‘तिच्यातला महिषासुर’ मराठी कथा लेखिका- स्वप्ना मुळे (मायी)
लालसर खमंग दाणे भाजून, बाजूला पांढरीशुभ्र वरई धुवून सुकवायला ठेवली होती.. बारीक गुळ घालून दाण्याचे लाडू वळताना त्यांच्या गप्पा देखील सुरू होत्या आपल्या मुलाच्या मित्राशी, म्हणजे रवीशी..
त्या म्हणाल्या, "मला आवडतो हा सिजनल बिझनेस करायला.. अरे, घरासाठी जीवचं रान करत धडपडणाऱ्या या दुर्गा, घरातल्या देवीला मनापासून सजवतात.. हार, फुलं, लख्ख घासून लावलेल्या समया.. हे सगळं करताना स्वतःलाही आंनदी ठेवत स्वतः सजवतात, नऊ दिवस त्यांच्या शक्तीला खरंच सलाम करावा वाटतो.. कारण ह्या सगळ्या धावपळीत त्यांचे उपवास चालू असतात.. देवीसारख्याच तेजाने त्या झळकत असतात.."
रवी हातातली लाडूची वाटी ठेवत म्हणाला, "खरं आहे तुमचं, स्त्रीशक्तीला सलाम आहेच.." एवढं बोलून त्याने पत्ता लिहिलेली चिठ्ठी त्यांच्याकडे दिली आणि तो निघाला..
देवीला सुंदर रेशीम वस्त्र तिने शिवून आणले होते.. पटापट पांढऱ्या कापसाची वस्त्रमाळ रंगवत तिने घटावरची माळही केली.. तो सोवळं नेसून जमेल तशी तयारी करत होता.. ती मात्र मध्येच चिडचिड करत होती.. धावत पळत स्वयंपाक घरात डोकावत होती.. पूजेला आलेल्या गुरुजींशी बोलत होती.. मध्येच आलेली सासरे बुवांची चहाची फर्माईश पूर्ण करत होती, आणि सारखी घड्याळाकडेही बघत होती..
त्याचंही लक्ष पूजा सांगणाऱ्या गुरुजींकडे होतं, पण तिच्या धावपळीकडेही होतं.. चहा घेताना तो तिला म्हणालाच, "तू जा निघून ऑफिसला, आम्ही आरती करून घेऊ.."
तिचा विचार करून त्याने दिलेला हा सल्ला, तिच्या मनात मात्र उगाच गैरसमजाचा महिषासुर जागा झालेला.. "काही नाही, मी जाते बरोबर, तूच जरा लवकर आटप,.."
त्याने मग पटकन चहाचा कप तोंडाला लावला.. नैवेद्य दाखवत आरती झाली.. देवीच रूप खरंच खुलून दिसत होतं....
छान काठापदराची साडी घालून, सगळ्यांच्या जेवणाची तयारी करून ती निघाली होती ऑफिसला.. फक्त पाण्याची बाटली घेऊन.. खरंतर स्वतःची काळजी घेणं तिलाच माहीत नाही, पण ह्याचा सगळा राग त्याच्यावर काढत.. उगाच धुसफूस करून, त्याला टोमणे मारत ती निघाली.. तिच्या मनातला अहंकाराचा महिषासुर उगाच डोकं वर काढत होता... ‘मी केलं सकाळपासून सगळं..'
खरंतर तोही होताच की बरोबर, पण निसर्गाने घडवलेला त्याचा पुरुषी ढाचा तिच्या पुढे गतीमध्ये जरा कमीच, ती मात्र अगदी लगबग लगबग ह्या सगळ्यामध्ये स्वतःसाठी नेहमीप्रमाणे काही न बनवता निघाली त्या चहाच्या कपावर.. सगळी धुसफूस त्याच्यावर काढत..
निघताना देवीला हात जोडल्यावरही तिच्या डोळ्यात पाणी आलं.. "नुसती मरमर लावली आहेस आमच्या मागे, संस्काराचं हे सुख टोचतं देखील आणि आनंद देखील देतं गं.. म्हणून ह्या परंपरांना सोडूनही द्यावसं वाटत नाही.. पण त्यात ह्या पुरुषांना मात्र अगदी अलगद ठेवतेस तू.." असं मनात म्हणताना तिने रवीकडे रागाचा कटाक्ष टाकला.
हे रवीला जाणवलं पण त्याने 'साडीत सुंदर दिसतेस' अशी डोळ्याने प्रतिक्रिया देताच ती झिडकारून ती निघाली.. मनातल्या रागाचा महिषासुर मोठा करत..
ऑफिसमध्ये आल्यापासून कामाने पाठपुरावा केला होता.. घड्याळाकडे लक्षही नव्हतं.. पण पोटात खोल खड्डा पडला आणि तिला भुकेची जाणीव झाली.. आज रोजच्यासारखा डबा नाही.. आज उपवास आहे आपला.. आणि सकाळी सगळ्यांचं करण्यात आपण तसेच आलोय फक्त पाणी घेऊन..
ती खुर्चीत बसली आणि तिने बाटलीतील पाणी घटाघटा पिलं.. परत नवऱ्याची आठवण काढत चिडचिड केली.. 'ह्याला काय, मस्त जेवला असेल... आपली काही काळजी नाही...'
परत भुकेच्या जाणिवेने ती कळवळली.. शिपायाला हाक मारण्यासाठी उठणार तेवढ्यात नऊवारी पातळ घातलेल्या आजी तिच्यासमोर आल्या.. हातातली स्वच्छ सुती पिशवी टेबलावर ठेवत म्हणाल्या, "रवीची बायको तूच ना.."
त्यांच्या या प्रश्नावर तिने आश्चर्याने "हो, मीच" म्हणत त्या टेबलावर काढत असलेल्या डब्याकडे पाहिलं.. त्यांनी तोपर्यंत प्लेटमध्ये गरम थालपीठ, दही, लोणचं, गोड म्हणून पेढा आणि फळ म्हणून केळं वाढलं होतं..
हसत ते ताट तिच्याकडे देत आजी म्हणाल्या.. "सुनबाई हे घे, शांतपणे खाऊन घे.. मी कोण, काय सगळं सांगते.."
तिलाही त्या थालपीठाच्या खमंग वासाने राहवलं नाही, पोटातल्या भुकेने उसळी मारली आणि ती आनंदाने त्या फराळाचा आस्वाद घेऊ लागली.. आजी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, "मी तुझ्या रवीच्या मित्राची आई.. गेल्या दोन वर्षांपासून हा बिझनेस करते.. नवरात्रीत गरमागरम फराळ पाचतरी स्त्रियांना देण्याचा.. ह्यात पैसा मी कमावते पण समाधान ते जास्त पटीने कमावते..
ह्या नऊ दिवसात देवीच्या सेवेसाठी झटणाऱ्या आपण बायका स्वतःकडे दुर्लक्ष करतो.. ते आपल्या स्वतःच्या स्वभावामुळे, आणि चिडचिड मात्र नवऱ्यावर करतो.. तो काहीच करत नाही म्हणून..
खरंतर तो त्याच्या गतीने करत असतो, आपण मात्र आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन ओढून ताणून हे करत असतो.. ते आपल्यालाच सहन होत नाही, आणि मग राग, चिडचिड असे नकारात्मक महिषासुर आपल्यात जागे होतात आणि आपलंच आपल्या जोडीदारासोबत नातं खराब करायला लागतात.. लेकरांवर चिडचिड करायला लागतात हे महिषासुर...
घरात सगळ्यांना वाटत असतं ही आपली देवी का कोपली आहे आपल्यावर? ते बिचारे विचारात असतात,..
आता हेच बघ ना, तू जर अशीच उपाशी राहिली तर तुझी किती चिडचिड होईल, त्यापेक्षा असं गरमागरम खा आणि तृप्त हो.. म्हणजे तू परत सज्ज धावण्यासाठी,.."
तिला आजीचं हे सगळं बोलणं पटलं, पण अजूनही 'तुम्हाला इथे कोणी पाठवलं' हा प्रश्न अनुत्तरीतच होता.. तिने ताक पिताना मध्येच विचारलं "पण तुम्ही इथे कश्या..?"
आजी हसत म्हणाल्या, "रवी घरी आला होता.. सणवार आले की आईची आठवण येते म्हणाला.. आई असती तर हिची धावपळ आईने वाटून घेतली असती.. आम्ही पुरुष माणसं तसे एका स्त्रीला कमीच पडतो मदतीला, मग तिची चिडचिड होते.. सणवार असले की हमखास होते.."
त्याचं बोलणं ऐकून मी सांगितला त्याला माझा बिझनेस.. तो एकदम खुश. त्यानेच पत्ता दिला तुझा.. आनंदी राहा.. उद्या येतेच गरमागरम फराळ घेऊन" म्हणत आजी निघाल्या..
तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.. त्याच्या विरुद्ध त्रास देणारा महिषासुर डोळ्यातून वहायला लागला.. तिने त्याला व्हिडीओ कॉल केला.. पलीकडून तो समाधानाने हसत होता.. ती रडत म्हणाली, "तुझी देवी कशी दिसतेय साडीत ? तू सांगितलं नाहीस.."
तो डोळे मिचकावत म्हणाला, "अगदी सुंदर, महिषासुराचा वध करणारी.. म्हणजे माझा हं.."
तिने लाजत फोन कट केला.. मनाशी ती म्हणाली, 'तू नाही रे महिषासुर.. तू माझ्यातला महिषासुर मारला आहेस, गैरसमजाचा, रागाचा...' तिला सकाळचा त्याचा चेहरा आठवला ‘साडी सुंदर दिसते' असं सांगणारा, आणि ती मनाशीच लाजली...
लेखिका - स्वप्ना मुळे (मायी), औरंगाबाद
0 टिप्पण्या