Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

डोरलं | मराठी ग्रामीण कथा | सचिन वसंत पाटील

Doral, dorale

डोरलं 

        हरी पतसंस्थेत बसलेला. गावात नुक्त्याच सुरू झालेल्या पतसंस्थेचा तो चेअरमन. तरुणगडी. बिनलग्नाचा. घरची परिस्थिती बरी. दहा-बारा एकर शेती. टॅक्टर, बैलजोडी, गडीमाणसं. त्याचा बापही राजकारणात. मग दिली पोराला काढून पतसंस्था.

        पोरगाही मग रोज तासघटका पतसंस्थेत बसू लागला. उगी हिशेबा - फिशेबाचं बघू लागला. मिसरूड फुटलेला हरी खजिन्यावरला नाग ठिसकारल्यागत ठिसकारू लागला. कामगार वेळेवर येतेत का नाही? कर्जाचे हप्ते, भिशी, पिग्मीची नोंद बरोबर आहे का? हे तो बघू लागला. बापालाही आनंद झाला. लवकरच आपला राजकीय वारसदार तयार होतोय, असं त्याला वाटू लागलं.

        पतसंस्थेत बसूबसून हरी घराकडं निघाला. कट्टाळा आलेला. रोज तेच तेच काम बघायचं, पिवळसर कागदाची लांबडीच्या लांबडी रजिस्टर बुकं. एकावर आवक, दुसऱ्या वहीत जावक. गुलाबी रंगाची पिग्मीची पावती बुकं. बँकेची पासबुकं. रोजची आकडेमोड बघून डोसक्यात किडं पडल्यागत व्हायचं. शाळेतबी कधी एवढा गणिताचा अभ्यास केला नव्हता. रोज तेच खातेदार. तोच पिग्मी एजंट शंकर नावाचा मावा खाऊन पचापच थुकणारा. मधू जाधव नावाचा एक अनुभवी क्लार्क टक्कल पडलेला काम एकदम सावकाश. अगदी गोगलगाय. तेबी अण्णास्नी विचारल्याशिवाय काही करायचा नाही. रूपाया जरी कुणाला द्यायचा असला तरी अण्णास्नी मोबाईलवर फोन. एवढा अण्णांचा पतसंस्थेत दरारा होता. अण्णास्नी विचारल्याशिवाय इकडली काडी तिकडं व्हायची नाही. अण्णांनी पतसंस्थेच्या माध्यमातनं गावच्या नाड्या आवळल्या होत्या. आपल्या धाकानं गाव विळा वाकवल्यागत वाकवला होता. आता पोरगाही संस्थेत बसून त्यांचा वारसा चालवित होता...

        हरी निघणारच तोवर दारातच गावाबाहेरल्या वस्तीवरली सवी गाठ पडली. कधीकाळी आलेली दुष्काळी भागातली माणसं गावाबाहेर वस्ती करून राह्यलेली. ही माणसं पोटासाठी रोजंदारीवर जायची. गडीमाणसं रानात हाजरीनं कामाला जायाची. काही जवळच्या एम.आय.डी.सी. त कामाला जायची. बाया भांगलणीला, काढणी - मळणीला जायाच्या सुखी भागात आल्यामुळे पैसा हातात खेळू लागला. चैन वाढली. नट्टापट्टा, डिझाइनच्या साड्या... रोज नवी नवी तर्‍हा बांधावर कामाला जाणाऱ्या काही बायका हाताबाहेर गेल्या. गावातल्या पैसेवान लोकास्नी धरून राहू लागल्या. म्हणून गावातल्या माणसांची या लोकांकडे पहायची दृष्टी ठीक नव्हती. त्यांच्यातलीच ही सवी.

        सवी हरीची वर्गमैत्रीणच. दिसायला सावळी. पण नाकी डोळी नीटस. उंच शेलाटी. अटकळ बांध्याची. सोनेरी रंगात बुडवून काढलेल्या नटरंगी मूर्तीगत दिसायची. चांगलीच देखणी होती ती... पण आता तिचं लग्न झालेलं. लग्न होऊनही ती नवऱ्याला घेऊनच माहेरला राहायला आलेली. कारण घरात आई एकटी. तीही आजारीच असायची. सवीचा नवरा जवळच्या एम.आय.डी.सी.त कामाला जायचा. दिडेक वर्षाचं पोर काखेत मारून ती समोर हसत उभी. एक पोर होऊनही तिच्यातलं पोरपण अजून गेलं नव्हतं. खळाळणाऱ्या झऱ्यागत अगदी अवखळ दिसत होती ती.
संस्थेच्या दारात तिला बघून हरीनं विचारलं,

        ‘कागं सवे, काय काम हुतं काय..?’

        ‘तरवो, उगंच कोण यील..!’
 
        खांद्यावरला पदर सावरत वाऱ्याच्या झुळकेनं शेवरीचा डहाळा लाजावा तशी शेवरीगत ती लाजली.

        ‘मग बोल तर...’ हरीला अवघडल्यागत झालं होतं. संस्थेतली, रस्त्यावरून जाणायेणारी माणसं तेंच्याकडंच बघत होती. निदान हरीला तरी तसं वाटत होतं... अजून आपलं लग्न नाही. संस्थेच्या दारातच आपण एका परस्त्रीबरोबर बोलतो आहोत आणि तेही वस्तीवरल्या. हा प्रकार तेलमीठ लावून कुणी घरात सांगितला तर? आपलं अण्णा पायातलं हातात घेत्याली. गावभर बोंब उठेल. आधीच गाव झाडावरलं. ह्या कोपऱ्यात किरडू निघालं की त्या कोपऱ्यात जाईस्तोर अस्सल नाग हुतोय. असलं हे गाव बाराबेण्याचं. आपल्याला कुणी पाहुणे, घरात सांगुने... असं हरीच्या मनात येतेलं. पण नकळत तिच्याबरोबर आपुन बोलत रहावं असंही वाटतेलं.

        ‘काय न्हाय, तुमच्या संस्थेत भिशी सुरू करावी म्हणते...’

        ‘हात्तीच्या, एवडंच होय...’ असं म्हणून हरी माघारी वळला. तिला संस्थेत नेऊन जाधव क्लार्कला खातं उघडायला लावलं... आठवड्यातून एकदा दोनशे रुपये संस्थेत आणून द्यायचे. एकूण रकमेच्या ऐंशी टक्के कर्ज. वार्षिक व्याजदर, डिविडंड, हे सगळं तिला समजावून सांगितलं. तिनं ‘होय’ म्हणून मान डोलावली. खातं सुरू झालं. सवी गेली. संस्थेचा एक खातेदार वाढला. आज एक चांगलं काम केल्याचा हरीलाही आनंद झाला. असेच चार-सहा आठवडे गेले. सवी नियमीत पैसे खात्यावर जमा करीत होती. हरी सगळं विसरून गेलेला. अशीच एकदिवस सवी पतसंस्थेत गाठ पडली. तिने पिवळसर रंगाची साडी नेसली होती. ती तिला अधिकच खुलून दिसत होती.

        ‘थांबा जराशी... काम हाय..!’

        ‘काय गं सवे..?’

        ‘काम होतं एक...’

        ‘बोलकी..’

        ‘पैला करतो म्हणा..!’

        ‘सांग तरी पैला..?’ तो सावध होऊन म्हणाला.

हरीला कळेना ही आता काय काम सांगते... आपल्या आवाक्यातलं असलं म्हणजे बरं. नाहीतर ही कायच्याबाय सांगायची. वस्तीवरल्या लोकांचं काय सांगता येतंय! पुन्हा अंगावर शब्द नको, म्हणून तो सावध होऊन बोलला. तवर सवी म्हणाली, 

        ‘वाईस कर्ज पायजे हुतं... भिशीवर...’

        ‘किती पायजेल..? आणि कशाला लागणार हाईत पैशे..?’

हरीनं नेहमीप्रमाणं चौकशी केली. संस्थेचा नियमच तसा होता. पैसे कशाला पाहिजेत? किती दिवस पाहिजेत ? हे विचारल्याशिवाय कर्ज द्यायचं नाही.

        ‘आमचं हिनी जरा आज्यारी हाईत... तेनला दवाखान्यात दाखवायचं हुतं...’ सवीनं सांगितलं.

        ‘किती पायजेल कर्ज.. ?’

        ‘किती मिळतंय बघा आमच्या खात्यावर... जेवडं हुईल तेवडं जास्तीत जास्त द्या..!’ सवीनं हातातलं पासबुक टेबलावर ठेवत म्हंटलं.

        हरीला कळेना, काय करावं? मधीआधी काही कुजबूज कानावर आलेली... हिचा नवरा दारूडा आहे. दारू पिऊन रोज हिला मारहाण करतो. चार दिवस कामावर जातो, चार दिवस नाही. हरीनं परवाच त्याला स्टँडजवळ फुलटॉस होऊन लडबडत चाललेला बघितला होता. हातातली सायकलही त्याला झेपत नव्हती.

        खूप विचार करून त्यानं सांगितलं, ‘वर्षाचं पन्नास आठवडं धरलं तर दहा हजार हुत्यात. त्यातलं ऐंशी टक्के म्हंटलं तर आठ हजार कर्ज मिळतंय...’ हरी हातातलं पासबुक चाळीत म्हणाला, ‘हे बग... तुझ्या खात्यावर आत्ता बाराशेच जमा हाईत. आठ हजार कर्ज मिळंल. खरं वेळच्या वेळंला हप्तं भरायचं. महिन्याच्या महिन्याला व्याज जमा करायचं, कबूल आसंल तर सोमवारी कर्ज मिळंल...’ हरीनं सविस्तर माहिती दिली. तरी मनात विचार आलाच... भिशी चालू आहे म्हंटल्यावर कर्ज नाही तर कसं म्हणायचं आणि आठ हजार म्हणजे काही फार रक्कम नव्हे... तरीसुद्धा धाकधूक हायीच. आता काय करते ही बया कुणासठावं? लावला चुना तर काय करायचं. अण्णा पायातलं काढतील. म्हणतील, लायकी हायका हिची आठ हजार कर्ज द्यायची... जरा रिस्कच आहे...

        ‘दहा हजार कर्ज मिळायचं नाही का..?’

        विचारात गुंतलेला हरी भानावर आला नि घाबरून म्हणाला, ‘न्हाय न्हाय नियमात बसत न्हायी ते...’

        हरीनं तोडायचा प्रयत्न केला.

        ‘माज्याकडं बघून तुमी कर्ज द्या... एक पै ठेवायची न्हाय तुमची. कायबी करून फेडते...’

        सवीनं आपले काळेभोर डोळे हरीच्या डोळ्याला भिडवले. तसा हरी सटपटलाच. खस्सदिशी खुरप्यानं गवत कापावं तशी नजर तोडीत म्हणाला,

        ‘तसं न्हायी करता येत...’

        ‘कायबी करा खरं नाही म्हणू नगा... पाया पडते तुमच्या...’ सवी गयावया करीत म्हणाली. 
हरीला काही बोलताच येईना... बाईमाणसाबरोबर लईतर कठोर बागायचं कसं. एवढी लेकुरवाळी बाई मागतीया तर देऊन टाकू हजारबर जास्ती. नड असल्याशिवाय कोण एवढं घायकुतीला येतंय. शेवटी वर्गमैत्रीण आहे, दिलकी कुटं जातिया ती... न्हायतर तिला ठावंच हाय आपल्या अण्णांचा हिसका! त्यानं कर्ज मंजूर केलं. पुढच्याच आठवड्यात ती दहा हजाराचा चेक घेऊन गेली. अण्णांनी सांगितलेलं सगळा व्यवहार चेकने करायचा. म्हणजे रेकार्डला नोंद राहाते. रोखारोखीत अपहार होतो. 

        परत महिनाभर सगळं व्यवस्थित होतं. वस्तीवरून पुन्हा काही गोष्टी हरीला समजल्या, सवीचा नवरा काही आजाबिजारी नाही. चांगला दारू ढोसून गावभर हिंडतोय! त्या दहा हजारात त्याने सेकंडहँन्ड एमएटी घेतलीय. कामावर जायला तो सायकल ऐवजी आता गाडी बापरतोय. काय का असेना जातोय न्हवं त्यो कामावर. फेडंल पैशे हळूहळू... हरीनं मनाची समजूत घातली.

        पुन्हा एक रोज सवी संस्थेत आली. कर्जाचं व्याज भरायला म्हणून.

        ‘नवरा आजारी हाय म्हणून खोटं सांगिटलंस व्हय..?’ हरीनं विचारलं.

        ‘मग काय करू, नवरा ऐकंचना... 
कायबी कर आणि धा हजार आणून दे, म्हणाय लागला. कामावर तर जाईनाच... रोज आक्काबाई ढोसून मारझोड करायला... आन्न खाऊन दिलं न्हाई बाबानं म्हयनाभर... मग काय करू..?’ सवीनं डोळ्यांला पदर लावला पण आता न लाजताबुजता खरंखुरं सांगितलं.

        ‘मग तवाच खरं सांगायचं न्हाय का..? देत हुतो की पैशे... खोटं कधी बोलू ने... खोटं बोलणाराचा मला लै राग येतो..!’ हरी तावातावानं म्हणाला.

        ‘एकडाव चुकी झाली, हितनं फुडं व्हायची न्हायी... माप करा एवड्यापावटी..!’

        पुन्हा सवीनं गयावया केली. तिचे काजळासारखे काळेभोर डोळे डबडबले. हरी त्यात विरघळला.

        ‘बरं बरं आसुंदे...’ हरीला काही बोलणंच सुधरेना. काय बोलणार हिच्यापुढं... बरं झालं कर्जाचं व्याज तर आलं, असा विचार करून तो गपगार बसला.

        थंडी संपली नि उन्हाळा सुरू झाला. रानात काढणी मळणीचा हंगाम आटोपला. नांगरणी, कुळवणी, ऊसफोडणी अशी उन्हाळी कामं सुरू झाली.

        एकदिवस सकासकाळी गावात एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. सवीचा नवरा कारखान्यात काम करताना अपघातात वारला. कुणी म्हणतं, दारू प्यायला होता. कुणी म्हणतं, मशिनच खराब होतं. काय झालं कुणास ठाऊक? पण सवीच्या नवऱ्यानं जीव गमावला हे खरं.

        हरीला चांगलाच धक्का बसला. या बातमीने तो पार हादरून गेला. दुःखाची अशी कुऱ्हाड सवीवर कोसळली असताना गप्प राहण्यावाचून तो काही करू शकत नव्हता. नियतीच हरामखोर.

        हरीनं चार दिवस जाऊन दिलं. मग उगी रानाकडं जाताजाता वाट वाकडी करून सवीच्या घराकडं चक्कर टाकली. घर कसलं खोपाटच ते. चार मेडकी रोवून वरती दोन-तीन पन्हाळी पत्रं टाकलेलं. साईडनं सगळा पाणकणसाचा कूड घेतलेला. हरीला बघून सवी रडरड रडली. म्हणाली, ‘म्हैना झालं नवऱ्यानं दारू सोडलेली... कारखान्यातलं मशिनच बंद पडलं... हेनी काय झालं म्हणून खाली उतरलं नि मशिन सुरू झालं... माजं कुक्कू चेंदामेंदा कि ओ झालं... माझंच नशीब फुटकं... आता काय करू, कुणाच्या तोंडाकडं बघूवं मी अता...’ गुरासारखी ती हंबरत होती. तो सैरभैर झाला. चार सांत्वनाचे बोल ऐकवून हरी घराकडं आला. कर्जाचा काही विषय काढलाच नाही. कुणीतरी सांगितलं, एमएटी विकून सवीनं नवऱ्याचं क्रियाकर्म आटोपलं. आता मायलेकी दोघी मिळून रानात कामाला जात्यात. रोज नवा बांध. रोज नवा मालक.

        एकदा सवी शेजारच्या मंदीबरोबर रानात कामाला निघाली होती. वाटेत हरी गाठ पडला,

        ‘काय सवे, काय भिशीचं हप्तं भरली न्हायीस?’

        ‘अत्ता चार रोज झालं कामाला चालली, करणार हाय सुरू अता...’

        एवढंच ती मोघम बोलली.

        हरी निघून गेला. तशी मंदी म्हणाली,

        ‘हेच्या भिशीतनं कर्ज घेटलंयस व्हय?’

        ‘व्हय बाई... गरजच तशी हुती...’

        ‘मग आता मेलीस चित्ताड घावलीस कचाट्यात..!’

        ‘मजी गं..’

        ‘बग तू... ही पतसंस्था असली हाय का एकदा मुंडक्यावर बसली की भूत मानगुटीवर बसल्यागत बसत्या... बगच तू...’

        दिवस उगवत होता. मावळत होता. मायलेकी रोज नवा बांध धरत होत्या. आलेल्या पैशातून कसातरी दिवस ढकलत होत्या. मधीच सवीची आई आजारी पडली. रानातलं काम झेपेना. आईचा दवाखाना लईच वाढला. मग सवीलाही कामाला जायाची पंचाईत व्हायची. नवरा मेल्यापसनं सवीची भिशी बंदच होती. हप्ता नाही अन् व्याजबी नाही. पाच-सहा आठवडे दंडात पडलेलं. खातंच बंद करावं लागलं. अजून सात-आठ हजार कर्ज आणि होणारं व्याज एवढी थकबाकी होती.

        सवी एकदा गावच्या बाजारात गाठ पडली. ती आता धक्क्यातून बरीच सावरली होती. कपाळ भोंडं असलं तरी जवानी उठून दिसत होती. हरीचं तिच्याकडं लक्ष नव्हतं तीच जवळ येऊन म्हणाली,

        ‘तुमची पैन् पै भागवतो... जरा दम धरा... कारखानदार देतो म्हंटलेत कायतरी मदत... ते आल्यावरना भागवतो...’

        ‘अगं पर किती दम धरा... भिशी फुटायचा वकूत आला... लोकांचं पैसे भागवाय पायजेत...’

        ‘सगळं देतो तुमचं... काय व्हायचं ते व्याज हुंदेल...’

        ‘भिशी फुटणाराय आता... अण्णा वरडाल्यात आमचं... भरायचं होत न्हायी तर कशाला कर्ज काडता..?’हरी जरा कठोर होऊनच बोलला. कालच त्यानं अण्णांच्या शिव्या खाल्लेल्या.

        ‘अता तुमीच आसं म्हंटल्याव आमी कुणाच्या तोंडाकडं बघायचं... मला तर काय म्हायती फुडं आसं वाडून ठेवलंय ते...’ सवी काकुळतीला येऊन बोलली. हरीला वाटलं, आपुन उगी कठोर बोललो बिचारीला.

        भिशी फुटली तरी सवीनं काय कर्ज भागवलं नाही. दोन खाती थकीत पडलेली. त्यात सवीचंही खातं होतं. अण्णा ओरडलंच... ‘न्हाय त्यास्नी कर्ज देतायसा, काय ऐपत हायका तेंची... काय घर का दार त्यास्नी... पोटासाठी गाव सोडून आलेली माणसं ही... देत जाऊ नका आसल्या बुडव्यास्नी कर्ज...’

        आता काय करावं हरीला कळेना. सवीकडनं कशी वसुली करावी. एक दिवस घराकडं जाऊन आला. पण घराला कुलूप. हरीला भ्या पडलं... आयला बाराबोड्याची गाव सोडून गेली कायकी. शेजारी विचारलं तर, चार रोज मावशीकडं गेलीया उद्या येणार हायीत, असं समजलं. मग जीव भांड्यात पडला. कायबी करून या महिन्यात पैसे वसूल करायचेच असं त्यानं ठरवलेलं.

        कर्ज देऊन वर्ष-सव्वा वर्ष झालेलं. व्याजासकट रक्कम चौदा हजारांवर गेलेली. पुन्हा नव्यानं भिशी सुरू झाली. नवी खाती. नवे खातेदार. हरीचा महिनाभर त्यातच गेला. सवडच मिळाली नाही.

        एक दिवस त्यानं ठरवलंच. सवीच्या घराकडंच जायाचं. पैसे घेतल्याबिगर वस्तीवरनं हालायचंच नाही. अण्णा कसं कर्जदाराच्या मुंडक्यावर ठिय्या मारून बसतेत तसं जाऊन बसायचं.

        कडूसं पडलेलं. तोंडाला तोंड ओळखू येत नव्हतं. अशा कातरवेळी हरीनं बस्तीकडली बाट धरली. वाटंत मधीआधी कोणतरी ओळखीचं गाठ पडत होतं, “काय चेरमन काय बेत?’ विचारीत होतं. काय न्हाव आलो मळ्यातनं... जरा काम हाय वाईस...’ असं कायबाय सांगीत होता.

        हरी सवीच्या घराजवळ आला. पत्र्याची एकच खोली. सवी बाहेरच कोंबड्या डालत होती. तिनं हसून स्वागत केलं. घरात चला म्हंटली. पण हरी ऐकेना. तिथंच तावातावान बोलू लागला, ‘भरायचं होत न्हावी तर काडता कशाला? पैजे टाक माजं... जातो आल्या वाटंनं...’ सवीनं पुन्हा गयावया केली.

        मग हरी आत आला. एकच खोली. त्यातच कोनाड्यात अडोसा करून सैपाकाला जागा केलेली. दुसऱ्या कोपऱ्यात तिची आजारी आई झोपलेली. बसा म्हंटल्यावर तो अवघडून चटईवर बसला. म्हातारी उठून बसली.

        कसं काय बरं हाय का..?’ हरीनं म्हातारीला विचारायचं म्हणून विचारलं.

        ‘कशाचं बरं आलंय... नावंनाब तब्येत आतच हाय...’

        ‘पैशे आलं का कारखानदाराकडलं?’ हरीनं विषयालाच हात घातला.

        ‘कुठला देतूय मुडदा... तुमचा पोरगा नशेत हुता म्हणून रिपोट दाखवितोय...’

        ‘आणि मग आता...’

        ‘आता काय करायचं... गरिबाला वाली कोण?’ असं म्हणून सवीनं डोळ्यांला पदर लावला. काहीवेळ गप्प गप्पच गेला. नगो-नगो म्हणताना सवी चहा करायला उठली... तिला थांबवून घेत हरीने पुन्हा पैशाचा विषय काढला, ‘काय बी करा आणि तेवडं भिशीचं कर्ज फेडा... दुसरं कशाचं येणं न्हाय का?’

        ‘कशानं फेडा? जवळ दमडी न्हायी... येणं बी न्हायी! कामाला जात हुती तेबी म्हातारी आजारी हाय म्हणून पंधरादी घरातच हाय’

        ‘तेला मी काय करू? काय करायचं ते करा, खरं माझं पैशे आजच्या आज भागवा...’ ‘आवो चेरमन जाऊंदेल चार रोज, ठेवत नाही तुमचं देणं...’

        ‘ते काय सांगू नगा आता... पैला पैशे टाका.. न्हाय तर उद्याच्या उच्चा एकशेएकची नोटीस टाकून घरावर जप्ती आणतो का न्हायी बघा!’

        जप्तीच्या बतावणीनं दोघीबी घाबरल्या. मग सवीची आई म्हणाली, ‘सवे, जरा नामदेव सावकराकडं जाऊन ये ऽ... बग तर त्यो काय म्हणतूय...’

        ‘नामदेव मळ्यातला कामकऱ्यांचा मुकादम, आडदांड गडी. कंत्राटं घेऊन आता तो सावकार झालेला. त्यानं रानं घेटलेली. मळा केलेला. हत्तीगत महेसाणा म्हशीची दावण केलेली. काही गडीमाणसं, बायका कायमच्या त्याच्याकडं कामाला होत्या. ह्याच्या सगळ्यांच्या अंगावर उचली. कुणाची उचल फिटायचीच नाही. कारण ह्यो शेकड्याला दहा टक्के व्याज लावायचा. त्यामुळं गब्बर झालेला. काही बायकाही याच्याकडं कामाला होत्या. पाहिजे तशा राबवून घ्यायचा ह्यो.

        खरंतर सवीला आठ दिवसापाठीमागंच ह्यो पर्याय सुचलेला. खरं नामदेव सावकाराची नजर काही ठीक नव्हती. त्यो बायास्नी, गड्यास्नी पैसे देतो आणि मागणं पाहिजे तसं राबवून घेतो, असा गावात बोल होता. त्याचा पैसाच फिटत नाही, त्यामुळं ती त्याच्याकडं जायाच टाळत होती. पण आता नाविलाज होता. बघूया तरी खडा टाकून म्हणून ती नामदेव सावकाराच्या घराकडं गेली.

        घर वस्तीवरलंच. फारतर दोन फर्लांगावर स्वत:च्या पायानं हरीण गुहेकडं चालत जावं तशी ती निघाली. आलं एकदाचं घर. सवीनं आत डोकावलं. टीवी सुरूच होता. सावकार सोफ्यावर हातात मोबाईल घेऊन त्यावर व्हाटस्‌अप करीत बसला होता. सवीला बघून त्यो उठला, ‘कागं सवे... येकी, आत येकीऽ..’ सवी भीतभीतच त्याच्यासमोर उभी राहिली. “काग काय काम हुतं का?’ त्यानं तिला खालणं वरपतूर निरखीत म्हंटलं

        ‘व्हयवं, एक नड हुती बघा...’

        ‘काय गं..?’ त्यो पुन्हा सोफ्यावर रेलून म्हणाला.

        ‘दोन वरसामागं... पतसंस्थेच्या भिशीचं कर्ज काढलेलं. तेची मुदत संपल्या. चेरमन घरात यिऊन बसल्यात, पैसे घेतल्याबिगर जाणार नाही म्हणत्याती!’ ती डोळ्यांत पाणी आणून म्हणाली.

        ‘मग मी काय करू?’ नामदेव सावकार बेफिकिरीन म्हणाला.

        ‘कायतर करून तेनला थांबवा... तुमचं ऐकत्याल. न्हायतर मला एक पंदरा हजार उचल द्या. मी कामाला येऊन फेडते समद...’

        ‘हे बग लोकं पैसं घेताना ग्वाड बोलत्यात... मागणं इवाळत्यात. नामदेव सावकार बाद हाय म्हणत्यात!’

        ‘न्हाय, तशी जागा ठेवत न्हाय मी.. तुमाला बोलायला.’ सवी गयावया करीत म्हणाली.

        ‘हे बग पैसं फिटोस्तर आमच्यातल्या बिगर दुसरीकडं कुठं कामाला जायाचं न्हाय. न्हायतर तुमाला हाय रोज एक बांद हुंगायची सवं.. तसलं चालणार न्हाय. कामाला हयगय न्हाय पायजे. बघ, तयार आसलीस तर लावतो फोन चेरमनला. सकाळी माजंमी पैसं पतसंस्थेत जमा करतो!’ उजव्या हातातला फोन डाव्या हातात तोलत सावकार म्हणाला. त्याची नजर तिला अधाशासारखी निरखीत होती... ती तशीच उठली. काही न बोलता चालू लागली. घरातून बाहेर आली. नामदेव सावकारानं खांदे उडवले.

        ती रस्त्याला लागली. मनात विचारांचं काहूर उठलेलं... 
काय करावं, घ्यावंत का सकाळी नामदेव सावकाराकडनं पंदरा हजार. घेतल तर कायम त्याच्यातच कामाला जावं लागल. त्याची रखेल बनून रहावं लागल. त्याच्या बोलण्याचा रोख तसाच हुता. आणि नाही घेतलं तर चेअरमन आता गप्प बसणार न्हायी. त्यो घरावर जपती आणल्याशिवाय राहणार न्हावी. काय करावं? ऱ्हावावं सावकाराकडं... एकदा आपुन त्याच्यात कामाला गेलो की कायमचं त्यातच अडकणार... सावकाराची बाईल म्हणून सगळे आपल्याकडं बघणार... आपुन नवरा नसलेली एकटी बाई, मग कोण कसाबी फायदा उठवाय बघणार. काय करावं, घ्यावं का पैसं... तिला वावटूळात घाबल्यागत झालं. पालापाचोळ्यागत ती रस्त्यानं भरकटत चालली...

        तिला पैलं दिवस आठवलं. आपला दारूडा नवरा आठवला... कसा का असंना खरं कुकवाला धनी हुता. दारूडा का आसंना पर न्हवरा हुता. कुणाची नजर वर करून बघायची बिशाद नव्हती. आता रानात कामाला जातूय तर भ्या वाटतंय माणसांचं, त्यांच्या नजरेच... जिकडंतिकडं डोमकावळे टपल्यात, मनात धाकधूक वाटत राहतं. या जगात एकट्या बाईनं जगावं कसं? आब्रुनं ऱ्हावावं कसं? त्यात बस्ती ही आसली. कोण कधी चानस मिळतुय ह्यासाठी टपलेली... गिघडाच्या औलादी... अवतीभवती... रानभर... तिला भवतीच्या अंधारातही ती गिधाडं दिसू लागली. त्यांचे लालभडक होळे चमकू लागले. वाकड्या टोची भीती दाखवायला लागल्या. काय उपेग आसलं पाचोळ्यागत जगून. दुसर्‍याच्या हातातलं खेळणं झाल्यागत. न्हील तिकडं वाहत जायचं. त्यापरास नगो ह्यो जलम. रांडमुंड बाईचा. मरून जावावं आपुन... गळफास घेऊन... तिला आता समजलं, विधवा बायका हिरीत का उडी घेत्यात. रेल्वे का जवळ करत्यात. स्टोव्हचा भडका का उडतो, आभाळाला भिडणारा...

        ती वाट तुडवीत होती. मनात नको नको ते भलते-सलते विचार येत होते. काळजात कल्लोळ उठलेला. घराकडं जायालाच नको. डोक्यात किडं पडल्यागत झालं होतं. भोकाड पसरून रडावं. ही धरणीमाय दुभागून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल. सगळंच मिटून जाईल, असं तिला वाटत होतं.

        ... घराकडं गेलो तर चेरमनला काय उत्तर द्याच? माघारी फिरावं, तर सावकाराकडं राहून शील कसं जपावं? तिला भिरमिटल्यागत झालं. सैरभैर होऊन, अंधारात ती दिशाहीन चालू लागली. हिकडं आड नि तिकडं हीर. कुणीकडं जावावं? कुणीकडंही गेलं तरी मरण हे अटळच. आगीतनं उठून फुफाट्यात पडल्यागत होणार होतं. मोठ्या संकटाच्या कचाट्यात घावली होती ती. डोसक्यात एकसारखं विचारांचं वावटूळ घोंगावू लागलं होतं.

        ...आणि अचानक एकाएकी तिला आठवण झाली. आपल्या नवऱ्याची आठवण म्हणून, तिनं जीवापाड जपून ठेवलेल्या सोन्याच्या डोरल्याची. एक काजवा लख्खक्न तिच्या डोळ्यांसमोरून चपकून गेला. उरावर धोंडा ठेऊन तिनं ठाम निश्चय केला. मन घट्ट केलं. डोरलं मोडून पतसंस्थेचं कर्ज भागवन्याइतकी रक्कम हाती येईल, या विचारानं ती आपली मजबूत पाऊले घराच्या दिशेने खंबीरपणे उचलू लागली... आता तिच्या पायांत दहा हत्तीचं बळ आलं होतं.

लेखक -  सचिन वसंत पाटील, कर्नाळ
            ता. मिरज, जि. सांगली,
            मोन. ८२७५३७७०४९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या