डोले (ताबूत)
लहानपणी गावात बसविले जाणारे डोले (ताबूत) आणि त्याची मिरवणूक अजूनही स्पष्ट आठवते... गावात मुलाणी आणि अत्तारांची दोन चार घरे होती. आता चाराची आठ झालीयत. सर्वांचे गावाशी सलोख्याचे संबंध. सगळे गाव एकत्र येऊन हा डोल्याचा उत्सव साजरा करायचे. आजही करताहेत!
गावात पाटलाच्या वाड्यामागील बाजूला माळवद वजा मशिदीची खोली होती. त्यामध्ये डोले बनविण्यापासून ते सजवण्यापर्यंत सगळेजण उत्साहाने कामाला लागायचे. काठ्या, कांब्या, चिरमुरे आणि जिलेटीनचे कागद, गव्हाची खळ, पताके यांनी डोला विशिष्ट पद्धतीने बनवून सजवला जायचा. त्याचा विशिष्ट आकार व त्यावर बनवलेली चाँदाची प्रतिकृती उठून दिसायची. खालच्या आळीपासून वरच्या आळीतले जाणकार आणि पोरेठोरे डोला सजवण्यात तल्लीन झालेली असायची. स्पीकरवर कव्वालीची गाणी लावली जायची. डोला भेटाभेटीच्या दिवशी रात्री पडद्यावर एक दोन सिनेमे असायचे. लाऊड स्पीकरवरून साऱ्या गावभर आणि वस्त्यांवर सिनेमाची खबर पोहचलेली असायची. गावातल्या मशिदीपुढं गोल खड्डा खोदलेला असायचा. रंगीबेरंगी सजवलेला डोला आणि त्यापुढं वेगवेगळ्या वासाच्या अगरबत्या आणि उदीचा धूर... त्यांचा दरवळ हवाहवासा वाटायचा. चपातीचा मलिदा मुठभरून प्रसाद म्हणून वाटला जायचा. (त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळून राहीलीय.) हातात दोऱ्याचा गंडा बांधला जायचा. सिनेमाच्या रात्री भेटाभेटीसाठी डोले निघाले की सिनेमा थोडा वेळ थांबवला जायचा. कासार आळीतल्या कैकाड्याच्या घराजवळ डोला भेट व्हायची. डोला पुन्हा मशिदित ठेवला जायचा. पुन्हा सिनेमा सुरु व्हायचा! पाटलाच्या वाड्याच्या बाजूची व मराठी शाळेसमोरची अत्ताराची एक एक घरं आणि म्हसोबा देवळाच्या पुढच्या टेकावर मुलाण्याची घरं आजही डोल्याचा सण गावासोबत एकत्र येऊन उत्साहात साजरा करताहेत!
अजूनही आठवतंय... पांढरे शुभ्र धोतर तसाच स्वच्छ शर्ट आणि डोक्यावर नेहमी गांधी टोपी घालणारे नुरा चाचा नेहमी हसतमुख व उत्साहाने समारंभाची जबाबदारी पार पाडायचे. गावात त्यांच्याबद्दलचा आदर अजूनही आठवतोय. पोस्टमास्तर असणारे हसन अत्तार तसेच सायबु व बबन अत्तार सगळ्यांच्या हातावर दोरे-गंडे बांधायचे. कुणी मलिदा, चोंगे, रोट खायला दयायचे. दोन दिवसाचा डोल्याचा उत्सव सगळ्या गावाचा उत्सव बनून जायचा...
डोले विसर्जनासाठी सगळे गाव मशिदी पुढं जमायचे. मशिदीच्या खड्ड्याभोवती नुरा चाचा सोबत गावातले अबालवृद्ध फेर धरून गाणी म्हणायचे... "माळी दादा पाणी जाऊ दे पाटानं रं" अशी बरीचशी ग्रामीण ढंगातली गाणी एका सुरात सगळे खड्ड्याभोवती गोल फिरत म्हणायचे. त्यात आम्हीही मिसळायचो. त्या गाण्यांमध्ये सुखदुःख आणि सगळं ग्रामीण जीवन उभं रहायचं... मशिदीपुढं एक वेगळं असं ग्रामीण रुप नजरेस पडायचं. विसर्जन मिरवणूकीची वेळ झाली की एका छोट्या डबीत काही नाणी ठेवून तो डबा त्या खड्ड्यात विशिष्ट पद्धतीने पुरुन ठेवला जायचा. खड्डा मातीने भरला जायचा. त्याच्या मधोमध उंचवटा करून डाळींबाच्या झाडाची फांदी लावून ठेवायचे. तिकडे डोल्याचे कागद सुरकुतलेले दिसायचे. (आम्हाला त्याचं कुतुहल वाटायचं) दुःखी वातावरणात आणि वाद्यांच्या साथीत डोल्याची विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. गावातले जाणकार खांदे दयायचे. हातातले दोरे काढून खड्ड्यावर किंवा डोल्यावर ठेवले जायचे. "आल विदा साऱ्या देशाची चिंता अलविदा" असा घोष सुरु असायचा. डोल्याची मिरवणूक देशमुख आळीतून खंडोबाच्या देवळापर्यंत आणि तिथून एसटी स्टॅंड चौक ते गावातल्या पेठेतून मारुती मंदिरासमोरून वळसा घालून ओढ्याकडे जायची. वाटेत गावातली बायामाणसं-पोरंसोरं डोल्याला नमस्कार करायची. गावासाठी दुवा मागत रहायची. हातातले दोरे डोल्यात ठेवायची. अंगारा लावून घ्यायची. थोडा अंगारा घरादारात फुकायला न्यायची. डोला ओढ्यात नेऊन विसर्जित केला जायचा. दुःखी अंत:करणाने सगळा गाव मशिदीजवळ येऊन एकमेकांना निरोप देऊन आपआपल्या घरी जायचा. सगळ्या गावचा "डोला" एक उत्सव होऊन जायचा. दोन चार दिवस डोल्यातली गाणी, स्पीकरवरच्या कव्वाल्या मनात घर करून रहायच्या पुढच्या वर्षासाठी!!
आजही गावात त्याच एकोप्याने डोला सण साजरा होतोय. नुरा चाचा नंतरची पिढी मुसाभाई, दाऊदभाई, आणि मुलाणी-अत्तारांची कुटूंबं त्याच उत्साहाने प्रत्येक वर्षी "आल विदा" म्हणत गावाची परंपरा व एकोपा टिकवून आहेत!!'
- प्रा.अरूण कांबळे, बनपुरीकर
बनपुरी, ता.आटपाडी, जि.सांगली.मो.नं. ९४२११२५३५७
0 टिप्पण्या