
हायकू संबंधित काव्यप्रकार
१) हाईबुन२) सेनेरियू
३) टंका (ताँका)
५) रेनकू
हायकू हे मुख्यत: निसर्गपर असतात. त्यात तीन ओळी असतात वगैरे बाबी आपल्याला आता चांगल्या प्रकारे माहीत आहेत. मात्र हायकूच्या पुढे जाऊन जागतिक पातळीवर जे हायकूशी संबंधित काव्यप्रकार लिहिले जातात. त्यासंबंधी आपण आज जाणून घेणार आहोत..
१) हाईबुन
हा काव्यप्रकारही जपानी असून यामध्ये छोटे गद्य आणि पद्य एकत्र गुंफलेले असते. शिवाय या छोट्याशा गद्यामध्ये आत्मकथन, दैनंदिनी, लघुनिबंध, काव्य कथा किंवा प्रवासवर्णन असते. हाईबुन ही संज्ञा प्रथमतः मात्सुओ बाशो याने इ.स. १६९० आपला शिष्य क्योरई याला इ.स. वापरला. हाईबुनचा प्रणेता असलेल्या बाशोने आपल्या भन्नाट प्रवासा दरम्यानचे तपशील त्यात दिले. त्याचा प्रवासाशी संबंधित ‘ओकु नो होसोमीची’ (अरूंद रस्ता अंतरात) हा हाईबुन संग्रह प्रसिध्द आहे. ‘हट ऑफ द फँटम ड्वेलिंग’ (वेताळाची झोपडी) हा निबंध असलेला तर ‘सागा निक्की’ (सागा डायरी) हा दैनंदिनी असलेला हाईबुन संग्रह म्हणता येईल. पारंपरिक हाईबुनमध्ये लघुकथा किंवा एखाद्या वस्तूची, जागेची, व्यक्तीची माहिती किंवा वर्णन असते. नंतर ‘हाईकाई’ कवींनी ही परंपरा पुढे चालवली. त्यामध्ये योसा बुसान, कोबायाशी ल्सा, मासाओ का शिकी महत्त्वाचे कवी होत.
नमुना म्हणून आपण एक हाईबुन पाहू.
बिजागऱ्याहंटसविले या ब्रिंडल पर्वताचा पायथा आणि टेनेसी नदीच्या मध्ये असणाऱ्या प्रदेशाच्या दक्षिणपूर्व भागाला एकेकाळी ‘गॅ सेलिन अॅली’ (पेट्रोल गल्ली) म्हटले जात होते. पूर्वी तो भाग पेट्रोल पंपांनी गजबजला होता. परंतु तो आता पूर्ण उजाड, ओसाड झाला आहे. काही पंपाचे रूपांतर इतर धंद्यात झाले होते, जसे की किराणा, लाँड्री , शोरुम वगैरे. पण ते ही नामशेष झाले. आता फक्त गंज लागलेले लोखंडी सांगाडे उरले होते.
भूतशहर
सलून बिजागऱ्या
कररकर...!
- टेरील फ्रेंच
२) सेनेरियू
हा सुद्धा जपानी प्रकार असून रचनाबंध हायकू सासखाच ३ ओळींचा असतो. मात्र भाव व्यंगात्म किंवा विनोदी असतो. त्यातून मानवी अपप्रवृत्तीवर उपरोधिक भाष्य केलेले असते.
उदा.
तेरा हायकू
समझ में नै आता
पढूँ कायकू?
- डॉ. संजय बोरुडे
३) टंका (ताँका)
टंका म्हणजे हायकूच असतो फक्त त्याला तीन ओळीच्या नंतर दोन ओळींची, सात अक्षरांची एक द्विपदी जोडलेली असते. यातील हायकूमध्ये निरीक्षण तर द्विपदीमध्ये परिणाम किंवा प्रतिबिंब अपेक्षित असते.
उदा.
बाकावर त्या
कप आईचा होता
रिकामा रिता
भरलाय पानांनी
पावसाच्या थेंबांनी... !
- शैला बटरवर्थ
याखेरीज ‘रेंगा’ आणि ‘रेनकू’ हे काव्यप्रकारही लोकप्रिय आहेत.
४) रेंगा (रेंगे) :
हा प्रकार दोन किंवा तीन कवींनी मिळून लिहावा लागतो. यात तीन ओळी, दोन ओळींचा किंवा सहा सात ओळींची कविता असते. दोन कवी लिहित असतील तर त्यासाठी A-3, B-2, A-3 किंवा B-2, A-3, B-2असा पॅटर्न असतो. तिघे लिहित असेल तर A-3, B-2, C-3 असा किंवा A-2, B-3, C-2 असा असतो. पहिल्या कवीने तीन ओळींचा हायकू किंवा कविता लिहिली की दुसर्याने दोन ओळींची लिहावी. त्यानंतर तिसर्याने तीन ओळींची.. याप्रमाणे एका आड एक अशी कडव्यांची रचना असते. सहा कडव्यांची कविता असावी. मात्र यात पहिल्या कडव्याशी निगडीत तिसर्या कडव्याच्या ओळी, अर्थ असावा. थोडक्यात साखळी पद्धतीने हा प्रकार लिहायचा असतो. हा प्रकार अमेरिकन कवी गॅरी गे याने १९९२ च्या उन्हाळ्यात शोधला.
उदा.
वाळूची पेटी
पाकळ्या पडतात
छोट्या कपात (रॉन सी.मॉस)
कामकरी मधमाशांनी पुन्हा
मध साठवायला सुरुवात केली (जॉन स्टीव्हन्सन)
आई आणि मुलगी
सारखेच गीत गुणगुणताहेत
संपूर्ण दिवसभर..(पोलोना ओब्लाक)
सुंदर हॅटसची रांग टांगलेली
गुंड्या दोऱ्यांनी बांधलेली (केरन सीजर)
५) रेनकू :
‘रेनकू’ म्हणजे जोडलेले आणि ‘रेंगा’ म्हणजे जोडलेले श्लोक किंवा ओळी. हा प्रकारही दोन तीन कवींनी एकत्र येऊन लिहायचा असतो. परंतु दोन्हींमध्ये फरक आहे. तो अधिक अभ्यासाने लक्षात येऊ शकतो.
उदा.
आनंदाने स्मित करणारी मुलगी
हातात कपभर हिम
चंद्र डोळ्यांची मुलगी (जॉन)
अर्धी बरणी संपलेली
आल्याच्या जॅमची...(कैरोल)
रस्त्या लगतचे दुकान
पायरीवरच्या कलाकाराने
मला माझी सही मागितली..(मायकेल)
फिकट चमक आकाशात
सूर्यास्तापूर्वी (अॅलन)
पहिली थंडगार रात्र
गंधसरुचा सुवास
पूर्ण रजईमध्ये (हॉर्टेन्शिया)
टप, टप आणि टप
पानझडीची सुरुवात
या लेखातील मूळ इंग्रजी रचनांचा अनुवाद मी केला असून संदर्भासाठी ब्रिटीश हायकू सोसायटीचे जर्नल आणि शेफिल्डच्या ‘प्रेझेन्स’, ब्रिटीश सोसायटी ऑफ हायकूच्या ‘कोकाको’ या अंकांचा उपयोग केला आहे.
- डॉ. संजय बोरुडे, अहमदनगर.
संपर्क : ९४०५०००२८०
0 टिप्पण्या