स्त्रियांवरील जाचक आणि जीवघेण्या प्रथा-परंपरा. |
आज आपण पाहतो की एक स्त्री वर्षभराचे व्रतवैकल्ये करते. ती उपवास करते. साऱ्या परंपरा प्रथा पाळते तरीही ती सुखी राहत नाही. सुखी वाटत नाही. पूर्वीही स्त्रिया अशाच प्रकारे व्रतवैकल्ये करायच्या. पतीसाठी लांब आयुष्याची प्रार्थना करायच्या. परंतु त्या बदल्यात काय मिळायचं त्यांना? क्लेश, दु:ख, सतीप्रथा... जिवंतपणी त्यांना पतीच्या शरणावर जिवंत जाळलं जायचं आणि मोठ्या तोऱ्यानं सांगितलं जायचं की ती अमुक व्यक्तीची आदर्श पत्नी होती आणि ती त्याचेसाठी सती गेली. महत्त्वपूर्ण गोष्ट ही की ती सती जात नव्हती स्वत: होऊन. परंतु आमचा समाज स्वत: आदर्श नसला तरी स्वत:ला आदर्श मानणारा हा समाज तिला पर्यायानं जगू देत नव्हता. तिला पदोपदी त्रास देत होता आणि बंधनात बांधत होता.
तिच्या पतीच्या निधनानंतर लगेच तिची इच्छा असो वा नसो, तिचा साजश्रृंगार उतरवला जायचा. तिला पांढरी साडी दिली जायची. तिचं कुंकू पुसलं जायचं. पायातील जोडवी काढली जायची. हातातील बांगड्या फोडल्या जायच्या आणि जर तिला पती शय्येवर सती जायचं असेल तर तिचा साज श्रृंगार उतरवला जायचा, नाहीतर सोळा श्रृंगारांनी तिला नटवलं जायचं. चांगला भरजरी शालू परिधान करून नाकात मोत्यांची माळ घालून पतीच्या सरणासोबत तिचीही मिरवणूक काढली जायची आणि पतीच्या चितेसह तिचाही अग्निप्रवेश केला जायचा. या अग्निप्रवेशाची आपण कल्पनाही करू शकत नाही की तिला किती परेशानी होत असेल. जिवंत जळताना तिच्या वेदना ह्या तिलाच माहीत असायच्या. त्यातच ती बाहेर येऊ नये म्हणून शय्येवर टाकताना काही ठिकाणी तिचे हातपायही बांधले जायचे. किती अघोरी प्रथा होती ती. पतीच्या शवासोबत जी स्त्री सती जात नसे तिचा छळ केला जात असे. तिला राजसी सुख मिळत नव्हतं. तिला टोमणे मारले जात होते. समाज तिला बरोबर जगू देत नव्हता. काहींच्या घरी तर घराच्या चार भिंतीत तिला डांबून ठेवलं जायचं आणि परिवारातील लोक तिची इच्छा नसतानाही तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. हे असं वैधव्य असायचं. म्हणूनच स्रिया आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी कामना करीत की पती हा जास्त दिवस जगायला हवा. कारण पती जर जिवंत असेल तर कोणी तिला विधवा म्हणणार नाही किंवा कोणीही तिच्यावर लांच्छन लावणार नाही वा कोणीही घरातील व्यक्ती तिच्यावर बळजबरी करून सामुहिकपणे बलात्कार करणार नाही.
आता तो काळ गेला. सतीप्रथा बंद झाली. लोकं आज सतीप्रथा पाळत नाहीत. परंतु प्रथा परंपरा आजही पाळतात. कारण पतीनं सुख द्यावं. परंतु आजचेही पती त्यांना खरंच सुख देतात का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आजचेही काही पती आपल्या पत्नीला जुगारामध्ये लावतात आणि हरतातही, तिचा दारूसाठी वा इतर शौकासाठी सौदाही करतात. आजही पती मरण पावताच त्याच्या स्त्रियांना विधवेचा पोशाख परिधान करायला भाग पाडलं जातं. तिला पांढरी साडी नेसवली जाते तिच्या बांगड्या फोडल्या जातात आणि तिचं कुंकू पुसलं जातं आणि काही ठिकाणी तर घरच्या इतर मंडळी कडून बलात्कार होतच राहतात. खरंच ह्या सर्व प्रथा परंपरा पाळण्याचा फायदा होतो का? ज्या पतीच्या लांब आयुष्याच्या कामनेसाठी एवढ्या प्रमाणात त्या पाळल्या जातात तर तो पती अल्पावधीत का मरावा किंवा पती निधनानंतर तिला विधवेचं जीवन तिला का जगावं लागावं आणि महत्त्वाचं म्हणजे एवढी व्रतवैकल्ये पाळून सुद्धा पतीनं पत्नीला का घरातून हाकलून दिलं जातं? ज्या पतीसाठी ह्या प्रथा परंपरा पाळल्या जातात त्या पतीनं दारू, जुगार, गांज्याच्या आहारी जावे काय? त्यानं त्या स्त्रीला मारझोड करावी काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत...
महत्त्वाचं म्हणजे ‘ज्या प्रथा परंपरा चांगल्यासाठीच आहेत त्या पूर्वजांनी पाडलेल्या आहेत. त्या त्यांनी अगदी विचार करूनच पाडल्या असतील त्याला वाईट म्हणू नये’ असे म्हंटले जाते. परंतु त्या प्रथा परंपरा पाळण्यातून जर ती स्त्री संतुष्ट नसेल तर तिला त्या प्रथा परंपरा पाळण्याची बळजबरी का करावी? ती करू नये. कारण जी गोष्ट करण्यापासून किंचितही फायदा होत नसेल तर ती गोष्ट करता कामा नये. त्याची बळजबरीही करता कामा नये. प्रथा परंपरेबाबत हेच आहे आणि मुख्य म्हणजे प्रथा परंपरा पाळायच्या पुरुषांसाठी. परंतु ज्या पुरुषांसाठी ती व्रतवैकल्ये करते, त्या पुरुषांनी एक पत्नी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीला अचानक विवाहानंतरच्या जीवनात वितुष्ट आल्यास एकाएकी सोडू नये. तिचा विचार करावा आणि तिला हाकलून देऊ नये. लग्न म्हणजे एक अतूट बंधन असते आणि ते अतूट नातं दोघांनी आयुष्यभर जपायचं असतं.
-अंकुश शिंगाडे, नागपूर
मो.नं. ९३७३३५९४५०
0 टिप्पण्या