! आताच झोपली ती. उठायला नको.” या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. समोरच्या बाळाला अंगाई म्हणत झोपवत होती. पुन्हा पुन्हा पांघरूण घालत होती. तोंडावरून हात फिरवत होती. तिच्या लेखी त्या खोलीत अजून कोणी नव्हतेच. फक्त ती आणि तिचे बाळ...“दादा आला का? त्याला म्हणावं फाइल काढून ठेव. आज रिपोर्ट दाखवायला जायचं आहे. परीला औषध बदलून देणार आहेत. तो आला की पाठव माझ्याकडे. जा आता. आवाज करू नको. परी उठल्यावर मऊ वरणभात घालते. मला जायला पाहिजे मी आवरते. जा तू..” “तुझी सखी, दिपा आली आहे. बघ तर खरं.” आई सांगत होती तिचे लक्ष नव्हते. हे रुप पाहून आईचे डोळे पाणावले. वेगळी वेदना दिसली डोळ्यात. काहीच उलगडत नव्हते. न कळत मा‍झ्याही डोळ्यात पाणी आले. दोघींनी ते लपवले. दरवाजा पुढे करून आम्ही दोघी खाली आलो. नि:शब्द. काय बोलावे सुचत नव्हते. मला हे सहन होत नव्हते.” हे सगळे असे कसे झाले? हा माझा मूक प्रश्न काकूनी ओळखला त्या म्हणाल्या, “हे..असं दोन महिन्यापासून सुरू आहे बघ. तिची परी तिचे विश्व होते. परी झाली तेव्हा गोरीपान, गुटगुटीत होती, काळेभोर जावळ, इवलीशी जिवणी, गोड हसायची, ती गोड परी सारखी दिसायची. तिला ती परी म्हणू लागली. तीच परी सोडून गेली, हे दु:ख सहन झाले नाही. मोठा सदमा बसला तिच्या मनावर. फुलपाखरा सारखी घरभर फिरभिरणारी परी एकदम अबोल झाली. तिच्या खूप पोटात दुखे. गडबडा लोळायची. सहा सात वर्षांची लहान पोरं ती. तिचे दुःख बघवायाचे नाही. खूप दवाखाने झाले, खूप उपाय केले पण यश आले नाही. तिचा शेर संपला. ती गेली. विजूचे विश्व हरवले. जगण्याची उमेद संपली. हा धक्का ती पचवू शकली नाही. ती रडलीच नाही. त्या दिवसांपासून आज पर्यंत परी आहे, हे समजून जगत आहे. पोरीची ही घालमेल बघवत नाही.”

“तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही? औषधपाणी केले नाही?”

“फॅमिली डॉक्टराचे औषध सुरू आहे. खरंतर काळ हेच औषध मोठे आहे. होईल बरी. वाट बघायची.”

“माफ करा ‘लहान तोंडी मोठा घास घेते’ मला वाटते तिची ट्रीमेंट चुकीची आहे. तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवले पाहिजे. ती निश्चित बरी होईल.”

“ती वेडी नाही. तिला वेड लागले नाही. जरा भ्रमात आहे. हळूहळू येईल मार्गावर. लोक काय म्हणतील?”

“तुम्ही कसेही वागा. लोक काय नेहमी बोलत असतात. त्यांना फक्त निमित्त हवं असतं. काकी तुम्ही झाडे लावता, ती निरोगी रहावीत, चांगली फुलावीत म्हणून त्यांची काळजी घेता, त्यावर जंतुनाशक फवाराता. माणसाच्या मनाचेही तसेच आहे ते निरोगी रहावे म्हणून हे मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतात. आपल्या मुलीचे भविष्य महत्त्वाचे.”

“मला तर काही सुचत नाही. विजूचे बाबा तर स्वत:ला दोष देत आहेत. एकसारखे ढसाढसा रडतात. माझ्यामुळे वाटोळे झाले पोरींचे म्हणतात. मी तर काय काय बघू? नवऱ्याची समजूत घालू की लेकीला धीर देऊ, का लेकाचे भविष्य सांभाळू? माझे दुःख मला व्यक्तही करता येत नाही. काय करू मी?” हुंदका फुटला त्यांना. मी सावरले.

“तिचे मिस्टर... त्यांची मदत.. झाली नाही.”

“ते मोठे रामायण आहे.” ती कहाणी सांगते ऐक. सविस्तर कथा सांगितली. ती ऐकून मी हादरले. आता त्या माऊलीची दया येऊ लागली.

“मी आहे ना? काळजी करू नका. चार दिवसात भेटते. बघू काय करता येते. तुम्ही खंबीर व्हा. येते मी.”

विजूचा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. बालपणीचे सुंदर दिवस पुन्हा पुन्हा फेर धरून नाचत होते. दिपाच्या मैत्रिणीची मोठी बहीण मानसोपचारतज्ज्ञ होती. तिची भेट घेतली. केस समजावताना म्हणाली, “मी एक गोष्ट सांगणार आहे. ती अदम जमाण्याची नाही. ऐकवीसाव्या शतकातील आहे. आताची... अगदी आत्ताची आहे... विश्वास बसणार नाही. पण सत्य आहे. माझ्या सखीची आहे. विजयाची गोष्ट. सगळे तिला विजूच म्हणतात. एका अल्लड पोरीची. ती अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीची, सगळ्या क्षेत्रात आघाडी. सर्वांना हवीहवीशी वाटणारी, देखणी. तिची पॅशन नाटक. नाटकासाठी ठार वेडी. बारवीत ही तिने राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला. यश मिळवलं. बारावी नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. तिने इथं महाविद्यालयात प्रवेश घेतला. तरी तिचे नाटक सुरू. तिच्या नाटकाचा हिरो अतुल. एका नाटकात ते दोघे काम करत. स्पर्धेच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या ठिकाणी जात, सतत प्रॅक्टिस, सतत सहवास, बरोबर हिंडणे फिरणे, अतुल तिला आवडू लागला. त्यांचे प्रेम फुलले. ऐके दिवशी तिने घरी जाहीर केले मी अतुलशी लग्न करणार. तिच्या बाबांचा नाटकात काम करण्यास विरोध नव्हता. पण आपल्या मर्जीने विजूने आपले लग्न ठरवावे? ते ही परक्या जातीतील मुलाशी? हे काही पटले नाही. घरात मोठे वादळ उठले. तिला विरोध झाला, तिने बंड केले. ते मोडून काढले. तिची आई मध्ये पडली तर तिला बाबा म्हणाले “माझं ऐकायचे नसेल तर तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस.” तिची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ झाली. मी म्हणेन तसेच या घरात झाले पाहिजे. हा हेका धरला. विजूचे पंख कापले गेले. शिक्षण बंद झाले, बाहेर फिरणे बंद, मी सांगेन त्या मुलाशी लग्न करावे लागणार. असा वटहुकूम जाहीर झाला. वर संशोधन सुरू झाले. चार पाच मुले बघून गेली. सर्वांना तिने पसंती दर्शवली. माझ्या मना विरुद्ध लग्न आहे, मग तो काळा काय अन् गोरा काय? शिकलेला काय अन् न शिकलेला काय? काय फरक पडतो? आयुष्य उधळूनच द्यायचे तर पसंती हवी कशाला? ही तिची भावना. खरं तर अतुल सुसंस्कृत, शिकलेला, नोकरी करणारा. उमदा गडी होता. दोघांची जोडी जेव्हा रंगमंचावर येई तेव्हा प्रेक्षकांनाही त्यांचा क्षणभर हेवा वाटे. अशा अतुलला केवळ दुसऱ्या जातीचा म्हणून बाबा डावले. त्यांचे विजूवर प्रेम होते. विजू म्हणाली असती तर एका मिनिटात तो पळून जाऊन लग्न करायला तयार होता. पण लग्न केले तर बाबांच्या आशीर्वादाने करावे असे तिला वाटे कारण विजूचे बाबांवर विलक्षण प्रेम होते. त्यांच्यासाठी तिने प्रेमाचा त्याग केला. बाबांचा अपमान होईल, त्यांची मान शरमेनं खाली जाईल असे मी करणार नाही. ते म्हणतील त्या मुलाशी मी डोळे झाकून लग्न करेन असे सांगून टाकले. अतुल लग्नात खोडा घालेल म्हणून एक सुरतचे श्रीमंत स्थळ आले होते. त्याला होकार कळवला. त्यांच्याशी बोलणी झाली. अगदी जवळचे आठ दहा नातेवाईक घेऊन ते सूरतला गेले आणि लग्न करून आले. स्पष्ट शब्दात सांगायचे तर मुलीला जिवंत गाडून आले.

    स्वप्न उध्वस्त झालेले. विजू हसत तर होती, पण त्या हसण्यात प्राण नव्हता. तिच्या स्वागतासाठी सगळी हवेली सजवली होती. भानुदासच लग्न ठरता ठरत नव्हतं तिशी उलटलेली. घोड नवरा तो आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर मुलगी सून म्हणून मिळाली होती. जास्त खोलवर कोणीच कुणाची चौकशी केली नव्हती. नवऱ्याकडील मंडळी खूश होती. गुलाबाच्या पायघड्या घातल्या होत्या. जखमी मनाला त्या कुठे शांत करणार होत्या? सर्व भिंतींना सुवासिक फुलांच्या माळा सोडवल्या होत्या, हातात मिठाईचे तबक घेऊन माणसांची लगबग सुरू होती. सगळीकडे चैतन्य. हीचे मन मात्र उदास होते चेहऱ्यावर उसने हसू आणत होती. मनाला बजावत होती. आता माघार नाही. मी इथं मेले तरी सांगलीला जाणार नाही सजवलेल्या फुलदाणी प्रमाणे स्वत:ला त्या घरात फुलवत होती. सजवत होती. सजवलेल्या पलंगाकडे जाताना पायांना कंप सुटला. तरी सामोरी गेली. मनात कोणताही आनंदाचा उमाळा नसताना मनाविरूद्ध नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. करत राहिली. घरच्यांनीही ती लहान आहे म्हणून सांभाळून घेतले. ती हळूहळू घरात मिसळली. निसर्गाने तिला मातृत्व बहाल केले. ते तिने स्वीकारले. ज्या विसाव्या वर्षी बहरायचे, फुलायचे, जीवनाला नवीन वळण द्यायचे, त्याच विसाव्यावर्षी ही मातृत्वाच्या ओझ्याने वाकून गेली. बाळतंपणासाठी ही माहेरी जाणे टाळले तिने. तिला जुन्या आठवणी पुसायच्या होत्या. या दोन वर्षात कधी तर एकदाच बाबा घरी येऊन गेले.

    सारं बरं चाललं होतं. हे ही नियतीला बघवले नाही. ऐके दिवशी भानुदास डोके धरून घरी आला. फार अस्वस्थ होता. दवाखान्यात नेहले औषधपाणी केले. पण गुण येईना. वेगवेगळ्या चाचण्या केल्या शंभर उपचार झाले. शेवटी निदान कॅन्सरचे आले. बघता बघता माणूस अंथरुणावर खिळला. त्यांची सेवा केली. अखेर तो गेला. दु:खाचा डोंगर कोसळला, खेळ मांडण्याआधी विस्कटला, त्यांचे आजारपण सासरच्या लोकांनी लपवले वर हिलाच पांढऱ्या पायाची ठरवले. आता पोरगी हाच एक धागा उरला. यावर उभे आयुष्य काढावे लागणार. ही बातमी समजल्यावर आई-वडील आले यांनी सासरच्या मंडळींना जाब विचारला. पैसापाणी कमी नव्हता पण आता बाबांना विश्वास नव्हता. त्यानी भांडण काढून पोरीला आणले. परीत रमली सावरली, पुढच्या शिक्षणासाठी अॅडमिशन घेतली. नवऱ्याच्या फंडाची, विम्याची रक्कम मिळाली. तिने ते पैसे बाबांना दिले त्यातून नवीन घर बांधायला लावले. परी आता शाळेला जायला लागली. ही मन रमवण्यासाठी जॉब करत होती. हे ही सुख नियतीला बघवले नाही. हसती खेळती परी अल्पशा आजाराने गेली तेव्हा खरी ती तुटली. अशी तुटली की पुन्हा जोडण्याची, उभारण्याची तिची इच्छा नाही. मनाच्या पार चिंध्या झाल्या. त्या शिवता येणार नाहीत. मी खूप आशेने आले आहे. माझ्या मैत्रिणीच दान मा‍झ्या पदरात घालाल.”

    या जगात अशक्य काही नाही. प्रयत्न करण्याची तयारी हवी. एवढे आघात लहान वयात सहन करणं सोपे नाही. यासाठीच लग्न करताना घाई करू नये. इथं मुलीची परिपक्वता महत्त्वाची. आता कोण बरोबर कोण चूक हे बघण्यात अर्थ नाही. यातून मार्ग काय काढता येईल हे पाहणे महत्त्वाचे. तुझे पहिले अभिनंदन करते. ही केस योग्य ठिकाणी आणलीस या बद्दल. आज होतं काय, लोक शरीराच्या आजारांवर औषधपाणी करतात, तो आजार मानतात पण मनाचं काय? हा आजार आहे हे मान्य करत नाहीत. मग कुठे देव देव करत बसतात, कुठे हलक्या डोक्याची ठरवतात, उतारे धुपारे करतात. एक जीव बरबाद करून सोडतात. स्वत: बदलत नाहीत दुसर्‍याला बदलू देत नाहीत. योग्य औषधाने हे आजार बरे होतात. प्रथम तिच्या आई-वडि‍लांना घेऊन ये. मी बोलते त्यांच्याशी त्यांची साथ महत्त्वाची आहे. नंतर दोन दिवसांनी मैत्रिणीला भेटते.”

    दिपाने विजूच्या आई-वडि‍लांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेहले. तिचे समुपदेशन केले. मैत्रिणी ट्रिटमेंट सुरू झाली. तिला औषध दिले. दिपाने आईला सांगितले मी जाते आता हिची खुशाली कळवा.

    वर्षे झाले असेल, आईचे पत्र आले होते. शेवटच्या दोन ओळी ती पुन्हा पुन्हा वाचत होती. “विजूने परवा भिंतीवर चित्रे काढली ती रंगवली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नाटक बघायला पण गेली.”

- सौ.वंदना अशोक हुळबत्ते, सांगली
  मो.नं.९६५७४९०८९२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या