Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

पाऊस सखीच्या अंगणातला ǀ सीमा पाटील

Paus Sakhichya angnatala

ये दाटल्या नभा एक सांग... आज का रेंगाळत आहेस तिच्या दारी? खरं सांग... रिता होऊन तिथं, तिच्या अंगणातील थोडा मृधगंधाचा दरवळ घेऊन येणार आहेस का माझ्यासाठी? आधीच तिचे अंगण आंब्याच्या गर्द मोहराने, बाळकैऱ्यांनी, जाई, मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळून निघालेले आहे, सोबत सोनचाफ्याला कोण बहर आलाय बघ आणि त्या दरवळाला तुझी गळाभेट म्हणजे मृधगंधाच्या रेशमी गाठीत बांधून तू माझ्यासाठी आज कस्तूरीकुपीच घेऊन येणार तर...

अरे आहेच माझी सखी तशी गुपितांत लपलेली... संकटात हसलेली, एकांतात रडलेली पण भरभरून जगलेली... आणि मला माहित आहे, ती कधीच हरत नाही कारण ती आहे अंगार कष्टात फुलणारा... सुखात रमणारा आणि आनंदात झूलणारा आणि पदरात असूनही पदर न पेटवणारा... हो आहेच ती तशी...

तुला आजून निघू वाटत नाही का तिच्या अंगणातून... मी कधीचा वाट पहातो आहे तू येण्याची... गच्च भरल्या नभासोबत भारलेल्या नयनानी... क्षिणलेल्या मनाने... पण मला खात्री आहे, तू येशील नक्कीच येशील... त्या कस्तुरीकुपीतून, वाऱ्याच्या मंद झुळकी बरोबर झूलणारा गारवा घेऊन... आणि मा‍झ्याही अंगणात आगमनातील, त्याच सरी घोड्यांच्या टापांच्या सुरात मोती पेरीत आणि थुईथुई नाचू लागतील, गाऊ लागतील भान हरपून, फेर धरतील हर्षभराचा वेडावलेला... गारताशांच्या आवाजात. तरुवेलींना त्या पुरतं हालवून सोडतील. आणि गारव्याच्या शिरशिरीने क्षणभर का होईना सुखावेल चैत्राच्या ऊनाने अंगाची लाही लाही झालेली वसुंधरा! झाडांना नुक्तीच पालवी फुटलेली पोपटी पोपटी राघूपाने अनुभवतील पहिला वहिला पाऊस सोबतीला हसत हसत डोलतील वेलींवरील लांबच लांब हिरव्या रंगांनी नटलेले हिरवे तुरे! आणि पानाआड लपून बसतील पाखरे, भीतीने कापरे भरल्यागत, पण थोडाच वेळ! जेव्हा सरींचा जोर ओसरेल तेव्हा तिही दोस्ती करतील आपल्या पंखावर स्थिरावलेल्या मोत्यांशी आणि अलगुजात हरवून जातील इतक्या दिवसांच्या, नाहीच महिन्यांच्या विरहाच्या क्षणांना गंधभारल्या कवेत घेऊन!

आणि हिरव्यागार कैऱ्याआडून गर्द पानातून घुमणारा आमराईतला ‘कोकिळतान’ साद घालील माझ्या कृषिवलास जोडून ठेवलेल्या बी बिवळ्यांची, तिफणीची सोय करण्यासाठी, ऐनवेळी पेरणीसाठी धावाधाव नको म्हणून!

 तर नभा तू तसाच ये तुला हवा तसा सोबतीला घेऊन ‘धुंदभारला’ गंध आणि अंकुराला जोजवणारा पाऊस घेऊन माझ्या सखीच्या अंगणातला!

लेखिका : सीमा ह.पाटील, कोल्हापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या