पाउसधारा [ वृत्त – पादाकुलक]
गडगडणाऱ्या पाउसधारा
कडकडणाऱ्या पाउसधारा
कौलारांच्या डफड्यावरती
तडतडणाऱ्या पाउसधारा.
झरझरणाऱ्या पाउसधारा
कुठे साचल्या डोहावरती
थरथरणाऱ्या पाउसधारा.
झुळझुळणाऱ्या पाउसधारा
सळसळणाऱ्या पाउसधारा
लोट पुराचे होत वाहती
खळखळणाऱ्या पाउसधारा.
रिमझिमणाऱ्या पाउसधारा
घमघमणाऱ्या पाउसधारा
देवधनूचे रंग उधळती
चमचमणाऱ्या पाऊसधारा.
चिडचिडणाऱ्या पाउसधारा
रिपरिपणाऱ्या पाउसधारा
चिंब चिंबल्या पानांमधुनी
टिपटिपणाऱ्या पाउसधारा.
सो सो सो सो वाऱ्यासंगे
सपसपणाऱ्या पाउसधारा
कडे कपारी दरी दरीतुन
धबधबणाऱ्या पाउसधारा.
धुळ-बिंदूचे चुंबन होता
दरवळणाऱ्या पाउसधारा
तृण पर्णाचे रूप घेवुनी
हिरवळणाऱ्या पाउसधारा.
खोल उमटल्या दुष्काळाचे
वळ बुजणाऱ्या पाउसधारा
कणाकणातुन मनामनाला
अंकुरणाऱ्या पाउसधारा.
- सोमनाथ एखंडे
मो.नं. ९४२१८२७३३२
मो.नं. ९४२१८२७३३२
0 टिप्पण्या