Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

सुपीक | प्रेरणादायी कथा | अनिल महाजन

अनिल महाजन यांची मराठी सुपीक कथा, Supik katha,
सुपीक|मराठी कथा [Supik|Marathi inspirational story|Anil Mahajan]

माझं नाव बाबांनी यशस्वी ठेवलं असलं तरी जवळपासची माणसं मला वेडसर, मंद बुद्धीचा या नावानेच ओळखत. “शाळेत जायला लागला, समवयस्क पोरांमधे मिसळला की बदल होतील. करायला नकोत ते विचार तू करू नकोस”, बाबा आईला सांगत.
    कस्तुरे मास्तरांनी एकदा चार ओळी लिहून दिल्या. म्हणाले, “बाबां ना दे!” मला अक्षरं लागायला लागली होती. जोडाक्षरं डोळ्यांना जड वाटायची म्हणून डोळे मिटवून घ्यायचो.
    आई जवळपास नाही अशी पुन्हाः पुन्हाः खात्री करून मगच बाबांनी चिठ्ठी वाचली. त्यांच्या चेहर्‍यावरच्या रेषा, चिठ्ठी वाचायच्या आधी होत्या तश्याच राहिल्या!
    दुपारी आई बाबा झोपल्यावर बाबांनी खिशात ठेवलेली चिठ्ठी मी घेतली. “आपल्या मुलाला कुठलीही गोष्ट कितीही सांगून समजत नाही. आमची शाळा सामान्य मुलांसाठी आहे. नोंद घेणे.” हा तो निरोप होता.
    सकाळी गणवेश घालताना बाबांनी थांबायला सांगितलं. म्हणाले, “शाळा बदलायची आहे तुझी!” बाबांनी मला छोट्या शाळेत नेलं. तिथले मास्तर, त्यांचे परिचित असावेत. बराच वेळ बोलून झाल्यावर बाबा निघून गेले.
    नव्या शाळेत मी रमलो. चार वर्ष तिथे गेली. मग बाबांनी माझी शाळा परत एकदा बदलली. तिसर्‍या शाळेत तीन वर्षे काढली. रानडे गुरुजींनी एकदा बोलावलं. “उद्या येऊ नकोस, मात्र बाबांना बोलावलंय असा निरोप दे!” गुरुजी म्हणाले.
    बाबाना सांगितलं. “काळजी नको हो. खूप शाळा आहेत. बेबी सरोजा घे आणि वाचून काढ!” बाबा बोलले.
    गावा जवळच्या गुरुकुलात बाबा घेऊन गेले. म्हणाले, “आता इथे रहायचंय तुला!” गुरुकुलात चार वर्ष होतो.
    “तुमचा मुलगा फारशी प्रगती करेलशी खात्री आमच्यापैकी कुणालाही नाही,” भोजने मास्तरांनी बाबांना सांगितलं.
    बाबांबरोबर घरी परतलो. मला बरीच अक्षरं, अंक लिहिता वाचता येत होते. गोष्टी आवडीने वाचत असे. आईला भाजी, किराणा आणून देण्याचं काम बाबांनी मला दिलं. ‘उणे म्हणजे, इतर अंकांना धक्का न देता काढून टाकणे, कसे?’ बाबा सांगत. हिशोब, मांडता यायला लागला.
    आई दु:खी असे. ‘आपला मुलगा असा. मंदबुद्धी घेऊन आलाय. त्याचा निभाव कसा लागेल’, तिला चिंता वाटायची.
    “दहा पैकी चार पक्षी, उंच भरारी घेण्यास सक्षम नसतात, तरी उडतात. उडण्याचा आनंद लुटतात,” बाबा तिला सांगायचे.
    बाबांनी मला छोटं हॉटेल सुरू करून दिलं. “माणूस मदतीला असेल. पण तू त्याला पडेल ती मदत करायचीय,” बाबांनी सांगितलं.
    “शांते, तुझा मुलगा आता भजी विकणारय होय?” प्रभा मावशीने आईला विचारलं. आई गप्प राहिली.
माझा व्यवसाय चांगला चालायला लागला. बाबा चुकून कधी हॉटेलात आले नाही. म्हणायचे, “यश, अपयश दोन्ही तुझं असावं!”
    माझी उंची वाढली. रुंदी पण वाढली. असं असूनही, बाबांनी मला जवळ घेतलं. “नफा काय ठाऊक नसूनही नफ्याचं गणित मला नक्की समजलंय,” बाबा बोलले.
    मग एक दिवस बाबांनी त्यांनी केलेली गुंतवणूक परत मागितली. म्हणाले, “सगळं तुझं तू निर्माण कर म्हणजे, सात्त्विक आनंदाचा धनी होशील!”
    पुढे बाबांनी पक्की जागा घेतली. मोठं दुकान सुरू केलं. म्हणाले, “मोठी जवाबदारी हातात घे. इथे लिहायचं नाहीय. लिहून दाखवायचंही नाही. करून दाखवायचंय!”
    हॉटेल छान सुरू होतं. आता मला यांत्रिक दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळाला होता. हॉटेलात दोनदा जाऊन यायचो. दुकाना बरोबर हॉटेल नफा कमवीत होतं.
    आई म्हणायची, “पांडुरंगाची कृपा आहे. देवाच्या गरजांकडे लक्ष देत गेलं की लाजेकाजे का होईना, देव आपल्या कडे लक्ष देतो!”
हिशोब खातं, बँकेचे पेपर्स मला छान पैकी कळत, समजत होते.
    एकदा रानडे मास्तर दुकानात आले. माझं काम पाहून म्हणाले, “एक गोष्ट सांगू? ती आधी होती ती बावळट छटा,आता तुझ्या चेहऱ्यावर नक्की नाहीय!”
    ‘जे घडलं होतं ते एकट्या बाबांमुळे घडलं होतं...’ मला जाणीव होत रहायची. कधीतरी बाबांना बोलून त्यांचे आभार मानायचे होते. आपली काळजी घेतात ती माणसं आपली असतात. ती मला ‘माझी’ वाटतात ही गोष्ट त्यांना कळायला हवी होती. पण करायचं काय?
    रानडे गुरुजींना विचारलं. मिठाई, बाबांसाठी छान कुडता, आईला साडी घेतली. काय बोलायचं, ‘सुरुवात कुठून करायची, पहिल्या शाळेपासून का मग भजी करून विकणार्‍या छोट्या हॉटेल पासून?’
    घरी आल्यावर सगळ्या गोष्टी पलंगा खाली दडवून ठेवल्या. अशा गोष्टी, माझ्यासाठी अपरिचित होत्या. अपरिचित म्हणजे ज्याच्या स्वभावाची चौकट समजलेली नसते ती!
    मला पाहून बाबांनी बोलवून घेतलं. पाठीवरून हात फिरवला. आई दारात होती. तिचे डोळे ओलसर होते. “तब्येत ठीक आहे ना? ये असा. चहा घेऊयात?” बाबांनी विचारलं. आई स्वयंपाक घराकडे चालती झाली.
    धावत माझ्या खोलीत गेलो. पिशवी घेऊन बाहेर पडलो. बाबांना कुडता दिला. धावपळ ऐकून आई बाहेर आली. म्हणाली, “घाबरून टाकलंस मला!” तिला साडी दिली. मिठाईचा डबा बाबांनी आपल्याकडे घेतला. डबा आईकडे देऊन म्हणाले, “तुमच्या पांडुरंगाचं आधी खाऊन झाल्यावर काही उरलं तर आपण खाऊयात!” आई देवघरात जाऊन परतली.
    “काय रे, आज आहे तरी काय म्हणायचं?” डोळे कोरडे करताना, ती बोलली.
    शब्दांची जमवाजमव झाली होती. पण मग लक्षात आलं, अंगावर जमा साबणाचा फेस, पाण्या बरोबर जसा नाहीसा होतो, तसं माझ्या शब्दांबरोबर झालं होतं!
    “सांग काय मनात असेल ते. संकोच नकोय!” बाबा बोलले.
    “मी असा, मंद बुद्धीचा. अनेक ठिकाणी अपयशी ठरलो. शाळेतून काढून टाकलं मला. शेजारी माझ्या विषयी वाईट बोलतात. तुम्हा दोघांची चेष्टा करतात...” मला दम लागला. बोलवेना.
    “पण बाबा, इतकं सगळं असूनही तुम्ही मला समजून घेतलं. धीर दिलात. माझ्यावर विश्वास दाखवून मोठं दुकान माझ्या ताब्यात दिलं. सांगा बाबा सांगा. मला ऐकायचंय. मी यशस्वी होईन असा विश्वास कसा होता तुम्हाला?”
    बाबा हलकं हसले. फरसाण मधले दाणे बाजूला काढले. एक दाणा, तोंडात ठेवला. क्षण कसाही असला तरी बाबांच्या ओठांवरचं हसू कधी कसं मावळत नाही? मला समजत नव्हतं. त्यांचं ते धीराने वागणं मला नवं कोरं आयुष्य देऊन गेलं होतं. जन्म आईने दिला. आयुष्य बाबांनी घडवीलं!
    माझे डोळे उगाच भरून आले. आई जवळ सरकली. “मुलं मोठी झाली की अंतर ठेवूनच बोलायचं असतं,” ती एकदा बाबांना सांगताना मी ऐकलं होतं.
    आज दिवस वेगळा म्हणून की काय, आई वेगळी वाटत होती. तिचा हात माझ्या पाठीवर होता. म्हणाली “उगी रहा...”
    “ऐकायचं तुला? सांगतो...” अजून एक दाणा तोंडात टाकून बाबांनी बोलायला सुरुवात केली.
    “ऐक, एखादी जमीन फळबाग करण्यासाठी चांगली ठरली नाही, तर तिथे गहू लावून बघायचा. गवत उभं पण ओम्ब्या भरल्या नाहीत? तर समजायचं, जमीन गव्हाचं पीक घेण्यासाठी पण योग्य नाहीय. वेगवेगळी पीकं घेऊन बघायची. मन स्वास्थ्य बिघडू द्यायचं नाही. काही न करता चांगले बदल घडून आले तर आनंद होतो ना? पण मेहनत घेऊन चांगलं होत नसेल तर? एक कुठलं तरी बी, ती जमीन नक्की स्वीकारते. बियांबरोबर जमीन फुलते. फळते! तोपर्यंत धीर सोडून चालत नाही. मला ठाऊक होतं. विश्वास होता म्हणूयात. एक कुठलंतरी काम तुला आवडेल, आपलं वाटेल आणि तू आहेस तसा तुझा स्वीकार करेल! तुझं आयुष्य घडेल! शाळेचे प्रयोग तेव्हड्यासाठी केले. फारसं हाती आलं नाही म्हणून मग नवीन काही करून पाहण्याचा माझा उत्साह वाढला. पैसे मिळविता येतात अरे. पण तुझ्या छोट्या हॉटेलाने तुला मोठं धैर्य दिलं. मला खूप मोठं समाधान मिळालं! आता मागे वळून बघू नकोस. आरसा फुटला म्हणजे काचेचे तुकडे उचलताना सावधगिरी बाळगून देखील एखादा कोपरा हाताला चीर पाडून जातो. जुनं म्हणून उकरून काढायचं नाही. आता वांगी भाकरीवर ताव मारुयात!” बाबा बोलले.
    बाबांचा माझ्यावर असलेला विश्वास, प्रेम आणि त्यांनी दाखविलेला संयम पाहून, मला रडू आवरता आलं नाही. बाबा म्हणाले, “रडून घे. दाब निघून जायला हवा. एक ध्यानात ठेव. या खूप मोठ्या आणि खूप चांगल्या जगात असा एकही माणूस सापडणार नाही, जो कामाचा नाही. होतं काय, जमेल ते काम देण्यात जगाचं व्यवस्थापन कमी पडतं!”
    “ये आता इकडे. फार वेळ त्यांना ऐकशील तर काम करायला लागलेला मेंदू बंद पडेल!” आई बोलली.
    बाबा, गोड हसले!

    - अनिल महाजन,
        मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या