Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

नाचून गेल्या चिमण्या | ललित लेख | प्रा.अरुण कांबळे

nachun gelya chimnya marathi lekh

नाचून गेल्या चिमण्या...!

    सकाळी अंगणातल्या चिवचिवाटानं जाग आली. चिमण्यांचा थवा अंगणात गलका करत होता. चटचट चटचट किड्या मुंग्या वेचण्यात सगळ्या गुंग होत्या. आईनं शेणानं सारवलेल्या अंगणाला नुकताच लखलखीतपणा आला होता. त्या शेणातल्या किड्या अळ्या आणि धान्य वेचण्यात रममाण झालेल्या चिमण्या माझी चाहूल लागताच भुर्रकन उडून लिंबांच्या झाडावर जाऊन बसल्या आणि अंदाज घेऊन काही क्षणात पुन्हा सारवलेल्या अंगणभर पसरल्या. चिमणा चिमणीचे ते चिवचिव करत, चटचट अन्न वेचत आणि टुणटुण उड्या मारत अंगणभर हुंदडणं डोळ्यात साठवत मी बाजूला बसून पहात होतो. काही अगदी मा‍झ्या जवळ येऊन मला निरखून पहात होत्या. मीही कुतुहलानं त्यांच्या डोळ्यात एकटक पाहत त्यांचं निरागसपण टिपून घेत होतो.

    आपल्याच तालात नाचणाऱ्या चिमण्यांनी अंगण सजून गेलं होतं. मध्येच शेळ्यामेंढ्यांचं ओरडणं, गाईगुरांचं हंबरणं आणि कावळ्यांचं कारकारनं ऐकत.. एकटक त्या अंगणाचं जिवंतपण अनुभवत होतो. बाजूला आईनं पाणी भरून ठेवलेली दगडी काटवटीत चिमण्यांची अंघोळीसाठीची धडपड आणि उडणारं पाणी कोवळ्या उन्हात अंगणाला सोनेरी झालर लावून जात होतं. तिथंच टपून बसलेली मनी आणि चिमण्यांचं हुंदडणं पहात दोन्ही पायावर तोंड ठेवून शांतपणे पहुडलेला काल्या होता. मध्येच अंड्याला आलेल्या करड्या कोंबडीचं देवळीत उडी मारण्यासाठी चाललेली धडपड आणि फांदीवर लक्ष ठेवून टपलेले कावळे सारे काही मा‍झ्या बनपुरीच्या घराच्या अंगणाची शोभा वाढवत होते.

    नुक्त्याच चार पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या शेळ्यांच्या करड्यांनी अंगणभर उड्या मारत चालवलेला धिंगाणा आणि सारवलेल्या अंगणात बारीक बारीक पडलेल्या लेंड्यांचा अंगणभर सडा पसरलेला होता. अंगणातल्या चुलीवर काळ्याकुट्ट अंगानं डिचकीत पाणी तापत होतं. दुसर्‍या बाजूला काट्याकुट्यात भक्ष शोधणारी पंडी मांजरीन तिच्याच तालात होती. पाणी तापवत डोळं चोळत, फुकणीनं फुकत शेकत गप्पा हाणीत बसलेली पोरं. असं गावाकडचं घरदार भरलं की अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी रोजच्या सकाळचं अंगण असं उजळून निघतं...

    आज चिमण्यांचं चिवचिवणं क्वचितच ऐकायला मिळतं. लहानपणी माळवदी घराच्या किलचानात चिमण्या घरटं करायच्या. घरटं बनवताना त्यांची चाललेली धांदल सारं घर उघड्या डोळ्यानं बघायचं. कधी कधी घरात पसरलेला कचरा, त्यातच पडलेलं एखादं फुटलेलं अंडं आणि कधीतरी उघड्या अंगाचं पडलेलं चिमणीचं पिल्लू पाहून मन हळहळायचं. चिमण्यांचं सुख आणि दुःख अनुभवत बालपण कधी सरलं समजलंच नाही. चिमण्यांनी मात्र घरात आणि मनात केलेलं घरपण हटता हटलं नाही.

    आज मात्र अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी मनाचं अंगण पुन्हा हरखून गेलं... अशा अंगणभर पसरलेल्या चिमण्या पुन्हा पुन्हा मनात नाचत रहाव्यात.. आणि घराचं अंगण पुन्हा सजीव होत रहावं..! (आज अंगण हरवलेली घरं आणि चिमण्यांचं ओसाडपण मनाची घालमेल वाढवत राहते अगदी मा‍झ्या आणि तुमच्याही.)

    - प्रा.अरुण कांबळे, बनपुरीकर
    बनपुरी, ता.आटपाडी जि.सांगली.
    मोनं.९४२११२५३५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या