Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

मित्राची आई ǀ सुभाष आ. मंडले

 

Mitrachi aai

मित्राची आई

आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे आपण जिथं घालवली, ते ठिकाण एकाएकी सोडून जाणं तसं अवघडच असतं आणि जर आपण आपल्या बालपण नावाच्या गोड झऱ्याचं पाणी त्या ठिकाणी प्यायलेलो असेल, तर ते ठिकाण आपल्या नसानसात भिनलेलं असतं. गावातील असंच एक ठिकाण आहे, की ज्या ठिकाणच्या आठवणी माझ्या मनाच्या स्मृतीपटलावरून सहजासहजी पुसल्या जाऊ शकत नाहीत.

वर्षातून किमान एक दोनदा गावी जाण्याचा योग येत असतो. बसमधून उतरून गावात शिरलो, की शेवटच्या टोकाला ग्रामदैवत मारूतीचं मंदिर लागतं. मारूतीच्या मंदिराला वळसा घालून पुढे जाताना पुर्वी कोपऱ्यावर पाण्याचा जुना आड होता. आता त्या ठिकाणी हातपंप आहे. त्या कोपऱ्यावरून पुढे जात असताना डाव्या बाजूला मान वळवून मी त्या घराकडे पाहतो. माझी शोधक नजर पुर्वी तिथं राहत असलेल्या माणसांचा कानोसा घेत असते. अलीकडच्या काही वर्षांत तिथे कोणीच राहत नाही. पुर्वी जे अंगण शेणाने चापून चोपून सारवून स्वच्छ ठेवले जात होते, तेच अंगण लांबून उखडलेला मुरूम, माती आणि कांग्रेस गवताने माखलेलं दिसतं. ज्या घराच्या अंगणात आपण खेळलो- बागडलो, त्याच अंगणात गुडघ्यापर्यंत वाढलेलं गवत पाहिलं की मन तीळतीळ तुटतं.

आज का कुणास ठाऊक कित्येक वर्षांनी माझी पावलं त्या वाढलेल्या गवतातून वाट काढत त्या पडक्या घराच्या दिशेने गेली. ज्या घराच्या चार भिंतीत घरातील सर्वांच्या सहवासात राहून संस्काराचे बाळकडू मिळालं, त्या घराच्या सर्व भिंती पडलेल्या; आता उरला आहे तो फक्त घराच्या सोप्याचा सांगाडा. तोही निर्जन अवस्थेत शेवटच्या घटका मोजत असलेला...काही क्षण त्या पडक्या भिंतीकडे मी तसाच पहात राहिलो. पुर्वी त्या घरातल्या भिंतीवर स्वातंत्र्य सैनिकम्हणून श्री. गोविंद बळवंत मोरे (बापू) यांच्या नावाचे प्रमाणपत्र दिसायचे. भिंतीतील फडताळ, त्या फडताळात असणारी पुस्तके, धार्मिक ग्रंथ, घरासमोरच्या कट्ट्यात रोवलेला पाण्याचा रांजण, बाजूला दगडाने रचलेली अंघोळीची न्हाणी, पावट्याच्या शेंगांचं आळं, त्यापुढे भवताली गुलमुसाची फुलांनी बहरलेली छोटी छोटी झाडं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळच्या फाटक्या परिस्थितीतही मायेची सावली देणारी आनंदाची आई. माझी माय... यापैकी कुणीही तिथं दिसत नव्हते. त्या ठिकाणाशी संबंधित सगळ्या गोष्टी आठवून उभं वारं सुटल्याचा भास मला होऊ लागला. काळजाला जखम व्हावी, तशा वेदना उराशी घेऊन मी तिथून परतलो.

माझ्या घराकडची वाट चालत असताना बालपणीच्या त्या रम्य आठवणींची चित्रफित नकळत डोळ्यांसमोर तरळू लागली. लहानपणी, गावातील मराठी शाळेत असताना वर्गमित्र हेमंत मोरे, नाथा (मारूती) देशमुख, प्रशांत बबन मोरे, दत्तात्रेय कोकरे, बाबूराव (हेमंत पितांबर मोरे), अभिजित पाटील, अंकुश लक्ष्मण मंडले, आनंदा मोरे आणि मी. असे आम्ही आठ नऊ जण रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी दुपारच्या वेळी जेवण करायला जायचो. बहुतेक वेळा सर्वांचे आई वडील शेतात गेलेले असायचे, त्यामुळे कधी संकोच वा मित्रांची घरं परकी वाटली नाहीत.

शनिवारी सकाळची शाळा असायची. मधल्या सुट्टीत इनमीन पंधरा वीस मिनिटे मिळायची; तीही खेळण्यात निघून जायची. मधल्या सुट्टीत कुणाच्या घरी जाऊन नाष्टा किंवा जेवण करायला वेळच मिळत नसायचा. त्यामुळे मधल्या सुट्टीत कुणीच घरी जात नसायचे. एखाद्या शनिवारी मी आनंदाच्या घरी जायचो. घरी गेलो की तुळशीरामदादा (भाऊ), ताई, गोविंदबापू (वडील),आणि आई (मंगल) अशा घरातील सर्वांसाठी चहा केलेला असायचा. मी चहा घेत नाही म्हणून आनंदाच्या आईने माझ्यासाठी दुधाने भरलेला ग्लास हमखास ठेवलेला असायचा. सुरूवातीला सारखं सारखं मित्राच्या घरी जायला संकोच वाटायचा, पण पुढे ते नेहमीचेच होऊन गेले.

थंडीचे दिवस होते. शनिवारची सकाळची शाळा होती.आनंदाने मधल्या सुट्टीत मला घरी येण्याचा आग्रह धरला, पण इतर मित्रांसोबत खेळण्यात मी दंग होऊन गेलो होतो. त्यामुळे मी नाही म्हणून सांगितले. पण त्याने “आईने बोलावलं आहे.” असे सांगितले. मग मात्र मला नाही म्हणता आले नाही. मी त्याच्यासोबत घरी गेलो.

आम्ही घराबाहेरच होतो. इतक्यात आमच्या दोघांचा आवाज ऐकून आईने आतूनच आवाज दिला, “ हात धुवूनच आत या.”

आम्ही इतर दिवशी दुपारी जेवायला घरी जायचो, त्यावेळी घरासमोरच्या रांजणातून डिचकीने पाणी काढायचो आणि एकमेकांच्या हातावर पाणी सोडून साबनाने हात धुवायचो. (जेवणाच्या आधी नियमित हात धुवायची सवय मला इथूनच लागली.) पण शनिवारी असं काही होत नसायचं. मग आजच का हात धुवायचे..? असा विचार माझ्या मनात आला, तरीही मी काहीही न बोलता आनंदा सोबत हात धुतले आणि घरात शिरलो. आईने कडईतला पदार्थ ताटात वाढायला सुरुवात केली. मी ओळखले, की आत्ता आपल्याला नाष्टा दिला जात आहे. मी संकुचित भावनेने, “मला नको. मी सकाळी घरी खावून आलोय.”, असं खोटं बोललो.

 आई आपुलकीने बोलल्या, “मक्याचा शिरा बनवला आहे. तुला आवडेल. तू पहिलं खाली बस तर खरं.”

(त्या पदार्थाचे नाव मक्याचा शिराकी मक्याचा चिवडाहे आत्ता नेमकं आठवत नाही.)

 माझ्यासाठी मक्याची चुलीच्या आरावर भाजलेली कणसंमाहीत होती. मोठ्या पातेल्यात शिजवलेली कणसंमाहीत होती, पण मक्याचा शिरा...!

माझ्यासाठी हा पदार्थ नवीनच होता. शिरा म्हणजे अर्थातच गोड पदार्थ असणार, त्यामुळे सुरवातीला नाही म्हणत असणारा मी! एका पायावर तयार झालो.

आणि खरोखरच मी पहिल्यांदाच असा इतका छान पदार्थ खाल्ला. मला तो आवडलाही होता, पण तरीही पुन्हा मागायचं धारिष्ट्य मला होईना. जेवढा दिला तेवढ्यावरच उरकून बाजूला होत असताना आनंदाने, “ याच्या ताटातलं संपलंय. आये! याला अजून थोडं दे.”

आंनंदाची आय, तेजं काय आयकु नगा. मी सकाळी घरात्न खावुन आलुय.”, मी.

मला आईंनी मायेनं जवळ घेतले आणि पाठीवरुन हात फिरवत मला विचारले,” मी आनंदाची आय हाय. मी तुजी आय नव्हं...?”

पुढे मला काय बोलावे तेच सुचेना. एक भावनिक साद घालत त्यांनी माझी बोलतीच बंद करून टाकली.

जणू काही माझी आणि त्यांची मागल्या जन्मीची ओळख असावी, अशा आपुलकीच्या भावनेनं त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्यातला संकोच किंवा आमच्यातल्या परकेपणाच्या सर्व भिंती कोसळून पडल्या. त्यावेळी आमचा माय लेकरांचा जोडलेला ऋणानुबंध आजही तितकाच घट्ट आहे. म्हणतात ना आनंदाचे क्षण वाऱ्यासारखे उडून जातात. अगदी तशीच काहीशी स्थिती आजमितीला माझी झाली आहे.

मधल्या काळात, आनंदाच्या मोठ्या भावाचा अॅक्सिडेंट, त्याचा दवाखाना, वडिलांचा मृत्यू, घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. अशा एकामागून एक मनोवस्था बिघडवणाऱ्या घटना घडल्या. यातच त्यांने व्यसनाला जवळ केले. त्यात इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसायही बुडाला. मला तो कधी रस्त्यात भेटला की, “घरी आईने बोलावलं आहे.”, असं प्रत्येक वेळी सांगायचा, पण “नंतर कधीतरी येईन.” असे म्हणून मी ते नेहमी टाळत गेलो. खरं सांगायचं म्हणजे आनंदाच्या व्यसनाधीनतेमुळे माझं मन त्या घरी जायला धजावत नव्हतं. आईचं सांत्वन कसं आणि कुठल्या शब्दांने मी करणार होतो?

एकदा पुण्यातून गावी जाताना  पहाटेच गावात पोहोचलो. मला दूरूनच आईने पाहिलं आणि आवाज दिला.  मी नाही होय करत त्या घरी गेलो. पहाटेची वेळ होती. बापूंच्या मृत्यूनंतर घराची झालेली दुरवस्था आणि आनंदाच्या वागण्यामुळे आईंना किती त्रास होत असेल. याची मला जाणीव होतं होती. त्यांना होणारा मानसिक ताण, त्यांच्या दुःखाच्या वेदनांना सावरणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. इतक्या वाईट मनस्थितीतून जात असतानाही त्या विषयी ब्र शब्दही त्यांनी काढला नाही, उलट हसऱ्या, प्रसन्न चेहऱ्याने माझी खूशाली विचारली. मी त्यांचा सख्खा ल्योक नाही, तरीही आपला मुलगा खूप दिवसांनी घरी आल्यानंतर जो आनंद आईच्या चेहऱ्यावर दिसतो. तो मला त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. आमच्या गप्पा चालू होत्या, तितक्यात आनंदाच्या पत्नीने आतून दुधाचा कप आणून दिला. मी ना अंघोळ, ना तोंड धुतले होते. अशा पारुषा अवस्थेत काहीही घ्यायची माझी इच्छा नव्हती, पण आईच्या प्रेमापुढे माझं काही एक चाललं नाही. मी गपगुमान दुध प्यायलो आणि आईंना नमस्कार करून मी जास्त वेळ न थांबता तिथून निघालो.   

काही दिवसांनी समजले की, कोरोनाच्या  काळानंतर आनंदा आजारपणामुळे गेला. माझा जिवलग मित्र आनंदा, स्वत:त चांगला बदल करण्याचा संकल्प शेवटी अपुर्णच ठेऊन गेला.

घराची वाट चालत असताना होऊन गेलेल्या सर्व आठवणींनी मनात चाललेल्या भावनांचे वादळ अजूनच जोर धरू लागले. मी डोळे गच्च मिटून घेतले आणि मनात चाललेल्या भावना कल्लोळाला शांत केले.

घरी जाताना कोकरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांचं रानातलं छोटंसं घर आहे. आनंदा गेला त्यावेळी त्या घराचं निम्मअधिक बांधकाम पूर्ण झाले होते. मी वाट वाकडी करून त्या दिशेने चालू लागलो. लांबून घराजवळ कुणी दिसतंय का पहात पुढे जात होतो. तितक्यात घराशेजारी जनावरांचा गोठा आहे. त्या गोठ्यातील जनावरांना पाणी पाजायला टाकीतून पाणी काढताना आई दिसली. मी त्यांना एक सुखद धक्का द्यावा, या उद्देशाने लांबूनच आवाज दिला,”आवरत्या का कळशी?”

माझा आवाज ऐकून पाण्याच्या टाकीवरची कळशी खाली घेत मागे वळून बघताना त्यांना चक्कर आल्यासारखं झालं. तोल सांभाळुन उभं राहण्याचा प्रयत्न करत असतानाच मी पळत जाऊन त्यांना सावरलं. मला पाहून त्यांच्या तोंडावर मायेचा उत्साह ओसंडून वाहू लागला. त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि “माझी आठवण यित्या व्हय, माज्या लेकरा.” असे म्हणून त्यांनी टाहो फोडला.

त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या काळजात चर्रर्र झालं. आतून मन भरून आलं. बाहेर सोडलेला श्वास पुन्हा आत घ्यायची इच्छाच होईना. आईंच्या मिठीत गुदमरून जावं, असं वाटू लागलं. अपराधीपणाच्या भावनेने आतून कोरडे हुंदाडे येऊ लागले. आनंदाला जाऊन दोन वर्षे झाली. तो गेला त्यावेळी मी त्यांना भेटलेलो. त्यानंतर मी तिकडे फिरकलो नव्हतो. त्यावर आजच भेट झाली होती.

त्यांच्यासोबत घरात गेलो. थोडा वेळ बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. ख्याली खुशाली विचारून झाली. आईंना बीपी, शुगरचा त्रास होतोय, पण त्यांनी एकदाही त्याबद्दल रडगाणे मांडले नाही; उलट दवाखान्यातून दिलेल्या मोठमोठ्या गोळ्या खाताना गळा आवळून धरल्यासारखा होतो, हे सांगतानाही त्यांनी अगदी हसत हसत सांगितलं.

गतकाळातील दुख:द गोष्टी आणि वयस्करपणातले आजारपण याने माणसाच्या मनाची काय अवस्था होत असेल, हे न विचारलेलंच बरं, पण आई त्याबद्दल सर्व काही अगदी हसत हसत सांगत होत्या. मनाला होत असलेल्या जखमा हसून झाकत होत्या.

नवरा व तरूण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणींनी होणाऱ्या वेदना आणि आजारपणाच्या दुखण्यातून मिळणारं रोजचं मरण आजही त्या हिंमतीने मागं सारत आहेत.

म्हातारपणीच्या आधाराची भक्कम काठी आहे, असे वाटत असणारा, करता सवरता ल्योक जगणं अर्ध्यावर सोडून गेला. मागं त्याची बायको व तीन साडेतीन वर्षांची मुलगी यांना सांभाळत आणि ॲक्सिडेंटमध्ये अधू झालेला थोरला मुलगा यांच्या संसाराला भक्कम आधार देत त्या जगत आहेत.

तिथून निघताना त्यांच्यासाठी जो खाऊ आणला होता तो मी त्यांच्या हातात दिला आणि नमस्कार करून भरल्या अंतःकरणाने मी तिथून निघालो. तिथून निघताना त्यांच्याकडून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांचं खूप सारं प्रेम मी सोबत घेऊन आलो. मला घालवायला त्या रस्त्यापर्यंत आल्या. खूप दूरवर जाऊन मी मागं वळून पाहिले, तर एका  हाताने तोंडावर पदर धरलेला आणि दुसरा हात निरोपासाठी  उंचावला होता. तोंड वळवून मी पुढे चालू लागलो आणि पुढच्या वळणावर वळण घेत मी त्यांना दिसेनासा झालो. माझ्या घराकडची वाट चालताना आईंना भेटल्यामुळे माझ्या मनावरचं कितीतरी मोठं ओझं हलकं झाल्यासारखं जाणवतं होतं.

या माऊलीने माझा बालपणीचा काळ सुखाचा केला, उन्हाळा पावसाळा हिवाळा अशा कोणत्याच ऋतूंचा आपल्या मनावर काहीच फरक पडत नसतो, तसा सुख- दुःख या भावनांचा स्पर्शही माझ्या मनाला होऊ दिला नाही. उलट माझ्या मनातील फुलझाडे सदा सर्वदा हिरवीगार, आनंदानें फुललेली, बहरलेली ठेवली.

मित्रा तुझ्यामुळे मला अजून एक आई मिळाली. या आईची माझ्यावरती जी माया, प्रेम आहे. त्यातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही...

-      सुभाष आ. मंडले , मो.नं. ९९२३१२४२५१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या