Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

रेल्वे प्रवासातली देवी | सौ राधिका माजगावकर पंडित

mahila railway pravas katha

मराठी कथा : रेल्वे प्रवासातली देवी

गाडीला तुफान गर्दी होती. गार्डने शिट्टी वाजवली आणि गाडी हलली. माझी बायको सुवर्णा वर चढली होती. माझा मात्र एक पाय बाहेर आणि एक पाय आत होता. मा‍झ्या मागच्या आजींना मी वर ओढून घेतले. त्यांच्या मागची तरुणी आजींना वर चढवताना, एकदम जोरात किंचाळली, “चोर ऽऽ चोर ऽऽ”

आता मी आणि आजी डब्यात होतो, तर तिचा एक पाय आत तर दुसरा हात आणि पाय पण बाहेर होता. मी मोठ्या मुश्किलीने तिला वर ओढलं. ती ओरडून सांगत होती, “ काका माझं मंगळसूत्र खेचले हो! तो बघा! पळाला तो ऽ तो ऽऽ चोर”

मीही जोरात ओरडलो, “अरे पकडा पकडा त्याला कुणीतरी”. प्लॅटफॉर्मवरही तुफान गर्दी होती. तरी एक दोघंजण त्याच्यामागे पळाले पण तो बदमाश रूळ ओलांडून पलीकडे जाऊन लपला. रुळावरून दुसरी गाडी गेली. आमची गाडी पण हलली.

आजींना भोवळ आली. त्यांनी खालीच बसकण मारली. आणि ती तरुणी! नाही हो! ती नववधू होती. हातातला हिरवा चुडा सौभाग्यवतीची नव्या नवतीची साक्ष देत होता.

हे सगळे इतकं अकस्मात, तडकाफडकी घडलं की मी काय, गाडीतल्या बायकासुद्धा गांगरल्या. हिरव्यागार साडीतली, सुवासिनीचं संपूर्ण सौभाग्य लेणं ल्यायलेली ती नवोढा! तिचा मोकळा गळा मलाही ओका बोका, भकास वाटला.

सुवर्णा आजींना सावरत होती. त्या मुलीकडे कुणाचेच लक्ष नव्हतं. नदीच्या लाटा एकमेकांवर आदळाव्या तसे हुंदके तिला आवरत नव्हते. मला मा‍झ्या मुलीची आठवण झाली. थरथर कापणाऱ्या तिला मी डोक्यावरून हात फिरवून शांत केलं आणि विचारलं, “नाव काय बाळ तुझं? ”

शब्द फुटत नव्हते. कसं बसं ती म्हणाली, “मुग्धा”.

आता डब्यातल्या बायकांनी मोर्चा तिच्याकडे वळवला. शेवटी बायकां त्या बायकाच. प्रत्येकीने आपापली मुक्ता फळं उधळली “पण मी म्हणते, मंगळसूत्र पदरा बाहेर काढून मिरवावंच का? माहित आहे ना गर्दीच्या ठिकाणी चोरटे वावरत असतात ते.”

आधीच घायाळ झालेली मुग्धा कळवळून म्हणाली, “नाही हो काकू, काळजी घेतली होती मी. गाडी सुरू झाली होती, ‘आजींना काही झालं तर’ या विचारांनी माझा थरकाप उडाला. पदर गळ्याभोवती लपेटून घेतला होता मी. पण आजींचा तोल जाऊ नये म्हणून माझा हात वर गेला आणि थोडंसं बाहेर आलेलं मंगळसूत्र चोरांनी खेचलं.”

आता मात्र तिच्याकडे रागाने बघणाऱ्या आजींच्या नजरेतला विखार विझला होता. त्यांच्याही लक्षात आलं, त्यात तिचा बिचारीचा काहीच दोष नव्हता. पुढे होऊन त्या म्हणाल्या, “शांत हो बाळा, आता तो विचार करू नकोस. झालं ते झालं. तू काळजी घेतली होतीस ना! आता स्वत:ला दोषी ठरवू नकोस. घडणाऱ्या गोष्टी घडतातच.”

मी सुवर्णाला खूण केली थर्मासमध्ये आणलेले सरबत तिने आजींना आणि मुग्धाला पाजलं. नंतर दोघी जरा शांत झाल्यावर ती म्हणाली, “असं बघा आजी, तुम्हाला दोघींना फार मोठा धक्का बसलाय. पण काय करणार? घडलं ते इतकं क्षणभरात भयंकरच घडलंय. चोराला पकडायला दुसरी गाडी मधे आल्यामुळे आणि आपल्याही गाडीने वेग घेतल्यामुळे कुणालाच धावायला वाव मिळाला नाही. पण हे लक्षात घ्या, तुमचा जीव वाचलाय. मुग्धाचं सगळं लक्ष तुमच्याकडे होतं. गाडीत चढताना तुमचा पाय घसरला. तिने तुम्हाला सावरलं.”

आजी म्हणाल्या, “खरं ग बाई, खरंय तुझं म्हणणं. माझा जीव वाचवला नसता तर गेले असते मी गाडीखाली.”

त्यांच्या तोंडावर हात ठेवत मुग्धा म्हणाली, “असं नका नं बोलू आजी, मी नाहीतर तुळजा भवानीनीच तुम्हाला वाचवलं. आई जगदंबेची कृपा आहे आपल्यावर.”

“खरंय मुग्धा, माझं काही बरं वाईट झालं असतं तर, नव्या नवरीला, म्हणजे तुला वाईट पायगुणाची म्हणून सगळ्यांनी फाडून खाल्लं असतं” आजी तिला जवळ घेत म्हणाल्या.

माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती शेवटी मी म्हणालो, “मला एक सांगा आजी, तुम्ही दोघीच कशा काय? बाकीची लोकं कुठे आहेत? ”

“अरे बाबा, घरुन निघताना एक मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून ते कारने मागून येत आहेत. मला आरामात रेल्वेने उठता, बसता, झोपता यावं म्हणून आम्हाला दोघींना पुढे पाठवलं. मंदिरात निवांत वेळी जाऊन, ओटी भरायची आमच्या कुलस्वामिनीची, असं ठरलं होतं. जरा आड बाजूला, खेड्यातच आहे हो आमची देवी. खेड्यात राहणारे आमचे नातेवाईक आम्हाला घ्यायला स्टेशनवर येणार आहेत. हौशी माणसे तर बँड बाजा सकट येणार आहेत” हे सांगताना आजी एकदम थबकल्या. शॉक बसल्यासारख्या गप्प झाल्या.

मी जवळ जाऊन विचारलं, “काय झालं आजी? अशा घाबरलात का एकदम?”

पाण्याचा पेला मी त्यांच्या पुढे केला. तो घटाघटा पिऊन त्या म्हणाल्या, “अरे पोरा, आमची खेड्यातली मोठी माणसं म्हणजे जुनी खोडं. जुन्या विचारांची संस्कारक्षम माणसं आहेत. नव्या नवरीचे स्वागत म्हणून आम्हाला घ्यायला येतील. तेव्हा या पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, असं पाह्यल्यावर माझे चुलत सासरे, मोठे दीर माझीच हजेरी घेतील. नातसुनेला खडसावतील, ‘सूनबाई ही कुठली फॅशन? नवी नवरी नवीन सून आहेस ना तू? कुलस्वामिनीला पहिल्यांदी दर्शनाला जाताना असा हा भुंडा गळा? हे बघ! असलं काही आमच्याकडे चालणार नाही. आत्ताच्या आत्ता आधी मंगळसूत्र गळ्यात घाल. तुझी फॅशन तुझ्या माहेरी’ हे असं आणि पोरीला काही बाही बोलून नको करतील आमचे नातेवाईक. आता गाडीत मी कुठलं मंगळसूत्र आणू? आणि हीच्या गळ्यात काय घालू? काय करावं बाई? आता हे नवीन संकट उभं राह्यलंय.”

आजी विचारांनीच घामाघूम झाल्या होत्या. मुग्धा परत रडवेली झाली. आधीच तिचे डोळे रडून रडून सुजले होते. त्यात आणखी भर. आजी पुटपुटत होत्या “मंगळसूत्र एक ग्रॅमचं साधं होतं. ते गेल्याचा विचार एक वेळ बाजूला ठेवीन. पण... पण कुलस्वामिनीच्या दर्शनाला मोकळ्या गळ्यांनी! बापरे! अपशकुनच समजतील सगळे. आम्ही रात्री अकराला पोहोचणार. पहाटे देवीला, दर्शनाला जायला निघणार, दोन्ही वेळी दुकानं पण बंद. पण मग मंगळसूत्र कुठून आणायचं?” आजी कासाविस झाल्या.

मुग्धाच्या चेहऱ्याकडे बघवतं नव्हतं. कात्रीत सापडली होती बिचारी. असं उघड्या गळ्यांनी मोठ्या लोकांसमोर जाणं तिलाही पटत नव्हतं. पण काय करायचं? काय करू मी आता? किती अगतिक झाली होती ती. आता मीच काय, रेल्वे डब्यातले सगळे स्तब्ध झाले होते.

... आणि एकदम माझी बायको सुवर्णा उठली, तिने मला खूण केली. आम्ही बाजूला गेलो. ती म्हणाली, “मी सांगते ते चूक की बरोबर काहीही समजा आणि फक्त हो म्हणा. हे बघा तुमच्या मित्राकडे आपण मुक्काम करून पहाटेच अंबाबाईच्या दर्शनाला, ओटी भरायला जाणार होतो ना.”

मी गोंधळलो आता हे काय नवीन? इकडे चाललंय काय! आणि हीचं काय मधेच? “अगं सगळा कार्यक्रम ठरलाय ना आपला? मित्राच्या ओळखीने पहाटे, गर्दी नसते म्हणून, ओटी भरायची वेळ हट्टाने तूच ठरवलीस ना? आता बदललास का बेत. तुझं म्हणजे प्लॅनिंगच नसतं सुवर्णा.” मी करवादलो.

मला शांत करीत ती म्हणाली, “अहो पण पहाटे ओटीची दुकानं बंद असतात.”

आता मात्र हद्द झाली, “कमाल आहे तुझी! अगं कालच भारी साडी, एक ग्रॅमचे मंगळसूत्र, इतर लेणी, ओटीचं सामान वगैरेची आपण खरेदी केली होती ना? ते सगळं घरी विसरलीस वाटतं! बाकी तुझ्या वेंधळेपणाचा कळस आहे.”

मा‍झ्या चढलेल्या आवाजाला संयमाने शांत करीत ती म्हणाली, “तुम्ही ना सगळ्यांसमोर मला बोलू नका. मी ठरवलयं, अंबाबाईच्या दर्शनाला रांगेत उन्हातान्हांत उभं राहावं लागलं तरी चालेल. उजाडल्यानंतर दुकानं उघडल्यावर मी ओटी दुकानातून घेणार आणि मग आपण दर्शनाला जायचं.”

मी म्हणालो, “अगं पण, आपल्या जवळच्या ओटीचं काय? ”

“तुम्ही असे चिडू नका हो, नुसतं बघा मी काय करते ते”, असं म्हणून ती वळली देखील. तिचा ठाम निश्चय ठरला होता. मग आता ती काय करते ते नुसतं बघण्याशिवाय माझा दुसरा काही इलाज नव्हता.

वि‍जेच्या वेगाने ती जागेवर गेली. तिने चपळाईने वरच्या बर्थ वरची बॅग काढली. त्यातून ओटीचं सगळं साहित्य बाहेर काढलं. आजींच्या जवळ जात ती म्हणाली, “आजी, मी जे करते ते पटतयं का बघा तुम्हाला. आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला आईची ओटी भरायला निघालो आहोत. हे बघा मणी मंगळसूत्र बांगड्या आणि हे ओटीचे सामान.”

आजी तुमची समस्या कळली मला. मंगळसूत्राबद्दल मुग्धाला कोणी बोललेलं आम्हालाही बरं नाही वाटणार, कारण मुग्धा आम्हाला मुलीसारखी वाटतेय. जग कितीही पुढे गेलं तरी आपलं मन संस्कारक्षम असतं.

मुग्धा भांबावलेली नवी नवरी आहे. तिला बघितल्यावर का कोण जाणे! मला आणि ह्यांना आमची मुलगी आठवली. तिला अशी दुःखी नाही बघू शकत आम्ही. देवीची ओटी मी नंतर भरीनच. पण आत्ता इथे ह्या देवीची, मुग्धाची ओटी मी भरणार आहे. हे मणी मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, सुवासिनीची लेणी, इथेच या प्रवासात मी तिला घालायला लावणार आहे. तुमची काही हरकत नाही ना आजी?

आजी इतक्या अवाक झाल्या की त्यांना आनंदाने बोलणंही सुधरेना आणि मग सुवर्णा, माझी बायको ठाम निश्चयाने उठली.

आता मला संदर्भ लागला. मी तिचं हे नवं रूप चकित होऊन बघतच राह्यलो. सुवर्णाने खरोखरच किती धोरणाने सुरेख सुवर्णमध्य साधला होता. तिने मुग्धाची ओटी भरली. प्रथम तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, लाल चुणूक साडीवर हिरव्या खणा नारळाची ओटी, हिरव्या बांगड्या खुलून दिसत होत्या. आजी गदगदीत होत म्हणाल्या, “पोरी, आमच्या डोक्यावरचं फार मोठ्ठं ओझं उतरवलंस गं बाई तू! माझ्या सुनेत तू देवीला पाह्यलंस, तर तुझ्यात मला देवी दिसली. धन्य आहेस. माझा मोठ्ठा आशीर्वाद आहे तुला.”

वातावरण हसरं करायचं म्हणून मी मध्येच ओरडलो, “आजी तिला अष्टकन्या नाही सौभाग्यवती सुखी भव म्हणा. आणि आमच्या इष्ट कन्येलाही भरगच्च आशीर्वाद द्या, आणि या देवीसमोर ह्या पामराच्या डोक्यावरही आशीर्वादाचा हात ठेवा.”

आनंदाश्रू पुसत आजी खळखळून हसल्या आणि मुग्धा! ती तर खूप भारावली होती. तिच्या नेत्रात लक्ष लक्ष ज्योतींनी फेर धरला होता.

रेल्वे धावत होती. रेल्वे च्या डब्याला मंदिराच्या स्वरूप आलं होतं. कुणीतरी म्हणालं, “आई तुझी अनेक रूपं.”

एका वृद्ध साधूने खणखणीत आवाजात जय जयकार केला, “जय मातादी । वैष्णोदेवी की जय, जय हो माते ॥”

आणि मी! मा‍झ्या गृह लक्ष्मीकडे, सुवर्णाकडे, अभिमानाने पहात होतो. तिच्यात मला अंबाबाई दिसली. ती अन्नपूर्णा आहेच. प्रसंगावधान राखून अडीअडचणीशी सामना करणारी ती मला दुर्गा भासली, निश्चयापासून न ढळणारी अचला होती ती. निर्णय क्षमता साधणारी चतुर स्त्री होती ती. खरंच, मानलं मी तिला, स्त्री हीच खरी देवीची अनेक रूपं आहेत. हेच खरे नवरात्र आणि हाच खरा नवरात्राचा अंबाबाईचा जागर.

अंबा माता की जय. म्हणा. दुर्गे दुर्घट भारी…

लेखिका: सौ राधिका माजगावकर पंडित, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या