Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

काजळी | ललित लेख | सौ.क्रांती पाटील

kajali

‘‘दिव्यादिव्यांची ज्योत सांगते, तुझी नी माझी प्रीती.’’

खरंच एक अनोखी ओढ,एक अनामिक प्रेम, एक सुंदर नातं असतं जणू या दिव्यातील ज्योतीचे नी आपले. जन्मानंतर ते मृत्यूपर्यंत ही दिव्याची ही ज्योत आपले ओवाळून स्वागत करत असते. जीवन प्रवासात मार्ग दाखविण्यासाठीच तिची सोबत असावी असं नकळत मनाला वाटून जातं... जेव्हा, जेव्हा मी तिला न्याहळत राहते तेव्हा, तेव्हा.. हा प्रवास आठवताना पहिली आठवण येते ती बालपणीची काही समजण्या, उमजण्याचं वय नसतं. आई देखील ओळखत नाही. अगदी... अगदी तेव्हापासून मी ज्योतीला तिच्या मंद उजेडाकडे पाहत राहायचे. रांगत, रांगत प्रत्येक पाऊल तिच्याकडेच झेपावायचे. ‘‘हा’’ आहे बाळा असं सांगितलंही जायचं आईकडून. अगं चटका बसेल. भाजेल म्हणूनही आई सांगायची. पण तरीसुद्धा या ज्योतीची कधी भीती नाही वाटली. कधी तीचं मनातलं आकर्षक कमी नाही झाले. का? का? असावी बरं एवढी ओढ या ज्योतीची.

        जसजसे वाढत गेले. तसतसे त्या ज्योतीची अनेक गूढ आणि तिचे गुज ही नकळत मनाला समजत गेलीत. मिणमिण करत शांतपणाने जळत,जळत मंद उजेड देणारी ही ज्योत. मनाला नेहमीच एक नवीन ऊर्जा, एक अनोखी प्रेरणा व शांती देते आपल्या तनामनाला... उजळून टाकते दाही दिशा अन् अंर्तमन. अंधारमय गाभारा. जरी वारे आले. तरीही फडफडत राहते. पण विझत मात्र नाही. दिवस असो वा रात्र सतत मंदपणे जळणारी ही ज्योत. आज काही केल्या नजरे पुढून हलत नव्हती. खूप, खूप एकामागून एक असे विचार तिच्याबद्दल येत होते. वाटलं की ही सतत स्वत: जळत राहते. जळता, जळता इतरांना उजेड तर देतेच. त्यांच्या अंधारमय आयुष्यात तेजोमय प्रकाश देते. उजळून टाकते. घराचा आणि मनाचा कोनान् कोना. पण मनात आलं हिला स्वत: जळताना नसतील का बरं यातना होत? इतरांसाठी कसं जगावं व जगता, जगता कसं संपून जावं.. ते ही लख्ख, तेजोमय प्रकाश देऊन. हे आज तिच्याकडून मला समजत होते. जगायचं तर असतेच पण इतरांसाठी जगताना जरी वेदना झाल्या, यातना झाल्या तरी दुसर्‍याच्या चेहर्‍यावरील हास्य पाहताना. त्याचा विसर पडतो. हे कार्य करत असताना, कधी आपण संपून जातो हे लक्षात ही येत नाही. जगण्याची ही मौज आज मला तिच्याकडून समजत होती. तरीही मनात एक प्रश्न डोकावला... कारण सतत मंद जळत राहण्यामुळे सुध्दा त्या ज्योतीभोवती काजळी साठलेली दिसली. उजेड थोडासा धूसर झाला होता. वाटलं विझतीये की काय आता मधूनच अर्ध्यावरती... पण नाही... ती तशीच धुसरपणे तेवत होती... हळूच थोडासा स्पर्श करताच... ती ज्योतीची काजळी झटकन खाली पडली आणि काय जादू ... क्षणातच पुन्हा ती ज्योत लख्खपणे मंद उजेड देण्यासाठी नव्याने जळत राहिली. तो उजेड पाहून गालावरती हसू आले. का माहिती आहे का?

        जीवन जगण्यासाठीच एक गूढ मला आज उमगलं होतं. त्या ज्योतीकडे पाहून... आयुष्य काय वेगळं आहे. या ज्योतीपेक्षा... आपल्या शरीराच्या अंधारमय गाभार्‍यात ‘‘आत्मा’‘ हा या ज्योतीचं काम करत असतो. ही ज्योतच आपल्या ह्दयमंदिरात सतत जळत असते. जन्मापासूनच, मृत्यूपर्यंत सोबत करते. हे जीवन जगत असताना . अनेक चढउतार येतात. तेव्हा त्यालाही वेदना होतात. सतत विचार करून त्याला ही काजळी धरली जाते. म्हणून आयुष्याचा खेळ अर्ध्यावर सोडायचा नाही. त्याला आत्मविश्वासाने हळूच ती काजळी झटका आणि बघा कशी लखलखती ही चंदेरी दुनिया तुम्हाला पुन्हा मोहित करेल. एक नवीन आनंद, सुख समृद्धी घेऊन... तुमच्या स्वागताला ही ज्योत पुन्हा सज्ज असेल. पुढील सुखकर प्रवासाठी.

        - सौ. क्रांती तानाजी पाटील,
            दुशेरे (कराड)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या