Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सेंड ऑफ | मराठी कथा | दीपक तांबोळी

Send off Marathi story, Marathi katha,
नोकरीच्या शेवटच्या दिवसाची काळजाला भिडणारी कथा ‘सेंड ऑफ’

सेंड ऑफ...

“फक्त सात दिवस...” समोरच्या कॅलेंडरकडे पाहत मकरंद पुटपुटला. आजकाल असेच तो दिवस मोजत होता. याची सुरुवात खरंतर मागच्या वर्षीच झाली होती. पण त्यावेळी तो महिने मोजत होता. आता मात्र एप्रिल महिना सुरू झाल्यापासून त्याने दिवस मोजायला सुरुवात केली होती. साहजिकच होतं कारण बरोबर सात दिवसांनी म्हणजे ३० एप्रिलला तो निवृत्त होणार होता. मागच्या डिसेंबरमध्ये त्याचा एक सहकारी रिटायर झाला तेव्हा एक मोठा निरोप समारंभ झाला होता. हारतुरे, गिफ्ट्स, खाणं पिणं, ती स्तुतिपर भाषणं यांची नुसती रेलचेल होती. खरंतर त्याचा सहकारी रागीट आणि तुसड्या स्वभावामुळे कर्मचार्‍यांमध्ये थोडासाही प्रिय नव्हता. पण निरोप समारंभाची जनरीत पाळणं महत्त्वाचं होतं. शिवाय मोठ्या साहेबांची ऑर्डर त्यामुळे इच्छा नसली तरी निरोप समारंभाचा कार्यक्रम करणं आवश्यक झालं. मकरंद तर त्याच्याच नाही तर इतरही डिपार्टमेंटमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे आपला निरोप समारंभ यापेक्षाही दणकेबाज होणार अशी ह्याला खात्री होती. ३० एप्रिलच्या आधी सर्व कर्मचारी, सहकारी, अधिकारी वर्गाला तो एका चांगल्या हॉटेलात जंगी पार्टी देणार होता. त्याने हॉटेलही पाहून ठेवलं होतं. विश्वासातल्या काही लोकांशी चर्चाही करून ठेवली होती. या कार्यक्रमासाठी नागपूरहून आपल्या कुटुंबियांना बोलावून तो त्यांची सगळ्यांशी ओळख करून देणार होता. निरोप समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना आपण काय भाषण द्यायचं याचीही त्याने मनातल्या मनात कित्येकदा उजळणी केली होती. किती किती स्वप्नं बघितली होती. पण मार्चमध्ये कोरोना भारतात दाखल झाला. भारतात तो फारसा संक्रमित होणार नाही असं वाटत असतानाच त्याने वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली. मग लॉकडाऊन जाहीर झालं. संचारबंदीचे नियम कडक झाले. सगळ्या कार्यक्रमांवर बंदी आली. सोशल डिस्टंसिंग आलं. पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. पहिला लॉकडाऊन संपून सगळे व्यवहार सुरळीत होतील मग आपल्या कार्यक्रमाला अडचण येणार नाही अशी आशा याला वाटू लागली. पण हाय रे दैवा! कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच गेली. हा हा म्हणता कोरोना सगळ्या देशात पसरला. सोलापूरही त्याला अपवाद ठरलं नाही. पहिल्यानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा त्याच्या लक्षात आलं आता आपला निरोप समारंभ होणं शक्य नाही. काय विडंबना होती बघा, भ्रष्ट, काम न करणाऱ्या, हाताखालच्या कर्मचार्‍यांचा छळ करणाऱ्या अधिकार्‍यांचे सेंड ऑफचे कार्यक्रम झोकात पार पडले होते आणि ह्याच्यासारखा प्रामाणिक, कष्टाळू, लोकप्रिय अधिकारी निरोप समारंभाविनाच निवृत्त होणार होता. खूप मोठी रूखरूख त्याच्या मनाला लागून राहिली होती. पण ईलाज नव्हता. “सर आत येऊ?” त्याची तंद्री भंगली. त्याने दाराकडे पाहिलं. ऑफिस सुप्रीटेंडंट देवळे आत येण्याची परवानगी मागत होते. “या या देवळे” देवळे टेबलपाशी आले. एक फाइल त्याच्या पुढ्यात ठेवून म्हणाले, “साहेब सही हवी होती” “काय आहे हे?” “आपला ठेकेदार पोपटाणीने काम पूर्ण केलं. त्याच्या बिलांवर सही हवी होती” त्याने डोळ्यांवर चष्मा चढवला. टेबलवरचं पेन उचलून समोरच्या कागदपत्रांवर क्षणभर नजर टाकली. सही करण्यासाठी हात उचलला तसे देवळे घाईघाईने म्हणाले, “थांबा साहेब. एकदा नीट वाचून घ्या. ठेकेदाराने खरंच काम पूर्ण केलंय की नाही ते इंजीनियरला विचारून पहा” तो थबकला. त्याला स्वत:वरच आश्चर्य वाटलं. नेहमी व्यवस्थित वाचून, समजून, उमजूनच कोणत्याही कागदपत्रांवर सही करणारे आपण सध्या काही न बघताच सह्या का करतोय? त्याने मोबाइल उचलून साईट इंजीनियरला फोन लावला, “सुर्यवंशी ह्या पोपटाणीचं काम पूर्ण झालं का?” “नाही सर, अजून वीस पंचवीस टक्के काम बाकी आहे. फिनिशिंग तर सगळंच बाकी आहे” “मग तुम्ही तुमच्या सह्या करून फाइल कशी पाठवलीत?” “सर मोठ्या साहेबांचा फोन होता. तुम्ही तीस तारखेला रिटायर होणार आहात. तुमच्या नंतर जे साहेब येतील ते कदाचित लवकर बील पास करणार नाहीत म्हणून तुम्ही जाण्याच्या आत साहेबांना ते बील तुमच्याकडून पास करून घ्यायचं होतं” “असं होय!” सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. “ठीक आहे. मी येतो उद्या साईटवर काम बघायला. मग बघू बिलाचं” “हो साहेब” फोन कट करून त्याने देवळेंकडे कृतज्ञतेने पाहिलं. सही न करता फाइल बंद करून परत देवळेंकडे देत तो म्हणाला, “थँक यू देवळे” देवळे हसले. “साहेब रिटायरमेंट जवळ आली की माणसाचं मन थाऱ्यावर राहत नाही. त्याचं कामात लक्ष लागत नाही. अशावेळी नको त्या कागदपत्रांवर अजाणता सह्या केल्या जातात याचे अनुभव आहेत आम्हाला. पाच वर्षांपूर्वी मेटकर साहेबांनी अशीच न बघता सही केली होती. फार मोठं व्हिजीलन्सचं प्रकरण झालं होतं. दोन वर्ष मेटकर साहेबांना सेटलमेंटचा एक रुपयासुद्धा मिळाला नाही आणि त्यांचं पेन्शनही सुरू झालं नाही. दोन वर्षांनी ते मिळालं आणि पंधरा दिवसातच मेटकर साहेब अटँकने गेले” “बापरे! त्यावेळी तुम्ही नव्हता का?” “मी नेमका सुटीवर होतो. ज्युनियर क्लार्कने त्यांची सही घेतली होती” तो शांत बसला. देवळेंनी त्याला मोठ्या संकटातून वाचवलं होतं.

    दुसऱ्या दिवशी मोठ्या साहेबांनी त्याला बोलावून घेतलं. “कापडे तुम्ही त्या पोपटाणीचं बील अॅप्रुव्ह नाही केलं?” “साहेब काम तर पूर्ण होऊ द्या. अजून बरंच काम बाकी आहे” “साईट इंजीनियर सुर्यवंशींनी तर सही केलीये. मग तुम्हाला घाबरायचं काय कारण?” “साहेब फायनल अॅथाँरिटी तर मी आहे. चार-पाच दिवसात पोपटाणीला काम पूर्ण करायला सांगा. मग करतो सही” साहेबांनी नाराजीने त्याच्याकडे पाहिलं, “कापडे तुमच्या अशा आडमुठेपणामुळेच तुम्ही मागे राहिलात. नाहीतर कुठल्याकुठे पोहचला असता” त्या “कुठल्याकुठेचा” अर्थ त्याच्या लक्षात न येण्याइतका तो मूर्ख नव्हता. पण अशा “कुठल्याकुठे” पोहचणाऱ्यांचे कधीकधी हाल अतिशय वाईट होतात हेही तो जाणून होता. साहेबांशी वाद घालण्याचा त्याचा मूड नव्हता. तो चूप राहिला. दोन दिवस निघून गेले. रविवारी सुट्टी असतानाही तो ऑफिसमध्ये येऊन बसला. सरकारी बंगल्यामध्ये त्याला करमत नव्हतं. घरच्या आठवणींनी तो कासावीस होत होता. ऑफिसमध्ये दोन चार फाइल हाता वेगळ्या केल्यावर त्याला काम करायची इच्छा होईना. त्याचं काम तसं परफेक्ट होतं. कोणतंही काम झटपट मार्गी लावण्यासाठी तो जिवाचं रान करायचा. म्हणूनच तो सगळ्यांमध्ये लोकप्रिय होता. खरं तर मोठ्या साहेबांच्या जागी त्याचीच वर्णी लागायची पण त्याने प्रमोशन नाकारलं. प्रमोशन झालं म्हणजे जबाबदाऱ्या वाढणार. रिस्क वाढणार. पैसा मिळाला असता पण पैशाची त्याने कधीच पर्वा केली नव्हती. मिळणाऱ्या पगारात तो समाधानी होता. अशीही त्याला कशाची कमतरता नव्हती. मुला मुलीचं लग्न होऊन गेलं होतं. मुलगा चांगल्या नोकरीत होता. एका बँकेत नोकरी करणारी त्याची बायको व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन नातवंडात रमली होती. तो सुखी आणि समाधानी होता. भ्रष्टाचार करून अतिरिक्त पैसा कमावण्याची त्याला हौस नव्हती. तो स्वत:ही दोन नंबरचं खात नव्हता आणि कुणाला खाऊ देत नव्हता. अर्थातच अनेक अधिकारी आणि कर्मचारीही त्याच्यावर नाराज होते.

    त्याने टेबलवरची बेल वाजवली. शिपाई आत आला, “बोला साहेब” “सुनील एक लेमन टी बनव. तुझ्यासाठी दुधाचा चहा बनवून घे.” शिपाई खूश झाला. दुसरे अधिकारी कधीही शिपायाला चहा पाजत नाहीत हे त्याला माहित होतं. त्याने लेमन टी बनवून कप टेबलवर ठेवला आणि स्वत:चा कप घेऊन बाहेर जाऊ लागला, “अरे कुठे निघालास? बस इथेच” “नको साहेब. तुम्ही गेल्यावर नवीन साहेबासमोर असा चहा पीत बसलो तर हाकलून देतील मला. नको. ती सवयच नको” “बरं बरं. कमीत कमी उभा तर राहशील?” शिपाई उभा राहिला. “साहेब देवळे बाबुजी सांगत होते तुमचा सेंड ऑफ होणार नाही म्हणे?” शिपायाने नको तो विषय काढला होता. त्याच्या मनावर एक मोठा ओरखडा उमटला. “या कोरोनामुळे काय करता येणार आहे? मी तुम्हा सर्वांना जेवण देणार होतो. तो बेतही कॅन्सल करावा लागतोय बघ” “चांगल्या माणसांचं नशीबही कसं वाईट असतंय बघा. मागल्या वर्षी ते सिंग साहेब रिटायर झाले. लय बेक्कार माणूस” बोलता बोलता त्याने तोंडाकडे अंगठा आणि मग नाकावर बोट दाबलं, “पण सेंड ऑफ लई झक्कास झाला” तो काही बोलला नाही पण त्याच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागून राहिली.

    गुरुवार उजाडला. आज त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस. सकाळपासूनच तो भुतकाळातल्या आठवणींनी अस्वस्थ होता. या नोकरीतला पहिला दिवस त्याला आठवला. नोकरी लागल्यामुळे आईवडिलांचे, भावाबहिणींचे आनंदाने फुललेले चेहरे आठवले. प्रत्येक प्रमोशनवर आणि राजकारण्यांच्या अवकृपेने झालेल्या वारंवार बदल्या आठवल्या. नवीन ठिकाणावरची नवीन माणसं. त्यांच्याशी मिळतं जुळतं घेताना झालेली तारेवरची कसरत. भ्रष्ट अधिकार्‍यांशी हा‍तमिळवणी न केल्यामुळे दोन वेळा झालेलं निलंबन. मग पाठीमागे लागलेल्या चौकश्या. अधिकार्‍यांच्या मर्जीतल्या नालायक लोकांना खंडीभर पुरस्कार मिळत असताना पूर्ण नोकरीत पात्र असतानाही एकही पुरस्कार त्याला मिळाला नव्हता. बायकोच्या नोकरीमुळे तो मुला बाळांना नोकरीच्या ठिकाणी कधीही घेऊन जाऊ शकला नव्हता. आणि त्याच्या इमानदारीमुळे दुखावलेल्या अधिकार्‍यांनी बदली होणं शक्य असतानाही कधीही त्याला नागपूरला जाऊ दिलं नव्हतं. मुलं मोठी होत असताना त्यांना पहाण्याचा आनंद त्याला त्यामुळे कधीच घेता आला नव्हता. प्रमोशन मिळण्याचा आनंदही तो कधी कुटुंबासमवेत शेअर करू शकला नव्हता. सगळ्या आठवणींनी त्याला मध्येमध्येच गहिवरून येत होतं. आनंदाची एकच गोष्ट होती की तो आता आपल्या कुटुंबात पोहचणार होता. पण तो आनंदही निर्भेळ नव्हता. नागपूरला गेल्या गेल्या त्याला चौदा दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार होतं. त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला नाही तरच त्याला घरी जाऊ दिलं जाणार होतं.

    तो ऑफिसामध्ये पोहचला. लॉकडाऊनमुळे कर्मचारी वर्ग एक दिवसाआड ऑफिसात येत होता. आज नेमका तो येणार नव्हता. त्यामुळे ऑफिसमध्ये तुरळक उपस्थिती होती. त्याच्या जागी आलेला अधिकारी त्याला भेटला. चार्ज देण्या घेण्याच्या पत्रावर दोघांनी सह्या केल्या. या सगळ्यात दुपार उलटून गेली. दुपारी चार वाजता पर्सनल डिपार्टमेंटचे अधिकारी त्याचा सेटलमेंटचा चेक घेऊन आले. देवळे आले होते. सुनील शिपाई उपस्थित होता. मोठ्या साहेबांनी आणि दुसर्‍या अधिकार्‍यांनी कोरोनाचं कारण सांगून यायचं टाळलं. त्याच्या केबिनमध्येच फक्त पाच जणांच्या उपस्थितित निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून कुणीही त्याच्या हातात हात मिळवला नाही. मास्क घातलेल्या चेहर्‍यांवर कोणतेही भाव त्याला दिसले नाहीत. ना कसले हारतुरे ना मिठाई ना कोणत्याही गिफ्ट्स ना ती भावविभोर करणारी भाषणं. एकदम मिळमिळीत असा तो निरोप समारंभ होता. पंधरा मिनिटातच तो केबिनच्या बाहेर आला. बाहेर निघताना त्याने पाहिलं. त्याच्या नावाची पाटी काढून त्याच्या जागी आलेल्या नवीन अधिकार्‍याच्या नावाची पाटी लागली होती. सरकारी कामात इतकी तत्परता की आपल्याला हाकलून देण्याची घाई? त्याला हसूही आलं आणि दु:खही झालं. जड अंत:करणाने तो ऑफिसच्या बाहेर आला. ड्रायव्हरने दार उघडता उघडता त्याला विचारलं, “कसा झाला साहेब सेंड ऑफ?” “कसला सेंड ऑफ आणि कसलं काय? चेक घेतला आणि आलो” “तुमच्या सेंड ऑफची आम्ही पण वाट बघत होतो साहेब. आपला सगळा ड्रायव्हर स्टाफ तुम्हाला काहीतरी गिफ्ट घेऊन देणार होता. पण काय करणार? या कोरोनाने सगळंच बिघडवलं बघा साहेब” त्याने बळेच एक स्मित केलं. गाडीत बसता बसता त्याने ऑफिसकडे पाहिलं. या वास्तुशी आणि विभागाशी त्याचा संबंध आता कायमचा तुटला होता. त्याला एकदम भडभडून आलं. कोर्टात घटस्फोट झाल्यानंतर वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या पती पत्नीसारखी ही ताटातूट आहे असं त्याला वाटून गेलं. बंगल्यावर त्याचा स्वयंपाकी मुरलीने बहुतेक सामानाची बांधा बांध करून ठेवली होती. फक्त चहाची, स्वयंपाकाची भांडी उरली होती. ती तो मुरलीलाच देऊन टाकणार होता. त्याने मुरलीला चहा बनवायला सांगितलं आणि तो सोफ्यात जाऊन बसला. एक विचित्र रिक्तपणा त्याला जाणवत होता. ते सकाळी लवकर उठणं, मॉर्निंग वॉकनंतर ऑफिसाला जायला तयार होणं. निघेपर्यंत डझनावारी फोन येऊन गेलेले असत. ऑफिसमध्ये क्षणभरही दुसरा विचार करायची फुरसत नसायची. ऑफिसची वेळ संध्याकाळी सहापर्यंत असली तरी तो सात साडेसातपर्यंत बसलेला असायचा. बंगल्यात परत आल्यानंतरही सतत फोन सुरू असायचे ते थेट अकरापर्यंत. आता ते सगळं बंद होणार होतं. या कामामुळे त्याला कुणी मित्र नव्हते. अशीही मैत्रीची व्याख्या सध्या बदललेली. चिकन, मटण खाणाऱ्या, तंबाखू, दारू यांची व्यसनं करणार्‍यांची, पैसे लावून रमी खेळणाऱ्यांची अनेक जणांशी मैत्री असते. हा तर पक्का शाकाहारी, निर्व्यसनी माणूस. पत्ते कधी हातात न घेतलेला. जगाच्या दृष्टीने अरसिक, बिनकामाचा, कंटाळवाणा. “३९वर्षाच्या इमानदारीने केलेल्या नोकरीचं हे फळ? इतका मिळमिळीत, भावनाहीन शेवट?” मुरलीने आणलेला चहाचा घोट घेत त्याच्या मनात विचार आला. “आपल्यापेक्षा तर शिपायांचे आणि कारकून लोकांचे सेंड ऑफ चांगले होते” त्याने एक दीर्घ निःश्वास सोडला. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब पडले. मनातले विचार दूर करण्यासाठी त्याने सकाळची वर्तमानपत्र वाचायला हातात घेतली पण ते वाचण्यातही त्यांचं मन लागलं नाही. चहा पिऊन झाल्यावर त्याने ट्रान्सपोर्टला फोन लावला. उद्या नागपूरला सामान घेऊन जाण्यासाठी ट्रक येणार की नाही याची खात्री करून घेतली. तो स्वत:च्या गाडीने उद्या सकाळीच निघणार होता. सात वाजले. तो विचार करू लागला. त्याच्या हाताखालच्या एकाही इंजीनियरने त्याची भेट घेतली नव्हती किंवा साधा फोनही केला नव्हता. इतकं सगळ्यांशी चांगलं वागूनही लोकांनी साध्या शुभेच्छा देण्याचंही सौजन्य दाखवलं नव्हतं. काय कारण असेल? कोरोनाची भीती की कुणाला पैसे खाऊ दिले नाहीत याचा राग? की मोठ्या साहेबांनीच त्यांना तसं करू दिलं नसेल? मोठ्या साहेबांशी त्याचं कधीच पटलं नाही त्याचा सूड तर त्यांनी अशा पद्धतीने घेतला नसेल? एक मात्र खरं की खुर्ची आहे तोपर्यंत माणसाला मान. खुर्ची गेली की कोण कुणाला विचारतंय. सरकारी खुर्चीचा तर हाच कायदा होता, “जाऊ द्या. आपलं नशीबच वाईट” मनाशी पुटपुटून त्याने एक निश्वास सोडला. फोन वाजला. बायको होती. सेंड ऑफ कसा झाला विचारत होती. काय उत्तर देणार होता तो? मग मुलगा, सून दोघंही बोलले, “उद्या सकाळीच निघतोय” असं सांगून त्याने फोन बंद केला.

    “साहेब सुर्यवंशी साहेब आलेत” मुरली म्हणाला तशी त्याची तंद्री भंगली. त्याने दाराकडे पाहिलं. सुर्यवंशी हातात बुके घेऊन उभा होता, “या या सुर्यवंशी” सुर्यवंशी चेहर्‍यावर मोठं हसू घेऊन आत आला.” सॉरी साहेब आज आपल्या ऑफिस मधला एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे सिक्युरिटीने ऑफिसमध्ये येऊच दिलं नाही. आम्ही सगळेच इंजीनियर्स, सुपरव्हायझर्स आलो होतो तुम्हाला भेटायला” “असंय का? पण मग मला कसं कळलं नाही?” “तुमचा आजचा शेवटचा दिवस. तुम्हाला बॅड न्यूज कशाला द्यायची म्हणून कुणी सांगितलं नसेल. असो. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर” बुके हातात देत सुर्यवंशी म्हणाला, “थँक्स” “एक मिनिट सर” अचानक तो बाहेर गेला आणि परत आला तेव्हा त्याच्या हातात एक छानशी ब्रिफकेस होती, “सर माझ्याकडून छोटीशी भेट” “याची काय गरज होती सुर्यवंशी?” “असं कसं म्हणता सर? तुम्ही आमच्याशी नेहमीच फ्रेंडली वागलात. आमच्याकडून चुका झाल्या तरी त्या पोटात घातल्या. कधी मेमो दिले नाहीत...” सुर्यवंशींला एकदम गहिवरून आलं. मग टेबलवर ठेवलेल्या ग्लासातल्या पाण्याचे दोन घोट पिऊन त्याने स्वतःला सावरलं, “तुम्ही जाणार या कल्पनेनेच कसंतरी होतंय सर” “थँक्यू सुर्यवंशी” मग सुर्यवंशी एकदम उभा राहिला. हात जोडत म्हणाला, “सर मी येऊ? बाहेर आपले सर्व इंजीनियर्स आणि सुपरव्हायझर्स उभे आहेत. जमाव करायचा नाही म्हणून एकेकाला सॅनिटाईझ होऊन आत यावं लागतंय. मी एकटाच बोलत बसलो तर सगळ्यांना उशीर होईल.” “बरं बरं” “सर पुन्हा एकदा पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा” तो गेला आणि एका पाठोपाठ इंजीनियर्स आणि सुपरव्हायझर्स येऊ लागले. प्रत्येक जण काही ना काही गिफ्ट घेऊन आला होता. इतरही डिपार्टमेंटचे इंजीनियर्स आले होते. सगळेच त्याच्या वागण्याची, स्वभावाची स्तुति करत होते. त्याच्यासारखा अधिकारी परत कधी होणार नाही याचा सतत उल्लेख करत होते. ते निघून गेल्यावर तो मुरलीला म्हणाला, “आता कुणी नाही ना? नसेल तर स्वयंपाकाला लाग. मला भूक लागलीये” मुरली हसला, “साहेब आज काही तुम्हाला लवकर जेवायला मिळत नाही. बाहेर ही ऽऽ मोठी लाइन लागलीय” “काय सांगतोस काय?” त्याचा विश्वास बसेना, “मग साहेब, आपल्या कॉलनीचा सिक्युरिटी गार्ड एकेकालाच पाठवतोय. आता आपल्या स्टाफचे लोक येताहेत” ते ऐकून त्याच्या मनावरचं मळभ, अस्वस्थता हळूहळू दूर होऊ लागली. आता स्टेनो, क्लार्क, शिपाई एकेक करून येऊ लागले. प्रत्येकाकडून गिफ्ट घेताना तो अवघडून गेला. पण दुकानं बंद असताना या लोकांनी ही गिफ्ट्स आणली कुठून याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याने एकाला तो प्रश्न केला. “साहेब काही जणांनी मार्चमध्येच लॉकडाऊन सुरू होण्या अगोदर घेऊन ठेवली होती. बाकीच्यांनी ओळखीच्या दुकानदारांकडून मागच्या दारातून घेतली. काहिंनी ऑनलाईन मागवलीत” थोड्या वेळाने देवळे आले. सोबत गिफ्ट म्हणून बुके आणि ऐतिहासिक पुस्तकांचा सेट घेऊन आले. देवळेंशी त्याला बरंच बोलायचं होतं म्हणून त्यांना त्याने सोफ्यावर बसायला सांगितलं. “साहेब ठेकेदार पोपटाणी आलेत” मुरली म्हणाला तसा त्याला धक्काच बसला. दुसर्‍याच क्षणाला पोपटाणी हजर झाला. पोपटाणी कॉट्रँक्टर असोसिएशनचा अध्यक्षही होता. “सरजी नमस्ते, और कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकी तरफसे आपको रिटायरमेंट लाईफकी बहुत बहुत शुभकामनाए” पोपटाणी हात जोडत म्हणाला, “आईये पोपटाणीजी बैठीये. सॉरी आपका बील मै सॅन्क्शन नही कर सका” “कोई बात नही सरजी. मैने तो बडे साहबको भी मना कर दिया था. क्यूँकी काम पुरा नही हुआँ था और हमे पता था आप जैसे इमानदार ऑफिसर अधूरे कामके बील अॅप्रुव्ह नही करते।” “ताने मार रहे है क्या?” “नही सरजी. सच कह रहे है. उल्टा हमे आप पर गर्व है की आप बिकाऊ नही थे. जो बिकते है उन्हीको खरीदा जा सकता है. आज आप जैसे इमानदार अफसरोकीही जरुरत है साहब. क्यूँ देवले बाबूजी सही है ना?” देवळेंनी हसत हसत मान डोलावली. तेवढ्यात एक माणूस मोठी सुटकेस घेऊन आला. ती सुटकेस मकरंदच्या हातात देत पोपटाणी म्हणाला, “सरजी आपने हमसे कभी कुछ लिया नही. अब इसे मना मत किजीये” “पोपटाणीजी मै सरकारी नोकर हूँ. आपसे गिफ्ट लुंगा तो व्हिजीलन्स केस हो जायेगा मेरे उपर” तो आढेवेढे घेत म्हणाला, “अभी आप रिटायर्ड है. दुसरा ये हमने आपको प्रेमसे दिया है. ना की किसी बिलको साईन करने के बदलेमें दिया है. बेफिकीर रहिये साहब. कुछ नही होगा” “धन्यवाद पोपटाणीजी” “धन्यवाद तो आपका करना चाहिये साहब. आपने कभी क्वालिटीपे कॉप्रमाईझ नही किया. कामकी क्वालिटी मिली तो आपने कभी बिलको रोका नही, जैसा दुसरे पैसोके लालचमे करते है. हम भी आप जैसे ऑफिस रही चाहते है साहब. लेकीन क्या करे जमाना बडा खराब है. अच्छा साहब मै निकलू? बडी लंबी लाईन लगी है बाहर. ये सभी लोग आपको चाहनेवाले है साहब. ये सेंड ऑफ की फॉरमॅलिटी नही निभा रहे है । नमस्ते” चारपाच क्लार्क भेटून गेल्यावर त्याचा ऑफिसमधला शिपाई सुनील आला. एक मोठा बॉक्स मकरंदच्या हातात देऊन त्याने नमस्कार केला. “अरे हे एवढं जड काय दिलंस मला?” “सर काही नाही एक मिक्सर आहे” “अरे बापरे. अरे याची काय गरज होती? एखादं गुलाबाचं फुलंही मला चाललं असतं” “नाही साहेब. आजपर्यंत इतके साहेब आले आणि गेले. मी कोणत्याच साहेबाला कधीच काही दिलं नाही. द्यायची इच्छाच झाली नाही. पण साहेब तुम्ही लई जीव लावला बघा” आणि तो एकदम रडू लागला. मकरंदने त्याच्या पाठीवर थोपटलं. “बस बस शांत हो” “साहेब तुम्हाला आठवतं. एकदा तुम्ही रविवारीही कामावर आलता. तुमचा स्वयंपाकी गावी गेलता म्हणून तुमचा डबा नव्हता. मी तुम्हाला म्हंटलं साहेब माझ्या डब्यातल्या दोन पोळ्या खावा. तुम्ही म्हंटलं ये आपण टेबलवर बसून एकत्र जेवू. पण माझी हिंमत होईना. मी टेबलवर बसायला नाही म्हणालो तर तुम्ही जमिनीवर बसून माझ्यासंगं जेवण केलतं. एवढा मोठा साहेब माझ्या भावासारखा माझ्यासोबत खाली बसून जेवला. मला लई कवतीक वाटलं साहेब. वेळप्रसंगी मला पैशाचीबी लई मदत केली तुम्ही. तुमची लई आठवण येईल साहेब” “कधी नागपूरला आलास की जरूर घरी ये सुनील” “व्हय साहेब” रात्री साडे अकरापर्यंत लोक येत होते. छोट्या मोठ्या गिफ्ट्स देत होते. बरेच शेजारीही आले होते. चारपाच स्टाफच्या महिलाही आल्या होत्या. एका महिलेने गिफ्ट द्यायला काही मिळालं नाही म्हणून चक्क त्याच्यासाठी स्वेटर विणून आणलं होतं. शेवटचा माणूस निघून गेल्यावर देवळे म्हणाले, “बघा साहेब तुम्हाला वाटलं असेल माझा सेंड ऑफ कुणी केला नाही. हा खरा मनातून दिलेला सेंड ऑफ होता. पटलं ना?” मकरंद हसला. म्हणाला, “खरंय, खूप मनाला वेदना होत होत्या. आता मी समाधानाने इथून जाऊ शकेन. बरं. सॉरी तुम्हाला थांबवून ठेवलं. एक काम होतं तुमच्याशी” असं म्हणून तो उठला. आतमध्ये जाऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात चेक होता. “देवळे रिटायरमेंटच्या सगळ्या स्टाफला एक जंगी पार्टी देण्याची मला इच्छा होती. पण कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. चारपाच महिन्यात किंवा हे कोरोनाचं प्रकरण निवळल्यानंतर या सगळ्या लोकांना माझ्यातर्फे एका चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी देऊन टाका. हा पन्नास हजाराचा चेक ठेवा तुमच्याजवळ. अजून लागले तर सांगा, “देवळेंनी चेककडे पाहिलं आणि तो परत त्याच्या हातात देत म्हणाले” साहेब तुम्ही नसताना पार्टी करणं आम्हाला आवडेल का? उलट तुम्हीच हे कोरोना प्रकरण आटोपलं की तुमच्या फुरसतीने तारीख कळवा. आम्ही पार्टी अॅरेंज करू. मात्र तुम्हाला सहकुटुंब यायचं आहे” “देवळे खुर्ची गेली की माणूस विसरला जातो. पाच सहा महिन्यांनी तुम्ही मला ओळखही दाखवणार नाही” “तुम्ही म्हणता ते खरं आहे पण तुमच्या बाबतीत तसं होणार नाही. खात्री बाळगा” “बरं, पण हा चेक तर ठेवा” “साहेब पैसे आहेत आमच्याकडे. तुम्हाला सेंड ऑफची पार्टी द्यायची म्हणून आम्ही जानेवारीपासूनच पैसे जमा करायला सुरुवात केली. सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे पैसे काढून दिले. इतक्या साहेबांना आम्ही सेंड ऑफ दिला. पैसे जमवताना फार कटकटी व्हायच्या. हा पहिला अनुभव आहे की बिना कटकटीने पैसे जमा झालेत” “देवळे खरंच तुम्हाला मानावं लागेल” “मला नाही, साहेब तुम्हाला मानावं लागेल. तीन वर्षात तुम्ही पैसा नाही पण प्रेम कमावलंत. बघितलं ना किती स्वंयस्फूर्तीने लोक आले होते. मोठ्या साहेबांनी ही लाइन पाहिली असती तर तुमची खरी किंमत त्यांना कळली असती” “हं जाऊ द्या. संपला आपला संबंध मोठ्या साहेबांशी. आता मला सांगा या एवढ्या गिफ्ट्स मधून कोरोना होण्याचे चान्सेस किती आहेत?” देवळेंनी खांदे उडवले, “मी दोन माणसं बोलावली आहेत. ती सर्व गिफ्ट्सवर डिसइंनफेक्टंट स्प्रे मारतील. तुमच्या ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलून एक छोटी गाडी या गिफ्ट्ससाठी अॅरेंज केलीये. तुमच्या कुटुंबियांना सांगून ठेवा. ते प्रीकॉशन घेऊनच सगळं सामान घरात घेतील. चला आता मी येऊ?” “खरंच खूप खूप धन्यवाद देवळे. तुम्ही खूप काळजी घेतलीत माझी” “धन्यवाद साहेब. हे फक्त तुमच्यासाठी. ओळख ठेवा. हॅपी रिटायर्ड लाइफ” देवळे गेल्यावर त्याने मुरलीला हाक मारली. मुरली बाहेर आल्यावर त्याला म्हणाला, “तुलाही खूप उशीर झालाय. सकाळी लवकर यायचंय. तू जा. मी भाजी गरम करून जेवून घेईन” “साहेब तुम्ही सगळ्यांकडून गिफ्ट घेतले. माझं गिफ्ट तर राहिलंच” तो हसला, “आता तू कशाला गिफ्ट देतोयेस? तीन वर्ष तू मला खूप छान स्वयंपाक करून प्रेमाने जेवू घातलं ते गिफ्टच तर होतं. तीन वर्षात माझं वजन चांगलंच वाढवलंय तू” “काही नाही साहेब छोटीशीच गिफ्ट आहे” म्हणता म्हणताच मुरलीने खिशातून एक छोटीशी डबी काढली. मकरंदचे डोळे विस्फारले” हे काय मुरली हे सोन्याचं दिसतंय” “पाच ग्रॅमची चेन आहे साहेब” “अरे वेड लागलं की काय तुला? पाच ग्रॅम म्हंटलं तरी बावीस तेवीस हजाराची चेन असेल ती. नाही मी अजिबात घेणार नाही” “साहेब नाही म्हणू नका. माझी शपथ आहे तुम्हाला” “अरे पण कशासाठी एवढा खर्च?” “साहेब मा‍झ्या दोन्ही मुलांना तुम्ही नोकरीला लावलंत. एक रुपयासुद्धा घेतला नाहीत. वीस पंचवीस लाख खर्च करूनही अशा नोकऱ्या मिळत नाहीत” “अरे मी फक्त शब्द टाकला. मला कुठे पैसे खर्च करावे लागले” “माझ्या बायकोचं मोठं ऑपरेशन झालं. तुम्ही एका मिनिटात एक लाख रुपये काढून दिले” “पण ते पैसे तू फेडले ना!” “पण त्याचं व्याजही तुम्ही घेतलं नाही” “अरे आपल्या माणसाकडून कुणी व्याज घेतं का?” “घेतात साहेब. मा‍झ्या भावाकडून मी एकदा पन्नास हजार घेतले होते. त्याने माझ्याकडून तीन वर्षाचं व्याज मागून घेतलं होतं” मकरंद नि:शब्द झाला. मुरली पुढे आला. त्याने ती चेनची डबी त्याच्या हातात ठेवली. खाली वाकून पाया पडू लागला तसं मकरंदने त्याला उचलून छातीशी धरलं. “साहेब तुमची लै आठवण येईल” मुरली रडत रडत म्हणाला, “मलासुद्धा” “साहेब एक विनंती आहे. मा‍झ्या सगळ्या कुटुंबाला तुम्हाला भेटायचं आहे. उद्या सकाळी बोलवू?” “अरे बोलव ना, त्यात काय विशेष” “साहेब आता शेवटची विनंती, मी भाजी गरम करतो जेवून घ्या. रात्रीचे बारा वाजलेत” “मुरली तुमच्या सर्वांच्या प्रेमानेच माझं पोट भरलंय. पण आता तू आग्रह करतोच आहेस तर घेतो जेवून”

    सकाळी मुरली त्याची बायको, दोघं मुलं, मुलगी यांना घेऊन आला होता. सगळे मकरंदच्या पाया पडले. मुरलीच्या बायकोने त्याच्यासाठी डबा करून आणला होता. शिवाय लाडू, चिवडा असे बरेच काही पदार्थही होते. कोरोनाची साथ सुरू असताना असे दुसर्‍याच्या घरचे पदार्थ खायचे नसतात हे त्यांना सांगायला मकरंदच्या जीवावर आलं. त्याने ते ठेवून घेतलं. ड्रायव्हर आल्यावर तो गाडीत जाऊन बसला. गाडी सुरू झाली आणि त्याचा मोबाइल वाजू लागला. “साहेब हॅपी जर्नी आणि बेस्ट ऑफ लक फॉर युवर रिटायर्ड लाईफ” देवळे बोलत होते. तो पुढे जात होता आणि कॉलवर कॉल सुरू झाले होते. शुभेच्छांना उत्तर देता देता त्याला गहिवरून येत होतं. या अप्रतिम सेंड ऑफला तो कधीच विसरू शकणार नव्हता.

      - दीपक तांबोळी,
      मो.नं. ९५०३०११२५५०
   सेंड ऑफ | दीपक तांबोळी | Send off Marathi story | Marathi katha   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या